अप्सरा आगा
- पुण्याच्या रविवार पेठेतील बोहरी आळी ही शहरातील सर्वात जुन्या आणि ऐतिहासिक बाजारपेठांपैकी एक म्हणून ओळखली जाते.
- पेशवेकालीन इतिहास, कारागिरांची परंपरा आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यापार यामुळं या परिसराला आजही वेगळी ओळख आहे.
- अरुंद गल्ल्या, हार्डवेअरची दुकानं, लाकडी काम करणारे कारागीर आणि जुन्या वास्तूंमधून बोहरी आळी जुन्या पुण्याचा जिवंत चेहरा दाखवते.
- ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांनी ‘कारागिरांची पंढरी’ म्हणून उल्लेख केलेल्या या बोहरी आळीवरील ‘बाईमाणूस’ने केलेला हा सविस्तर ग्राउंड रिपोर्ट.
स्वारगेटच्या गर्दीतून वाट काढत पेशवेकालीन रविवार पेठेत शिरलं, की जणू एका वेगळ्याच दुनियेत पाऊल पडतं. ही नुसती खरेदीची बाजारपेठ नाही बरं का, तर काम करणाऱ्या हातांची आणि पिढ्यानपिढ्या कौशल्य जपणाऱ्या माणसांची जिवंत 'कारागिरांची पंढरी' आहे. इथल्या अरुंद गल्ल्यांमध्ये जसा शेकडो वर्षांचा व्यापार चालतो, तसाच हिंदू-मुस्लिम संस्कृतीचा गोड सलोखाही पाहायला मिळतो. ज्येष्ठ लेखक डाॅ. अनिल अवचटांच्या 'पुण्याची अपूर्वाई' पुस्तकातून सांगणाऱ्या आणि आजही तितक्याच व्यापारी ऊर्जेनं गजबजलेल्या या बोहरी आळीचा 'बाईमाणूस'ने केलेला हा सविस्तर ग्राउंड रिपोर्ट.
पुण्याच्या स्वारगेट परिसरातून साधारण दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेली रविवार पेठेतील ऐतिहासिक बोहरी आळी. स्वारगेटपासून तीन किलोमीटर अंतरावर पोहचण्यासाठी अर्धा तास गेला. कारण तिथंपर्यंत जायचं म्हटलं की, गर्दीतून वाट काढत जावं लागतं, हे ठरलेलंच. कारण पेशवेकालीन पेठांमध्ये शिरलं की, त्या पेठा कधी मोकळ्या दिसणार नाहीत. तिथं असणारे विविध दुकाने, स्टाॅल, भाजीमंडी, विविध घरगुती आणि सजावटीचे साहित्य अशा वस्तूंनी आणि कापड बाजारांनी या पेठा कायम गजबजलेल्याच असतात. इथं लोकांची खरेदीसाठी कायमच गर्दी असते.
(रविवार पेठेतील बोहरी आळी Photo Credit - Apsara Aga)
पुण्याच्या शनिवारवाडा, तांबडी जोगेश्वरी या भागातून येणाऱ्या अरुंद गल्ल्यांमधून वाट काढत जेव्हा आपण रविवार पेठेत येतो, तेव्हा एका वेगळ्याच दुनियेत पाऊल ठेवल्यासारखं वाटतं. कानावर पडणारा हातोड्यांचा आवाज, खिळ्यांची आणि साखळ्यांची खणखण, लाकूड कापल्यानंतर येणारा भुस्याचा वास... हीच ती पुण्याची प्रसिद्ध 'बोहरी आळी'. जुन्या भागातील रविवार पेठेच्या परिसरात वसलेली बोहरी आळी, ही केवळ एक बाजारपेठ नाही, तर ती पुण्याच्या कारागिरीची, कौशल्याची आणि उद्यमशीलतेच्या इतिहासाचा एक पुरावाच आहे.
गजबजलेल्या बाजारपेठेतून दिसतं बोहरी आळीचं वेगळेपण
बोहरी आळीत पाऊल टाकताच सर्वप्रथम दिसतात इथल्या गजबजलेल्या बाजारपेठा. दुकानांच्या बाहेर अगदी छतापर्यंत टांगलेल्या वस्तू, लाकूडकामासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या आकाराच्या करवती, लाकूड गुळगुळीत करणारे रंधे, जड हातोडे, शेकडो प्रकारचे खिळे, स्क्रू, अत्याधुनिक ड्रिल मशीन, मोठमोठी कुलपे, दाराच्या कड्या, रंगकामाचं ब्रश आणि डबे, विद्युत उपकरणं, चकचकीत पितळी सामान, काय नाही इथे? एखाद्या सामान्य माणसाला या वस्तूंची नावेही माहिती नसतील; पण माझ्या बाजूनंं भरउन्हात पाठीवर पोतं घेऊन जाणाऱ्या कारागिरासाठी मात्र ही त्यांच्या उपजीविकेची साधनं आहेत.

दुपारचे दीड-दोन वाजले असतील, मी एका दुकानाच्या ओट्यावर बसून बघत होते. एक माणूस आला, त्यांनी दुकानदाराला कोणत्याही भाषेचा वापर न करता हाताने इशारा केला. दुकानदारानं पण एका सेकंदात एक डबा काढला आणि एक स्क्रू त्यांना दिला. हा संवाद आपल्याला, कोणत्याही मॉलमध्ये किंवा ऑनलाईन शॉपिंगमध्ये कधीच दिसणार नाही. त्यामुळेच बोहरी आळी ही केवळ खरेदीची जागा नसून, कामाला आकार देणाऱ्या साहित्याचे, विविध वस्तुंचे भांडार आहे.
पिढ्यानपिढ्या जपलेला लाकडी फ्रेम्सचा व्यवसाय
मी आळीत पुढे सरकले. एका छोट्या दुकानात लाकडाच्या चौकटी आणि भरपूर अशा फ्रेम्स दिसल्या. तिथंच एक त्या दुकानातील कामगार एका फ्रेमला फिनिशिंग करत होता. त्यांचं नाव रमेश सुतार. ते सांगतात,
'आम्ही बढाई समाजाचे. आम्ही या भागातले खूप जुने रहिवासी. जवळपास ७० वर्षांपासून आमचा परिवार लाकडी फ्रेम्स बनवण्याचा आणि विकण्याचा धंदा करतोय. माझे पणजोबा, आजोबा-आजी आणि आता आमची आई, जी आता ८० वर्षांची आहे. आम्ही सगळे मिळून याच व्यवसायात आहोत.
हा आमचा कौटुंबिक व्यवसायच बघा. पूर्वी पूर्णपणे लाकडावर हातानं काम करावं लागायचं. खूप कष्ट होते, वेळ लागायचा. आता काळ बदललाय, तंत्रज्ञान आलं. आम्ही आता रेडिमेड एमडीएफ बोर्ड वापरतो, त्यांना आकर्षक रंग देऊन, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये फ्रेम्स तयार करतो. आमच्या फ्रेम्समध्ये गणपती, गौरी, लग्न, देवघर, पूजा आणि इतर सजावटीच्या फ्रेम्स असतात. आमच्या दुकानाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व जाती-धर्मातील लोक प्रेमानं आमच्याकडून फ्रेम्स बनवून घेऊन जातात. आम्हाला पण त्याचं समाधान वाटतं."
(बढाई समाजाचे रमेश सुतार Photo Credit - Apsara Aga)
ते पुढे सांगतात, 'एका काळी आमच्या समाजातली अनेक कुटुंबे या एकाच लाईनमध्ये हा व्यवसाय करत होती. आता दुर्दैवानं कमी लोक राहिलेत. नव्या पिढीला या कष्टात रस नाही. तरीही आम्ही आमच्या परंपरेला जप्त आहोत. सर्व धर्म, सर्व जाती यांच्यातील सलोखा आणि प्रेम आमच्या या व्यवसायात आजही जिवंत आहे. हीच आमची खरी ओळख."
बोहरी आळीचे नाव कसे पडले?
खरंतर बोहरी आळीचा इतिहास पेशवेकालीन आहे. १८ व्या शतकात म्हणजे साधारण १७५० च्या आसपास पेशव्यांनी पुण्याला एक प्रमुख व्यापार केंद्र बनवण्यासाठी देशभरातून विविध व्यापारी, कारागिरांना पुण्यात येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यात गुजरात आणि इतर भागांतून दाऊदी बोहरा समाजाचे व्यापारी पुण्यात आले. रविवार पेठेतील या भागात स्थायिक झाले. त्यांच्या नावावरूनच या गल्लीला बोहरी आळी हे नाव पडले, असे इथले व्यापारी सांगतात. या समाजानं या परिसरात जी दुकानं उभारली आणि जी व्यावसायिक संस्कृती रुजवली, त्यामुळेच या संपूर्ण परिसराला एक वेगळी आणि स्वतंत्र ओळख मिळाली.
इथले रस्ते अरुंद आहेत, दुकाने एकमेकांना लागून उभी आहेत, ग्राहकांची सततची वर्दळ असते आणि वाहनांची ये-जा सुरु असते. पण या गर्दीत आणि कामाच्या गडबडीतही एक शिस्त मात्र असते. प्रत्येक दुकानात मालाची मांडणी योग्यरित्या दिसते. बोहरी व्यापाऱ्यांचे ग्राहकांशी बोलणंही नम्र आणि आदराचे असते. त्यांच्या या व्यावसायिक पद्धतीमुळेच ग्राहकांचा पिढ्यान् पिढ्या त्यांच्यावर विश्वास आहे.
पेशवेकालीन सैफी मशीद
बोहरी आळीत फिरत असताना, तिथल्या इतिहासाची एक भव्य सैफी मशीद बघायला मिळते. गजबजलेल्या बाजारपेठेच्या मध्यभागीच असलेली ही मशीद आहे. बकरी ईदनिमित्त (२७ मे २०२६) मशिदीला सजावट करण्याचं काम सुरु होतं. तिथंच मशिदिच्या बाहेर बसलेले सज्जाद शेख सांगतात,
"सैफी मशीद ही बोहरी आळी येथे असलेली दाऊदी बोहरा समाजाची मुख्य मशीद आहे. ही जागा केवळ धार्मिक इबादतीचे स्थान नाही, तर इतिहास आणि वास्तुकलेचा संगम आहे. ही मशीद दाऊदी बोहरा समाजाचा प्राचीन वारसा आहे. याचा इतिहास थेट मराठा साम्राज्य आणि पेशवेकाळाशी जोडलेला आहे. जेव्हा पेशव्यांनी व्यापाऱ्यांना पुण्यात येऊन स्थायिक होण्याचे आवाहन केले, तेव्हा बोहरी समाज इथे आला. अनेक शतकांपासून ही मशीद आमच्या समाजाच्या धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचे केंद्रस्थान राहिली आहे."
पुढे ते सांगतात, "यात भारतीय, इस्लामी आणि नियो-क्लासिकल पाश्चात्य वास्तुकलेचा सुंदर मिलाफ दिसून येतो. मशिदीच्या कोपऱ्यांवर उभे असलेले मनोहर मिनार आणि भव्य घुमट याची शोभा वाढवतात. तुम्ही जर बारकाईनं पाहिलं, तर खिडक्या, दरवाजे आणि खांबांवर केलेले उत्कृष्ट लाकडी कोरीवकाम हे या मशिदीचे मुख्य आकर्षण आहे. मशिदीच्या आतल्या बाजूला कुराणातील आयते आणि फुलांच्या डिझाईन्स अत्यंत कलात्मक पद्धतीने कोरल्या आहेत. मशिदीच्या त्या शांत वातावरणात उभे राहिल्यावर बाहेरच्या बाजारपेठेतील किलबील काही काळासाठी नाहीसी होते."
(पेशवेकालीन सैफी मशीद Photo Credit - Apsara Aga)
"रोजगारासाठी राजस्थानहून पुण्यात आलो..." - काईद जोहर
हे दुकान सोडलं आणि पुढं काही अंतरावर गेले, तिथं तर स्टील आणि जर्मन ची खुपसारी बाहेर मांडलेली भांडी दिसली. तिथं त्यांच्या दुकानातं गेले. दुकानाच्या मालकाचे नाव काईद जोहर. ते सांगतात,
"हे आमचं जर्मन स्टील भांड्याचं दुकान. आमचे दादाजी राजस्थानहून व्यापार करत , पायपीट करत चालत पुण्याला आले होते. एका गावातून सामान घ्यायचं आणि दुसऱ्या गावात विकायचं, असं करत करत ते इथे पोहोचले. पुण्यात आल्यावर सुरुवातीला त्यांनी गणेश पेठेत किराणा मालाचं दुकान सुरु केलं. हळूहळू आमचे लोक रोजगारासाठी पुण्यात येऊ लागले आणि याच पेठेत थांबले. एका दुकानाची दोन झाली, दोनची तीन झाली. असं करत आम्ही व्यवसाय वाढवला."
त्यांना मी विचारलं की, 'तुम्ही जुनी रविवार पेठ बघितली, तेव्हा कसं होतं वातावरण? आणि आता कसं? यावर ते सांगू लागले, "रविवार पेठ पूर्वी खूप वेगळीच होती. तेव्हा इथं छोटे छोटे गल्लीबोळ होते. वरती राहिला घर असायचं आणि खाली दुकान चालवायचं, अशीच पद्धत होती. जुन्या प्रकारच्या इमारती होत्या, वाडे होते. आता मात्र खूप बदल झालाय. रस्ते रुंद झालेत, गाड्या-वाहनं वाढलेत, इलेक्ट्रॉनिक सामान आलंय. काही जुन्या इमारती अजून दिसतात, पण बरेच नवीन बांधकाम पण झालंय. तरीही, एक गोष्ट मात्र बदललेली नाही, इथला पारंपरिक व्यापार."
(राजस्थानाहून पुण्यात आलेले काईद जोहर Photo Credit - Apsara Aga)
कोणत्याही धर्माचा सण असो, बोहरी आळीत गर्दीच गर्दी
बोहरी आळी परिसरात अनेक वर्ष राहिलेले अन्वर शेख यांनी मला या पेठेच्या अनेक अनोख्या आणि जुन्या गोष्टी सांगितल्या. ते सांगतात,
"रविवार पेठ हा अतिशय ऐतिहासिक आणि महत्त्वाचा परिसर. पूर्वी होता आणि आजही आहे. रविवार पेठेत जशी ही बोहरी आळी आहे, तशीच शेजारी पांडी आळीही आहे. कधीकाळी अख्ख्या पुण्याची कपड्याची मुख्य बाजारपेठ ही रविवार पेठच होती. आता ती बाजारपेठ लक्ष्मी रस्त्यावर स्थलांतरित झालीये. बाजारपेठेच्या दृष्टीने रविवार पेठ महत्त्वाची होती. खरं सांगायचं तर बोहरी आळी ही हिंदूंचा सण असो, मुस्लिमांचा असो वा ख्रिश्चनांचा नेहमीच गजबजलेली असे. आजही ती तशीच गजबजलेली दिसते."

ते पुढे सांगतात, "या बोहरी आळीत दाऊदभाई अब्दुल अली आणि कासमजी इब्राहिम नगरवाले या दोघा बोहरी व्यापाऱ्यांची जुनी दुकानं होती. ते चोपडे बनवायचे. चोपडे म्हणजे जुन्या काळातील विशेष प्रकारचं, लाल कव्हर असलेलं मोठं हिशोबाचं पुस्तक. मारवाडी, गुजराती आणि हिंदू व्यापारी मंडळी आपल्या व्यावसायाच्या अकाउंटसाठी हेच चोपडे वापरायचे. हे चोपडे बनवण्याचं खास कौशल्य फक्त या बोहरी दुकानदारांकडेच होतं, ते दुकान आता नाही.तसेच 'चोपड्यासाठी ऑर्डर देण्याची एक खास परंपरा होती. दिवाळीच्या पंधरा दिवस आधी मुहूर्त पाहून हिंदू व्यापारी ऑर्डर द्यायला यायचे. ऑर्डर देणारा व्यापारी डोक्यावर गांधी टोपी घालून, नवीन कपडे घालून मानाने दुकानात यायचा. बोहरी दुकानदार त्या हिंदू व्यापाऱ्याचे स्वागत करायचे, त्यांना हार घालायचे, ओवाळून घ्यायचे. जेव्हा चोपडे तयार व्हायचे, तेव्हा ते घेतानाही हिंदू व्यापारी पूजा करून, विधी करूनच ते ताब्यात घ्यायचे. त्यानंतरच ते चोपडे दिले जायचे."
चोपड्यांची अनोखी परंपरा...
अन्वर शेख पुढे सांगतात, "त्या चोपड्यांमध्ये हिंदू पंचांग, मुस्लिम पंचांग आणि इंग्रजी तारीख या तिन्ही गोष्टी एकत्र छापलेल्या असायच्या. शिवाय, त्या चोपड्याच्या पहिल्या पानांवर लक्ष्मी, सरस्वती, गणपती यांच्या सुंदर छायाचित्रांचा समावेश असे. बनवणारा मुस्लिम बोहरी समाज, वापरणारा हिंदू-मारवाडी समाज, आणि आतमध्ये सर्व धर्मांची पंचांग, हे दृश्य रविवार पेठेच्या सौंदर्याचे, इथल्या मातीचं एक अनमोल पैलू होतं. बोहरी समाज धार्मिक असला तरी सर्व धर्मांशी त्यांचा स्नेहपूर्ण संबंध होता. धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक एकोपा याचं यापेक्षा जिवंत उदाहरण दुसरं काय असू शकतं? एकमेकांच्या सणांत सहभागी होणे, एकमेकांचा आदर करणं आणि व्यवहारातही सौहार्द राखणं, ही भावना आजही या आळीत दिसते."

इथे अनेक दुकानं पिढ्यान् पिढ्या चालत आलेली आहेत. इथल्या दुकानमालकांना त्यांच्या मालाची जितकी जाण आहे, तितकीच ग्राहकांच्या गरजांचीही आहे. इथे एक वेगळाच अनुभव येतो. ग्राहक एखादी वस्तू घ्यायलाआला की, फक्त ती विकून पैसे खिशात टाकणं आणि मोकळं होणं, अशी पद्धत इथल्या दुकानदारांची नाही. ते ग्राहकाला चांगली वागणूक देतात. आपल्या दुकानात काही वस्तू नसेल तर तो दुकानदार दुसऱ्या दुकानाचे नाव सांगून ग्राहक तेथे पाठवतो. हाच त्यांचा प्रामाणिकपणा दिसून येतो. खरंतर आजच्या मोठ्या स्पर्धेच्या युगात, जिथं मॉलमध्ये प्रत्येक वस्तूवर बारकोड असतो मात्र, माणसाशी संवाद नसतो, तिथं बोहरी आळीतल्या व्यवहारात विश्वास आणि संवाद कायम दिसतो. विश्वासामुळे बोहरी आळीचा अनुभव इतर कोणत्याही आधुनिक बाजारपेठांपेक्षा पूर्णपणे वेगळा ठरतो.
‘कारागिरांची पंढरी’
डाॅ. अनिल अवचट बोहरी आळीला ‘कारागिरांची पंढरी’ म्हणतात. जसे वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी, आत्मिक सुखासाठी श्रद्धेनं पंढरपूरची वारी करतात; तसंच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कारागीर, कष्टकरी आणि तंत्रज्ञ आपल्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या साधनांच्या शोधात, आपल्या उपजीविकेच्या वारीसाठी या बोहरी आळीत येतात. त्यांच्या दृष्टीनं ही केवळ एक बाजारपेठ नसून प्रेरणेचं, कौशल्याचं आणि परंपरेचं पवित्र केंद्र आहे. तसेच महान उर्दू आणि फारसी कवी मिर्झा असदुल्ला खान गालिब यांच्या स्मरणार्थ या चौकाला मिर्झा गालिब चौक असं नाव देण्यात आल्याचे लोक सांगतात. जुन्या पुण्याच्या या भागात मुस्लिम आणि बोहरा संस्कृतीचा मोठा प्रभाव असल्यामुळं, तसेच या परिसराची रचना आणि वास्तुकला जुन्या काळातील उर्दू संस्कृतीची आठवण करून देणारी असल्यामुळं हे नाव देण्यात आल्याचे बोललं जातं.
जुन्या मंदिरांचेही आकर्षण
पुढे, बोहरी आळीतील विविध जुन्या आणि इतिहासकालीन गोष्टी बघितल्यानंतर येथे अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक हिंदू मंदिरेही आहेत. हा परिसर पेशवेकालीन असल्यानं येथे अनेक शतके जुनी आणि जागृत मंदिरे बघायला मिळतात. श्री विष्णू मंदिर, निवडुंग्या विठोबा मंदिर, सोमेश्वर महादेव मंदिर, पालखी विठोबा मंदिर, श्री लक्ष्मी नारायण मंदिर असे जुने मंदिरेही इथल्या व्यापाऱ्यांचे, पुणेकरांचे श्रद्धास्थान आहेत.
(बोहरी आळीतील चतु : शृंगी माता मंदिर Photo Credit - Apsara Aga )
खरंतर रविवार पेठ हा पुण्याचा सर्वात जुना व्यापारी भाग असल्यानं, इथे मुस्लिम संस्कृतीची प्रतीके म्हणजे मशीद, दर्गा आणि हिंदू संस्कृतीची प्रतीके म्हणजे जुनी मंदिरे अगदी एकमेकांच्या शेजारी गुण्यागोविंदाने उभी आहेत. बोहरी आळीत खरेदीला येणारे लोक या जुन्या मंदिरांनाही आवर्जून भेट देतात. हा संपूर्ण परिसर ऐतिहासिक वास्तू, धार्मिक विविधतेनं नटलेला दिसतो. दुपारची वेळ झाली होती, बोहरी आळीतील गर्दी आणखीच वाढत होती. गाड्यांचे हॉर्न, कामगारांच्या हाका, चहावाल्याच्या केटलीचा. जुन्या पुण्याच्या व्यापारी संस्कृतीचा, हस्तकौशल्याच्या वारशाचा जिवंत ठेवा म्हणून बोहरी आळी आजही तितक्याच अभिमानानं उभी आहे.
संध्याकाळची अजान कानावर पडत होती. बकरी ईदच्या तयारीमुळं संपूर्ण परिसरात एक वेगळीच लगबग जाणवत होती. कुठं मशिदीच्या सजावटीचं काम सुरू होतं, तर कुठं दुकानांमध्ये शेवटच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी उसळली होती. हातोड्यांचे आवाज, चहाच्या टपरीवर रंगलेल्या गप्पा आणि ‘ईद मुबारक’ म्हणत एकमेकांना हसून शुभेच्छा देणारी माणसं. शेकडो वर्षांचा इतिहास, कारागिरांच्या हातातील कौशल्य आणि हिंदू-मुस्लिम सलोख्याची परंपरा जपत बोहरी आळी आजही उभी आहे.






