‘स्फेन’ पेंग्विन मेला आणि सारं जग हळहळलं… आता ‘मॅजिक’ पेंग्विनचं काय होणार…? बिचारा ‘मॅजिक’ पेंग्विन जेव्हा ‘स्फेन’च्या मृतदेहाजवळ बसला होता तेव्हा त्याच्या डोक्यात काय विचार सुरू असतील…? असं नाही की आजपर्यंत कधी पेंग्विन मेलाच नाही, मग नेमकं यावेळीच ‘स्फेन’ गेल्याची बातमी का व्हायरल झाली? सोशल मीडियावर स्फेन आणि मॅजिक या पेंग्विनचा विषय ट्रेंडिग का होतोय…?
याच कारण म्हणजे स्फेन आणि मॅजिक हे पेंग्विंन गे (समलिंगी) होते. सिडनीच्या सी-लाइफ सिडनी एक्वेरियम मधील ही जगप्रसिद्ध ‘गे’ जोडी पर्यटकांचे आकर्षण होती. पर्यटकांना या दोन पेंग्विन मित्रांची लव्ह स्टोरी ऐकवण्यात मत्सालयातील अधिकारी उत्सुक असायचे. आता यापैकी स्फेनचे आजारपणामुळे निधन झाले. तो 11 वर्षांचा होता आणि त्याच्या जाण्याने त्याचा 8 वर्षांचा जोडीदार मॅजिक आता एकटाच राहिला आहे.
स्फेनच्या मृत्यूनंतर तेथील अधिकाऱ्यांनी मॅजिकला काही तास त्याच्या मृतदेहाजवळ बसू दिले, जेणेकरून त्याला ही जाणीव व्हावी की त्याचा जोडीदार आता त्याच्या आयुष्यात कधीच येणार नाही. स्फेनचा मृतदेह बघून मॅजिकने लगेचच गाणं गायला सुरूवात केली आणि त्याच्यापाठोपाठ एक्वेरियममधील इतर पेंग्विननेही या गाण्याला साथ द्यायला सुरूवात केली. एक्वेरियमचे अधिकारी सांगतात, ते दृष्य अतिशय क्लेषदायक होतं, आम्हा सगळ्यांना त्यावेळी अतिशय गलबलून आलं होतं…

एका प्राणी संग्रहालयात होते पेंग्विन दोन सुरेख…
2018 सालच्या ऑस्ट्रेलियाच्या सी-लाइफ सिडनी एक्वेरियम मधील ही गोष्ट… ‘एका प्राणी संग्रहालयात होते पेंग्विन दोन सुरेख, नव्हते कसेच त्यांना पिल्लू लडिवाळ एक…’ गदिमांच्या बदकांवर पेंग्विनचं कलम करुन या ओळी रचण्याला कारण आहे स्फेन आणि मॅजिक या दोन राजबिंड्या पेंग्विनचे. दोघांची चांगलीच गट्टी. दोघे सतत एकत्र. दोघांना एकमेकांबद्दल आकर्षण असल्याने सदैव एकमेकांना बिलगून.
पेंग्विनच्या घोळक्यातील इतर नर किंवा मादी पेंग्विनमध्येही ते फार मिसळत नसतं. हळूहळू अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की, हे आकर्षण मैत्रीच्या पलिकडलं आहे. त्या दोघांनी जेव्हा एखादा दगड किंवा छोटा मासा अंगाखाली घेऊन तो उबवण्याचे प्रयत्न सुरू केले, तेव्हा अधिकाऱ्यांची खात्रीच पटली की हे समलिंगी नर पेंग्विनचं जोडपं आहे.
अनिवार ओढ आणि प्रेम यातून दोघांमध्ये मातृत्वाची किंवा पितृत्वाची भावना निर्माण झाल्याने ते अंडे म्हणून दगड किंवा तत्सम वस्तू उबवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यातून त्यांना ‘बाळ होणे’ तर शक्यच नव्हते. कुरुप, वेडे कसेही पिल्लू त्यांच्या प्रणयातून निपजण्याची शक्यता नव्हते.
कदाचित त्यामुळे काही दिवसांनी दोघांची मानसिक अवस्था बिघडण्याची शक्यता होती. परंतु त्यातून मार्ग काढला गेला. स्फेन आणि मॅजिक हे दोघे बाबा होऊ शकतात, असा प्रयत्न केला गेला.
स्फेन + मॅजिक = स्फेनजिक
याच प्राणी संग्रहालयातील एका मादी पेंग्विनचा लौकिक असा की अंडे उबवण्यात तिला अजिबात रस नव्हता. यापूर्वी तिने बऱ्याचदा अंडी दिली, परंतु ती उबवण्यासाठी कष्ट घेतले नाहीत. यावेळी तिने पुन्हा अंडे दिले तेव्हा अधिकाऱ्यांनी ते अंडे उबवण्याची जबाबदारी वात्सल्याची पाखर करण्यास आसुसलेल्या स्फेन आणि मॅजिक यांच्याकडे द्यायचे ठरवले. त्या दोघांनी प्रेमाने त्या अंड्याची देखभाल केली.
एखादा वर्तुळाकार दगड, छोटा मासा, कधी अन्नाचा तुकडा दोन पायांच्यामध्ये धरून तो उबवण्याचा प्रयत्न केलेल्या या दोन जिवलग मित्रांनी अंडे दत्तक घेतले. अंडे उबविले गेले, तर ‘तळे राखील तो पाणी चाखील’ या न्यायाने त्या पिलाचे पितृत्व या दोघांकडेच गेले. स्फेन आणि मॅजिक यांनी दत्तक घेतलेल्या पिल्लाचे नाव ‘स्फेनजिक’ असे ठेवण्यात आले. पुढे दोन वर्षांनी या दोघांनी ‘क्लेंक्सी’ नावाचे आणखी एक पिल्लू दत्तक घेतले.

जगभरात यापूर्वीही समलिंगी पेंग्विन जोडप्याने अंडे दत्तक घेऊन उबविण्याचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. सिलो आणि रोय या नर जोडप्याने असे अंडे उबवले होते. मात्र, त्यानंतर सिलो नर स्क्रॅपी नामक एका मादी पेंग्विनच्या प्रेमात पडून रोयला सोडून गेला. त्यानंतर सिलोने एकट्याने त्या पिलाचा सांभाळ केला. या पुस्तकी कथा नाहीत, तर प्राणी संग्रहालयात नोंदवून ठेवलेल्या सत्य घटना आहेत.
प्राण्यांच्या 450 प्रजातींमध्ये समलिंगी संबंधाची उदाहरणे दिसून आल्याचे अभ्यासक सांगतात. बोनोबॉस या मर्कट प्रजातीमध्ये याचे प्रमाण जवळपास 30 टक्के असल्याचे संशोधकांना आढळून आले. बहुतांश प्राण्यांमध्ये लैंगिक आकर्षणाची, समागमाची नैसर्गिक भावना निर्माण होते ती प्रजोत्पादनासाठी. मात्र, ज्या संबंधातून प्रजोत्पादन शक्य नाही अशा संबंधाकडे काही प्राणी का वळतात याचे कोडे संशोधकांना उलगडलेले नाही.
ज्या प्रजातीमध्ये मादींची संख्या अधिक आहे, त्यांच्यात समलैंगिक संबंधांचे प्रमाण जास्त असल्याचे निरीक्षणही काही संशोधकांनी नोंदवले आहे. इतरांच्या तुलनेत पेंग्विनमध्ये हे प्रमाण जास्त आहे. कदाचित, अंटार्क्टिकाच्या गारठ्यात एकमेकांच्या सततच्या उबेची गरज अधिक असते, हे याचे कारण असू शकेल असे काही अभ्यासकांना वाटते.
गे पेंग्विन जोडप्याने दुसऱ्या पेंग्विनच्या पिल्लाला ओलीस धरले होते तेव्हा...
डेन्मार्कमधल्या एका प्राणी संग्रहालयात एका पेंग्विन पिल्लाला ताब्यात घेण्यावरून पेंग्विनच्या दोन जोडप्यांमध्ये हमरातुमरी पाहायला मिळाली होती. यातील एक जोडपं गे होतं. छोटं पिल्लू आपलं व्हावं यासाठी अपहरण नाट्य रंगलं. दोन्ही जोडप्यांमध्ये 'शाब्दिक' चकमकही अनुभवायला मिळाली. पण अखेर शेवट गोड झाला होता. ही आहे, गोष्ट युरोपातल्या डेन्मार्क या रमणीय देशातल्या ओडेन्स प्राणी संग्रहालयातली.
या संग्रहालयात गे पेंग्विन जोडप्याला एका पिल्लाला आपलंसं करण्याची ओढ लागली होती. हे पुरुष पेंग्विन जोडपं एका पिलाच्या दिशेने आकर्षित झालं. आपल्या कक्षाच्या इथून फेरफटका मारत असताना या पिल्लाला पळवून नेण्याचा विचार त्यांच्या मनात आला असेल. दुर्लक्षित पिल्लू आणि त्याचे विचलित असे बाबा पाहून या गे जोडप्याच्या मनातील पिलाला पळवून नेण्याचा विचार दृढ झाला असावा.
त्या पिल्लाची आई निवांतपणे आंघोळ करताना त्यांना दिसली. लहानग्या पिलाला पळवून नेण्यासाठी हीच योग्य वेळ आहे, असं त्यांना वाटलं. या प्राणी संग्रहालयातील गार्ड सँडी हेडइगर्ड मुन्क यांनी हा सगळा प्रकार 'याचि देही याचि डोळा' अनुभवला.
आंघोळीचं कौतुक झाल्यानंतर त्या पिल्लाची आई पाण्यातून बाहेर पडली. त्यावेळी पिल्लू गायब झाल्याचं तिच्या लक्षात आलं. तिने त्या पिल्लाचा शोध घेतला. बराच वेळ काहीच घडलं नाही असं वातावरण होतं. दुसऱ्या दिवशी पालकांनी पुन्हा पिल्लाचा शोध घ्यायला सुरुवात केली.
गे पेंग्विन जोडपं आणि त्या पिल्लाचे आईबाबा असलेलं पेंग्विन जोडपं यांच्यात जोरदार भांडण झालं. त्यांनी कर्कश आवाज काढत विरोध व्यक्त केला. शेपट्या हलवून आदळआपट केली. एकमेकांना 'खुन्नस'ही दिली. गे पेंग्विन जोडपं पिल्लाला लपवण्याचा प्रयत्न करत होतं. हा वाद थांबवण्यासाठी संग्रहालयातल्या कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला.

माणसंच नाही तर प्राणीही असतात गे आणि लेस्बियन!
स्फेन आणि मॅजिक या समलिंगी पेंग्विन जोडीमुळे खरोखरच समलिंगी संबंध निसर्गातही आढळतात का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे… त्यावरचं उत्तर आहे, निश्चित आढळतात. जगभरात यावर विविध जीवशास्त्रज्ञ संशोधन करत असून त्यामुळे मिळालेले निष्कर्ष चकित करणारे आहेत.
साध्या कीटकांपासून ते पेंग्विन,डॉल्फिन, चिम्पांझी यांसारख्या बुद्धिमान जीवांपर्यंत समलिंगी संबंध आढळतात. एवढेच नव्हे तर चिंपांझींचा चुलतभाऊ असणाऱ्या बोनोबो या कपीमध्ये (Ape) समलैंगिक संबंधांचा झालेला विकास पाहिल्यावर तर आपणाला तोंडात बोट घालावे लागते.एकंदरीत 450 प्रजातीचे जीव हे समलेंगिक असतात असे संशोधन झाले आहे.
1960 च्या दशकात ऑस्ट्रियाचे नोबेल पुरस्कार विजेते झूलॉजिस्ट कोनराड लॉरेंज यांनी अंदाजे 1,500 प्रजातीच्या प्राण्यांवर वेगळ्या प्रकारचं संशोधन केलं. आपल्या रिसर्चवर आधारित एकंदरीत 450 प्रजातीचे जीव हे समलेंगिक असतात, असे देखील त्यांनी म्हटलं. यूनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे डॉ. नॅथन बॅली यांनी 2004-05 मध्ये प्रकाशित केलेल्या आपल्या रिसर्च पेपर मध्ये देखील अशाच प्रकारची माहिती प्रकाशित केली होती.
जीवशास्त्रीय दृष्टीने पाहावयास गेल्यावर लक्षात येते की, समलिंगी संबंध ठेवण्याची कारणे विविध आहेत. ताणमुक्ती, आपल्या समूहातील आपला दर्जा वाढवण्यापासून ते आपल्या पिल्लांचे संगोपन चांगल्या प्रकारे व्हावे, यासारख्या विविध गोष्टी करण्यासाठी तर जीवांमध्ये समलिंगी संबंध ठेवले जातात.






