(किरण गिते)
‘’तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते ही चित्रा वाघ’’... विधान परिषदेत अतिशय त्वेषाने बोलत असतानाच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा ‘डायलॉग’ फेकला आणि सारं सभागृह अवाक झालं…
चित्रा वाघ यांनी हे उद्धव ठाकरे गटाच्या अनिल परब यांना उद्देशून म्हटलं… गेल्या दोन दिवसांपासून दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर विधि मंडळात जोरदार चर्चा सुरू आहे. दिशाच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी म्हणून याचिका दाखल केली. यावेळी आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचंही त्यांनी सांगितलं. यानंतर विधिमंडळात आदित्य ठाकरेंवर कारवाई करण्याची सत्ताधाऱ्यांकडून मागणी करण्यात आली.
हा मुद्दा उपस्थित करताना ठाकरे गटाच्या अनिल परब यांनी आदित्या ठाकरेंची पाठराखण करत मंत्री संजय राठोड आणि चित्रा वाघ यांच्यावर सभागृहात टीका केली. त्यावर चित्रा वाघ यांनी परब यांच्या टीकेला उत्तर देत ‘’तुमच्यासारखे ५६ पायाला बांधून फिरते ही चित्रा वाघ, आम्हाला हलक्यात घेऊ नका, आम्ही जर बोलायला लागतो तर तिकडच्या खुर्च्या खाली होतील.’’
काही मिनिटांतच चित्रा वाघ यांचे हे वक्तव्य वाऱ्याच्या वेगासारखं व्हायरल झालं आणि सगळीकडे त्याची चर्चा सुरू झाली. महिला लोकप्रतिनिधींच्या तोंडी असली भाषा शोभत नाही इथपासून ते सभागृहाचं पावित्र्य भंग झालं इथपर्यंत…. पुरुष लोकप्रतिनिधींनी यापूर्वीच सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा सोडलेल्या असताना आता महिला लोकप्रतिनिधीही काही मागे नाहीत, असाही टीकेचा सूर राजकीय आणि सामाजिक वतुर्ळात उमटला.
अगोदर चित्रा वाघ, मग सुषमा अंधारे…
चित्रा वाघ यांच्याही पुढे जात मग उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही शेरेबाजी करायला सुरूवात केली. “सभागृहाची सुसंस्कृत परंपरा गरिमा धाब्यावर बसवत एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या 56 जण पायाला बांधून फिरते. ही भाषा कोणत्या शाळा-कॉलेजात शिकवली जाते हे माहीत नाही. पण हे दरवेळी सांगायची गरज काय. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सांगताना लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात!”, अशी शेरेबाजी सुषमा अंधारे यांनी केली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर मराठी बिग बॉस आणि चित्रा वाघ यांची व्हिडिओ एकत्रितपणे टाकली आहे. त्याचबरोबर कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, बाईईईईई काय हा प्रकार… थोडं थोडं साम्याच आहे, नाही ! पण कोणीतरी सांगा ते आपल्या राज्याचे ते सर्वोच्च सभागृह आहे.. बिग बॉसचा एखादा सीजन नाही!! रोहिणी खडसे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, हे राज्याचं सभागृह आहे. बिग बॉसचा सीझन नाही. जी काल वक्तव्य करण्यात आलं ती पाहून मला बिग बॉसचा सीझन आठवला. त्या कार्यक्रमात तुम्ही जितकी एकमेकांची उनी-धुणी काढाल तेवढाच बिग बॉस खूश होतो. तसंच वक्तव्य चित्रा वाघ यांनी कोणाला तरी खूश करण्यासाठी केलं होतं का? असा सवाल रोहिणी खडसेंनी उपस्थित केला.
चित्रा वाघ यांनी सभागृहाची सुसंस्कृत परंपरा गरिमा धाब्यावर बसवली आहे का?
या सगळ्या पार्श्वभूमीवर महिला लोकप्रतिनिधींची सार्वजनिक ठिकाणची भाषा कशी असावी यावर ‘बाईमाणूस’ने काही मान्यवरांना बोलतं केलं.
नागपूरच्या प्राध्यापक आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या धम्मसंगिनी रमागोरख म्हणाल्या की, “मुक्तीदायी व्हिजनविहीन, सत्ताकांक्षी महिलांना आपल्या पक्षनेतृत्वासाठी घसा सुखेपर्यंत सभागृहात चिरकावं लागणं हे खूप वाईट आहे. त्याहून दयनीय काय असू शकतं? तर पक्षनेतृत्वाला निष्ठा दाखवण्यासाठी या सत्ताकांक्षी महिला एकमेकींवर अक्षरश: कोणत्याही थराला जाऊन बोलत आहेत. महिला समतेचं आणि सत्ता सामिलीकरणाचं स्वप्न बघायला लागतात तेव्हा घरातल्या सत्तेला आव्हान देत बाहेर पडतात. सामिलीकरणाची ओढ एवढी तीव्र असते की, घरातील पुरूषसत्तेला आव्हान देताना झालेल्या संघर्षाचे सोईस्कर विस्मरण करत वा प्रगल्भ तडजोड करत सार्वजनिक पुरूषसत्ता मात्र त्या समजून उमजून स्वतःवर लादून घेतात. मग अशा स्वस्त वाटाघाटींमुळे सन्माननीय सत्तासहभागाचं गाडंच पुढे सरकत नाही, सरकणार पण नाही. पक्षनेतृत्वाच्या, पक्षसंरचनेच्या पुरूषसत्ताक मर्यादा पदरात घेणाऱ्या वा पक्षाच्या हरेक जातवर्गलिंग धोरणांची, तोंड फाटेपर्यंत कौतुक गाणी गाणाऱ्या सत्ताकांक्षी स्त्रिया हे स्त्रीमुक्तीच्या स्वप्नभंगाचे तुकडे म्हणून बघताना काळजात कालवाकालव होते.’’
‘’महिला समतेचं आणि सत्ता सामिलीकरणाचं स्वप्न बघायला लागतात तेव्हा…’’
चित्रा वाघ यांचे '’तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते' हे स्टेटमेंट सामाजिक समतेला गालबोट लावणारे आहे या संदर्भात बघितले जात नाहीये तर ते ते लैंगिकतेच्या मैदानात आणून चित्रा वाघांच्या अधिक अवमूल्यनासाठी वापरले जात आहे हेही फार उचित नाही. या स्टेटमेंटला धरून विरोधी पक्षांचे प्रवक्ते अधिक हिणकस, चारित्र्यहनन करणाऱ्या कोट्या करत आहेत हे चित्र अशोभनीय आहे.
'चित्रा वाघांनी कमी आकडा सांगितला म्हणत' त्यांच्या चारित्र्यहननात विरोधी पक्ष प्रवक्ते सहभागी होत आहेत आणि महिला प्रवक्त्या पण मागे नाहीत! मुळात सर्वच राजकीय पक्षांना लिंगभाव संवेदनशीलतेेचं- समतेचं प्रशिक्षण आवश्यक आहे. 'कोणीही कोणाला पायाला बांधून फिरू नये' असा समतेचा समाज निर्माण करायला घराबाहेर पडणाऱ्या सर्व स्त्रीपुरूषांना स्मरून आपला सार्वजनिक दृष्टीकोन आणि जीवनव्यवहार दुरूस्त करायला किमान सभागृहातील प्रतिनfधींनी हिंमतीने, जबाबदारीने पुढं आलं पाहिजे, असा सल्ला धम्मसंगिनी देतात.
सभागृहात चित्रा वाघ ज्या बोलल्या आणि जेव्हा त्यावर वाद निर्माण झाला तेव्हा त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, ज्याची जेवढी लायकी आहे तेवढाच तो विचार करतो आणि तेवढंच बोलतो. काल माझं नाव घेऊन अनिल परब बोलले त्यामुळे मी त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं. माझ्या चारित्र्यावर कायम बोललं जातं. कायम प्रश्न उपस्थित केले जातात. अजून किती दिवस तेच तेच प्रश्न विचारणार आहे? असा उलट प्रश्न देखील यावेळी त्यांनी केला.
“पुरूषांनी अपमान केला की आपण सगळेच चवताळून उठतो, मग…?’’
जेष्ठ संपादिका राही भिडे यावर म्हणतात की, “पुरूषांनी आपला अपमान केला की आपण सगळेच चवताळून उठतो. चित्रा वाघ यांनी केलेलं स्टेटमेंट हे फार उद्धटपणाचं आणि हे कोणालाही पटणार नाही असं स्टेटमेट आहे. महिलांविषयी कोणी काय बोललं तर आपण त्या महिलांची बाजू घेतो. पण चित्रा वाघ यांनी केलेल्या विधानाशी कोणीही सहमत असूच शकत नाही. पायाला पुरूषांना बांधून तुम्ही फार कर्तुत्त्व गाजवत आहात असं होत नाही. यावरून त्यांना कोणतीही सहानुभूती मिळणार नाही.”
लेखक, ब्लॉगर आणि स्तंभलेखक श्रीरंजन आवटे या सगळ्या वादावर बोलताना म्हणतात,’’ चित्रा वाघ यांनी अनिल परब यांना उद्देशून केलेलं विधान हे सभागृहाच्या गरिमेला धरून नव्हतं आणि व्यक्तीचा सन्मान करत बोलायला हवं त्याच्याशीही ते सुसंगत नव्हत. स्त्रियांचा अपमान झाल्यावर त्या विषयी बोललं जातं. पण, सत्तेच्या पदावर पोहोचल्यावर स्त्री किंवा पुरूष असो वापरली जाणारी भाषा आणि सभ्यता आपण हरवून बसलो आहोत. सार्वजनिक सभ्यता आणि स्तर खालावलेला आहे. हेच चित्रा वाघ यांच्या विधानातून लक्षात येतं. त्यामुळे पदावर बसलेल्या नेत्यांची भाषा आणि मानसिकता जोवर बदलत नाही तोवर समाजात बदल होणार नाही.
सुषमा अंधारेंनी केलेल्या टीकेवर श्रीरंजन आवटे आपलं मत मांडतात. ते म्हणतात,“अशा प्रकारच्या विधानांवर टीकाही केली जाते. पण टीका शांत मार्गाने करायला हवी. सध्या चिखलफेक करणं चालू आहे. भाजपाचे नेते आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या संघटना नितेश राणे असतील किंवा कोरटकरांपासून सोलपूरकरांपर्यंत, यांची भाषा महाराष्ट्राचं किती अध:पतन झालं आहे हे दाखवणारी आहे.’’
समाजात स्त्रियांना अनुसरून अनेक विधानं पुरूषांकडून करण्यात येतात. पुरूष स्त्रियांच्या विरोधात एखादं विधान करतो तेव्हा त्याला सर्व स्तरातून विरोध केला जातो. सगळेच जण चवताळून उठतात. स्त्री असो किंवा पुरूष. कोणीही एकमेंकांविषयी बोलताना असंवैधनिक किंवा खालच्या पातळीवर जात बोलणं ही माणुकीसला काळीमा फासणारी बाब आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कायम टीका टीप्पणी केली जाते. पण, तीच टीका कोणाच्या चारित्र्या शिंतोडे उडवत असेल तर आपण समाजापुढे काय आदर्श निर्माण करत आहोत याचा नक्कीच विचार झाला पाहिजे.






