1972 च्या दुष्काळामुळे महाराष्ट्रात हाहाकार उडाला होता. गावाकडे रोजगार नव्हता,त्यामुळे रोजगारासाठी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्टातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू झाले आणि पुण्यात असंख्य कामगार दाखल झाले. त्यामुळे शहरातही बेरोजगारांची संख्या वाढू लागली. हाताला काम मिळालं नाहीतर लोकांना उपाशी राहण्याची वेळ येत होती. कामासाठी लोक दिवसभर उपाशी पोटी ताटकळत बसत होते. जागोजागी हॉटेल्स होते पण त्यांना ते परवडणारे नव्हते. त्यांना फक्त चार घास पोटात जावे एवढीच अपेक्षा होती.
त्याशिवाय हमालांचे अतोनात काबाड कष्ट आणि अधिक त्रासदायक काम असायचं. त्यांना कधी सिमेंटची पोती तर कधी धान्याची पोती भरावी लागतात. 100 किलो पेक्षाही जादा वजनाचे ओझे बऱ्याचदा त्यांना पाठीवरून ने-आण करावे लागते. या कामामुळे त्यांना आरोग्याच्या ही भरपूर समस्यांना सामोरे जावे लागत होते. पाठीचा खूप त्रास सहन करावा लागत होता. मात्र त्यांना पर्याय नव्हता तात्पुरत्या गोळ्या औषधे घेऊन पुन्हा कामावर ते जात होते.
अंगमेहनतीमुळे त्यांना भूकही सपाटून लागायची. हा कामगार वर्ग जेव्हा खानावळीत जेवायचा, तेव्हा इतर मंडळी जेवून उठली तरी त्याची भूक बाकी असेच. मग खानावळीतील बाई रागेजून म्हणायची, ‘रांधून माझं मनगट तुटंल, पण या मेल्याची भूक काही मिटणार नाही!’ त्यातही . कनिष्ठ जातीतील असंख्य कामगार असल्याने त्यांना प्रसिद्ध खानावळी जेवण देण्यास नकार देत असत. डॉ. बाबा आढाव मग या प्रश्नाच्या मुळाशी गेले आणि त्यातून जन्म झाला ‘ कष्टाची भाकर’ या एका अभिनव उपक्रमाचा…
शहरात मोठ्या प्रमाणात बेरोजगार लोकं असतात. ते उदरनिर्वाहासाठी पडेल ते काम करत असतात. हमाली, घरकाम करणाऱ्या महिला, बांधकाम कामगार, कचरा वेचक म्हणून काम करतात. विशेषतः याठिकाणी माणसं प्रामुख्याने काम करतात. लोकांना रोज काम असतंच असं नाही. कामाची योग्य वेतनही ठरलेलं नसत. कामाची वेळ ठरलेली नसते, काम रोज मिळेल की नाही याची शाश्वती नसते. अशा कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
कामावरून काढून टाकलं तरी दाद मागता येत नाही. कामगार वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असल्यामुळे संघटन नाही. संघटित नसल्यामुळे अन्यायाविरुद्ध आवाज उठवता येत नाही. संघटितपणे प्रश्न सुटू शकतात. संघटितपणे मालकावर दबाव आणू शकतात म्हणून वेगवेगळ्या स्थरातील कामगारांना न्याय,अधिकार, हक्क, मिळावा यासाठी असंघटित कामगारांना संघटित करण्याचं काम डॉ. बाबा आढाव यांनी केलं. 1953 साली तेल आणि गुळ बाजारातल्या 500 हमालांसह हमाल पंचायतीची स्थापना केली.

2 ऑक्टोबर… ‘कष्टाची भाकर’चा जन्म झाला
1972 सालच्या दुष्काळानंतर बाबा आढाव यांनी 'एक गाव एक पाणवठा' ही चळवळ सुरु केली होती. चळवळीत अनेक हमाल सहभागी झाले होते. सुट्टीच्या दिवशी हमाल आपल्या गावी जाऊन एक पाणवठा प्रस्थापित करत होते. चळवळ सुरु असताना बाबांच्या अनेक गोष्टी पाहण्यात आल्या. त्यासाठी हमाल पंचायतीने अनेक उपक्रम हाती घेतले. त्यातलाच एक 'कष्टाची भाकर' हा उपक्रम...
हमाल पंचायतीच्या एका लढ्याला त्यावेळी यश आले होते. हमालांचे 100 किलो वजनाचे असणारे पोते निम्म्यावर म्हणजे 50 किलो इतके कमी करण्यात यश आले. त्यामुळे कामगारांना थोडा आधार आणि थोड्याफार प्रमाणात पैसा देखील शिल्लक राहू लागला. या आधारामुळे कामगाराला जिंदगी सुधारण्याचे एक उत्तेजन मिळाले.पण, हमाल पंचायत इतक्यावर थांबली नाही तर कष्टकऱ्या कामगारांना, हमालांना मोजक्या दरात सकस आहार मिळावे यासाठी पंचायतीने 'कष्टाची भाकर' केंद्र सुरु केले.
'ना नफा ना तोटा 'या तत्त्वांवर आधारित कष्टाची भाकर केंद्र सुरू झालं. महिलांना आणि काही कामगाराना देखील कष्टाची भाकर केंद्रात काम मिळाल्याने त्यांचा रोजंदारीचा प्रश्न मिटला. या स्थापन केलेल्या कष्टाची भाकर केंद्रात गरजुंना, कामगारांना पोळी-भाजी झुणका-भाकर आठवड्यातून एकदा गोड पदार्थ अगदी मोजक्या दरात रुपये 30 रुपयांमध्ये परवडणारे असे पौष्टिक जेवण मिळायला लागलं.
2 ऑक्टोबर 1974 रोजी डॉ. बाबा आढावांनी पुण्यात पहिलं ‘कष्टाची भाकर’ केंद्र सुरू केलं. समाजक्रांतीचा विचार जोरावर असण्याचा तो जमाना होता. तेव्हा संघटित कामगार चळवळी प्रभावी होत्या. पण बाबांनी असंघटित बांधवांची संघटना बांधली. कामगार चळवळीतील आर्थिक मागण्यांची चौकट ओलांडून कष्टकरी-कामकरी जीवनाला व्यापून टाकणाऱ्या विविध क्षेत्रांना बाबांच्या हमाल पंचायतीने स्पर्श केला. त्यामुळेच कष्टाची भाकर हे केवळ ‘शिव वडा-पाव सेंटर’ नव्हतं.
महात्मा गांधींना अपेक्षित असलेल्या क्रांतीचा प्रयोग
बाबा आढाव म्हणतात, ‘हा महात्मा गांधींना अपेक्षित असलेल्या क्रांतीचा प्रयोग होता. क्रांती ही नेहमीच अन्यायाविरोधातील संघर्षातून घडत नाही. तर राबणाऱ्यांना जाचणाऱ्या प्रश्नांबद्दल आस्था ठेवणाऱ्या उपक्रमांतूनही ती धीम्यागतीने मुळ धरते.’ त्या काळात मार्केट यार्डातील किंवा रेल्वे स्टेशनवरील हमालांच्या कष्टाचं नियमन नव्हतं. हमाल पंचायतीने एका मजुराने कितपत ओझं उचलणं मानवीय आहे याची निर्देशकं तयार केली.

हमालीचे दर निश्चित केले. पण कष्टाचं काम करणारांना परवडेल असा आहारही हवा. त्यासाठी ‘कष्टाची भाकर’ हे हमाल पंचायतीनंच उभारलेलं केंद्र सुरू केलं. भूक हा कष्टकऱ्यांचा मुलभूत प्रश्न. त्यावरचा हा एक करूणामयी आणि व्यवहार्य तोडगा होता.
आजही पुण्यासारख्या शहरांमध्ये देशभरातून मजुर वर्ग येतो. त्यांना कुठेतरी स्वस्तात भाड्याने खोली मिळते. मजुर अड्ड्यांवर काम मिळतं. पण कष्टांच्या तुलनेत मिळणाऱ्या उत्पन्नाचं प्रमाण सहसा कमीच असतं. अनेकांना आपलं सर्व उत्पन्न केवळ पोट भरण्यासाठी खर्चावं लागतं. बचत होतच नाही. त्यामुळे पोषक व स्वस्त आहार 'कष्टाची भाकर' केंद्रमधून मिळत आहे.
या आहाराची चव आणि पोटभर जेवण कष्टकऱ्यांना आवडेल असा हवा. त्यासाठी कष्टकऱ्यांच्या कुटुंबियांनाच या केंद्रात अन्न शिजवण्याची जबाबदारी दिली गेली. त्यामुळे हा आहार लोकप्रिय झाला. अगदी शिक्षणासाठी पुण्यात राहणारे गरीब विद्यार्थीही ‘कष्टाची भाकर’मधून जेवू लागले.
मजुरांची अंगमेहनत लक्षात ठेवून जेवणाचे पदार्थ
हमालांना खूप शारिरीक कष्ट पडत असल्याने त्यांना सामान्य माणसांपेक्षा जास्त उष्मांकाची गरज असते. सर्वसामान्य माणसाला दिवसाला 2000–2500 उष्मांकाची गरज असते, तर हमालांना 3,600 उष्मांक लागतात. या बाबी लक्षात घेता थाळीमध्ये भाकरी किंवा चपाती, डाळ किंवा कडधान्याची उसळ (ज्यामधून प्रथिने मिळतील), पिठलं, भाजी आणि भाताचा समावेश करण्यात आला.
भवानी पेठेत सुरू झालेल्या कष्टाची भाकरचा पहिल्या केंद्राचा विस्तार होत होत आज पुण्यात 11 केंद्र कार्यरत आहेत. केंद्रांमधून भाकरी - 10 रू., चपाती- 5 रू. भाजी 10रू., भजी - 10 रू., पिठलं - 5 रू. इतक्या स्वस्त दरात आजही मिळतं. शिवाय १०० ग्रॅम जिलेबीही १० रूपयात मिळते. कष्टाची भाकरमधील जेवण चवदार, पोषक व स्वस्त असतं. या केंद्रातून दर दिवशी किमान दहा हजार लोक आपली भुक भागवत होते.

असे चालते ‘कष्टाची भाकर’चे काम…
अन्नपदार्थ तयार करण्यासाठी लागणारे धान्य आणि भाज्या जे पंचायतीचे सभासद आहेत आणि ना नफा तत्वावर मालाची विक्री करतात, अशाच स्थानिक पुरवठादारांकडून विकत घेतल्या जातात. पंचायतीची स्वतःची गिरणीदेखील आहे. तिथेच भाकरी व चपाती यासाठी लागणारे पीठ पंचायतीचे सदस्य असलेल्या कामगारांकडून तयार केले जाते. हमाल पंचायतीतील अनेक विधवा इथे काम करतात.
प्रत्येक कामगाराचे बँकेत खाते असेल, याची आढाव यांनी काळजी घेतली आहे. त्यांना व्यवस्थित पगाराबरोबरच सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युईटी फंड यांसारख्या सोयीदेखील आहेत. यामुळे या समाजातील अनेक कामगार सक्षम झाले असून, आर्थिकदृष्ट्या सबळ झाले आहेत. थाळीची किंमत बदलत असली, तरी ती अंदाजे 30 ते 55 रुपये या दरम्यानच असते.
विशेष म्हणजे कष्टाची भाकरमधील कामगारांचा या उपक्रमात विशेष विचार केला गेलायं. या उपक्रमात 51 लोक कार्यरत आहेत. भवानी पेठेतील मुख्य केंद्रातून अन्य केंद्रांना रोज टेंपोतून ताजे खाद्यपदार्थ पोचवले जातात. सकाळी आठ वाजताच हे जेवण सर्व केंद्रांवर पोचलेलं असतं. कारण मजुर वर्गाला कामावर जाण्याआधीच जेवण मिळायला हवं. त्यासाठी केंद्रांचे कामगार सकाळी सहालाच हजर असतात. त्यांची ही कर्तव्यदक्षता टिकून रहावी यासाठी कामगारांना भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युएटी, दिवाळी बोनस, पगारी सुट्ट्या आदी सुविधा दिल्या जातात. दिलीप मानकर कष्टाच्या भाकर केंद्रांचं व्यवस्थापन पाहतात.






