- डॉ. ठकसेन गोराणे
महाराष्ट्राच्या ग्रामीण-आदिवासी भागातील अनेक गावांच्या ग्रामदैवतांच्या जत्रा-यात्रांचे आयोजन हा त्यापैकीच एक आनंदोत्सव! मनोरंजन, कलाकुसरींचे सादरीकरण, कष्टमय जीवनाला थोडासा विश्राम, विरंगुळा, गाठीभेटी अशा अनेक इष्ट उद्देशाने ह्या जत्रांचे आयोजन केले जात असे. काही गावांमधून तर वर्षभरात एकाच गावात टप्प्याटप्प्याने दोन दोन ग्रामदैवतांच्या जत्रा आजही भरतात.
आजही अशा अनेक जत्रां-यात्रांमधून परंपरा पालनाचा आणि धर्माचरणाचा भाग म्हणून अनेक अनिष्ट, अघोरी, अमानुष रुढी, प्रथा जतन करून त्या जशाच्या तशा जोपासल्या जातात, असे दिसते. अनेक जत्रां-यात्रांमधून नवसापोटी प्राण्यांचे बळी देण्यात येतात. जत्रेच्या निमित्ताने इतर सांस्कृतिक कार्यक्रम भलेही ठिकठिकाणी वेगवेगळे होत असतील, परंतु त्या सर्वांमध्ये एक समान धागा आढळतो, तो म्हणजे देव-देवतांचे नवस फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणात उघड्यावर पशूपक्षीबळी देण्याची अनिष्ट व अघोरी प्रथा! अशा जत्रांमध्ये प्रत्यक्षात आपण गेलो तर आपल्या नजरेस पडते की, तेथे प्रचंड प्रमाणात उघड्यावर पशूबळी देण्याचे काम चालू असते.
तेथे कमालीची अस्वच्छता व दुर्गंधी पसरलेली असते. तेथेच मांस शिजवून, जेवणावळी उठत असतात. काही ठिकाणी देव-देवतांची नवसपूर्ती म्हणून दंडवत, लोटांगण घालणे, लोखंडी हुक चेहर्यावर, पोटाला, पाठीला टोचून घेऊन गळ खेळण्याचे क्रूर व अघोरी प्रकार चालू असतात. आजूबाजूला प्रचंड कोलाहल चालू असतो. यात काही चुकीचे आहे, गैर आहे असे कुणालाही वाटत नाही. विशेष म्हणजे हे जसे हिंदूंच्या देवदैवतांच्या नवसपूर्तीच्या बाबतीत घडते तसेच मुस्लिमांच्या अनेक दर्ग्यांवर, पिराच्या ठिकाणीही मन्नतीची पूर्ती म्हणून पशूबळी दिले जातात.
नवसापोटी उघड्यावर पशुबळी देण्यामध्ये केवळ अशिक्षितच असतात असे नव्हे तर शिक्षित भाविकही मोठ्या प्रमाणात मनोभावे सहभागी होताना दिसतात. शिक्षण व्यवस्थेत असलेले वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य शिक्षणातून व्यक्तीच्या आचरणात येईल, विकसित होईल आणि त्यामुळे तो अंधश्रद्धेचा, अवैज्ञानिक गोष्टींचा बळी होणार नाही अशी अपेक्षा होती. मात्र येथे शिक्षणाचा पराभव झाल्याचे चिन्ह आढळते.
शिकलेला माणूस आहार, व्यायाम, आरोग्य, तंत्र वैज्ञानिक कौशल्याचे ज्ञान वापरण्यासाठी माहिती, ज्ञान व शास्त्रीय विचार पद्धती यांचा वापर करतो. मात्र महत्त्वाच्या बाबींमध्ये यशस्वी होण्यासाठी किंवा सफल होण्यासाठी तो पारंपरिकतेचा मार्ग शोधतो. त्यासाठी तो जपजाप्य, होमहवन, ताईतोडगे, पूजाअर्चा, नमाज, प्रार्थना, यज्ञयाग, गंडेदोरे, उपासतपास, नवससायास असं सर्वही यथासांगपणे पार पाडतो.
अशा वेळी नवस करू नका आणि उघड्यावर पशुबळी देऊ नका, असे बोलणेही फारसे कुणाला रुचत नाही, पटत नाही. उलट तीव्र विरोधच होतो. अशा वेळी हिंदू-मुस्लिम असे सर्व हितसंबंधी एकत्र येऊन प्रबोधन करणार्या कार्यकर्त्यांना एकजुटीने विरोध करतात. देवदैवतांच्या श्रद्धेपोटी आणि नवसपूर्ती करण्यासाठी लांबून लोक, भाविक आलेले असतात. त्यातील अनेक जण स्वत:चे किंवा भाड्याचे वाहन घेऊन त्यासोबत बकरं, मेंढरू, कोंबडं घेऊन आलेले असतात. त्यांनी 10-20 नातेवाईक मित्रमंडळी यांनाही सोबत आणलेले असते.
हे सर्वजण परंपरा जपणारे, जोपासणारे, मानणारे, मिरवणारे असतात. जत्रा, यात्रेच्या ठिकाणी विस्तीर्ण माळावर किंवा गल्लीबोळात, जिथे जागा दिसेल तिथे, घाणीवर माती-केरकचरा ढकलून, पुढचा कार्यक्रम सुरू करतात. अशा वेळी ह्या लोकसमुदायाला समजावणे, प्रबोधित करणे अवघड होऊन बसते.
नवसे कन्या- पुत्र होती। तरी का करणे लागे पती? असा खडा सवाल जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी चारशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या समाजाला विचारलेला आहे. महाराष्ट्र अंनिस अशा संत वचनांचीच आठवण समाजाला, भाविक-भक्तांना प्रबोधनातून करून देत असते. सामान्य भाविकांना हा मुद्दा, विचार पटतोही. पण तथाकथित भगत मंडळी आणि अशा अनिष्ट, अघोरी प्रथा परंपरा चालू ठेवण्यात आणि त्यांचे उदात्तीकरण करण्यात ज्यांचा फायदा, विशेषत: आर्थिक हितसंबंध अडकलेले असतात, त्यांचा प्रबोधन, सत्याग्रहाला कडाडून विरोध असतो.
त्यांना संत- विचार, संत-वचनं, लोकांचे आरोग्य, कायदा याच्याशी काही देणेघेणे नसते. 23 जुलै, 1998 रोजी महाराष्ट्र शासनाने उच्च न्यायालयात प्रतिपादन केले आहे की, देवाच्या नावाने पशू व पक्षी यांची होणारी हत्या थांबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अशा हत्या रोखण्यासाठी सर्व प्रकारची काळजी घेतली जाईल व योग्य ती पावले उचलले जातील.
या युक्तीवादावर समाधान व्यक्त करून तसा लेखी आदेश न्यायालयाने काढला. परंतु 1998 पासून आजपर्यंत महाराष्ट्र अंनिसने महाराष्ट्रातील त्या त्या जिल्हा व पोलीस प्रशासनाला वारंवार विनंती करूनही, महाराष्ट्रातील पशुबळीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या एकाही जत्रा-यात्रेत न्यायालयाच्या या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी झालेली नाही.
महाराष्ट्रातील उदगीर येथे एक घटना घडली. पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्ह्यांची संख्या वाढते आहे. ती कमी व्हावी म्हणून नवस बोलून पोलिसांकडूनच बोकडबळी दिला गेला. जत्रेतील नवसापोटी उघड्यावर होणारी पशूहत्या थांबविण्याची अपेक्षा अशा पोलिसांकडून कशी काय करणार, हा एक मोठा जटिल प्रश्न आहे.
महाराष्ट्रात दरवर्षी लहानमोठ्या अशा सरासरी 4 ते 5 हजार जत्रा-यात्रा भरतात. असे समजूया की, त्यापैकी केवळ 2 हजार जत्रा-यात्रांमधून पशूपक्षी बळी देऊन, नवस फेडले जातात. नवसपूर्ती म्हणून एका पशुबळीची जत्रा करण्यासाठी आजच्या महागाईनुसार किमान 15 हजार रुपये खर्च येतो. प्रत्येक जत्रेतून सरासरी 1 हजार प्राण्यांचे बळी दिले जातात, असे गृहीत धरले तर, 2 हजार जत्रांमध्ये 20 लाख पशुबळी दिले जातात.
म्हणजे महाराष्ट्रातील ग्रामीण-आदिवासी भागातून दरवर्षी किमान 3 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम या अनिष्ट आणि अघोरी प्रथेपायी खर्च होते. त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील आर्थिक बजेट मोठ्या प्रमाणात कोलमडते. अर्थव्यवस्था खिळखिळी होते. नवसापोटी पशूहत्या यामागील हे अर्थकारण ग्रामीण भागाला दिवाळखोरीकडे नेणारे आहे, एवढे मात्र नक्की!
खरंतर आपल्याकडे अशा प्रकारे दैवीउपचार, परंपरांचे पालन, धर्माचरण, नवसायास, जत्रा-यात्रा यांची पूर्तता करण्यासाठी आर्थिक ऐपत नसतानाही जो खर्च केला जातो, त्यामुळे बहुसंख्य लोक कायमचे कर्जबाजारी होतात. जत्रेत शोध घेतला तर एका जत्रेसाठी घेतलेले कर्ज पुढील जत्रेपर्यंत फिटू शकत नाही, अशी अनेक कुटुंबं, अशा जत्रांमधून आपणास पाहायला मिळतात. शिवाय पुन्हा वर्षभरात एखाद्या संकटातून निभावण्यासाठी, लाभापोटी पुन्हा दुसरा नवस केलेलाच असतो. त्याचीही पूर्ती करायची असते.
पुन्हा त्यासाठी कर्ज काढणे भाग पडते. अशा दुष्टचक्रात अनेक कुटुंबे आजही अडकलेली आहेत. अज्ञानातून, अंधश्रद्धेतून अनाठायी खर्च होणारी हीच रक्कम जर कुटुंबांच्या आरोग्यासाठी तसेच शिक्षण, शेती विकासासाठी आणि अशाच इतर आवश्यक बाबींसाठी खर्च झाली तर अशा कुटुंबांची निश्चितच विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. म्हणून कुटुंबात, समाजात असे सर्व बाजूंनी संकट, अडचणी, समस्या घेऊन येणार्या अशा जत्रा-यात्रांचे स्वरूप ठरवले तर बदलू शकतो.
वेगळ्या आशादायी, उत्साहवर्धक व कालसुसंगत अशा प्रकारे जत्रायात्रांचे आयोजन करता येऊ शकते. जत्रांयात्रांचे आयोजन जरूर करावे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मनोरंजनाचे, संस्कृती संवर्धनाचे, विविध प्रकारच्या स्थानिक समस्या निवारणाचे, असे अनेक उत्सव, कार्यक्रम, उपक्रम सादर करता येतील. त्या दिशेने अशा जत्रा-यात्रांची वाटचाल सुरू होणे आवश्यक आहे. समाजधुरीणांनी पुढे येऊन असा विचार समाजात रुजवायला हवा. संघटितपणे आणि कृतिशील प्रयत्न करायला हवेत.
(साभार - माय महानगर)






