लोककलावंताकडे अत्यंत उपेक्षेने पाहिले जाते. त्याच्या वाट्याला ही उपेक्षा समाजाने दिली, की कलेने दिली? लोककला या समाजाचा भाग आहेत. त्या समाजातल्या सांस्कृतिक हालचालींवर उभ्या आहेत. प्रसिद्ध विचारवंत एरिक फ्रॉम यांनी त्यांच्या 'दि सेन सोसायटी' या पुस्तकात 'लोककला म्हणजे मानवी समूहाने स्वतःशी आणि इतरांशी साधलेला लोकसंवाद आहे' असे म्हटले आहे.
माणसाला सामुदायिक कलेची माणूस म्हणून जगण्यासाठी नितांत आवश्यकता आहे. कलेक्टिव आर्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीने तिच्या जगण्याला स्वतःच्या इंद्रियांद्वारे अर्थपूर्ण, सर्जनशील, क्रियाशील आणि भागीदारीसह प्रतिसाद देणे होय. यात भागीदारीला फार महत्त्व आहे. तसे झाले नाही, तर माणूस सतत चिंताग्रस्त आणि मनोरुग्ण राहील असे एरिक फ्रॉम यांना वाटते. लोककला समाजातल्या रूढी, परंपरा आणि धार्मिक विधींना जोडल्या गेल्याने त्या टिकल्या हे एका बाजूला जसे खरे आहे तर दुसऱ्या बाजूला त्या कला म्हणून कुंठित झाल्या हेही खरे आहे.
जागरण, गोंधळ, भारुड, लळिते, दशावतार, पोतराज, नंदीबैलवाले, तमाशा ही महाराष्ट्रातल्या काही लोककलांची नावे आहेत. या साऱ्याच लोककला एका अर्थाने भटक्या आहेत. एका गावातून दुसऱ्या गावात फिरणाऱ्या. एका घरातून दुसऱ्या घरात जाणाऱ्या. यातले कलावंत कोण आहेत? तर तेही गावकुसाबाहेर फेकलेले दलित आणि भटके आहेत.
या उपेक्षित कलावंतांचे प्रश्न नीट समजून घेतल्याशिवाय त्यांच्या सामाजिक न्यायाच्या कहाण्या कळणार नाहीत. आणि त्यांचे प्रश्नही सुटणार नाहीत. आपल्याकडे लोककलांचा जो अभ्यास झाला, तो बहुधा विद्यापीठाच्या ॲकॅडमिक चौकटीत झाला. त्यातही तो बऱ्याच अंशी मराठीत केवळ वाङ्मयीन अंगाने झाला, हे मान्य करायला हवे. याचा सर्वात मोठा तोटा लोक-कलावंतांना तर झालाच.
पण त्या कलांच्या कला म्हणून प्रवासालाही या अभ्यासाचा फारसा उपयोग झाला नाही. विद्यापीठांच्या पदव्यांसाठी झालेले लोककलांचे संशोधन केवळ वाड्मयीन परिघात न होता ते समाजशास्त्रीय दृष्टीने झाले असते, तर आपल्याला काहीएक निष्कर्षावर येता आले असते.

लोककलांचा जो अभ्यास झाला, तो फक्त विद्यापीठाच्या अंगाने झाला
लोकककलांमधली जातिव्यवस्था, धर्मकारण आणि अर्थशास्त्र समजून न घेतल्यामुळे बऱ्याच नामवंत अभ्यासकांनी लोककलांचे उदात्तीकरण करण्यात धन्यता मानली. अगदी प्रभाकर मांडे, रा. चिं. ढेरे, तारा भवाळकर, विश्वनाथ शिंदे, सुदाम जाधव, रामचंद्र देखणे, प्रकाश खांडगे असे अभ्यासकदेखील याला अपवाद नाहीत.
लोककला या धर्माच्या, रूढी आणि परंपरांच्या वाहक आहेत असे मानल, की सारेच प्रश्न आपोआप संपतात. ज्या जातिसमूहांनी जातव्यवस्था नाकारून धर्मपरंपरेला छेद दिला, त्याच जातिसमूहातील लोक-कलावंतांना लोककलेतून इथली धर्मपरंपरा टिकविण्याचे आदेश वरच्या वर्गाकडून दिले हे वेगळे सांगायला नको.
तमाशाचेच उदाहरण पाहायचे झाल्यास, पुरोगामी महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास असं सांगतो की, तमाशातली बाई नाचविणे हे इथल्या मराठा पाटलाने सतत प्रतिष्ठेचे मानले. तमाशातली जातिव्यवस्था तपासत असताना काही वास्तव गोष्टी समोर येतात. आज महाराष्ट्रात पन्नास ते दीडशेपर्यंत लहान-मोठे तमाशा फड आहेत. शिवाय शासकीय परवानगीने चालणारी कलाकेंद्रे वेगळी.
या सगळ्यांची संख्या काढल्यास आज महाराष्ट्रात दहा ते पंधरा हजार तमाशा कलावंत आहेत. या कलावंतांच्या जातींचा विचार केला तर बहुतांशी कलावंत महार, मातंग, कोल्हाटी, गोंधळी आणि गोपाळ या दलित आणि भटक्या-विमुक्त जातीतले आहेत. पण तमाशा फडाचे मालक मात्र मराठा आणि मुस्लिम आहेत. गायला महार, वाजवायला मांग, नाचायला कोल्हाटी स्त्रिया, आणि तंबू-बांबू रोवायला आदिवासी मजूर अशी तमाशातली जातिव्यवस्था आहे.
थोडक्यात, कलेच्या सादरीकरणात दलित कलावंत आणि पैसा मात्र उच्चवर्णीय मालकाच्या खिशात अशी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली जातीची उतरंड तमाशातही आहे. इतर लोककलांचेही फारसे वेगळे नाही. जागरण, गोंधळ, पोतराज बहुरूपी, रायरंद या लोककला सादर करणारे कलावंतही याच घटकातील आहेत.
या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित केलेला 'ब्रोकन मॅन' म्हणजे पाठीचा कणा मोडलेला माणूस आजही लोककलांमध्ये वावरतो आहे. लोककलांमधला कलावंत रात्रीचा राजा अन् दिवसा भिकारी असतो. लोककला दलित आणि उपेक्षित भटक्या जातींनी विकसित केल्या आहेत. पण या पारंपरिक लोककला किती दिवस टिकवायच्या हा खरा प्रश्न आहे.
लोककलांमधला कलावंत रात्रीचा राजा अन् दिवसा भिकारी
पायात चाळ बांधून घुंगरांशी संसार करणाऱ्या बाईचं जिणं लाजीरवाणं असतं. तिचा रंगलेला चेहरा साऱ्यांनाच दिसतो. पण त्यामागची वेदना मात्र दिसत नाही. तमाशात नाचकाम करणारी बाई पुरुषी नजरा चुकवत ओढ्यानाल्याला अंघोळ करते. मासिक पाळीच्या काळातही या बाईला बोर्डावर नाचावं लागतं. शिवाय तिला आजारपणही परवडणारं नसतं. त्या काळात रोजंदारी कोण देणार? असंख्य इंगळ्या डसाव्यात अशी जीवघेणी वेदना घेऊन ती तमाशाच्या बोर्डावर हसतमुखानं वावरत असते.
इतर लोककलांमधल्या स्त्रियांची अवस्था वेगळी नाही, महार, मांग, कोल्हाटी, डोंबारी, गोंधळी जातीतील स्त्रियांचा भरणा जास्त. लोककलेचा फड बाईच्या नावानं चालतो. जसे विठाबाई, कांताबाई, सुरेखा पुणेकर, यमुनाबाई वाईकर अशी कितीतरी नावं सांगता येतील. म्हणायला त्या फडाच्या मालकीण, कलेच्या हकदार. पण पैशाची सारी मालकी सावंत, खेडकर, पठाण अशा वरच्या जातीतील मालकांकडे.

भारतीय जातिव्यवस्थेने कलेचे असे फायद्यानुसारी विभाजन केले आहे. भारतीय संगीत जगतातलं श्रेष्ठ संगीत म्हणून लोकसंगीताची ओळख सांगितली जाते. पण लोकसंगीताचा, लोककलांचा सारा इतिहास बिनचेहऱ्याचा आहे. गेल्या शतकात आपल्या देशातल्या वादकांना, गायकांना, नट-नट्यांना प्रतिष्ठा आणि संपत्ती मिळायला लागली.
पण प्रतिष्ठेचा धागा ज्या लोककलांच्या मुळाशी आहे, त्या गतशतकातील लोककलांचा इतिहास मात्र पुसला गेला आहे. या देशातल्या जातिव्यवस्थेने भारतीय कला इतिहासाला चेहरा आणि प्रतिष्ठा मिळू दिली नाही, हे वास्तव आहे.
भारतात वेदोत्तर चार्वाकाचा बुद्धिप्रामाण्यवाद प्रवाह टिकला असता किंवा हा देश बुद्धमय राहिला असता, तर आपल्या देशाच्या सांस्कृतिक वास्तवाचं चित्र फार वेगळं राहिलं असतं. चातुर्वण्य व्यवस्थेत अडकलेल्या भारतात कलांची विभागणी जातिसंस्थेच्या उतरंडीप्रमाणे झाली हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ज्या कलांना एरिक फ्रॉम यांनी इन्डिन्व्हिज्वल आर्ट म्हणजे त्या कला भारतातल्या वरच्या वर्गाने आपल्या हातात ठेवल्या आणि कलेक्टिव्ह आर्ट म्हणजे लोककला या समाजातल्या खालच्या जातींमध्ये वाटून टाकल्या.
दुसरे म्हणजे ज्या कला उत्पन्नाला जोडल्या गेल्या आहेत त्या कला आपल्या हाती ठेवून पैसे न मिळणाऱ्या लोककलांना विधीनाट्याला जोडून त्यांना भीक मागायला लावण्यात इथल्या वरचा वर्ग कमालीचा यशस्वी झालेला दिसतो. जसे नाटक, चित्रपट यावरील वर्चस्व ब्राह्मणांनी अजूनही सोडले नाही आणि लोककलांमध्ये ते गेले नाहीत.
महाराष्ट्रातील लोककलावंतांचा सर्वे करताना त्यात ब्राह्मण कलावंत म्हणून दिसले नाहीत. अपवादाने पठ्ठे बापुरावांसारखी काही मंडळी होती. पण तेही लेखनकाम करायला. इथे जातिद्वेषात कलेला विभागू नये हे खरे आहे. परंतु ब्राह्मण्य आणि सामंती मानसिकतेने कलेत श्रेष्ठता-कनिष्ठता ठरविली हेही नाकारून चालणार नाही.
कलेचे शास्त्रीय गोडवे गाणाऱ्या अभिजात वर्गाने लोककलेला नेहमीच नाके मुरडली, लोककलेचे तोंडभरून कौतुक झाले, पण या कलांना प्रतिष्ठा देण्यासाठी निर्णायक पाऊले उचलली गेली नाहीत. याचा परिणाम लोककलावंत सतत उपेक्षित राहिला. दरिद्री राहिला. दुसऱ्याकडे नेहमीच मागत्या राहिला.
लोककला या कला, रूढी-परंपरा आणि व्यवसाय अशा तिहेरी चक्रात अडकल्या आहेत. कला म्हणून लोककलांचे महत्त्व माप भरून उरते. उत्स्फूर्त, मनोरंजन, आविष्कार, नाट्य, विनोद, नृत्य, संगीत या साऱ्याच बाबतीत लोककला उजव्या आहेत. माणसाच्या आदिम जाणिवेला जोडलेल्या आहेत.
या अर्थाने त्या अधिक नैसर्गिक आहेत. ताजेपणाने भरलेल्या आहेत, जिवंत आहेत. राहिला प्रश्न त्यातील धर्माचरणाचा आणि रूढी- परंपरांचा. एखादी सांस्कृतिक गोष्ट धर्माला जोडली की बिनबोभाट रुढ होते हे सांस्कृतिक वर्चस्वाचे राजकारण इथल्या वर्चस्ववादी जातिव्यवस्थेला नक्कीच माहीत आहे.
शेवटी प्रश्न उरतो तो व्यवसायाचा. लोककला व्यवसाय म्हणून कधीच यशस्वी झाल्या नाहीत. महाराष्ट्रात तमाशा सोडला, तर इतर लोककला मृतप्राय झाल्या आहेत. कोणत्याही कलेतून कलावंतांच्या पोटाचे प्रश्न सुटत नसतील तर त्या नामशेष होणार हे उघड आहे.
पुरोगामी म्हणवणारे दलित पुढारी लोककलावंतांचे प्रश्न आस्थेने मांडत नाहीत
पहाटेच्या वेळी हातात कंदील घेऊन गाणे म्हणत फिरणारा पिंगळा कला म्हणून तर फिरत नाही? उघड्या अंगावर आसूडाचे वळ उठवून दारोदार फिरणारा पोतराज भीक मागतो हे कसे नाकारणार? वाद्यांच्या ठेक्यावर दोरीवर कसरत करणारी कोल्हाट्याची मुलं काय मागतात? घराघरात जाऊन भविष्य सांगणारा आणि नंदीबैलाला सजवून गावोगाव, भटकणारा कोण आहे? पायात घुंगरं बांधून फडात नाचणारी तमासगिरीण आणि देवाच्या नावाने सोडलेली मुरळी कलावंत म्हणून सुखी आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत शोधत लोककलांकडे पाहिले तर या कला जिवंत रहाव्यात असे कुणालाही वाटणार नाही.
लोककला आणि लोक-कलावंतांच्या जगण्याकडे असे समाजशास्त्रीय चिकित्सेने पाहिले असते, तर लोक-कलावंतांचे सामाजिक न्यायाचे प्रश्न अधिक प्रकाशात आले असते. तर लोक-कलावंतांचे आजचे प्रश्न अधिक दाहक आहेत ते सोडविण्यासाठी लोककलांवरील संशोधनाचा उपयोग व्हायला हवा होता. पण दुर्दैवाने विद्यापीठीय संशोधनात तसे झालेले दिसत नाही.
लोककलावंत वोट बँक नाहीत म्हणून राजकारणी त्यांच्या प्रश्नांकडे गांभिर्याने पाहात नाहीत. लोककला या दलित, उपेक्षित, भटक्यांनी विकसित केलेल्या कला आहेत, असे असूनही पुरोगामी म्हणवणारे दलित पुढारी लोककलावंतांचे प्रश्न आस्थेने मांडत नाहीत. तमाशा आणि इतर लोककलेत वावरणारे मतलबी समाजसेवक स्वतःच्या हितापलीकडे पाहात नाहीत.
तमाशा मालकांचे शोषण करून मजले चढवणारे सावकार गावोगावी वाढताहेत. प्रसारमाध्यमेही लोककलांकडे केवळ रंजक बातमी म्हणून पाहतात, प्रेक्षकांची अभिरुची बदलली, हुल्लडबाजी आणि नाचगाणे वाढले. या सगळ्या गोष्टींचा अनिष्ट परिणाम आज मराठी लोककलांवर झाला आहे. आज मराठी चित्रपट, नाटकाला बरे दिवस येत असताना मराठी लोककला कोमात जाव्यात हे पुरोगामी महाराष्ट्राचे सांस्कृतिक दुर्दैव आहे.

केवळ पॅकेज देऊन किंवा वृद्ध कलावंताला तुटपुंजे मानधन देऊन लोककलांना अच्छे दिन येणार नाहीत. त्यासाठी सांस्कृतिक विकासाच्या मुख्य प्रवाहात लोककलांना सन्मान दयावा लागेल. लोककलावंतांच्या आरोग्याचे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे, त्यांच्या आत्मसन्मानाचे आणि त्यांच्या अस्वस्थ जगण्यातील रोजचे प्रश्न समजून घेतल्याशिवाय लोककलांच्या विकासाची प्रागतिक पावले टाकता येणार नाहीत.
लोककलांचा प्रागतिक अर्थाने विचार करायचा म्हणजे त्यांना अधिकाधिक सामाजिक प्रबोधनाला जोडावे लागेल. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जलसा आणि शाहिरी परंपरेचा वारसा मराठी लोककलांनी जेवढा स्वीकारायला हवा होता, तेवढा तो तमाशा सोडून इतर लोककलांत पाझरला नाही. ही पुरोगामी परंपरा स्वीकारल्याशिवाय लोककलेतील कलेला सामाजिक अन्वयार्थ प्राप्त होणार नाही.
जागतिकीकरणात लोककलांचे काय होईल?
आज जागतिकीकरणात लोककलांचे काय होईल ? असा प्रश्न अनेकांना पडतो आहे. जागतिकीकरण ही एक वेगवान आर्थिक व्यवस्था आहे. भारतात 1991 पासून खुल्या अर्थव्यवस्थेच्या रूपाने जागतिकीकरणाने पाऊल टाकले. आज जागतिकीकरणाच्या विळख्यात संपूर्ण जग उभे आहे. जागतिकीकरणाचे चांगले-वाईट परिणाम सांगणाऱ्या चर्चाही खूप झाल्या आहेत.
पण आधीच असहाय असलेल्या घटकाला जागतिकीकरणाला एखादया जनावरासारखे हुसकावून लावता येणार नाही. जागतिकीकरणाच्या महासागरात आपले अस्तित्व टिकवून पोहण्याची क्षमता अर्जित करावी लागणार आहे. लोककलांचा या दृष्टीने विचार केल्यास लोककलांनी स्वतःत बदल करून घेतला आहे असे आपणास दिसेल.
तमाशाचे ऑर्केस्ट्रीकरण, जागरण गोंधळाचा इव्हेन्ट, पूजा विधी साहित्याचे ऑनलाईन मार्केटिंग, तमाशात आलेली भपकेबाज लाईट, चित्रपटगाणी, कमीत कमी कपड्यांतील शृंगारनृत्ये, आधुनिक संगीत वाद्ये, फिरते रंगमंच, लावणी शो हे सारे जागतिकीकरणाचे दृश्य परिणाम आहेत. लोककलांनी स्वतःमध्ये करून घेतलेले हे आधुनिक बदल आपल्यातल्या अंगभूत असणाऱ्या कलेच्या विकासासाठी तर नक्कीच केलेले नाहीत. हे आर्थिक दबावातून आलेले बदल आहेत.
म्हणून जागतिकीकरणात लोककला ग्लोबल होतील, त्यांचा इव्हेन्ट होईल, त्या अधिक झगमगीत आणि आकर्षक होतील, त्या पैसाही मिळवतील पण या ग्लोबल दुनियेत त्या व्यवसाय म्हणून कुठे जातील आणि कला म्हणून किती उरतील हा खरा प्रश्न आहे. ज्या लोककला माणसाच्या पोटाचे प्रश्न सोडवणार नाहीत, त्या लोककला टिकणार नाहीत. त्यामुळे जागतिकीकरणात एकूणच आपल्या कलांचे काय होईल? असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.
आपल्या साऱ्याच आधुनिक कला चेहरा बदलताहेत, त्या अधिकाधिक बाजाराला जोडल्या जात आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण आज आपल्या सांस्कृतिक आशयाला जागतिकीकरण, राजकारण आणि धर्मकारण यांची मिलीभगत कुठे नेऊन ठेवील याचा नेम नाही.
कारण सध्या भारतीय माणसाच्या एकूणच सांस्कृतिक जगण्यात राजकारण ज्या पद्धतीने हस्तक्षेप करत आहे ते पाहता कला आणि कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न अधिक टोकदार होत जाणार आहे असे दिसते. कुणी काय खावे, कुणी काय बोलावे, कुणी काय लिहावे यावर दिवसेंदिवस बंधने येत असतील तर आपल्या सांस्कृतिक अभिव्यक्तीची सारीच ठिकाणं दडपणातून नक्कीच खुरटी बनतील. चित्रपट, नाटक यांसारख्या पडद्यावरच्या कला दडपल्या जातील तर त्यात उत्स्फूर्त आणि मुक्त आविष्काराला जोडलेल्या लोककला कशा सुटतील ? सध्याचे सांस्कृतिक दहशतीचे वातावरण पाहता अभिव्यक्तीच्या बंधनात न अडकलेल्या मुक्त लोककलांना अजूनच बुरे दिन येतील.
(साभार - परिवर्तनाचा वाटसरू, भटक्यांचे स्वातंत्र्य)






