ही गोष्ट सुरू होते दुसऱ्या महायुद्धाच्या काळात… 1941 च्या दरम्यान हिटलरने तत्कालीन USSR अर्थात रशियावर हल्ला केला. या हल्ल्याच्या पूर्वी USSR ने पोलंडमधील नागरिकांना शरणार्थी म्हणून जागा दिली होती. मात्र हिटलरच्या हल्ल्यानंतर USSR ने पोलिश नागरिकांना बळजबरीने आपल्या सैन्यात सहभागी करून घेण्यास सुरवात केली. अशा वेळी काही पोलीश नागरिक USSR मध्ये गेले. मात्र उरलेल्या अनेकांनी शरणार्थी म्हणून वेगवेगळ्या देशात जाण्याचा निर्णय घेतला.
यावेळी निर्वासित असणाऱ्या पोलीश सरकारच्या पंतप्रधानांनी ब्रिटीश पंतप्रधान विस्टन चर्चिल यांना पत्र लिहलं. पोलीश पंतप्रधानांनी अशीच पत्र जगभरातल्या विविध देशात असणाऱ्या आपल्या दूतावासांकडे देखील सोपवली. त्यातलच एक पत्र मुंबईच्या पोलीश दुतावासात आलं.
या पत्रात किमान आपल्या येणाऱ्या पिढ्यांना तरी वाचवा म्हणून साद घालण्यात आली होती. पण भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लिनलिथगो यांनी मात्र या पत्राला केराची टोपली दाखवली. त्यांच म्हणणं होतं की, महायुद्धामुळे आर्थिक संकट निर्माण झालं आहे. अशा वेळी शरणार्थी संभाळण्यास आर्थिकदृष्ट्या शक्य नाही.

हिटरलपासून आम्हाला वाचवा…
दूसरीकडे नवानगरचे राजे दिग्विजयसिंह हे युद्ध मंत्रीमंडळाचे सदस्य होते. हे मंत्रीमंडळच दुसऱ्या महायुद्धात संस्थानांनी ब्रिटीश सरकारला मदत करण्यासाठी उभारण्यात आले होते. त्यांना आपल्या एका पोलीश मित्राकडून पोलीश मुलांच्या संदर्भात असणारा हा प्रश्न समजला. त्यास व्हाईसरॉय यांचा विरोध असल्याची बातमी देखील समजली. पण व्हाईसरॉय यांच्या विरोधात जावून पोलीश मुलांना भारतात आणण्यासाठी त्यांनी योजना आखण्यास सुरवात केली.
विरोधाचं कारण फक्त आणि फक्त आर्थिक होतं. दिग्विजय सिंह यांनी हा प्रश्न सोडवायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी बडोदा आणि पटियाला संस्थानासोबत संपर्क केला. आपल्या माहितीतल्या व्यापाऱ्यांसोबत संपर्क केला आणि मोठी आर्थिक मदत या योजनेला मिळवून घेतली. आर्थिक प्रश्न मिटल्याने व्हाईसरॉय यांचा असणारा विरोध देखील मावळला होता.

राजे दिग्विजयसिंह यांच्यामुळे हजारो पोलीश मुलं कोल्हापूरमध्ये दाखल
फेब्रुवारी 1942 साली एक हजार पोलीश मुलं भारतीय भूमीवर उतरली. या मुलांचं भविष्य देखील नव्हतं. इराण, क्वेटा करत ही मुले दिल्लीत आली व दिल्लीतून या मुलांना मुंबईत आणण्यात आलं. इथं या मुलांना तीन महिने ठेवण्यात आलं. पुढे या मुलांना जामनगर व कोल्हापूर येथे पाठवण्यात आलं आणि त्याकामी कोल्हापूर संस्थानने पुढाकार घेतला. कोल्हापूरच्या वळीवडे गावात हळुहळु 5 हजार पोलीश लोकांची वसाहत उभारण्यात आली. पाण्यासाठी हौद बांधण्यात आला होता.
एक छोटे हॉस्पिटल आणि एक शाळा सुद्धा उभारण्यात आली होती. पूर्ण कॅम्पच्या सभोवताली कुंपण उभारण्यात आले होते. त्याच्या रखवालीसाठी शस्त्रधारी सैनिक चोवीस तास तैनात असायचे. प्रत्येक कुटूंबाला दोन खोलींची बराक राहण्यासाठी देण्यात आली होती. सर्व पोलीश लोकं कधीतरी युद्ध थांबेल व आपण मायदेशात जावू अस वाटतं असे. पण पोलीश लोकांनी कॅम्पवर असताना काम करणं सोडलं नव्हतं कोणी नर्सचं काम करत असे तर कोणी कपडे शिवून देत असे.
हळुहळु कॅम्पमधील लोकांची आणि कोल्हापूरच्या स्थानिक लोकांचे व्यवहार हावू लागले. दुधवाले, किराणावाले यांचा पोलीश लोकांसोबत संपर्क वाढला आणि ते महाराष्ट्राच्या संस्कृतीत मिसळून गेले.

पोलीश आणि कोल्हापूरचे वळीवडे याचं खास कनेक्शन
तीन-चार वर्षांपूर्वी वळीवडे कॅम्पमध्ये राहून गेलेल्या झेडजीस्ला उर्फ सॅम पिटूरा आणि टेडीस्युझ उर्फ टेड पिटूरा हे आपलं बालपण गेलेलं गाव पाहायला आले होते. टेड कोल्हापुरात आला तेव्हा तीन वर्षाचा होता तर सॅमचा जन्मच मुळी वळीवडे कॅम्प मध्ये झाला. प्रत्येक कुटुंबाप्रमाणे त्यांनाही दोन खोलीची बराक राहण्यासाठी मिळाली होती. फक्त इतर कुटुंबामध्ये वडील लोकांना युद्धात लढण्यासाठी जावे लागले होते, पण टेड आणि सॅमचे वडील अपंग असल्यामुळेते वळीवडे कॅम्प मध्येच शिंपीकाम करायचे. तर त्यांची आई हॉस्पिटल मध्ये नर्स होती.
एकंदरीत टेडला आठवते तसे त्या कॅम्पमध्ये स्त्रियांचेच वर्चस्व जास्त होते. सुरवातीला गावकऱ्यांशी त्यांना जास्त संपर्क ठेवण्याची परवानगी नसायची. पण तरीही दुध घालायला येणाऱ्या स्त्रिया, ब्रेड आणि इतर वस्तू विकणारा किराणा दुकानदार साफसफाईला येणारे लोक यांच्याशी हळहळू पोलिश लोक मिसळू लागले. पोलिश सणसमारंभ त्यांनी कोल्हापुरात साजरे केले. भारतीय दिवाळी, रंगपंचमीसारख्या सणाची त्यांना उत्सुकता असायची. अधे मध्ये पिक्चर दाखवले जायचे. आसपासच्या उसाच्या शेतात, पंचगंगेच्या तीरावर त्यांच्या छोट्या छोट्या ट्रीप निघायच्या.
पिटूरा बंधूना वळीवडे स्टेशन पासून ते आत्ता भग्नावस्थेत असलेल्या त्यांच्या शाळेपर्यंतचा तो प्रवास भरून येणारा होता. हिटलरसारख्या क्रूरकर्म्यापासून जीव वाचवून निघालेली ही मंडळी कोण कुठल्या देशात आली. या मातीने त्यांना आपलं मानून त्यांचा संभाळ केला. कोल्हापूरशी ऋणानुबंध या पोलंडवासियांचे निर्माण झाले.
टेड आणि सॅमच्या आईने मारियाने त्यांना एक खूप हृद्यस्पर्शी आठवण सांगितली होती. सॅमचा जन्म नुकताच झाला होता. आणि कॅम्प मध्ये एक ओली बाळंतीण साफसफाईच्या कामाला आली होती. ती जवळपासच्याच कुठल्यातरी खेड्यातली असेल. त्या आईचे दुध आटले होते. आणि तीच बाळ दुधाविना रडत होते. हे बघून मारियामधल्या आईचा पान्हा फुटला. तिने त्याबाळाला आपल्या छातीशी धरून त्याला दुध पाजले. कोल्हापूरच्या मातीने केलेल्या उपकाराची परतफेड त्या माउलीने आपलं दुध पाजून केली.
आठवड्यातून एकदा कोल्हापूर शहरातून पद्मा स्काउट पथकातील मुलं खास या कॅम्प मधल्या मुलांशी फुटबॉल खेळण्यासाठी जायची. पिटूरा बंधूना भेटण्यासाठी कोल्हापूरच्या महावीर उद्यानातल्या पोलिश स्मारकाजवळ या पद्मा स्काउट मधले बापू शिंदे आणि ज्ञानदेव जाधव हे जुने सवंगडी खास भेटीसाठी आले होते. नव्वदीच्या घरात पोहचलेली ही सगळी मंडळी मात्र जुन्या उत्साहाने एकमेकांना भेटली.साऱ्यांनी मिळून पोलिश गीत गायली. सुखादुखाच्या गोष्टी शेअर केल्या.

पोलंडची वांडा झाली वांडा काशीकर
कॅम्प मधली वांडा ही पोलिश तरुणी कोल्हापूरच्या तरुणाच्या प्रेमात पडून वांडा काशीकर झाली. नऊवारी नेसून गंगावेस जवळच्या आपल्या अत्तराच्या दुकानात मालकीणबाईच्या थाटात कोल्हापुरी मराठी बोलत लक्ष ठेऊन बसायची. काही वर्षापूर्वी तिचं निधन झालं.
1947 ला भारत स्वतंत्र झाल्यावर आणि दुसरे महायुद्ध संपल्यावर हे पोलंडवासी आपल्या देशी परत गेले. त्याच कॅम्प मध्ये भारत सरकारने पाकिस्तानातून फाळणी नंतर भारतात आलेल्या सिंधी लोकांची राहण्याची सोय केली. निर्वासितांना आश्रय देण्याची कोल्हापूरची परंपरा चालूच राहिली. आज या कॅम्पच्या जागी गांधीनगर म्हणून मोठे कपड्यांचे सिंधी मार्केट उभे आहे. तरीही कॅम्प चे छोटे अवशेष पहावयास मिळतात.
आता तो काळ अनुभवलेले लोक हळहळू आपल्यातून कमी होत आहेत. तरीही या सगळ्या दुव्यांना जोडून ठेवणारा हात म्हणजे कोल्हापूरचे कर्नल विजयसिंह गायकवाड. इंडोपोलिश असोसीएशनचे ते अध्यक्ष आहेत. पोलंड मधून आपल्या आश्रयभूमीकडे येणाऱ्या प्रत्येक पोलिश व्यक्तीचा ते पाहुणचार करतात. या इतिहासाचा एक भाग ते स्वतः जगत आहेत.
स्वतः ऐंशी वर्षाचे तरून असून आजही पोलंडच्या कोल्हापुरातल्या या इतिहासाचे एखादे म्युझियम उभारावे, एखादी डोक्युमेंट्री बनावी यासाठी ते प्रयत्नशील असतात. शासन दरबारी खेटे मारत असतात.

पोलंडवासीय भारताचे हे उपकार कधीच विसरले नाहीत
स्वतः पारतन्त्र्यात असूनही आपण आपल्याहून वाईट स्थितीत असणाऱ्या परदेशी पाहुण्यांची काळजी घेतली या बद्दल ते कायम ऋणी असतात. ज्या पंचगंगेने त्यांना आधार दिला तिच्या रौद्ररूपाने आपल्या अन्नदात्या कोल्हापूरवासियावर संकट ओढवले. अशावेळी पोलंडवासीय मागे कसे राहतील? याच उपकारांची जाणीव ठेवत कोल्हापूरच्या पुरावेळी पोलीश नागरिकांनी मदत केली होती.
दूसरीकडे 2019 साली या घटनेस 70 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेऊन या कॅम्प मध्ये राहिलेल्यापैकी हयात असणाऱ्या नागरिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना राज्य अतिथी म्हणून याठिकाणी निमंत्रित करून वळीवडे पोलंड कॅम्पच्या स्मृती जगविण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
14 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या या कार्यक्रमात पोलंडचे उप परराष्ट्र मंत्री मार्सिन प्रझिडाक आणि भारतातील पोलंडचे राजदूत ॲडम बुराकोव्स्की यांच्या हस्ते 1942 ते 1949 या काळात येथे वास्तव्य करणाऱ्या या पोलिश कुटुंबांच्या आणि नागरिकांच्या स्मरणार्थ एक स्मृतीस्तंभाचे अनावरण आणि संग्रहालयाची पायाभरणी देखील करण्यात आली होती.
भारत व पोलंड या दोन्ही राष्ट्रांमधील हा ऐतिहासिक बंध पुन्हा जोपासण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या प्रयत्नांचा गौरव करण्यासाठी आणि त्यामाध्यमातून कोल्हापूरच्या जनतेचाही सन्मान करण्यासाठी पोलंडचे परराष्ट्र मंत्री झ्बिग्नीव राऊ यांच्या हस्ते त्यांना ‘द बेने मेरिटो’ हा सन्मान प्रदान करण्यात आला होता.
(सौजन्य - बोल भिडू)






