बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात रोहतक तुरूंगात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा, डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत सिंह पुन्हा एकदा 20 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला आहे. तो सर्व काळ आपल्या बागपत येथील आश्रमातच राहिल, या शर्तीवरच त्याला हा पॅरोल मिळालाय.
हरियाणात नुकत्याच संपलेल्या विधानसभा निवडणूकीच्या दरम्यानच त्याला पॅरोल मिळाल्यामुळे अनेक प्रश्न उभे राहताहेत. विरोधी पक्षांनी आरोप केलाय की राजकीय लाभासाठीच गुरमीत सिंहाला पॅरोल मिळालाय. पण हरियाणा शासनाने दावा केलाय की नियमानुसारच अन्य कैद्यांप्रमाणे यालाही पॅरोल आणि फर्लो मिळतात.
जन्मठेपेची शिक्षा भोगतोय, परंतू आतापर्यंत 12 वेळा तुरुंगाबाहेर
जेव्हा जेव्हा हरियाणात निवडणूका असतात तेव्हा गुरमीतला पॅरोल मिळतो. गुरमीत 2020 पासून 12 वेळा तुरूंगाबाहेर आलाय. त्यानं 255 दिवस तुरुंगाबाहेरच काढले आहेत. निवडणूकीच्या आधी आता पाचव्यांदा तो बाहेर आला आहे. 2020 मध्ये पंजाब निवडणूकीच्या आधी 7 फेब्रुवारी 2020 रोजी त्याला पॅरोल मिळाली होती. ऑक्टोबर 2022 मध्ये 40 दिवसांची पॅरोल मिळाली तेव्हा आदमपूर लोकसभेची पोट निवडणूक होती आणि हिमाचलमध्येही निवडणूका होत्या.

राजस्थान विधानसभा निवडणूकीच्या आधीही 21 नोव्हेंबर 2023 रोजी त्याला 21 दिवसांची पॅरोल मिळाली होती. या वर्षी 20 जानेवारी 2024 रोजी लोकसभा निवडणूकीच्या आधी 50 दिवसांची पॅरोल मिळाली होती. तर हरियाणा निवडणूकीच्या आधी 13 ऑगस्ट रोजी 21 दिवसांची आणि नंतर याच आठवड्यात 20 दिवसांची पॅरोल त्याला मिळाली आहे.
जेलमधून बाहेर आल्यावर गुरमीत आपल्या सिरसा येथील आश्रमात राहतो. तिथूनच तो व्हिडीयो कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या अनुयायांना (ज्यांना प्रेमी म्हटलं जातं) तो दर्शन देतो. अनेकदा वेगवेगळ्या पक्षाचे नेते त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. तो आश्रमात नसला तरीही रोज हजारो प्रेमी येतात. त्यांना रेकॉर्डेड प्रवचनं ऐकवली जातात.
डेराच्या मीडिया विभागाचा एक सदस्य सांगतो, “सध्या डेऱ्यासोबत 6 कोटी प्रेमी जोडलेले आहेत. जे पिताजीच्या (गुरमीत सिंह) सांगण्यावरून जनसेवा करतात. निवडणूकीशी पिताजींचा कधीच संबंध नव्हता. आधी संगतची एक राजकीय विंग होती. तेव्हा संगतमधील लोकांशी चर्चा करून कोणत्या राजकीय पक्षाला समर्थन द्यायचं याचा निर्णय घेतला जायचा आणि प्रेसला सांगितलं जायचं. पण संगतची ही राजकीय विंग आता रद्द करण्यात आली आहे. आता डेरा राजकारणापासून दूरच आहे. राजकारणामुळे पिताजींना खूप काही सोसावं लागलंय. पिताजींची इतकीच इच्छा आहे की सर्व प्रेमी एकत्र राहावेत.”
पण डेऱ्यातील लोकांशी बोलल्यावर समजतं की अजूनही संगतचे लोक कोणत्या राजकीय पक्षाला समर्थन द्यायचं याचा निर्णय करतात आणि निवडणूकीच्या एक-दोन दिवसा आधी तशा सूचना सर्व प्रेमींना दिली जाते की कोणाला मतदान करायचं.
डेरा प्रेमींचे व्यवस्थापन आजही पद्धतशीरपणे सुरू
एखाद्या कंपनीप्रमाणे डेरा प्रेमींचं व्यवस्थापन केलं जातं. प्रेमी, प्रेमीसेवक (यांनी पूर्वी भंगीदास म्हटलं जायचं), ब्लॉक प्रेमीसेवक, 15 सदस्यांची समिती, आणि शेवटी राज्यस्तरीय 85 सदस्यांची समिती असते. व्यवस्थापकीय समिती प्रेमींशी थेट जुळलेली असते. प्रत्येक गावात एक प्रेमीसेवक असतो. सत्संग करणं, लोकांची मदत करणं, डेऱ्याच्या सूचना प्रेमींना देणं ही याची कामं असतात. हाच निवडणूकीच्या सूचनाही देतो.

सिरसा जिल्ह्याच्या रानिया विधानसभा क्षेत्रातील बंबूर गावाचे प्रेमीसेवक आहेत राजेंद्र प्रसाद. ते सांगतात, “माझ्याकडे काहीच नव्हतं. पण पिताजींमुळे आता माझी बॅटरी कंपनी आहे. एक कोटी वार्षिक भाडं देऊन जमीन घेऊन शेती करतो. सारं काही पिताजींनीच दिलंय. निवडणूकीत कोणाला मतदान करायचं याचा निर्णय संगतचे लोक घेतात. त्यात माझाही सहभाग असतो. कोणी एकच माणूस निर्णय घेऊ शकत नाही. सर्वांची मतं ऐकून निर्णय घेतला जातो आणि मग ती आमच्यासारख्या प्रेमीसेवकांपर्यंत पोहोचवली जाते. आम्ही ती प्रेमींना देतो. मागच्या लोकसभा निवडणूकीत सांगितलं होतं की भाजपला मतदान करायचं आहे. पूर्वी आमची राजकीय विंग याचा निर्णय घ्यायची. आता संगत घेते. प्रेमीजन त्यानुसार मतदान करतात. काही वेळेस संगत सांगते की तुम्ही तुमच्या इच्छेनुसार मत द्या. तेव्हा आम्ही विचार करतो की कोणता उमेदवार नशाखोरीच्या विरोधात बोलतोय, कोण आमची मदत करेल. पिताजींचा आदेश आहे की, जिथे असाल तिथे एकजुटीनं जगा.”
भाजपला मतदान करा, असा पिताजींचा आदेश
बंबूर गावात 900 प्रेमी आहेत. प्रसाद 1988 पासून डेऱ्यासोबत आहेत. त्यांनी पुढे सांगितलं की संगतने दोनदाच कोणाला मत द्यायचं याचा निर्णय घेतला होता आणि दोन्ही वेळेस भाजपला मत द्यायला सांगितलं होतं. एकदा निर्णय घेतल्यावर त्यात बदल होत नाही. डेऱ्यापासून एक किमी अंतरावर शाहपूर बेग गाव आहे. इथं सात हजार मतदार आहेत. गावातील 40 टक्के लोक डेऱ्यासोबत जोडलेले आहेत.
इथले किराणा दुकानदार, 55 वर्षीय बालकृष्ण 12 वर्षांचे असल्यापासून डेऱ्यासोबत आहेत. ते आपल्या कामामुळे संगतमध्ये कमीच जातात पण तिथून आलेली निवडणूकीची सूचना ऐकतात. बालकृष्ण सांगतात, “या विधानसभा निवडणूकीसाठी अजून कोणतीही सूचना आली नाही. अनेकदा निवडणूकीच्या सकाळीच सूचना येते. अनेकदा सांगितलं जातं की तुमची मतं भाजप आणि काँग्रेस यांना वाटून द्या. हा डेरा म्हणजे देवाचं घर आहे. दोन्ही पक्षाचे लोक आले तर कधीकधी असा निर्णय घेतला जातो.”

या गावचे प्रेमीसेवक गुरूदयाल कम्बोज 1989 पासून डेऱ्याशी जोडलेले आहेत. ते सांगतात, “आम्ही एकजुटीनं राहतो. सर्व प्रेमी एकालाच मतदान करतात. मागच्या लोकसभा निवडणूकीत आम्ही भाजपला मत दिलं होतं. 2019 च्या विधानसभा निवडणूकीतही आम्ही भाजपलाच मत दिलं होतं. एक-दोन दिवस आधी व्यवस्थापनाकडून आम्हाला सूचना मिळतात. पण आम्ही एकदुसऱ्याच्या अशा संपर्कात आहोत की दहा मिनिटात गावातील सर्व प्रेमींना याची माहिती होते.”
सिरसा डेऱ्यावर येत नसला तरी प्रेमींची गर्दी
शिक्षा झाल्यापासून गुरमीत सिंह सिरसा डेऱ्यावर फिरकला नाही. तरीही इथं शेकडो लोक रोज येतात. रेकॉर्डेड प्रवचनं ऐकतात आणि जातात. जुन्या डेऱ्यावर आमची भेट फतेहाबादच्या शमशेर सिंह यांच्याशी झाली. २३ सप्टेंबरला गद्दी दिवसाला ते डेऱ्यात आले होते. ते सांगतात, “आम्ही गावात राहतो. अनेकदा नेत्यांशी आमचे वैयक्तिक संबंध असतात. पण संगतचा फैसला त्यांच्या बाजूने नसतो. अशावेळी आम्ही अर्धी मतं संगतच्या सूचनेनुसार देतो आणि अर्धी आमच्या इच्छेनुसार.”
ऐलनाबादचे भाजप उमेदवार अमीर चंद मेहता यांच्या तलवाडा गावात अंतुराम इन्साँ राहतात. डेऱ्याशी जोडलेले लोक स्वतःच्या नावापुढे इन्साँ हे उपनाम लावतात. ते सांगतात, “एक-दोन दिवस आधी मेसेज येतो. जे पक्के प्रेमी असतात ते त्यानुसारच वोटींग करतात. पण काही इतरांच्या म्हणण्यात येतात आणि दुसऱ्यांना वोट करतात. आमच्या गावात पाचशे मतदार आहेत. त्यांतील चारशे डेऱ्याच्या आदेशानुसार वोटींग करतात.”
मार्च 2023 मध्ये डेऱ्यातील राजकीय विंग अचानक भंग करण्यात आली. पण यामागचं कारण सांगण्यात आलं नाही. डेऱ्याचे प्रवक्ता जितेंद्र खुराणा सांगतात, “संगतच्या निवडणूकीच्या निर्णयात पिताजी काही दखल देत नाहीत. संगतची समिती आपल्या स्तरावर याचा निर्णय घेते. पिताजींनी कधीही कोणत्या राजकीय पक्षाला मत द्या म्हणून सांगितलं नाही.”
पण डेऱ्याविषयी पुस्तक लिहिणारे पत्रकार, अनुराग त्रिपाठी यांना हे अमान्य आहे. ते म्हणतात, “गुरमीत सिंहचे अनेक निवृत्त आयएएस अधिकारी तसेच नेत्यांसोबत संबंध होते. ते त्याला सांगायचे की राजकीय हवा कोणत्या दिशेनं वाहते आहे. तरीही डेरा प्रेमी कोणाला मत देतील याचा अंतिम निर्णय गुरमीतच करायचा. गुरमीतची राजकीय समज चांगली आहे.

2011 च्या आधी तो आपल्या परिसराच्या हिशेबानं आपलं समर्थन द्यायचा. त्याचवेळी नरेंद्र मोदी राष्ट्रीय पातळीचे नेते बनू लागले होते. गुरमीतनं हेरलं की भाजपसोबत जाण्यात त्याचा फायदा आहे. तिथं धार्मिक राजकारणासाठी जागा होती. त्यामुळे तो उघडपणे भाजपसोबत गेला. त्यानंतर भाजप आणि डेरा एकत्रच वाटचाल करत आहेत.”
भाजप आणि डेरा यांच्यातील संबंध 2014 च्या हरियाणा विधानसभा निवडणूकीत उघडपणे पुढे आले. तेव्हा मध्य प्रदेशचे मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेता, कैलाश विजयवर्गीय निवडणूक प्रभारी होते. निवडणूकीच्या एक आठवडा आधी ते भाजपाच्या 44 उमेदवारांनी घेऊन सिरसा डेऱ्यावर गुरमीत सिंहला भेटले. ही भेट जेमतेम पंधरा मिनिटांची होती.
ज्यात गुरमीतनं या उमेदवारांवर आपला आशीर्वाद हस्त ठेवला. मग त्यांना डेऱ्याच्या राजकीय विंगला भेटायला सांगितलं. यातून हेच दिसतं की राजकीय विंगचा निर्णय प्रत्यक्षात गुरमीतचाच असायचा. सध्या गाव पातळीवर प्रेमीजनांची बैठक सुरू आहे. त्यांचा अंतिम निर्णय झाला नसला तरीही त्यांचा कल भाजपकडेच आहे.
(सौजन्य - न्यूज लॉँन्ड्री)
अनुवाद - प्रतिक पुरी






