के. ए. शाजी
- केरळच्या निलंबूरच्या दाट जंगलात, ‘चोलनाइकन’ ही आदिम जमात आजही गुहांमध्ये आपलं आयुष्य जगते. आशियातील गुहांमध्ये वास्तव करणारी ही कदाचित शेवटची जमात मानली जाते.
- त्यांच्या या वेगळ्या जगण्यावर आता अनेक संकटांचे सावट गडद होत चालले आहे. हवामान बदल, जंगलांची झपाट्याने होणारी तोड आणि बाहेरून येणाऱ्या आधुनिकतेचा दबाव या सगळ्यांनी त्यांच्या अस्तित्वालाच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
केरळमधील निलंबूर जंगल परिसरात ‘करुलाई’कडे जाणारा प्रत्येक रस्ता जणू एखाद्या रहस्याची दारं उघडतो. सभोवताली दाट धुकं आणि शांततेचं जाळं पसरलेलं आहे. शहराच्या गोंगाटातून बाहेर पडत आपण जणू एखाद्या वेगळ्याच जगात प्रवेश करतो. रस्ता हळूहळू अरुंद होत जातो, मोबाईल नेटवर्क गायब होतं आणि सभोवताली दाट धुकं व शांतता पसरू लागते. सागाच्या उंच झाडांखाली सडलेल्या पानांचा वास, हवेतली ओल आणि सतत कानावर पडणारी किटकांची किरकिर हे सगळं मिळून जंगल आपल्याला आपल्यात सामावून घेतं.
जंगलाच्या एका शेवटच्या कोपऱ्यात, एका छोट्याशा खडकाळ गुहेत मंद आगीचा उजेड दिसत असतो. त्या शेकोटीभोवती बसलेले काही स्त्री-पुरुष जंगली रताळं भाजत असतात. त्यांचे चेहरे आगीच्या प्रकाशात कधी उजळतात, कधी पुन्हा सावल्यांमध्ये हरवतात. हे आहेत चोलनाइकन… भारतातील सर्वात दुर्मिळ, सर्वात कमी उरलेल्या आदिवासी समुदायांपैकी एक.

चोलनाइकनची लोकसंख्या आहे फक्त २५०
२०११ च्या जनगणनेनुसार चोलनाइकन समुदायाची संख्या केवळ १२४ इतकी होती. मात्र स्थानिक आदिवासी विकास कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता ही संख्या सुमारे २५० पर्यंत वाढली आहे. तरीही १९६० च्या दशकातील सुमारे ४०० या लोकसंख्येच्या तुलनेत ती लक्षणीयरीत्या कमीच आहे.
चोलनाइकन लोक पिढ्यान्पिढ्या याच जंगलात राहिले आहेत. त्यांच्यासाठी जंगल हे केवळ निवाऱ्याचं साधन नव्हतं, तर ते एक जिवंत, सजीव अस्तित्व होतं. लहान प्राण्यांची शिकार, कंदमुळे, जंगली फळं, मध या सगळ्यावरच
मंजेरी गावातील सी. विनोद, जे चोलनाइकन समुदायातील पहिले पीएचडीधारक आहेत, सांगतात, “कधीकाळी हे जंगल आमची आई होतं. आता हे जंगल ना आमचं पोट भरू शकत, ना आमचं रक्षण करू शकत. नद्या लवकर आटतात, झाडांना वेळेवर फळं लागत नाहीत आणि हत्ती आता आमच्यापासून घाबरत नाहीत. इथलं जीवन दररोजच्या संघर्षासारखं झालं आहे.”
लुप्त होत चाललेली खाद्यसंस्कृती
चोलनाइकन समुदायासाठी अन्न हीच त्यांची ओळख आहे. ते शेती करत नाहीत; उलट जंगलातून अन्नसाहित्य गोळा करून आपलं जीवन जगतात. एक काळ असा होता, जेव्हा जंगल त्यांना सगळं काही देत होतं. कंदथिरी (डायोस्कोरिया प्रजाती), जंगली केळ्याची फुलं, मशरूम आणि जंगली मध.
‘सेंटर फॉर इंडिजिनस फूड सिस्टम’च्या एका अभ्यासानुसार, त्यांच्या पारंपरिक आहारात स्वस्त तांदूळ आणि डाळींपेक्षा कितीतरी अधिक पोषक घटक होते. परंतु बदलत्या पावसाच्या पद्धती आणि वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे जंगली अन्नस्रोतांची विविधता कमी होत गेली.
कुप्पमाला गावातील शिबू यांचा अलीकडेच गूढ परिस्थितीत मृत्यू झाला. त्यांच्या ३४ वर्षीय पत्नी चाथी सांगतात, “भूक ही आमच्यासाठी नवी गोष्ट नाही. पण इतरांवर अवलंबून राहणं हे नवीन आहे. आता आम्हाला रेशन किंवा सरकारी योजनांची वाट पाहावी लागते. आम्ही आमची स्वावलंबनाची ताकद गमावली आहे.”
विनोद म्हणतात, “लोक जेव्हा एखादं ज्ञान वापरणं थांबवतात, तेव्हा ते ज्ञान हळूहळू नष्ट होऊ लागतं. आमचे वडीलधारी शेकडो खाद्य वनस्पती ओळखू शकत होते, पण आमच्या मुलांना फक्त तांदूळ आणि साखर एवढंच माहिती आहे.”

बदलत्या जंगलाच्या भरोशावरचं जीवन
चोलनाइकन ही भारतातील सर्वाधिक अभ्यास झालेल्या आदिवासी जमातींपैकी एक आहे, तरीही धोरणकर्ते त्यांना अजूनही पूर्णपणे समजू शकलेले नाहीत. त्यांच्या प्राचीन कथांमध्ये आणि श्रद्धांमध्ये निसर्गपूजा, बारकाईने केलेलं निरीक्षण आणि अनुभवातून आलेलं ज्ञान यांचा अद्वितीय संगम दिसतो.
२०१६ मधील एका संशोधन लेखात खगोल भौतिकशास्त्रज्ञ मयंक एन. वाहिया यांनी त्यांच्याबद्दल लिहिलं आहे, “हे लोक निसर्गाकडे अत्यंत खोलवर पाहतात आणि त्यांनी जग समजून घेण्याचा स्वतःचा एक तर्कसंगत मार्ग विकसित केला आहे. ते ताऱ्यांकडे पाहून वेळ मोजायचे, बेडकांच्या आवाजावरून पावसाचा अंदाज बांधायचे आणि प्राण्यांच्या पाऊलखुणा एखाद्या पुस्तकासारख्या वाचायचे.
कल्कुलममधील उचाकुलम गावात राहणाऱ्या ५२ वर्षीय सरोजिनी सांगतात, “आता आकाश आणि जंगल दोन्ही बदललं आहे.” सरोजिनींचे पती करियान यांचा जंगलातून वनोपज गोळा करताना हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्या म्हणतात, “आता तारे वेगळ्याच पद्धतीने फिरतात, पाऊस अनियमित झाला आहे आणि प्राणीही आधीसारखं वागत नाहीत.”
त्यांचे हे शब्द त्या संपूर्ण समुदायाच्या भीतीचं प्रतिबिंब आहे, ज्यांचं शतकानुशतकांचं जीवनपद्धतीचं जग आता बदलत्या हवामानामुळे हळूहळू विस्कटत चाललं आहे.
निलंबूर हा पश्चिम घाटातील त्या भागांपैकी एक आहे, जिथे पानझडी जंगलं आढळतात. एकेकाळी इथे बांबू, वेत आणि खाण्यायोग्य झुडपांची विपुलता होती. पण हवामान बदलामुळे इथलं नाजूक संतुलन ढासळलं आहे. आता उन्हाळे अधिक लांब होत आहेत, पावसाचं स्वरूप अनियमित झालं आहे आणि ज्या जलधारा कधीकाळी जंगलाला जीवन देत होत्या, त्या मार्च लागताच आटतात आणि अनेक महिने कोरड्या राहतात. या बदलांमुळे माणूस आणि वन्यप्राण्यांमधील संघर्ष वाढला आहे. चोलनाइकन समुदायासाठी जंगलात अन्न मिळवणंही दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे.
मम्पाड येथील एमईएस कॉलेजच्या ‘सेंटर फॉर कंझर्वेशन इकॉलॉजी’चे के. एस. अनूप दास, जे या समुदायासोबत सातत्याने काम करतात, सांगतात, “आता हवामानाचा स्वभाव इतका बिघडला आहे की, तो त्यांच्या रोजच्या जगण्याचाच धोका बनला आहे. चोलनाइकन लोक दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. एकीकडे त्यांच्या संकुचित होत चाललेल्या अधिवासामुळे बाहेर पडणाऱ्या वन्यप्राण्यांचा धोका आणि दुसरीकडे हवामानातील बदल, जे त्यांच्या अन्नस्रोत वनस्पती आणि निवाऱ्यांना नष्ट करत आहेत.”
जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी ‘अरण्य’
२०२३ मधील एका अभ्यासात अशा १०२ वनस्पती प्रजातींची नोंद करण्यात आली, ज्यांचा वापर चोलनाइकन आणि संबंधित ‘कट्टुनाइकन’ जमात पारंपरिकरित्या करत होती. मात्र मातीतील ओलाव्यातील बदल आणि आक्रमक प्रजातींच्या वाढत्या प्रसारामुळे यापैकी अनेक प्रजाती आता नष्ट होऊ लागल्या आहेत.
केरळ वन संशोधन संस्थेचे मुख्य वैज्ञानिक टी. वी. सजीव सांगतात, “अचानक येणाऱ्या पूरामुळे जमिनीखालील कंदमुळे सडू लागली आहेत. आसपासच्या मळ्यांमधून येणाऱ्या कीटकनाशकांमुळे जंगलाची संपूर्ण साखळी विस्कटली आहे. मधमाश्याही आपली पोळी सोडून जात आहेत. लँटाना कॅमारा आणि सेन्ना स्पेक्टेबिलिससारख्या आक्रमक वनस्पती झपाट्याने पसरत आहेत आणि स्थानिक प्रजाती कमी होत आहेत. यामुळे जंगलात अन्नाच्या उपलब्धतेचं गंभीर संकट निर्माण झालं आहे.”

विनोद म्हणतात, “एक काळ होता, जेव्हा प्रत्येक ऋतूत अन्न मिळायचं. आता अनेक महिने असे असतात की खायला काहीच नसतं. आम्ही वन अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या सरकारी रेशनवर अवलंबून राहतो.”
पिढ्यान्पिढ्या चोलनाइकन समुदायात हत्तीला पवित्र मानलं जात आलं आहे. जंगलाचा प्रमुख म्हणून त्याची पूजा केली जायची. पण हवामान बदल आणि अधिवास नष्ट होण्यामुळे हे नातं आता ताणलेलं बनलं आहे. गेल्या १८ महिन्यांत करुलाई आणि वझिक्कडावू वस्त्यांच्या आसपास हत्तींसोबत झालेल्या संघर्षात तीन चोलनाइकन लोकांचा मृत्यू झाला आहे.
या समुदायासोबत काम करणारे विभागीय वन अधिकारी रंजीत भास्करन सांगतात, “प्रत्येक मृत्यू संपूर्ण समुदायाला हादरवून टाकतो. जेव्हा एकूण लोकसंख्या २५० पेक्षाही कमी असते, तेव्हा प्रत्येक जीवितहानी म्हणजे विलुप्ततेकडे आणखी एक पाऊल असतं.”
निलंबूरच्या दुर्गम भागात हत्तींपासून बचावासाठी खंदक खणणे, कुंपण उभारणे किंवा फटाके फोडणे यांसारखे पारंपरिक उपाय आता फारसे परिणामकारक ठरत नाहीत. त्यामुळे शास्त्रज्ञ पर्यावरणाला कमी हानी पोहोचवणारे तांत्रिक उपाय शोधत आहेत.
अशाच एका नव्या उपायाचं नाव आहे ‘अरण्य’—एक इशारा देणारं उपकरण. हे उपकरण The Cochin College येथील इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख पॉलबर्ट थॉमस यांनी विकसित केलं आहे. थॉमस सांगतात, “हे उपकरण खांबांवर बसवता येतं आणि जंगलात बॅटरीवर चालणाऱ्या वायरलेस नेटवर्कवर कार्यरत असतं. सुमारे ५० मीटरच्या परिसरात हत्ती, वाघ किंवा अस्वल यांची उपस्थिती ओळखू शकतं. हत्तींसाठी लाल दिवा, वाघांसाठी पिवळा आणि अस्वलांसाठी हिरवा दिवा पेटतो.”
त्यांचे सहकारी के. एस. अनूप दास स्पष्ट करतात, “आमचा उद्देश वन्यप्राण्यांना हाकलून लावणं नाही, तर माणूस आणि प्राणी यांच्या हालचालींमध्ये सुरक्षित अंतर ठेवणं आहे. जंगलाचं पर्यावरण न बिघडवता अपघात टाळायचे आहेत.”
ही कल्पना केरळ वन विभागाच्या ‘सह-अस्तित्वा’च्या धोरणाशी सुसंगत आहे. वरिष्ठ वन अधिकारी राजू फ्रान्सिस म्हणतात, “जर आपण सुरक्षित अंतर राखलं आणि हत्तींच्या वर्तनाला समजून घेतलं, तर ते दोघांसाठीही फायदेशीर ठरेल.”
मात्र चोलनाइकन समुदायासाठी, जे आजही उघड्या खडकांच्या आडोशात झोपतात, हे “सुरक्षित अंतर” ही संकल्पना समजून घेणं तितकंसं सोपं नाही.
आधुनिकतेकडे ओढ… आणि दुभंगलेलं जग
आधुनिकता चोलनाइकन समुदायापर्यंत पोहोचली आहे, पण हा बदल त्यांच्यासाठी तितकाच गुंतागुंतीचा ठरतो आहे. आता करुलाई आणि मंजेरी भागात काही मुलं शाळेत जाऊ लागली आहेत; सी. विनोद हे स्वतःच याचं उदाहरण आहेत, जिथे शिक्षण दोन वेगळ्या जगांना जोडण्याचं काम करतं.

तरीही, समुदायातील बहुतांश लोक शिक्षणाबाबत अजूनही द्विधा मनःस्थितीत आहेत. सरकारने निलंबूर जवळ त्यांच्यासाठी निवासी वसाहती उभारल्या आहेत, पण अनेक जण या बदलाशी जुळवून घेऊ शकत नसल्याने पुन्हा जंगलात परत जातात. राज्य सरकारच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे (ITDP) प्रकल्प अधिकारी सी. इस्माइल सांगतात, “त्यांच्या मते ही घरं खूप उष्ण आणि गोंगाटाची आहेत.”
दरम्यान, बाजारव्यवस्थेच्या हस्तक्षेपामुळे त्यांचं शोषणही होत आहे. काही एजंट हे आदिवासींकडून मध आणि औषधी वनस्पती अत्यल्प किमतीत खरेदी करतात आणि त्याच वस्तू मोठ्या नफ्यावर विकतात. पैशांच्या व्यवहाराची पुरेशी माहिती नसल्यामुळे चोलनाइकन लोकांना त्याचा फारसा फायदा मिळत नाही.
पूचपारा वस्तीतल्या मीनाक्षी सांगतात, “बाहेरच्या लोकांबरोबरही आम्हाला वस्तूंची देवाणघेवाण (विनिमय) करणंच अधिक सोयीचं वाटतं. दर बुधवारी वन विभागाच्या परवानगीने व्यापारी आमच्या वस्तीत येतात. ते आमच्याकडून मध आणि जंगलातील इतर वस्तू घेतात आणि बदल्यात आम्हाला धान्य, कपडे आणि गरजेच्या इतर वस्तू देतात.”
राष्ट्रीय स्तरावर मिळालेलं लक्ष… आणि तरीही न बदललेली वास्तवता
सप्टेंबर २०२४ मध्ये या भागातील काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी चोलनाइकन समुदायाच्या एका छोट्याशा गावाला भेट दिली होती. एखाद्या मोठ्या राष्ट्रीय नेत्याने तिथे जाणं, हे स्वतःमध्येच एक महत्त्वाचं पाऊल होतं. त्यांनी जंगलात तासन्तास पायी चालत जाऊन वडीलधाऱ्यांशी संवाद साधला आणि भूक व हत्तींच्या हल्ल्यांच्या कथा ऐकून घेतल्या.
त्यांच्यासोबत गेलेल्या एका वन अधिकाऱ्याने आठवण सांगितली, “प्रियंका कोणत्याही सुरक्षा ताफ्याशिवाय आल्या आणि लोकांबरोबर बसल्या. असं याआधी कधी झालं नव्हतं. पण या भेटीनंतरही प्रत्यक्षात फार काही बदल झालेला नाही.”
चित्रपट दिग्दर्शक उन्नीकृष्णन अवला, ज्यांनी या जमातीवर जवळपास १० वर्षं संशोधन केलं आहे, आता त्यांच्या जीवनावर ‘थंथपेरू’ (वारसा) नावाचा चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटाचं चित्रीकरण त्याच खऱ्या गुहांमध्ये करण्यात आलं आहे, जिथे हा समुदाय राहतो. हा चित्रपट हवामान बदल आणि सरकारी दुर्लक्षाच्या छायेत त्यांच्या अस्तित्वासाठी सुरू असलेल्या संघर्षाची कहाणी सांगतो.

अवला म्हणतात, “ही एखादी लोककथा किंवा भूतकाळाची आठवण नाही, तर हळूहळू संपत चाललेल्या एका वास्तवाची गोष्ट आहे. चोलनाइकन जमात नष्ट होत आहे कारण ते आदिम आहेत म्हणून नाही, तर कारण त्यांना जीवन देणारं जंगलच मरत चाललं आहे.”
टी. वी. सजीव सांगतात, “या जमातीकडे निसर्ग आणि पर्यावरणाबद्दल अमूल्य ज्ञान आहे. ते जैवविविधतेचे चालते-फिरते खजिने आहेत. बदलत्या हवामानाशी कसं जुळवून घ्यायचं, हे त्यांना माहीत आहे. जर त्यांची भाषा आणि परंपरा नष्ट झाल्या, तर आपण हे सगळं ज्ञान कायमचं गमावू.”
संध्याकाळ होताच निलंबूर जंगल पुन्हा एकदा जिवंत होतं. झिंगूर आणि किटकांच्या आवाजाने सगळं जंगल दुमदुमतं. सागाच्या झाडांमध्ये धुके दाटतं आणि ओलसर मातीचा सुगंध हवेत दरवळत राहतो. करुलाईच्या उतारावर एका गुहेजवळ चोलनाइकन लोकांचा एक छोटासा समूह झोपेची तयारी करत असतो. त्यांच्या पेटवलेल्या आगीचे निखारे अजूनही मंद उजळत असतात… आणि अचानक दरीच्या खोलवरून हत्तीचा आवाज घुमतो. चोलनाइकन समुदायाचं भविष्य आता अशा गोष्टींवर अवलंबून आहे, ज्या त्यांच्या नियंत्रणाबाहेर आहेत. बदलतं हवामान, सरकारी धोरणं आणि ती आधुनिक दुनिया, जिला कदाचित त्यांच्या अस्तित्वाची जाणीवही नाही.
(सौजन्य - मोंगाबे इंडिया)






