‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झालं… भारतीय हवाई आणि सैन्य दलाच्या अतुलनीय कामगिरीला सबंध देशाने डोक्यावर घेतलं. साऱ्या जगाला भारताने आपली ताकद दाखवून दिली. या शिवाय ‘ऑपरेशन सिंदूर’ ची दररोज देशवासियांना माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या कामाचीही प्रचंड तारिफ झाली.
मात्र ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ज्या महिला जवानांनी असाधारण धैर्य आणि शौर्य दाखवले त्यांच्या कामाची म्हणावी तितकी दखल घेतली गेली नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम यशस्वी करण्यामध्ये सीमा सुरक्षा दलाच्या महिलांनी नेमकं काय केलं हेच आम्ही या लेखातून सांगणार आहोत…
BSF च्या 7 रणरागिणींनी इतिहास घडवला!
‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान सीमा सुरक्षा दलाच्या महिला जवानांनी असाधारण धैर्य आणि शौर्य दाखवले. तसेच, पाकिस्तानी हल्ल्यांना योग्य उत्तर दिले आणि अनेक पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त केल्या. या महिला जवानांना त्यांना पुरुष कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या महत्त्वाच्या मोहिमेत बीएसएफच्या सात महिला सैनिकांनी जिवाची बाजी लावल्याचे समोर आले आहे. असिस्टंट कमांडंट नेहा भंडारी यांच्या नेतृत्वाखाली 6 शूर सैनिकांनी तीन दिवस आणि तीन रात्री दोन महत्त्वाच्या सीमा चौक्यांचे रक्षण केले.
पाकिस्तानकडून झालेल्या प्रचंड गोळीबार आणि तोफगोळ्यांना न जुमानता, या महिलांनी केवळ शौर्याने लढले नाही तर शत्रूला माघार घेण्यास भाग पाडले. सीमा सुरक्षा दलाच्या महिला कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय शौर्य आणि दृढनिश्चय दाखवून ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. या महिला जवानांना पुरुष कर्मचाऱ्यांइतकेच खडतर प्रशिक्षण घ्यावे लागले. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान त्यांनी त्याच भावनेने सीमांचे रक्षण केले.
तीन दिवस आणि तीन रात्र…महिला जवानांचे असामान्य धैर्य
‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य केले आणि त्यांच्या स्थानापासून एक इंचही मागे हटल्या नाहीत. सीमेवर असलेल्या चौक्यांवर ठाण मांडून पाकिस्तानी सैन्याचा आणि दहशतवाद्यांचा हल्ला परतवून लावला. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या महिला जवानांनी असामान्य सामर्थ्य धैर्य आणि दृढनिश्चय दाखवला. सीमा सुरक्षा दलाच्या महिला जवानांनी केवळ शत्रूचा धाडसाने सामना केला नाही, तर देशाप्रती असलेल्या त्यांच्या जबाबदाऱ्यांची त्यांना पूर्ण जाणीव असल्याने देशालाही आश्वस्त केले.
कठुआ, सांबा आणि जम्मू सेक्टरमधील सीमा चौक्यांवर शत्रूंचा सामना करणाऱ्या भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या या तरुणी केवळ देशाच्या सीमांचे रक्षण करत नाहीत, तर धैर्य आणि दृढनिश्चयाचे जिवंत उदाहरण आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या महिलांनी त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून केवळ धोरणात्मक स्थानांचे रक्षण केले नाही, तर धाडसी प्रतिहल्ला केला. ही कारवाई आघाडीच्या संरक्षणात महिलांच्या वाढत्या भूमिकेतील एक मैलाचा दगड मानली जात आहे.
संबंधित लेख वाचा: 1) युद्धात जेव्हा सैनिक शहीद होतो… मागे काय उरतं…? |
असिस्टंट कमांडंट नेहा भंडारी कोण आहे?
पाकिस्तानी सीमेच्या अगदी जवळ असलेल्या सीमा चौकीचे नेतृत्व करणाऱ्या सहाय्यक कमांडंट नेहा भंडारी यांनी सैनिकांचे नेतृत्व केले आणि ‘झिरो लाईन’ ओलांडून आक्रमण करणाऱ्या पाकिस्तानच्या तीन चौक्यांवरील सैनिकांना योग्य उत्तर दिले. शत्रूच्या तीन अग्रेषित चौक्यांना योग्य उत्तर देऊन शांत केले. नेहा व्यतिरिक्त त्यांच्या पथकातील सहा महिला जवानांनी चौकीचे रक्षण केले.
सांबा-आरएस पुरा-अखनूर सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरील शत्रूच्या चौक्यांवर गोळीबार होणाऱ्या प्रत्येक गोळीने त्यांचा 'जोश' वाढत होता. नेहाचे आजोबा सैन्यात सेवा करत होते. तिचे पालक केंद्रीय राखीव पोलिस दलात आहेत आणि कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील ती अधिकारी आहे. ती म्हणाली, ‘माझे आजोबा सैन्यात सेवा करत होते. माझे वडील केंद्रीय राखीव पोलिस दलात होते आणि माझी आई केंद्रीय राखील पोलिस दलात आहे. मी या दलात तिसऱ्या पिढीतील अधिकारी आहे.’
तीन दिवसांच्या संघर्षादरम्यान पाकिस्तानला योग्य उत्तर देण्यासाठी पुरुष सहकाऱ्यांसोबत महिलांनी खांद्याला खांदा लावून काम केले. नेहासोबत 18 ते 19 महिला सीमा रक्षक होत्या. सहा महिला चौक्यांवरच्या गोळीबाराला उत्तर देत होत्या. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान जम्मू जिल्ह्यातील अखनूर सेक्टरमधील परगल फॉरवर्ड एरियामध्ये भारतीय सीमा सुरक्षा दलाचा भाग असल्याचा आणि सीमा चौकीचे नेतृत्व करण्याचा तिला अभिमान आहे. अखनूर-परगवाल सेक्टरमधील पाकिस्तानी पोस्टपासून सुमारे 150 मीटर अंतरावर हे पोस्ट आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान जम्मू सीमेवरील आंतरराष्ट्रीय सीमेवर ‘फॉरवर्ड पोस्ट’चे नेतृत्व करणारी नेहा ही एकमेव महिला अधिकारी होती.
पहिल्यांदाच महिला जवान सक्रीय युद्धात सहभागी
सक्रिय युद्ध परिस्थितीत महिला सैनिकांनी इतकी मोठी भूमिका बजावण्याची ही पहिलीच वेळ होती, ज्यामुळे पुरुष सैनिकांच्या बरोबरीची त्यांची क्षमता सिद्ध झाली. तीन वर्षांपूर्वी बीएसएफमध्ये सामील झालेल्या नेहा भंडारी यांनी या संधीचे सोने करण्याचा अन् पराक्रम दाखवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली मनजीत कौर, मलकीत कौर (पंजाब), स्वप्ना रथ, शंपा बसक (पश्चिम बंगाल), सुमी जेस (झारखंड) आणि ज्योती बानियान (ओडिशा) या सहा महिला सैनिकांनी मिळून अखनूरच्या दोन चौक्या वाचवल्या. यापैकी चार महिला 2023 मध्ये भरती झाल्या होत्या, तर मनजीत आणि मलकीत यांना 17 वर्षांचा अनुभव होता.
फॉरवर्ड पोस्टवरील महिलांच्या भूमिकेचे आणि पाकिस्तानी पोस्टवर गोळीबारात त्यांच्या सहभागाचे कौतुक करताना सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक शशांक आनंद म्हणाले, की ‘सिंदूर ऑपरेशन’मध्ये ‘बीएसएफ’च्या महिला कर्मचाऱ्यांनी मोठी भूमिका बजावली. बटालियन मुख्यालयात जाण्याचा पर्याय त्यांच्याकडे असला, तरी त्यांनी त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांसह पुढच्या चौक्यांवर राहण्याचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. पुरुषांप्रमाणेच महिलाही मोठ्या उत्साहाने सैन्यात आपली क्षमता दाखवत आहेत. 
‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान दररोज भारतीय मोहिमेची माहिती देण्यासाठी आणि पाकिस्तानच्या नापाक कृत्याचा भांडाफोड करण्यासाठीही भारताने व्यूहनीती म्हणून महिला अधिकाऱ्यांची निवड केली होती. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेऊन भारताच्या पराक्रमाचे चित्र संपूर्ण जगासमोर मांडले आणि ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने कशी आणि कोणती कारवाई केली हे सांगितले. लष्करातील दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी दररोज पत्रकार परिषदेद्वारे देश आणि जगाला लष्करी कारवाईबद्दल नवीनतम माहिती दिली आणि दाखवून दिले, की भारतातील महिला शक्ती इतर कोणापेक्षा कमी नाही.
भारतातील महिला शक्ती इतर कोणापेक्षा कमी नाही.
शतकानुशतके भारतातील महिलांना मातृशक्तीचा दर्जा देण्यात आला आहे. जिथे महिलांची पूजा केली जाते, तिथे देवांचा वास असतो. जिथे महिलांची पूजा केली जात नाही तिथे केलेले सर्व काम व्यर्थ ठरते. देशात नवरात्रीला मातृशक्तीच्या रूपात माता दुर्गेची पूजा करून आपण देशाला आणि जगाला संदेश देतो, की मातृशक्ती कोणापेक्षाही कमी नाही. आता आपल्या सैन्यातील महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपली प्रतिभा दाखवून आपली उत्कृष्ट क्षमता दाखवली आहे. महिला लढाऊ विमाने उडवत आहेत. त्यामुळे त्या युद्धभूमीत सर्व प्रकारची भूमिका बजावण्यास तयार असल्याचे दिसून येते.
भारतात महिलांसाठी लष्कराचे दरवाजे बंद होते. शरद पवार संरक्षण मंत्री असताना हे दरवाजे खुले झाले. त्यांचा निर्णय किती योग्य होता, हे महिलांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतही महिलांचा प्रवेश सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने सुरू झाला. त्यांची पहिली तुकडी बाहेर पडत असतानाच ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सीमारेषेवर महिला जवानांनी गाजवलेल्या शौर्याची माहिती बाहेर आली.
भारतीय सशस्त्र दलात महिलांच्या सहभागाचा इतिहास दीर्घ संघर्ष आणि बदलांनी भरलेला आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळापासून महिला अप्रत्यक्षपणे भारताच्या सुरक्षेत आणि सेवेत योगदान देत आहेत. पूर्वी महिलांना फक्त ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन’मध्येच घेतले जात असे; परंतु फेब्रुवारी 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महिलांना सैन्यात कायमस्वरूपी कमिशन मिळू लागले आहे. आता ‘एनडीए’च्या एकूण जागांपैकी दहा टक्के जागांसाठी मुलींची निवड केली जाते आणि तेही स्पर्धा करून. सशस्त्र दलात सामील झाल्यानंतर, त्यांच्यासाठीही समान संधी आहेत. 
त्यांची कारकीर्द प्रगती मुलांसारखीच असेल. सेवा मार्ग समान आहेत. आता आपण अभिमानाने म्हणू शकतो, की आपल्या सैन्यात पूर्णपणे लिंगनिरपेक्षता आहे. आज आपल्या सैन्यात महिला लढाऊ वैमानिक आहेत. क्षेपणास्त्रे उडवणाऱ्यांत महिला आघाडीवर जातात. त्या अभियांत्रिकी कामदेखील पाहतात आणि उपग्रहांवर नियंत्रणदेखील ठेवतात. आता महिला संरक्षणदेखील करतात. त्या तांत्रिक बुद्धिमत्तादेखील दाखवतात.
आतापर्यंत महिलांना समोरासमोर युद्धात पाठवले जात नाही. राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील स्क्वाड्रन लीडर मोहन सिंग 2016 मध्ये भारतीय हवाई दलाच्या तेजस फायटर स्पायडरमध्ये सामील होणाऱ्या पहिल्या महिला बनल्या. यापूर्वी त्यांनी मिग 21 बायसन फायटर विमानदेखील उडवले आहे.
ग्रुप कॅप्टन सलिया धामी या ‘एअर सर्व्हिस’च्या पहिल्या महिला अधिकारी बनल्या आहेत. त्या ‘फ्रंटलाइन कॉम्पॅक्ट युनिट’चे कमांडिंग करत आहेत. त्या ‘फ्लाइंग युनिट’च्या फ्लाइट कमांडर बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारीदेखील आहेत. भारतीय सशस्त्र दल, वैद्यकीय सेवा आणि लष्कर आणि नौदलाच्या वैद्यकीय सेवा महिला अधिकाऱ्यांकडून चालवल्या जात आहेत. संरक्षण दलांमध्ये लिंग समानता सुनिश्चित करण्याच्या दिशेने भारताची प्रगती मंदावली आहे; पण यामध्ये सातत्याने प्रगती झाली आहे.
आता बऱ्याच महिला एकाच वेळी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. त्या इतरांसाठी मार्ग मोकळा करत आहेत. त्यांच्या कामगिरीवर बरेच काही अवलंबून असेल. जर त्या चांगले काम करत असतील, तर त्यांना स्वीकारणे सोपे होईल आणि येणाऱ्या महिलांसाठी मार्ग मोकळा होईल. ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन’ अंतर्गत महिला फक्त 10 किंवा 14 वर्षे सेवा देऊ शकतात. त्यानंतर त्या निवृत्त होतात; पण आता त्यांना कायमस्वरूपी कमिशनसाठी अर्ज करण्याची संधीदेखील मिळेल. यामुळे त्यांना सैन्यात सेवा सुरू ठेवता येईल आणि पदानुसार निवृत्ती घेता येईल. यासोबतच त्यांना पेन्शन आणि सर्व भत्तेदेखील मिळतील. ही चांगली बाब आहे.






