देशाच्या राजधानीत दिल्लीत आयोजित होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सांगलीच्या लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या, तसेच रंगभूमी आणि स्त्रीमुक्ती चळवळीच्या अग्रणी डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड झाली आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याची आनंदाची बातमी शारदीय नवरात्रोत्सवात येऊन थडकल्यानंतर, पाठोपाठ तारा भवाळकर यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड हा अपूर्व योगायोग म्हटला पाहिजे.
स्त्रीमुक्तीची चळवळ आणि डॉक्टर भवाळकर यांचे आंतरिक नाते आहे. कारण ‘स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर’ हा ‘लोकवाङ्मय गृह’ने प्रकाशित केलेला त्यांचा ग्रंथ प्रसिद्धच आहे आणि नुकताच ‘सीतायन’ हा त्यांचा ग्रंथ ‘मनोविकास प्रकाशन’ने प्रकाशित केला आहे. त्याअर्थाने स्त्रीमुक्तीचं-स्त्रीस्वातंत्र्याचं एक वर्तुळच पूर्ण झालं आहे.

महाराष्ट्रातल्या किंवा एकूणच भारतातील स्त्रीमुक्तीच्या चळवळीला थोर परंपरा आहे. तेराव्या शतकातल्या जनाबाई-मुक्ताबाई-सोयराबाई पासून ते कान्होपात्रा-बहेणाबाई या संत कवयित्रींनी महाराष्ट्रात स्त्रीमुक्तीचा मार्ग धुंडाळला, तर महाराष्ट्राबाहेर देशात संत मीराबाई, संत अक्क महादेवी, लल्लेश्वरी अशा अनेक संत कवयित्रींनी समाजातील पाखंडाविषयी मुक्तीचा झेंडा फडकविला. या बंडखोर संत कवयित्रीनी जी क्रांती केली, त्या त्यांच्या आत्मस्वरांची स्पंदनं ताराबाईनी आपल्या लेखणीतून टिपली.
लोकसाहित्य-लोकसंस्कृती ही केवळ ग्रामीण-निरक्षर लोकांची, तसंच संतसाहित्य आणि या साहित्यातील स्त्रीप्रतिमांच्या पारंपरिक पाखंडी संकल्पनांना छेद देत ताराबाईंनी आपल्या लेखनातून संघर्षसूत्र उभे केले. अगदी राम गणेश गडकरींच्या नाटकातील स्त्री प्रतिमांपासून ते अहल्या-सीता यांच्या प्रतिमापर्यंत ताराबाईंनी या व्यक्तिरेखांचे अंत:स्वर आपल्या अभ्यासातून-संशोधनातून उभे केले.
जात्यावरील दळण दळणाऱ्या स्त्रीच्या कथा-व्यथा टिपताना ती मुळातच बंडखोर होती हे त्यांनी वारंवार अधोरेखित केले. स्त्रीच्या आयुष्याचे भोगवादी चित्र ताराबाईंच्या लेखणीतून अभावानेच व्यक्त झाले. ताराबाईंच्या साहित्यातील स्त्री जनाबाईसारखी डोईचा पदर खांद्यावर घेऊन पंढरीच्या भरल्या बाजारी निघणारी स्त्री आहे.
तसंच केवळ स्त्रीविषयक भूमिका नाही तर, रंगभूमीचा पूर्वरंग, लोकरंगभूमी, विष्णुदास भावे कालीन रंगभूमी, किर्लोस्करांची नाटके, देवलांची नाटके, लोकनागर रंगभूमी, कोकणातील दशावतार आणि यक्षगान अशा विविध विषयांवर ताराबाईंनी संशोधनपर ग्रंथ लिहिले आणि मराठी रंगभूमीचा एकप्रकारे इतिहासच सिद्ध केला. मुळातच ताराबाईंची वृत्ती ही बंडखोर आणि त्यात लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीतील सत्व आणि स्वत्व बंडखोरीच्या मार्गाने शोधणारी, त्यामुळे त्यांच्या लेखनाला अपूर्वाई प्राप्त झालेली आहे.

ताराबाईंचा आणि माझा परिचय साधारणतः 1978 पासूनचा. ‘इंडियन नॅशनल थिएटर’च्या लोकप्रयोज्य कला संशोधन केंद्राची स्थापना दसऱ्याच्या दिवशी वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या हस्ते 1978 साली झाली. या संशोधन केंद्रात संशोधन सहाय्यक म्हणून मी ज्येष्ठ नाटककार लोककलेचे अभ्यासक गीतकार अशोकजी परांजपे यांच्या संचालकत्वाखाली संशोधनाचे काम सुरू केले. तेव्हापासून ताराबाईंचा प्रत्यक्ष संपर्क आला. अशोकजी परांजपे गो. ब. देवल यांच्या सांगली जवळच्या हरिपूरचे. त्याच काळात अशोकजी परांजपे आणि ताराबाई या सांगलीकडील मार्गदर्शकांचा सहवास लाभला.
त्याच दरम्यान जयसिंगपूर येथे लोकसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते आणि या संमेलनासाठी ताराबाईंनी आग्रहाने मला बोलावले होते. त्यावेळी त्या सांगलीच्या महिला महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करीत असत. पुढे संपर्क वाढला. ‘लोकसाहित्य संशोधन मंडळ’ ही संस्था लोकसाहित्याचे गाढे संशोधक प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर मांडे यांनी स्थापन केली आणि 1975-1978 पासून महाराष्ट्र आणि गोव्यातील विविध ठिकाणी लोकसाहित्य परिषदा आयोजित होऊ लागल्या.
दुर्गाबाई भागवत, रामचंद्र चिंतामण ढेरे, डॉ. प्रभाकर मांडे, डॉ. गंगाधर मोरजे, डॉ. मधुकर वाकोडे, डॉ. ताराबाई परांजपे, विनायक खेडेकर, डॉ. अशोक रानडे अशी लोकसाहित्य-लोकसंस्कृतीच्या संशोधनाची मोठी पर्वणीच महाराष्ट्र देशी सुरू झाली आणि त्यात ताराबाई भवाळकर यांचे मोलाचे योगदान आहे. किंबहुना त्यांच्या नेतृत्वाखाली सांगली येथे ‘लोकसाहित्य संशोधन मंडळा’ची ‘लोकसाहित्य परिषद’ आयोजित झाली ती त्यांनी अतिशय यशस्वीपणे पार पाडली.
औरंगाबाद, जुन्नर, सांगली, अहमदनगर, श्रीगोंदा, गोवा, अंबड अशा अनेक ठिकाणी लोकसाहित्य परिषदा आयोजित झाल्या आणि वर उल्लेख केलेल्या या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात लोकसाहित्य आणि लोककलेच्या क्षेत्रात संशोधक अभ्यासकांची पुढील पिढी निर्माण झाली. एवढेच नव्हे तर विद्यापीठ पातळीवर लोकसाहित्य आणि लोककलांचा अभ्यास सुरू झाला, त्यात डॉक्टर तारा भवाळकर यांचे केवळ योगदानच नव्हे तर प्रत्यक्ष सहभाग सातत्याने लाभला.

मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत मी विभाग प्रमुख असताना अनेक वेळा डॉक्टर तारा भवाळकर यांनी विद्यार्थ्यांना, तसंच शिक्षकांनाही मार्गदर्शन केलं. ‘लोकरंग सांस्कृतिक मंच’, ‘महाराष्ट्र कला संस्कृती मंच’, ‘पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान माध्यम संस्था’ यांच्यातर्फे आयोजित झालेल्या लोकसाहित्य-लोककला संमेलनांमध्ये डॉक्टर तारा भवाळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन सातत्याने लाभले.
डॉक्टर अरुणा ढेरे, प्रत्यक्ष मी, डॉक्टर विश्वनाथ शिंदे, डॉक्टर बाळासाहेब बळे, सांगलीच्या जोगण्या परंपरेचा अभ्यास करणारे दिवंगत पाटील, डॉक्टर मुकुंद कुळे, सांगलीचे आकाशवाणी केंद्रावरील अधिकारी संजय पाटील, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विद्यमान विभाग प्रमुख डॉक्टर गणेश चंदनशिवे… अशा अनेक लोकसाहित्य अभ्यासकांचा गोतावळा ताराबाईंनी एकत्र केला.
कोकणातील एका साहित्य संमेलनात उद्घाटनपर भाषण करताना मान. शरद पवार यांनी एकदा सांगितले होतं की- अनेक ज्येष्ठ साहित्यिक संमेलन अध्यक्ष म्हणून आजवर वंचित राहिले आहेत... त्यात त्यांनी लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला होता. शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकसहित्य-लोकसंस्कृतीतील ही लौकिक पातळीवरील ‘साहित्यशारदा’ आज 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या महिरपी सिंहासनावर विराजमान होत आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे!






