“प्यार का प्रॉब्लेम क्या है ना? के जब तक उसमे पागलपन ना हो, वो प्यार ही नही।”
प्रेम हे बहुधा नको त्या व्यक्तींशीच होत असते. अशा व्यक्तीशी ज्याची जात, कुळ, घराणं आपल्यापेक्षा विभिन्न आहे, जिथे होकाराची अपेक्षा कमी आहे, एकदम टोकाचा विरुद्ध स्वभाव असलेल्या व्यक्तीशी opppsites attract, जी पोरगी कधीच पटू शकत नाही तीच आवडते, कॉलेजातल्या सोज्वळ मुलींना टुकारी करणारे बॅडबॉईजच आकर्षित करतात. हे प्रेम पूर्णत्वाला जात नाही, हे प्रेम शेवटी प्रेमींच्या नाशाला कारण ठरतं.
पण हे माहीत असतांनाही प्रेमींना त्यातून सुटका करून घेता येत नाही कारण प्रेम हे असंच असतं. अनावश्यकपणे आयुष्यात येऊन मग जगण्याची गरज बनून जाणारं, अशक्य अपेक्षा ठेवायला भाग पाडणारं, सामान्य व्यक्तींना असामान्य त्याग, संघर्ष करायला लावणारं. म्हटलं तर कमजोरी, म्हटलं तर सगळ्यात मोठी शक्ती.
लैला-मजनू अशाच प्रेमींची कथा आहे जे शत्रू घराण्यात जन्मलेले आहेत आणि आपल्या प्रेमाचं भवितव्य काय असणार हे माहीत असतांनासुद्धा हे दोघे स्वतःला रोखू शकत नाही कारण परिणामांच्या भीतीपेक्षा त्यांच्यातील आकर्षण हे कितीतरी प्रचंड असतं.
फ्लर्ट कॅटेगोरीत मोडणाऱ्या या दोघांनाही एकमेकांना पाहताक्षणी प्रेम होतं आणि ते ही अगदी करीब करीब सिंगलमधला योगी म्हणतो तसं “घनघोर” प्रकारचं. आणि जेव्हा अशा प्रकारच्या लोकांना प्रेम होतं, तेव्हा अमर प्रेम कहाण्या बनतात.
इम्तियाज अलीचा भाऊ साजिद अलीचा ‘लैला मजनू’ हा आजच्या काळात आणि त्याचीच सासुरवाडी काश्मीरमध्ये घडतो पण इथे कथेत त्याने एक नवीन गोष्ट इन्ट्रोड्यूस केली आहे की लैला-मजनू या दुष्टचक्रात अडकलेले आहेत ज्यात त्यांचं प्रेम कधीच पूर्णत्वास जात नाही, अगदी परिस्थिती अनुकूल असतांनाही.
सिनेमात दोन घराण्यांच्या दुष्मनीतून लैला-मजनूचं विलगीकरण होतं, पुढे लैलाच्या इच्छेच्या विरुद्ध तिचं लग्नही केलं जातं पण या घटना घडत असतांना त्यांना टाळता येण्याची पूर्ण शक्यता होती पण तसं होत नाही आणि गोष्टी विपर्यासाला जात राहतात.

हे सगळं होत असतांना कयामत से कयामत तक पासून इशकजादे ते रामलीलापर्यंत ही कथा वेगवेगळ्या व्हर्जनसमध्ये पाहून झालेली असल्याने प्रेक्षकाला हा सिनेमा नेमका कोणत्या वळणाने जातोय हे माहीत असतं व आपण अडाखे लावत बसतो की आता हा व्हिलन बनेल, याच्यामुळे असं घडून येईल आणि या पॉइंटला साजिद अली आपल्याला बसवून तमाशा दाखवतो, कैस -लैलाच्या ऱ्हासाचा तमाशा.
या प्रेमींच्या रस्त्यातले अडसर अनेकदा दूर होऊन अनुकूल परिस्थिती निर्माण होते आणि प्रत्येकदा जेव्हा आपल्या मनात आशा निर्माण होते की हो! कदाचित आता हे दोघे मिळू शकतील, तेव्हा साजिद-इम्तियाजची पटकथा त्यांचे पात्र आणि प्रेक्षक या दोघांसोबत छळ करतात आणि नकळत प्रेक्षक हे सर्व काही एक स्पेक्टेटर बनून पाहत असतांना पडद्याच्या आत नेऊन कैस-लैलाच्या जागेवर बसवला जातो. कदाचित एक अशक्य अपेक्षा शक्य होऊ शकते या आशेने आपण सिनेमाचा प्रवास जगू लागतो.
लैला-मजनूची सुरुवातीची तीस मिनिटं खूप खराब आणि बालिशपणे दिग्दर्शित केलेली आहेत. ज्यात लैलाची भूमिका करत असलेली तृप्ती दिमरी खूप लाऊड आणि obnoxious अभिनय करते. अगदी इब्बान जे सिनेमातलं सगळ्यात मनोरंजक पात्र आहे ते सुद्धा लाऊड वाटतं आणि हा तद्दन भिकार कॅटेगरीतला सिनेमा आहे असं वाटतं असतं तेव्हाच अविनाश तिवारीची कैस पडद्यावर येते आणि जेव्हा तो लैलावर पहिला कटाक्ष टाकतो तिथून सिनेमा अचानक वरच्या गियरला जातो आणि मग शेवटपर्यंत पकड सोडत नाही.
यापूर्वी तू है मेरा सँडेमध्ये दिसलेला अविनाश तिवारी कमालीचा नट आहे. त्याच्या इंटेन्स नजरेने लैलाला झुरवणारा अविनाश प्रेक्षकांना सुद्धा त्याच्याकडे आकर्षित करतो.
अविनाशचा आवाज भारदस्त आहे आणि तो अभिनय करतांना त्याच्या सगळ्या शरीराचा(बॉडी लँग्वेज)वापर करतो जे सिनेमाच्या उत्तरार्धात खूप महत्वाचं ठरतं कारण या सिनेमाचा उत्तरार्धच या सिनेमाला लैला-मजनूच्या इतर व्हर्जन्सपासून वेगळं बनवतो.
विरह झाल्यानंतर ज्या व्यक्तीचा चेहरा आधी दिवसरात्र डोळ्यासमोर असायचा तो आताही तसाच असतो पण त्याच्याशी जोडलेल्या भावना पूर्णपणे बदललेल्या असतात. आता तो चेहरा डोळ्यासमोरुन कसा दूर करावा? हा विचार सतत डोक्यात असतो. त्या आठवणींपासून दूर कसं जावं या विचारांनी ग्रस्त असलेल्या कैसला जेव्हा लैलासुद्धा तो असलेल्या रेस्तराँमध्येच बसलेली असल्याचं जाणवतं तेव्हा कैस तिथून पळ काढतो, नंतर जेव्हा एकदा लैला त्याला भेटायला येते तेव्हा 4 वर्षांत मनात दाबून ठेवलेल्या भावनांचा बांध फुटतो आणि मूळ लैला-मजनू या फारशी लघुकथेत लिहिलं आहे त्याचप्रमाणे कैस जागेवरच मूर्च्छित होऊन पडतो आणि प्रेक्षकाला भावुक करून टाकतो पण ही नुसती सुरुवात होती.
इथून पुढे कैसचा प्रवास प्रत्येक दृश्यासोबत अजूनच खडतर होत जातो. अनेकदा जवळ येऊनही कोणत्या ना कोणत्या कारणाने कैस आणि लैलातलं अंतर कमी होत नाही. “दुरी ये कमी ही ना हो, मैं निंदोमें भी चल रहा। होता है कल बेवफा, ये आता नही, छल रहा।” इर्शाद कामिलची लेखणी हजार चंद्रांइतकी चमकून जाते. प्रत्येक गाण्यातले शब्द इतके अर्थपूर्ण आहेत की संवादांना पूरक ठरतात आणि नायकाच्या भावना व्यक्त करायला लागतात. Lyrics इतकंच कौतुकास्पद आहे नवोदित संगीतकार निलाद्री कुमारचं संगीत.
कारकिर्दीच्या पहिल्याच सिनेमात निलाद्रीने फ्रंटफूटवर बॅटिंग करून एकामागोमाग एक सलग सुपरहिट गाणे असलेली अल्बम बनवली आहे आणि लैला मजनू निःसंशय यावर्षातली सर्वोत्कृष्ट अल्बम आहे. श्रेया घोषालचं सरफिरी, आतिफचं तुम आणि अरीजितचं अहिस्ता तर एकदम स्वप्नवत झालेत.
दोन व्यक्तींमध्ये अचानक निर्माण होणारी केमिस्ट्री आणि मग हळूहळू फुलत जाणारं प्रेम, त्या दोघांमध्ये एक्सचेंज होणारे लुक्स, एकमेकाला बघतांना येणारी डोळ्यातली चकक, कधी लज्जा तर कधी, “तिलाही मी आवडायला लागलोय, हे सगळं खरंच होत आहे का?” या विचारांनी चेहऱ्यावर येणारं स्मित, यासोबतच एका वेगळ्या पद्धतीने शूट केलेलं काश्मीर पडद्यावर पाहतांना खूप विहंगम वाटतं. इथे नेहमी दाखवली जाणारी हिमवृष्टी काहीशी टाळत हिरवळ दाखवली आहे, उष्ण लूक मिळवला आहे.
जणू काही डिरेक्टर दाखवू पाहत आहे की काश्मीर तुम्हाला दाखवला जातो तो फक्त तसाच नाहीये, इथे अजूनही बरंच काही आहे. इथले युवकही इतर राज्यांच्या तरुणांसारखे कॉलेजात जातात, प्रेम करतात. इथे नुसताच ‘कोल्ड’वॉर चालू नसतो, इथे प्रेमातली ‘ऊब’ही आहे. जे चित्र तुम्हाला मीडियाद्वारे दाखवलं जातं फक्त तीच आमची आयडेंटिटी नाहीये.

आम्ही दिवसरात्र भारत-पाकिस्तान नसतो खेळत. इंडो-पाक कॉन्फलिक्ट आणि आतंकवाद याशिवाय इथे नॉर्मल लोकंसुद्धा आहेत ज्यांचं जीवन आणि स्वप्न खूप साधे आहेत.
मुकेश छाब्राने कास्टिंग करतांना प्रॉपर काश्मीरचे वाटतील असे लोकं कास्ट केलेत आणि तितकीच मेहनत त्यांच्या मेकअप आणि कपड्यांवर घेतलेली आहे कारण कोणीच मुंबईतून आणून काश्मिरात बसवलाय असं वाटत नाही. लैला मजनूचा सगळा कस, सगळं सामर्थ्य, सगळी ताकद त्याच्या शेवटच्या 30 मिनिटात आहे ज्यात कैस त्याच्या फार्महाऊसवर जातो आणि लैला जवळ असूनही कुठल्याना कुठल्या कारणामुळे त्याच्यापासून दूर जात असल्याने कैसची मनस्थिती एकदम खालावते.
लैलाच्या लग्नांनतर 4 वर्ष कैस लंडनमध्ये कसा जगला हे आपल्याला दाखवलं जात नाही पण तो जेव्हा लंडनहून भारतात येतो तेव्हा पडद्यावर ‘मजनू’ लिहून येतं( लैलासाठी हे सिनेमात तिच्या पहिल्या फ्रेमलाच लिहून येतं) आणि इथे प्रेक्षकांना कळविलं जातं की आता हा कैस राहिलेला नसून मजनू झालेला आहे आणि तिथून पुढे सिनेमातली पात्र त्यात कैस शोधत राहतात पण तो त्यांना कधीच सापडत नाही कारण लैलाच्या विरहात तो कधीच नाहीसा झालेला असतो, आता उरलेला असतो तो फक्त कैस जो लैला समोर असतांनाही तिच्यासाठी झुरतोय. कैस नेहमी त्याच्या फार्महाऊस पासून जवळच्या जंगलात पळून जात असतो कारण त्याने ही सिविलायझेशन सोडून विल्डरनेस स्वीकारलेली असते.
गर्दी त्यागून तो सतत एकांत शोधत राहतो जिथे त्याला लैला सापडते, जिथे तो तिला स्पर्श करू शकतो, तिच्याशी तासंतास गप्पा मारू शकतो, नाचू-गाऊ शकतो, ते आयुष्य जगू शकतो जे त्याला जगायला भेटलेलं नाही. सामान्य माणूसपणाच्या अटी-रूढी मर्यादा पार करून ‘जंगली’ झालेल्या कैसने प्रेमाची एक अशी लेव्हल गाठलेली असते जिथे त्याला मनुष्यजात नको आहे आणि जिथे त्याचं प्रेम पूर्णत्वास पोचलेलं आहे.
आता त्याला अजून काहीच नको आहे, खरोखरची लैला सुद्धा. अखेरच्या तीस मिनिटात घडणाऱ्या अनेक नितांतसुंदर दृश्यांपैकी एक आहे जेव्हा एक समूह नमाज पढण्यासाठी बसलेला असतो आणि समोरून आपल्याच धुंदीत जात असलेला मजनू स्वतःशीच गप्पा मारत असतो आणि त्याच्या आवाजाने नमाजीत व्यत्यय येतो तेव्हा त्यांपैकी एक इसम मजनूला विचारतो की “नमाजीत खलल आणतांना तुला लाज नाही वाटली? तुला माहीत नाही का की असं करणं निषिद्ध आहे?” तेव्हा काही क्षण गोंधळलेला मजनू अचानक ध्यानावर येतो व त्या व्यक्तीची नम्रपणे माफी मागतो आणि म्हणतो “तुम्ही तुमच्या माशुकसोबत गप्पा करण्यात व्यस्त होते आणि मी माझ्या” हे ऐकून संतप्त झालेला दुसरा एक माणूस दगड भिरकावून मजनूचं डोकं फोडतो, तर ज्या माणसाने त्याला प्रश्न विचारला होता तो मजनूच्या उत्तरावर सुन्नपणे पाहत राहतो.
आपल्या प्रेमाची अल्लाहशी तुलना करून आणि तिच्यासाठी वेडं होऊन आपलं आयुष्य वाहणारा मजनू समाजासाठी पागल असतो, हीन असतो पण हेच जर ईश्वरासाठी केलं तर तो मात्र पंडित समजला जातो, त्याला समाजात मान असतो. एका कटलेला पतंग ज्याला कुठलीच दिशा, उद्धिष्ट नसते तसा फुटलेल्या डोक्याची भळभळती जखम घेऊन रक्ताच्या थारोळ्यात पळत सुटलेला मजनू कायमचा समाजाला त्यागून जंगलात निघून जातो आणि तो नंतर कोणाच्या हाती लागत नाही, अगदी पकडलं गेल्यावर सुद्धा.
जगापासून हळूहळू होत गेलेला दुरावा आणि प्रेमाशी होत गेलेली एकरूपता हाफीज हाफीज गाण्याद्वारे अगदी परफेक्ट चित्रीत केली गेलीये. हे गाणं मजनूच्या मनःस्थितीचा सार आहे. हळूहळू सुरू होणारं गाणं त्याच्या आता उफाळत असलेल्या भावना दाखवतं तर सुरवातीला येणारा काश्मिरी कोरस त्याच्या आजूबाजूचं जग, गाणं हळूहळू बिल्डअप होतं राहतं आणि मजनू सांगतो की “मला आता कसलीच फिकीर राहिलेली, अक्कल राहिलेली नाही.
फक्त प्रेम झालंय, रोगी असल्यासारखं काय बघताय मला?” तो आता समाजाचा बांधील राहिलेला नाही. स्वतःच्याच आगीत जळून एकाच वेळी तो खाक आणि पाक झालेला आहे. त्यातून आता काहीतरी नवीन, काहीतरी पवित्र जन्माला आलंय.

जग त्याला कोरसमध्ये समजवण्याचा प्रयत्न करतो की सुधारून जा नाहीतर संपशील आणि पडद्यावर त्याच्या उचापतींना त्रस्त झालेलं गाव लाठ्या-काठ्या घेऊन त्याच्यामागे धावत आहे आणि या समाजाला फाट्यावर मारून मजनू समोर धावतोय.
मनात कुठलीही भीती न बाळगता, हसतमुखाने, सैरभैर धावतोय. जे त्याला हवंय ते त्याला त्याच्यातच सापडलंय म्हणून आता ते बाहेर शोधण्याची गरज नाही. बुद्धीजमचं हे प्राचीन तत्व सिनेमा रुपकांमधून अतिशय सुंदरपणे मांडतो. सगळ्या गावाला त्याच्यामागे पळवणारा दाढी-केस वाढवून, अनेक दिवस अंघोळ न करून गचाळ झालेला, कपडे फाटून मळके झालेला मजनू जेव्हा एकटाच नाचत असतो तेव्हा त्याने मंत्रमुग्ध करून टाकणारी एक अजबच लय मिळवलेली असते.
त्याचा नाच, त्याचं गावाला मागे पळवण, त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य नुसतं पाहतच राहावं वाटतं. कुणाच्या प्रेमाच्या, पागलपणाच्या डोहात उतरण्यापासून ते बुडण्यापर्यंतचा प्रवास पाहत रडावं की आनंदी व्हावं ही वेळ हा सिनेमा पाहतांना प्रेक्षकांसमोर येते कारण मजनूसाठी जीव तिळतीळ तुटतो.
अनेकदा इच्छा होते की त्याला घट्ट मिठी मारावी, त्याच्यासोबत रडावं पण जे पडद्यावर घडत असतं ते ही इतकं सुंदर आहे की त्याची तुलना दुसऱ्या कुठल्या गोष्टीसोबत करता येत नाही. समाजासाठी काफिर झालेला मजनू प्रेमात मात्र हाफीज (पंडित) झालेला असतो. त्याने खऱ्या अर्थाने solace गाठलेला असतो. हाफीज हाफीज गाणं हा सिनेमातला सर्वात सुंदर भाग आहे आणि अविनाशने यात जे करून दाखवलंय त्याचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे.
“तो हा रोल जगला” हे आपण बऱ्याचदा सुपरफिशियली बोलून जातो पण अविनाशने मजनूमध्ये अक्षरशः जीव ओतलाय, त्याने आपलं सर्वस्व या पात्राला देऊन मजनू जिवंत केलाय. त्याने मजनूच्या यातना जगल्यात. अविनाशला या पात्रासाठी अवॉर्ड नाही मिळणार पण माझ्यासाठी तो या वर्षातली बेस्ट परफॉर्मन्स आहे. त्याला पुढे कसे सिनेमा मिळतात, त्याचं करियर कुठली दिशा घेईल काही सांगता येत नाही पण यानंतर तो आयुष्यभर घरी जरी बसून राहिला तरी लैला मजनू ही त्याची लेगसी असणार आहे.
लैला मजनू हा सिनेमा आपल्या आयुष्यातल्या त्या व्यक्तीसारखा आहे ज्याला आपण त्याच्या गुण-दोषासकट स्वीकारलेलं असतं कारण त्याचे गुण, दोषांना कव्हर करतात. त्या व्यक्तीतला चांगुलपणा जसा आपल्याला त्याच्या दोषांकडे दुर्लक्ष करून त्यावर प्रेम करायला भाग पाडतो, तसंच काही लैला मजनूचं आहे.
(साभार - pavangangawane.wordpress.com)






