117 खेळाडूंच्या भारतीय ऑलिम्पिक वटवृक्षाची एक-एक करून शंभरच्या वर पाने गळून पडली… हरून पडली. आपल्या 140 कोटींच्या देशात अद्याप ३ खेळाडूंनाच पदकस्पर्श करता आलेय. ही बाब नक्कीच भूषणावहही नाही अन् अभिमानस्पद तर मुळीच नाही. मात्र उर्वरित चार दिवसांत पदक संख्येत नक्कीच भर पडेल आणि टोकियोच्या पुढे पॅरिस असेल, अशी भाबडी आशा आपण आजही बाळगून आहोत. पण ही भाबडी आशा आणखी किती काळ बाळगायची. त्यालाही काही मर्यादा आहेत ना!
आपले ऑलिम्पिक अभियान सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला आपल्या खेळाडूंवर अजिबात टीका करू नका, त्यांना प्रोत्साहन द्या. त्यांचे मनोधैर्य उंचावेल, असं लिहा. बोला. असे आवाहन आपल्या ऑलिम्पिकचे पथकप्रमुख गगन नारंग यांनी प्रसारमाध्यमांना केले होते.
त्यामुळे गेले दहा दिवस आपली प्रसारमाध्यमं आपल्या खेळाडूंबद्दल पॉझिटिव्हच बोलत होती, लिहत होती आणि अजूनही आहेत. पण नुसतं पॉझिटिव्ह बोलून पॉझिटिव्ह घडतं का ? गेले दहा दिवस पॉझिटिव्ह राहून, बोलून आणि लिहून पाहिलं, पण एक-दोन क्षण सोडले तर पदोपदी निगेटीव्हच घडलंय.
तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली. आपण ऑलिम्पिक खेळांसाठी आहोत का? मला पडलेल्या या प्रश्नाचा मलाच प्रचंड राग येतोय. आपण फक्त नॉन-ऑलिम्पिक असलेल्या खेळात पुढे असल्याचे मला वाटू लागलेय. मग ते क्रिकेट असो किंवा कबड्डी. इथेच आपण काय ते पुढे आहोत. 
ऑलिम्पिकदरम्यान 25 पेक्षा अधिक खेळांच्या मैदानांत जाऊन खेळ पाहण्याचे भाग्य लाभले. खेळही अफलातून होते आणि त्यात खेळणारे जागतिक दर्जाचे खेळाडूही अद्वितीय होते. पण त्या मैदानात आपले खेळाडू केवळ हजेरी लावण्यापुरतेच दिसले. नाव पुकारताच ‘हजर सर’ म्हणणारे.
आम्ही फक्त ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवायला आलोय हेच त्यांना दाखवायचे असावे. नेमबाजी, तिरंदाजी, हॉकी, कुस्ती, बॅडमिंटन आणि आता अॅथलेटिक्स हे हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके खेळ सोडले तर अन्य खेळात आपले अस्तित्वही जाणवले नाही. हा लेख लिहेपर्यंत केवळ नेमबाजीतच आपण तीन पदके जिंकलो होतो. बाकी खेळात चौथे येण्याचेच दु:ख सहन करावे लागले.
नेमबाजीत भारताने पदके जिंकली ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. पण बाकी खेळांचे काय ? म्हणे तिरंदाजीत आपले भवितव्य उज्ज्वल आहे, पण शेवटी घडले काय? आपले इतके मोठे पथक असूनही शेवटी आपली झोळी रिकामीच राहिली.
बॅडमिंटनमध्ये तर आम्ही स्वत:ला खूप बलशाली समजत होतो. तिथेही जे घडले ते अपेक्षितच होते. अनपेक्षित,आश्चर्यकारक काहीच घडले नाही. जे खेळाडू पदक जिंकले, त्यांच्या आसपासही आपले खेळाडू नव्हते. मग तो लक्ष्य असो किंवा रांकीरेड्डी-शेट्टी. सिंधूबद्दल तर न बोललेलेच बरे.
महासत्ता होऊ पाहाणारा आपला भारत देश पॅरिस ऑलिम्पिकची ज्या पद्धतीने तयारी करत होता, वाटलं आता आपण खेळात मध्यमवर्गीय झालोय. पण प्रत्यक्षात कामगिरी पाहिली तर ती दारिद्र्य रेषे खालचीच आहे. ऑलिम्पिक खेळांच्या बाबतीतही आपण दारिद्र्य रेषेखालीच आहोत, हेच वास्तव आहे आणि हे आपण खुल्या दिलाने मान्य करायलाच हवे.
जेव्हा आपल्याला आपली क्षमता कळेल, तेव्हाच आपण त्यावर अधिक मेहनत घेऊ शकू. आपल्याला एकेक पदक संघर्ष करूनच जिंकावे लागतेय. ज्या खेळात आपली ताकद वाढतेय, असे आपण म्हणत होतो. तेथेच आपली नौका बुडालीय. बाकी खेळांबद्दल तर विचारण्याची आणि सांगण्याची सोयच नाही.
काही वर्षांपूर्वी ऑलिम्पिकमध्ये खेळणार्या भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी फार कमी संख्येने चाहते स्टेडियममध्ये पोहोचायचे. कारण आपल्या इथे क्रिकेटच सबकुछ समजला जातो. बाकी खेळांना लोकांचे प्रेम मिळत नव्हते. पण पॅरिसमध्ये जिथे जिथे आपले खेळाडू होते.
शेकडो-हजारोंच्या संख्येने पाठीराखेही पोहोचले होते. मग हॉकी असो किंवा बॅडमिंटन किंवा अॅथलेटिक्स हजारो चाहते स्टेडियममध्ये हजर होते. याचाच अर्थ भारतीय चाहत्यांची ताकद ऑलिम्पिकमध्येही दिसायला लागली. हे पाहून खेळाडूंना आपण घरीच खेळतोय, असा भासही झाला असेल. पण खेळांचे काय? पदकांचे काय? तिथे मात्र ठणठण गोपाळाच.

एकीकडे आपण ऑलिम्पिक आयोजनाची तयारी करतोय, पण आपले खेळाडू ऑलिम्पिक खेळांसाठी तयार नसल्याचे पॅरिसमध्ये जाणवलेय. आपला प्रचंड मोठा देश आजही ऑलिम्पिक खेळांमध्ये इतका मागे आहे की मानही शरमेने आपोआप झुकतेय.
जलतरण, बास्केटबॉल, अॅथलेटिक्समधल्या धावण्याच्या शर्यती, जिम्नॅस्टिक्स, व्हॉलीबॉल, नौकायन, सायकलिंग, तलवारबाजी, फुटबॉल, ज्युदो, तायक्वांदो, पेंटाथलॉन, रग्बी, टेबल टेनिस, वॉटरपोलो, वेटलिफ्टिंग या खेळांबद्दल एक शब्दही सांगता येणार नाही. या स्पर्धांमध्ये आपले खेळाडू प्राथमिक फेरीतही दिसत नव्हते. आपण नेहमीच अभिमानाने सांगतो की आमच्या देशात प्रचंड गुणवत्ता आहे, पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. हे रडगाणे आता थांबायला हवे.
आधी ती गुणवत्ता कुठे आहे ते शोधून काढा. त्याच्यासाठी वाट्टेल ते अभियान राबवा. अमेरिकन-युरोपियन सोडा, आपले इतर आशियाई देश कोणती क्रीडा धोरणं राबवतात ते पाहा.
ऑलिम्पिकमध्ये वशीलेबाजी चालत नाही, असे म्हटले जाते. जो खेळतो, लढतो, तोच जिंकतो. पण आपल्याइथून गुणवत्ता असलेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचायलाच मिळत नसेल तेव्हा वशील्याचेच खेळाडू तिथपर्यंत पोहोचणार ना. आपल्या ११७ मध्ये किती वशील्याचे होते ? कल्पना नाही.

इतक्या मोहीमा, इतका पैसा खर्च करूनही ऑलिम्पिकचा निकाल हाच मिळणार असेल तर आपल्या सिस्टममध्ये काहीतरी मोठा गोंधळ आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मुंबईइतकी लोकसंख्या असलेला ऑस्ट्रेलिया पदकतालिकेत तिसर्या क्रमांकावर आहे. 13 सुवर्णांसह 33 पदके जिंकलीत. हा लेख वाचेपर्यंत तो आकडा आणखी वाढलेलाही असेल. एवढेच नव्हे तर जगाच्या नकाशावर राईसारखे सुक्ष्म ठिपके असलेले देशही पदकतालिकेत आपल्या पुढे आहेत.
अजूनही अशी अनेक उदाहरणे देता येतील. पण उदाहरणे देऊन उपयोग काय. आधी बोंबाबोंब असायची, खेळाडूंना सुविधा मिळत नाही, खेळांसाठी मैदाने मिळत नाही. पैसा मिळत नाही. पण आता ते बोंबलण्याचेही दिवस गेलेत.
यंदा दिग्गजांच्या प्रशिक्षणावर सरकारने पाण्यासारखा पैसा खर्च केलाय. तब्बल पाचशे कोटी. तरीही पदकांचे तेच रडगाणे पॅरिसमध्ये वाजतेय. या निकालाला सर्वस्वी आपले खेळाडूच जबाबदार आहेत, मग संघटना आणि संघटक. मागासलेल्या भारताला ऑलिम्पिक खेळांबाबत नव्याने विचार करण्याची वेळ आता आलीय.
जिथे पैसा-पॉवर असूनही आपण मागे पडतोय, तिथे मागे पडण्याचे कारण काही वेगळेच असायला हवे. माझ्या दृष्टीने आपल्या देशाला केवळ प्रामाणिकपणाच वाचवू शकतो. जोपर्यंत आपल्या खेळात प्रामाणिकपणाचा जन्म होत नाही तोवर आपण ऑलिम्पिकच्या पदकतालिकेत मागासलेलेच राहणार. त्यासाठी आधी प्रामाणिकपणा कशाला म्हणतात, याचे धडे सर्वांना द्यायला हवेत.
(फेसबुकवरून साभार)






