तीन महिन्यांपूर्वीची ही घटना, तारिख होती 9 जून 2024… उत्तर प्रदेशातील तितोरा गावातील एक कुटुंब गावात लाडू वाटून जल्लोष साजरा करत होतं. त्याला कारणही तसंच काहीसं होतं. पश्चिम उत्तर प्रदेशातील या तितोरा गावच्या राजेंद्र कुमार यांच्या लहान मुलाची म्हणजेच अतुलची थेट ‘आयआयटी धनबाद’ मध्ये निवड झाली होती. सर्वत्र उत्साहाला उधाण आले होते. पण हा उत्साह, आनंद काहीच दिवसांनी चिंतेत भर टाकणारा ठरणार होता. याची कल्पना तेव्हा या कुटुंबाच्या मनाला शिवली देखील नव्हती…
त्याचं झालं असं की, तितोरा गाव हे तसं सधन प्रदेशात येतं. चहूबाजूंनी उसाची शेती आणि बहुसंख्येने असलेल्या गुजर समाजाच्या नागरिकांची मोठमोठाली घरे. यातच दाटीवाटीने असलेल्या, निळे निशाण फडकत असलेल्या दलितांच्या बहुतांश तुटक्या घरांतील वस्तीतील एक घर राजेंद्र कुमार यांचे. घराच्या वर असणारी खोली ही राजेंद्र यांच्या चार मुलांना अभ्यासासाठी वापरली जाते. त्यांचा सगळ्यात मोठा मुलगा मोहित हा 24 वर्षांचा आहे.
तो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,हमिरपुर येथे बी. टेकचे शिक्षण घेत आहे. दुसरा मुलगा रोहित हा आयआयटी खरगपूर येथे केमिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेत आहे. त्यानंतर असलेला वीस वर्षीय रोहित हा मुझफ्फरनगर येथे हिंदी साहित्यात पदवीचे शिक्षण घेत आहे आणि चौथा अतुल….
दररोज दुपारच्या 3 वाजल्यानंतर उत्तरप्रदेशमधील तितोरा या गावाची वीज जाते आणि राजेंद्र कुमार यांच्या या छोट्याशा खोलीत त्यांच्या 4 मुलांनी चिमणीच्या मिणमिणत्या प्रकाशात अभ्यास करून हे यश प्राप्त केलयं. 25 हजार रुपयांना मिळणारे इन्वर्टर घेण्याची ऐपत त्यांची नाही.
राजेंद्र कुमार यांनी अत्यंत कष्टाने चारही मुलांना उच्चशिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले. गावात ते कापड शिवण्याचे तसेच मजुरीचे काम करतात. या कामातून त्यांना महिन्याचे जेमतेम दहा अकरा हजार मिळतात. त्यातून ते मुलांचे शिक्षण व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.

राजेंद्र कुमार सांगतात, "मी माझ्या सर्वात मोठ्या मुलाच्या शिक्षणासाठी आमचे स्वतः च्या मालकीचे घर विकले. त्याचा मला कसलाच पश्चाताप होत नाही. नववी पर्यंत शिक्षण झालेल्या राजेंद्र यांनी मुलांच्या उच्च शिक्षणासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी दाखवली. त्याचाच परिणाम म्हणून अतुलचीही निवड आयआयटीसाठी झाली.
पण या जेईई एडव्हान्सच्या निकालानंतर आयआयटीमध्ये प्रवेशासाठी 17,500 रूपये भरून प्रवेश घेणे अनिवार्य होते. त्यासाठी पैसे भरण्याची शेवटची तारीख होती 24 जून 2024. राजेंद्र यांच्यासाठी ही रक्कम तशी मोठीच. परंतु त्यांनी पैसे उधार घेण्याचा मार्ग निवडला. खाजगी सावकाराकडे त्यांनी पैशांची विचारणा केली, मात्र त्याने पैसे द्यायला नकार दिला. त्यानंतर त्यांनी एका मित्राकडून 10000रूपये उसने घेतले.
दुसऱ्या एका मित्राकडून 4000 व त्यांच्याकडील 3500 हजार असे मिळून 17,500 ही रक्कम जमा केली. अखेर ते चोवीस जूनला ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी कॉम्पयुटर समोर बसले. परंतु पाच वाजण्याच्या आधी फक्त 180 सेकंद शिल्लक असताना सर्व्हर बंद झाला. परिणामी आयआयटी मध्ये अतुलला प्रवेश नाकारला गेला.
त्यानंतरचे काही महिन, कुमार कुटुंबीयांनी प्रवेशासाठी अनेक ठिकाणी दाद मागितली. ते प्रथम अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोगाकडे गेले. तिथे त्यांना मद्रास उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. कारण यावेळची जेईई एडवान्स परीक्षा घेण्याची जबाबदारी आयआयटी मद्रासवर होती.
मद्रास उच्च न्यायालयाने हा प्रश्न आमच्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगून त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. राजेंद्र यांनी अखेर सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. त्याचा निर्णय कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे.
याविषयी राजेंद्र सांगतात की, " माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे.न्यायालय काहीच चुकीचे करणार नाही."
हा सगळा उपद्व्याप झाल्यानंतर अतुल देखील आशावादी आहे. तो म्हणतो,
"आधी मी निराश झालो होतो पण नंतर मला याची सवय झाली. आम्ही याविरोधात कोर्टात चाललो आहोत."
राजेंद्र कुमार व अतुल या बाबत पूर्णपणे आशावादी आहे. न्यायालयात न्याय मिळण्याची त्यांना खात्री आहे कारण, 2021 मध्ये अशाच एका प्रकरणात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने, परीक्षा फीसाठी उशीर झाला म्हणून नाकारण्यात आलेला प्रिन्स जयबिर सिंग या दलित विद्यार्थ्याचा प्रवेशाचा निर्णय दिला होता. त्यावेळी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने म्हणले होते की, "याचिकाकर्त्याची सामाजिक पार्श्वभूमी पाहता व त्याने केलेले परिश्रम पाहता, त्यांना प्रवेश मिळणे आवश्यक आहे."
आज देखील अतुलच्या बाजूने निर्णय लागेल व आणखी एका दलित विद्यार्थ्याला उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेता येईल अशी अपेक्षा आहे.






