Skip to main content

बीड : १३ वर्षीय पीडितेची न्यायासाठी २४ तास फरफट; रात्रभर पोलीस स्टेशन, दिवसभर रुग्णालयात ताटकळत ठेवलं...

Article in Marathi
Sukeshani Naikwade
28 May 2026
133 views
बीड : १३ वर्षीय पीडितेची न्यायासाठी २४ तास फरफट; रात्रभर पोलीस स्टेशन, दिवसभर रुग्णालयात ताटकळत ठेवलं...

सुकेशनी नाईकवाडे, बीड 


  •  बीड जिल्ह्यातील केज येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या गंभीर घटनेनंतर प्रशासनाच्या असंवेदनशील कारभाराचा धक्कादायक चेहरा समोर आला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये आणि वैद्यकीय तपासणीसाठी तब्बल दहा तास रुग्णालयात थांबवण्यात आलं. 


  • “पीडितेला संवेदनशीलतेने वागवण्याऐवजी प्रशासनाने मानसिक छळ केला,” असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी बीडमधील केज येथे घडलेल्या प्रकरणानंतर केला आहे. 


  •  पीडितेला वेळेवर मदत न मिळाल्याने आणि तिला तणावात ठेवण्यात आल्याने सामाजिक संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.


बीड जिल्ह्यातील केज येथे घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. आधीच गंभीर प्रकाराच्या मानसिक धक्क्यात असलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन पीडितेला न्याय मिळवण्यासाठी अक्षरशः प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा सामना करावा लागला. एका बाजूला पोलीस स्टेशनमध्ये रात्रभर थांबावे लागले, तर दुसऱ्या बाजूला वैद्यकीय तपासणीसाठी तब्बल दहा तास उपजिल्हा रुग्णालयात ताटकळत बसवण्यात आले. या घटनेमुळे पोलीस आणि आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. 


User Image


काय आहे नेमकी घटना? 


केज तालुक्यातील एका गावात उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मामाच्या गावी आलेली १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी झोपलेली असताना तिच्याच चुलत मामे भावाने तिच्याशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी अचानक घरात आला आणि “आज्जी कुठे आहे?” अशी विचारणा केली. पीडितेने आज्जी शेतात सरपण आणण्यासाठी गेल्याचं सांगितलं. त्यानंतर आरोपीने घराची कडी आतून लावली. घाबरलेल्या पीडितेने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. “असं का करतोयस?” असे विचारत तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने तिचे तोंड रुमालाने बांधले, हात पकडून खाली पाडले आणि तिच्यावर बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता, ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.


तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये रात्रभर प्रतीक्षा


या घटनेनंतर पीडित मुलगी प्रचंड घाबरलेली होती. आरोपीच्या धमकीमुळे काही काळ ती शांत राहिली. मात्र तिच्या वागण्यात झालेला बदल लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी विचारपूस केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. यानंतर पीडितेचे कुटुंब रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास केज पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. मात्र तेथेही त्यांना तातडीने मदत मिळाली नाही. तक्रार नोंदवण्यासाठी आणि गुन्हा दाखल करण्यासाठी पीडितेच्या कुटुंबाला संपूर्ण रात्र पोलीस स्टेशनमध्ये थांबावे लागले. पहाटे पाच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. एका अल्पवयीन मुलीला आणि तिच्या कुटुंबाला रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये जागून काढावी लागल्यामुळे बीडमध्ये संताप व्यक्त केला जातोय. 


 वैद्यकीय तपासणीसाठी तब्बल १० तास प्रतीक्षा


गुन्हा दाखल झाल्यानंतर सकाळी वैद्यकीय तपासणीसाठी पीडितेला केज येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तेथेही प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आला. महिला स्त्रीरोगतज्ञ उपलब्ध नसल्याचे कारण सांगत सकाळी ११ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत पीडितेला रुग्णालयात ताटकळत ठेवण्यात आलं. एका अल्पवयीन पीडितेला तातडीने वैद्यकीय तपासणी, उपचार आणि मानसिक आधार मिळणे अत्यंत आवश्यक असताना तब्बल दहा तास थांबवून ठेवण्यात आलं. रुग्णालयात पीडित मुलगी, तिची आई आणि कुटुंबीय दिवसभर अस्वस्थ अवस्थेत बसून होते. डॉक्टर कधी येणार, तपासणी कधी होणार, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती त्यांना मिळत नव्हती.


User Image


“पीडित मुलीचा दोन दिवस मानसिक छळ” - मनीषा तोकले यांचा संताप  


महिला सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले यांनी या संपूर्ण प्रकरणावर बाईमाणूसशी बोलतांना संतप्त प्रतिक्रिया देत प्रशासनाच्या वागणुकीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्या म्हणाल्या  “दोन दिवस आणि एक रात्र सतत तणावात राहिलेलं हे १३ वर्षांचं लेकरू अन्याय झाल्यापासून दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजेपर्यंत प्रचंड मानसिक तणाव आणि ट्रॉमामध्ये होतं. या काळात ती तिच्या पालकांसोबत पोलीस स्टेशनला गेली असता, संध्याकाळपासून पहाटे ५ वाजेपर्यंत तिला तिथे बसवून ठेवण्यात आलं आणि पहाटे एफआयआर देण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पोलीसांकडून उद्धट वागणूक, अपमानास्पद बोलणं आणि असंवेदनशील व्यवहार करण्यात आला. रात्रभर झोप नाही, जेवण नाही, पाणी नाही अशा अवस्थेत त्या मुलीला ठेवण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता मेडिकलसाठी रुग्णालयात आणल्यानंतरही रात्री ९ वाजेपर्यंत केवळ महिला डॉक्टर उपलब्ध नसल्याचं कारण देत तिला ताटकळत ठेवण्यात आलं.


आधीच मानसिक धक्क्यात असलेल्या मुलीकडे लोक वेगळ्या नजरेने पाहत होते, कर्मचारी उद्धटपणे वागत होते. हा सगळा प्रकार अत्यंत अमानुष आहे. कायद्यानुसार अल्पवयीन मुलींना अशा पद्धतीने पोलीस स्टेशनमध्ये ठेवता येत नाही, तसेच त्यांच्या मानसिक स्थितीचा विचार करून संवेदनशीलतेने प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असते. मात्र पोलीस आणि आरोग्य यंत्रणेने पोक्सो कायद्याचे नियम धाब्यावर बसवत त्या मुलीचा आणि तिच्या कुटुंबाचा मानसिक छळ केला. या प्रकरणातील दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे,” अशी मागणी मनीषा तोकले यांनी केली. 


“प्रशासनाने पोक्सो कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केले” - तत्त्वशील कांबळे  


बालहक्क कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांनी बाईमाणूसशी बोलतांना या प्रकरणावरकाही गंभीर प्रश्न उपस्थित केले. “१३ वर्षीय मुलीसोबत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र त्यानंतर प्रशासनाने ज्या पद्धतीने वागणूक दिली, ते अधिक धक्कादायक आहे. पीडितेला रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये थांबवून पहाटे ५ वाजता एफआयआर देण्यात आला, तर मेडिकलसाठी पूर्ण दिवस घालवावा लागला. पोक्सो कायद्यानुसार अशा अल्पवयीन मुलीचे जबाब तिला ज्या ठिकाणी सुरक्षित वाटेल, तिच्या घरी किंवा अन्य सुरक्षित ठिकाणी महिला पोलिसांनी घेणे अपेक्षित असते. तसेच महिला डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करणे, पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करणे, ही सर्व प्रक्रिया कायद्यात नमूद आहे. मात्र या प्रकरणात त्या मुलीला दिवसभर उपाशी-तापाशी थांबवून ठेवण्यात आले.


डॉक्टर उपलब्ध होईपर्यंत तिला रुग्णालयात बसवून ठेवणे हा देखील मानसिक छळाचाच प्रकार आहे. तिच्या प्रकृतीची, मानसिक स्थितीची किंवा तिला विश्रांतीची गरज आहे का, याचाही विचार प्रशासनाने केला नाही. उलट दिवस-रात्र त्या मुलीला तणावात ठेवण्यात आले. त्यामुळे बाल हक्क आयोग आणि मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची तात्काळ गंभीर दखल घेऊन जे अधिकारी व कर्मचारी दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी तत्त्वशील कांबळे यांनी केली.


User Image


प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह


या घटनेमुळे केजसह संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक संघटना, महिला कार्यकर्ते आणि बालहक्क कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका निष्पाप मुलीला न्याय मिळवण्यासाठी इतक्या यातना सहन कराव्या लागणे, हे कोणत्याही सुसंस्कृत समाजाला काळिमा फासणारे असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. एका बाजूला शासन महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी मोठमोठ्या घोषणा करत असताना, प्रत्यक्षात मात्र पीडितांनाच अमानुष वागणूक मिळत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात कोणत्याही अल्पवयीन पीडितेला अशा प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक यातना सहन कराव्या लागू नयेत यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रशासनाने या घटनेकडे केवळ एक गुन्हा म्हणून न पाहता, एका अल्पवयीन मुलीच्या वेदनेचा आणि तिच्या कुटुंबाच्या संघर्षाचा विचार करून संवेदनशीलतेने पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.


Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...