छत्रपती संभाजी नगर ते पैठण रस्त्यावर, पैठणपासून 28 किलोमीटर अंतरावर चौंडाळा हे गाव वसलेलं आहे. प्राचीन काळापासून ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाणाऱ्या आणि संत एकनाथ महाराज यांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि समाधीस्थान असलेल्या श्रीक्षेत्र पैठणपासून अगदी काही अंतरावरच असलेलं चौंढाळा. तशी या चौंढाळा गावाचीही साऱ्या पंचक्रोशीत ख्याती, कारण माहूरची जी रेणुका माता आहे तिचं उपपीठ याच चौंढाळा गावात…नवरात्रौत्सवात या गावात फार प्रसिद्ध अशी चौंढाळ्याची यात्रा भरते.
तर या अवघ्या सातशे उंबऱ्यांच्या व 1200 लोकसंख्या असलेल्या चौंडाळा गावाने मात्र, गेली काही शतके एक अनोखी प्रथा प्राणपणाने जपली आहे. आजच्या ‘हायफाय’ संस्कृतीत ही प्रथा हास्यास्पद व चेष्टेचा विषय होऊ शकेल. अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांसाठी आव्हान ठरू शकेल अशीच ही प्रथा आहे. ‘गाव तसं चांगलं पण, वेशीला टांगलं’ असा एक वाक्यप्रचार आपल्याकडे प्रचलित आहे. प्रथेबाबत अनेकजण याच प्रकारे नाके मुरडतात. पण, गावातील लोक मात्र मोठ्या अभिमानाने व तेवढ्याच भक्तीभावाने ही प्रथा परंपरा म्हणून पाळतात.
(चौंडाळा गावातील रेणुका देवी मंदिर)
अशा काय काय आहेत ‘चौंडाळा’च्या प्रथा?
- या गावात लग्न लागत नाही…
- या गावात एकही दुमजली घर नाही…
- या गावातील एकाही घरात पलंग नाही…
- या गावातील घरात झोपण्यासाठी गादीही नाही…
- या गावातील महिला मांसाहार करत नाहीत…
- या गावातील बैलांना शेंगट्या लावत नाहीत…
चौंडाळा गावात शिरताच क्षणी ‘बाईमाणूस’च्या टीमला आपण काहीतरी वेगळं अनुभवतोय याची जाणीव झाली. सगळीच्या सगळी घरं एकमजली… एकाचेही घर दुमजली नाही किंवा एकाही घराला माडी नाही… गावातील एक-दोन घरात प्रवेश केल्यानंतरही तोच अनुभव. कुठेच पलंग दिसला नाही, की खाट दिसली नाही. घरातील वृद्ध खाली जमिनीवरच अंथरूण टाकून पडलेली, साधी गादीदेखील नजरेला पडली नाही…
हे सगळंच जितकं विचित्र होतं तितकचं हे सगळं असं का, हे जाणून घेण्याचं कुतुहलही तितकचं होतं. चौंडाळा गावाचे एक ग्रामस्थ सुखदेव दळवे आमचा प्रश्नांकित चेहरा बघून थेट बोलायलाच सुरूवात करतात.
‘’कित्येक दशके झाली या गोष्टीला, या गावात एकही लग्न लागत नाही हे खरंय. म्हणजे गावात कुणाचेही लग्न ठरले तर इथे हळद लागते, साखरपुडा होतो, लग्नापूर्वीचे सर्व विधी होतात, मात्र मंगलाष्टकं काही गावात लागत नाहीत. गावाच्या शिवाराबाहेरच एक मंगल कार्यालय आहे, तिथे जाऊन लग्न करावं लागतं.एकदा का शिवाराच्या बाहेर लग्नाचा विधी संपला की पुन्हा वऱ्हाड गावात येतं आणि मग जेवणावळीचा कार्यक्रम वगैरे वगैरे…’’

(चौंडाळा गावातील घरे)
रेणुका माता अविवाहित म्हणून…
हे असं का याचं उत्तरही सुखदेव दळवे देतात. गावाच्या या परंपरेमागची पौराणिक कथा सांगताना ते म्हणतात की, गावात रेणुका देवीचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर माहूरच्या देवीचे उपपीठ म्हणून ओळखलं जातं. एक दैत्यराजा होता, तो देवीच्या रूपाला पाहून मोहित झाला आणि त्याने देवीला विचारले, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. देवीने नकार दिला, परंतु त्या देत्याने सैन्य आणून देवीसोबत लग्न करण्याचा जबरदस्तीने प्रयत्न केला.
मात्र त्यात तो अपयशी ठरला. दैत्यासोबत आलेल्या लोकांना तहान लागली. त्यांची तहान भागवण्यासाठी गावाच्याजवळ 11-12 किलोमीटर पर्यंत महापराक्रमी भिमाने गंगा आणली होती. परंतु नारद मुनी यांनी भिमाला सांगितले की, या दैत्याच्या सैन्यांना पाणी देण्याची काहीही गरज नाही. नारद मुनींनी असे म्हटल्यावर भिमाने नदीला लाथ मारली आणि नदीचा प्रवाह पूर्वीसारखा करून टाकला.
दैत्य राजा आणि त्याने सोबत आणलेली वऱ्हाडी यांना देवीने शाप दिला आणि त्यांचे शिळेत (दगडात) रुपांतर झाले आणि देवी कुमारीका राहिली. रेणुका मातेचे लग्न झालं नाही. त्यामुळेच गावात कोणत्याही मुलीचे किंवा मुलाचे लग्न केले जात नाही. आजही या गावाच्या परिसरात लहान-मोठे असंख्य दगड दिसतात.
चौंडाळा गावातील रेणुका मातेचे मंदीर म्हणजे एक चिरेबंदी वाडा आहे आणि पूर्ण मंदीरही संपूर्ण दगडांनी बांधलेलं आहे. गाभाऱ्यात चार बाय चार फुटांचा देवीचा तांदळा म्हणजे मुखवटा आहे. पाषाणातील हा तांदळा शेंदूर रंगाचा असून देवीचे डोळे मोठ्या आकारात आहेत. 500 वर्षांपेक्षाही अधिक पुरातन असे हे रेणुका मातेचे मंदीर असल्याचे गावकरी संगतात.
मंदीरापेक्षा अधिक उंच घर नसावे म्हणून…
गावात अशा अनेक विचित्र प्रथा आणि त्यापैकी एक असलेली प्रथा म्हणजे गावात एकही दुमजली घर नसणे. अनिल काळे म्हणतात, की आमच्या गावातील लोकांकडे दुमजली घर बांधायला पैसे नाहीत असे अजिबात नाही. मात्र गेल्या कित्येक दशकापांसून सुरू असलेल्या प्रथेचा आम्ही आदर करतो. गावात असलेल्या रेणुका मातेच्या मंदिरापेक्षा अधिक उंच घर असता कामा नये अशी गावाची श्रद्धा आहे आणि म्हणूनच आम्ही त्यापेक्षा अधिक उंच घर बांधत नाही.
(रेणुका देवी)
‘’रेणुका माता कुठं पलंगावर बसते…?’’
कुसुम बोडखे या चौंडाळा गावातील एक वयस्कर महिला. ‘बाईमाणूस’ शी बोलताना त्या म्हणाल्या,’’ गावात अगदी पहिल्यापासूनच पलंग किंवा खाटा वापरत नाहीत. गावातील कोणत्याही महिलेची ‘डिलिव्हरी’ असली तरी ती खाली जमिनीवरच करायची. जमिनीवर बाजरीच्या पेंढ्या टाकायचे, एक उशाला आणि एक पायाशी ठेवायचे. तीन पेंड्या मध्ये टाकायच्या आणि बाळंतीण बाईने तिथेच आडवं व्हायचं. गादी, पलंग, खाट अशा कोणत्याही सुविधा गावात नाहीत..
‘’आमची रेणुका माता कुठं पलंगावर बसते अन् झोपते, मंग आमी का बरं ऐषोरामात राहायचं’’ असा सवाल कुसुम बोडखे करतात.
दिवसभर काम करून थकवा आल्यानंतर घरी पोहोचल्यावर माणूस आराम करण्यासाठी पाठीला बाज किंवा पलंगाचा आसरा घेतो. परंतु चोंडाळा गावामध्ये बाज किंवा खाट व पलंग हे वापरले जात नाहीत. गावकऱ्यांची अशी अंधश्रद्धा आहे की रेणुका माता पलंगावर बसलेली असल्यामुळे, तिचा अपमान होईल अशी कोणतीही कृती करायची नाही. त्यामुळे, या गावातील नागरिक कधीही पलंगावर किंवा खाटांवर झोपत नाहीत. इतकंच नव्हे तर गावातील लोक गादीचाही वापर करत नाहीत. गावामध्ये एखाद्या महिलेचे बाळंतपण करायचं असेल तर ते जमिनीवरच केले जाते आणि माहेरी बाळंतपणासाठी आलेल्या महिलेचे बाळंतपणाचे दिवसही त्या महिलेला जमिनीवरच काढावे लागतात.
गावातील एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला किंवा एखाद्या व्यक्तीची प्रकृतीही खूप खालावलेली आहे अशा अवस्थेमध्ये रुग्णाला 'बेड रेस्ट'ची गरज असते परंतु या गावामध्ये तीही सुविधा उपलब्ध नाही. अनेक गावांमध्ये आजी लग्नाला आहेर म्हणून पलंग भेट देतात, परंतू या गावात (वेशीबाहेर) मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नामध्ये खाट किंवा पलंग भेटवस्तू म्हणूनही दिले जात नाहीत!
मांसाहार फक्त पुरुषांसाठी, महिलांना व्यर्ज्य
या सगळ्या चौंडाळा गावाच्या प्रथा-परंपरा ऐकून डोकं चक्रावून जाण्याची वेळ आली असतानाच आणखी एका प्रथेबद्दलची माहिती एका गावकऱ्याने दिली. चौंडाळा गावातील खाद्यपरंपरा देखील अजबच आहे. येथे फक्त पुरुषांनाच मासांहार खाण्याची आणि बनवण्याची परवानगी आहे, महिलांना नाही.
मांसाहारासाठी जे मसाले लागतात आणि सोबतीला भाकऱ्या लागतात तेच बनवण्याची महिलांना परवानगी, परंतू मांसाहाराला त्या स्पर्शही करत नाहीत, ते काम गावातील पुरुषांचे… गावांतील पुरुष मंडळीच स्वतःच मटण बनवतात. मात्र यानंतर मटण बनवलेली जागा स्वच्छ करण्याचे काम मात्र महिलांचे…यामागची आख्यायिका मात्र कुणाला सांगता आली नाही.

(चौंडाळा गाव)
‘अंनिस’ काय म्हणते?
चौंडाळा गावातील या अजब प्रथेविरुद्ध अंधश्रद्धा निर्मुलन समिती काय म्हणते याबद्दल ‘बाईमाणूस’ने महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे यांच्याशी संपर्क साधला. ‘’खरंतर या अव्यवहारिक आणि अवैज्ञानिक गोष्टी आहेत कालबाह्य झालेले आहेत. भारतीय राज्यघटनेमध्ये फक्त भारतीय नागरिकाच्या मूलभूत कर्तव्य म्हणून सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यांसाठी ही घटना ह्या बाबी मारक आहेत आणि म्हणून या भागातील शासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन त्या गावांमध्ये बैठका घेतल्या पाहिजेत, लोकांशी संवाद साधला पाहिजे.
त्याचबरोबर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लोकांच्या मनातील वर्षानुवर्ष आलेला अज्ञान-अंधश्रद्धा दूर केल्या पाहिजेत. तेव्हाच या प्रथेला हळूहळू फाटा दिला जाईल आणि लोक नक्कीच या प्रथा बंद करतील’’ असे डॉ. गोराणे यांनी सांगितले.






