असं म्हणतात की, फार पूर्वी इराणमधे न्याय मागण्याची एक वेगळीच पद्धत होती. आपल्या तक्रारी कागदावर लिहायच्या आणि त्या कागदाने बनवलेला अंगरखा घालून अधिकाऱ्याकडे फिर्याद घेऊन जायचे. या अंगरख्याला 'कागजी पैरहन' म्हणत. इस्मत चुगताई या सुप्रसिद्ध उर्दू लेखिकेच्या आत्मकथनाचे नाव 'कागझी पैरहन' आहे त्याला हा संदर्भ आहेच, शिवाय या आत्मकथनाच्या पहिल्या पानावर उदधृत केलेला मिर्झा गालिब यांचा शेर हे नाव अधिक उलगडून दाखवतो.
“कुणाच्या लेखन सौंदर्याचे, नक्षीकामाच्या मोहकतेचे प्रतीक फिर्याद करणारे आहे? प्रत्येक चित्राच्या आकाराचे वस्त्र कागदाचे आहे.” अश्या आशयाचा तो शेर आहे. मराठीत या पुस्तकाचा अनुवाद सुलोचना वाणी यांनी 'कागदी पेहराव' या नावाने केला आहे. पद्मगंधा प्रकाशनाने तो प्रसिद्ध केला आहे.
इस्मत चुगताई या बंडखोर लेखिकेचा आज जन्मदिन…त्यामुळे या आत्मकथेची आठवण झाली. चाळीसच्या दशकात मुक्तविचारसरणीचा आविष्कार करणाऱ्या त्यांच्या लेखणीने आधुनिक विचारांच्या वाचकांच्या मनात खास स्थान मिळवले होते. त्यांचा उल्लेख ' इस्मतआपा' असा केला जाण्यामागेही वाचकांनी त्यांच्यावर केलेले प्रेम दिसून येते. त्यांचा जन्म 1915 साली उत्तर भारतातल्या बदायूं इथं झाला आणि 1991 साली मुंबईमधे त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या मृत्यू नंतर 25 वर्षांनी जेव्हा आपण ही आत्मकथा वाचतो तेव्हाही अगदी आजच्या आधुनिक काळातही त्यांचे विचार कमालीचे बंडखोर वाटतात. मग जेव्हा त्या प्रत्यक्ष ते विचार अंमलात आणत होत्या, त्या तीस /चाळीस च्या दशकात, त्यातूनही मुस्लिम कुटुंबात, अशा प्रकारचा विचार करायला आणि त्या प्रकारे जगायला केवढी हिम्मत पाहिजे याची कल्पना करणंही अवघड आहे.

अनिष्ठ सामाजिक रूढी आणि परंपरांवर बोचरे भाष्य
त्याकाळात मुलींना शिक्षणाची दारे नुकतीच उघडली जाऊ लागली होती. मुस्लिममुलींसाठी तर शाळा अजून सुरु व्हायच्या होत्या . असे असताना कुटुंबियांशी सतत संघर्ष करत इस्मत आपा शिकल्या. अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून त्यांनी बी.ए. आणि नंतर बी.एड. ची पदवी मिळवली.
शिकत असतानाच त्यांचे लेखनही सुरु झाले होते. लखनौ इथल्या प्रोग्रेसिव रायटर्स असोसिएशनच्या बैठकीत त्या सहभागी होत. त्याकाळच्या अनिष्ठ सामाजिक रूढी आणि परंपरांवर बोचरे भाष्य करणारे त्यांचे लेखन परंपरावादी आणि धर्ममार्तंडाच्या रोषास कारणीभूत ठरले नसते तरच नवल.
1942 मधे लाहोर इथून निघणाऱ्या मासिकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या 'लिहाफ़' (रजई) नावाच्या कथेमधे अश्लील लेखन केले असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तिथल्या न्यायालयात बादशहाच्या वतीनं खटला भरण्यात आला होता. त्याचवेळी असाच आरोप सादत हसन मंटो यांच्यावरही करण्यात आला होता आणि त्यांनाही लाहोर न्यायालयात सुनावणीसाठी पाचारण करण्यात आले होते.
इस्मतआपानी आत्मकथनाच्या सुरुवातीलाच या खटल्याचे आणि त्या निमित्ताने मंटोसह केलेल्या लाहोर सफरीचे धमाल वर्णन केले आहे. या प्रकरणात सरळ माफी मागावी म्हणजे खटला पुढे चालणार नाही आणि दंड किंवा शिक्षा होणार नाही म्हणून त्यांच्या अनेक नातेवाईकांनी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
इस्मतआपा मात्र ठाम राहिल्या, खटल्याच्या सुनावणीसाठी त्यांना दोनदा लाहोरला जावे लागले. सुनावणीत कथेमधे कुठलेही गैर शब्द वापरले नसल्याचे सिद्ध झाले आणि न्यायालयाने त्यांची विनाशर्त सुटका केली.

इस्मत आपांवर अश्लिल लेखिकेचा शिक्का
‘कहां है भारत की वह महान नारी, वह पवित्रता की देवी सीता, जिसके कमल जैसे नाजुक पैरों ने आग के शोलों को ठंडा कर दिया और मीराबाई जिसने बढ़ कर भगवान के गले में बाहें डाल दीं। वह सावित्री जिसने यमदूत से अपने सत्यवान की जीवन-ज्योत छीन ली। रजिया सुल्ताना जिसने बड़े-बड़े शहंशाहों को ठुकरा कर एक हब्शी गुलाम को अपने मन-मंदिर का देवता बनाया। वह आज लिहाफ में दुबकी पड़ी है या फोर्स रोड पर धूल और खून की होली खेल रही थी।”
‘अ लाइफ इन वर्ड्स मेमोयर्स’ या पुस्तकात इस्मत चुगताई लिहितात, एका लघुकथेने त्यांचे जीवन बदलून टाकले, हा काही चांगला अनुभव नव्हता. त्या लिहितात, माझ्यावर आजपर्यंत लिहाफचीच लेखिका आहे असे लेबल लावले गेले. ही कथा लिहिल्यानंतर माझी खूप बदनामी झाली आणि मला मानसिक त्रास सहन करावा लागला. यामुळे माझे आयुष्य बदलून गेले.
ही कथा लिहिल्यानंतर लोकांनी माझा अपमान करण्याची एकही संधी सोडली नाही. लिहाफच्या आधी आणि लिहाफच्या नंतर मी जे काही लिहिलं त्याची कधीच दखल घेतली गेली नाही. पण लिहाफच्या लिहिण्याने माझ्यावर अश्लील लेखिकचा ठपका ठेवण्यात आला. मला प्रसिद्धी नेहमीच बदनामीच्या स्वरूपात मिळाली.
इस्मत चुगताई यांची वादग्रस्त कथा ‘लिहाफ’ ही स्वातंत्र्यापूर्वी 1941 मध्ये ‘अदब ए लतीफ’ एका उर्दू मासिकात प्रकाशित झाली होती. ही कथा दडपून गेलेल्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याच्या शरीराचं शोषण कसं केलं जातंं यावर आधारित होती. ही त्या काळातली कथा आहे, जेव्हा लग्न म्हणजे मुलींचा व्यापार केला जायचा.
महिलांना घरातील एका वस्तूप्रमाणे समजलं जायचं. ही कथा वादग्रस्त ठरली कारण या कथेत स्पष्टपणे वापरली गेलेली भाषाशैली. आज जेव्हा आपण महिलांच्या शरीराबद्दल, लैंगिकतेबद्दल बोलतो त्या वेळी अनेकदा इंग्लिश भाषेची मदत घ्यावी लागते. अनेक वेळा आपल्याला मानवी शरीराची योग्य नावंदेखील माहीत नसतात.
इस्मत चुगताई यांनी त्यांच्या लिखाणात मानवी देहाच्या बाबतीत लिहिताना उर्दू भाषेचा प्रयोग केला आहे. आणि त्या काळात भारतात भाषांना धर्मानं जोडलं जायचं. एका मुस्लिम घरंदाज महिलेच्या शरीराबद्दल लिहिल्यामुळे इस्मत चुगताई यांना बेशर्म ठरवलं गेलं. लिहाफ ज्या काळात लिहिली गेली होती त्या काळात समाजात फक्त दोनच प्रकारच्या संबधांना मान्यता होती. एक म्हणजे स्त्री आणि दुसरं म्हणजे पुरुष.
समलैंगिक संबधांविषयी काहीच बोलण्याचं स्वातंत्र्य त्या काळात नव्हतं. पण या कथेत रूपकात्मक गोष्टींचा वापर करून पडद्याआडून या विषयाचा खुलासा केला आहे. लिहाफ ही अशी कथा आहे ज्यातून त्या काळातले सत्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय महिलांची लैंगिकता म्हणजे केवळ विषमलिंगी विवाह संबंध असा नसून यापुढे जाऊन महिलांच्या लैंगिक इच्छा काय असू शकतात हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच महिला म्हणजे फक्त घरी ठेवायचे सुंदर शरीर नसून मन आणि मेंदू असलेली माणूस असते. तसेच त्यांच्या भावनांचा आणि स्वप्नांचा उलगडा त्यांनी त्यांच्या कथेतून मांडण्याचा प्रयत्न नेहमीच केला आहे. या कथेची किंमत त्यांना अनेक मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करून चुकवावी लागली. पण त्यांनी याबद्दल कधीच माफी मागितली नाही. उलट न्यायालयाची लढाई लढली. जिंकलीसुद्धा.

‘गरम हवा’ साठी फिल्मफेअर
शाहिद लतीफ यांच्याशी विवाह केल्यानंतर आरजू, झिद्दी सारख्या चित्रपटाच्या कथा आणि निर्मितीमध्ये त्यांचा सहभाग होता. ‘गरम हवा’ हा फाळणी संदर्भात त्यांनी लिहिलेला चित्रपट खूप नावाजला गेला. इस्मत आपांना त्यासाठी फिल्म फेअर पुरस्कारही मिळाला. शशी कपूरच्या ‘जुनून’ चित्रपटासाठी त्यांनी संवादलेखन केलं होतं. दुर्दैवाने त्यांच्या या आत्मकथनात त्यांचा मुंबईतील जीवनप्रवास आलाच नाहीये.
‘कागदी पेहराव’ मधे इस्मतआपांचे लहानपण, कॉलेजमधले आणि बोर्डिंगातले दिवस इथंपर्यंतच वर्णन आहे. त्यामुळे एका लेखिकेचे आत्मचरित्र म्हणून 'कागदी पेहराव' वाचायला घेतले तर वाचकांची निराशा होते. सुरुवातीला 'लिहाफ़' च्या खटल्याविषयी लिहिल्यानंतर इतर कुठल्याही लिखाणाबद्दल यात लिहिलेले नाहीये.
उच्च शिक्षणाच्या ध्यासाने प्रसंगी धर्मही सोडण्याची तयारी असलेल्या इस्मत आपांचे प्रगतिशील धाडसी व्यक्तिमत्व या पुस्तकातून समोर येते. समाज आणि धर्म जर जाचक बंधने घालत असेल तर ती झुगारून देण्याचे साहस त्यांनी आयुष्यभर केले.अगदी लहानपणपासून बुरख्याला विरोध केला. स्त्रीपुरुष समानता स्वतःच्या कर्तबगारीवर आचरणात आणून दाखवली.
सर्वधर्म समभाव आपल्या घरापासूनच राबवला. त्यांची एक मुलगी आर्यसमाजी झाली, तिने हिंदूशी विवाह केला. त्यांच्या मृत्यूनंतर मुस्लिम रीतीनुसार त्यांचे दफन न करता दहन करण्यात आले. तसे करावे ही त्यांची इचछा होती की नव्हती याबद्दलही मत मतांतरे आहेत. आपल्या लेखनातूनही त्यांनी नेहमीच समानता, स्वातंत्र्य याच मूल्यांचा पुरस्कार केला. उर्दूतील ख्यातनाम लेखिका कुर्रतुल रेहमान इस्मत आपांच्या या लढाऊ बाण्यामुळे त्यांना साहित्यातल्या 'लेडी चंगेजखान' म्हणत.






