महाराष्ट्र पोलिसांचा वचक गेल्या काही वर्षांत कमी झाला आहे. पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप वाढल्याने त्यांच्या निस्पृहतेबद्दल वाईट चर्चा सुरू झाली आहे. राज्यकर्ते कोणीही असले, तरी त्यांना स्वायत्त पोलिस यंत्रणा नको असते. एकेकाळी स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांशी तुलना होणारे मुंबई पोलिस दल आता त्यांच्यातल्याच कुरघोडीच्या राजकारणाने पोखरून निघाले आहे.
महाराष्ट्र पोलिसांतही परप्रांतीय आणि राज्यातील अशा लॉबी तयार झाल्या आहेत. गटबाजीची लागण झालेली पोलिस यंत्रणा गंभीर गुन्ह्याबाबतही तपास नीट आणि गांभीर्याने करीत नाही. त्यामुळे पोलिसांना वारंवार उच्च न्यायालयाचे ताशेरे ऐकून घ्यावे लागतात. सद्रक्षणाय खलनिग्रहाणाय ही पोलिसांची प्रतिमा आता उलट झाली आहे.
‘अंडरवर्ल्ड’च्या काळात गुन्हेगारी जगताने पोलिसांना हाताशी धरून बनावट चकमकी घडवल्या होत्या. आता राज्यकर्त्यांच्या हातातील कळसुत्री बाहुल्या असल्यासारखे पोलिस यंत्रणा त्यांच्या तालावर नाचते. त्यामुळे गुन्हेगारांचे फावले आहे. लैंगिक अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. राजकीय कार्यकर्त्यांच्या रोज हत्या होत आहेत. वाय दर्जाची सुरक्षा असलेले नेतेही सुरक्षित नाहीत.
दाऊद टोळीशी संबंध असलेल्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात तरबेज असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना एक महिना सिद्धीकी यांची रेकी होत असल्याचे समजत नसेल, तर आपली गुप्तचर यंत्रणा काय करकते, हे तपासून पाहण्याची गरज आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात आणि चित्रपट जगतात जबरदस्त प्रभाव असलेल्या सिद्दीकी यांची वांद्रे पूर्व येथे हल्लेखोरांनी हत्या केली. मुंबई पोलिसांनी तात्काळ दोघांना अटक केली असली, तरी या हल्ल्याने महाराष्ट्र सरकारच्या प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून एक हरियाणाचा आणि एक उत्तर प्रदेशचा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एक आरोपी अद्याप फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सिद्धीकी हे गेल्या काही दिवसांपूर्वीपर्यंत काँग्रेसमध्ये होते. त्यांचा मुलगा काँग्रेसचा आमदार होता. त्यांच्या हत्येनंतर अजित पवार, तसेच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी विरोधकांना या विषयावर राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे; परंतु मुंबई बाँबस्फोट आणि दंगलीच्या वेळी भाजपच्या नेत्यांनी शरद पवार यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताना त्यांचे ‘अंडरवर्ल्ड’शी कसे संबंध आहेत, हे मीठ, मसाला लावून सांगितले होते आणि निवडणुकीत त्याचेच भांडवल करून पवार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा पराभव केला होता, याचा विसर त्यांना पडला असला, तरी राजकीय पंडितांना तो पडलेला नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणात बाबा सिद्दीकी हे केवळ माजी आमदार नव्हते. वांद्रे पश्चिममधून ते तीनदा निवडून आले होते. विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये ते अन्न व पुरवठा मंत्रीही होते. त्यांचे चिरंजीव झिशान सध्या वांद्रे पूर्वचे आमदार आहे. अशा व्यक्तीची हत्या महाराष्ट्र सरकारवर निश्चितच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनासाठी ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.
या हत्येने कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या वाटेवर महाराष्ट्र आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. लॉरेन्स बिश्नोई टोळीने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली असेल; पण पोलिसांना या हत्येच्या मुळाशी जावे लागेल. या हत्येमागे त्यांची सलमान खानशी असलेली मैत्री आहे का हे जाणून घ्यावे लागेल.
बाबा सिद्दीकी यांच्या कथित दोन हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचाही पोलिस शोध घेत आहेत. त्यांच्या काही मालमत्ताही ‘ईडी’ने जप्त केल्या होत्या. मुंबई पोलिसांचा प्राथमिक तपास झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणावर (एसआरए प्रकल्प) केंद्रित आहे. सिद्दीकी हे 2000 ते 2004 या काळात महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले. हे पद भूषवताना सिद्दीकी यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे सांगण्यात आले.
‘ईडी’ या प्रकरणाचा तपास करत आहे. याच प्रकरणात 2018 मध्ये ‘ईडी’ने वांद्रे पश्चिम येथील सिद्दीकी यांची 462 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. सिद्दीकी यांच्यावर ‘एसआरए’ प्रकल्पात पिरॅमिड विकसकांना मदत केल्याचा आरोप होता. हा घोटाळा सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे सिद्दीकी यांची हत्या झाली का, याचा तपास पोलिस करत आहेत.
वर्ष 2013. सिद्दीकी यांचा फोन वाजला. बराच वेळ वाजल्यानंतर सिद्दीकी यांनी फोन उचलला. पलीकडून असलेली एक व्यक्ती रागाने म्हणाली, ‘मी राम गोपाल वर्मा यांना तुमचा चित्रपट बनवायला सांगू का?’ तिथे एक आमदार होता... या फोननंतर देशभरातील वर्तमानपत्रात ही बातमी प्रसिद्ध झाली. मुंबई पोलिसांची झोप उडाली. कारण ही धमकी देणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम होता.
या फोननंतर 11 वर्षांनी सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली आहे. या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचे लोक आहेत. या हत्येची जबाबदारी घेत लॉरेन्स बिश्नोई टोळीने म्हटले आहे, की सलमान खान आणि दाऊद इब्राहिमला जो कोणी मदत करेल त्याला जबाबदार धरले जाईल.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे नियोजन लॉरेन्स टोळीचे तीन शूटर अनेक दिवसांपासून करत होते. दोन शूटर उत्तर प्रदेशातील आणि एक हरियाणाचा आहे. हरियाणातील गुरनेल सिंग असे या तरुणाचे नाव असून, धर्मराज कश्यप आणि शिव कुमार उर्फ शिवा असे दोन आरोपी उत्तर प्रदेशचे आहेत. लॉरेन्सच्या टोळीने ‘सोशल मीडिया’वर पोस्ट केली. त्यात म्हटले आहे, की आमचे कोणाशीही शत्रुत्व नाही; पण जो कोणी सलमान खान आणि दाऊद टोळीला मदत करतो, त्याचा हिशेब करतो.

सलमानची जवळीक आणि ‘अंडरवर्ल्ड’शी असलेले संबंध यामुळे लॉरेन्स बिश्नोई टोळीने सिद्दीकी यांना टार्गेट केल्याचे लॉरेन्सच्या टोळीच्या धमकीवरून स्पष्ट झाले आहे. वाय दर्जाची सुरक्षा भेदून तिघेही सिद्दीकी यांच्यावर सहज हल्ला करून तेथून पळून गेले. विशेष म्हणजे या घटनेच्या सहा महिन्यांपूर्वी लॉरेन्स गँगच्या सदस्यांनी सलमान खानच्या घरावर गोळीबार केला होता. अनेक रिपोर्टस्मध्ये सिद्दीकी यांना ‘अंडरवर्ल्ड’ आणि बॉलीवूडमधला पूल असेही संबोधण्यात आले होते. सिद्दीकी आणि ‘अंडरवर्ल्ड’च्या लोकांमध्ये जमिनीच्या तुकड्यावरून वाद झाला होता.
सिद्दीकी आणि अहमद लंगरा यांच्यात जमिनीच्या तुकड्यावरून भांडण झाले. लंगरा हा छोटा शकील आणि दाऊद इब्राहिमच्या जवळचा होता. छोटा शकीलने सर्वप्रथम सिद्दीकी यांना फोन केला होता. या प्रकरणापासून दूर राहा, अन्यथा परिणाम चांगला होणार नाही, अशी धमकी त्याने दिली होती. छोटा शकीलच्या या धमकीच्या कॉलची माहिती सिद्दीकी यांनी मुंबई पोलिसांना दिली. हे प्रकरण गांभीर्याने घेत मुंबई पोलिसांनी लंगरा याला अटक केली. दाऊद इब्राहिमला सिद्दीकी यांनी पोलिसांकडे जाऊन धमकीचे कॉल आणि लंगराला अटक करण्याची माहिती देणे पसंत नव्हते.
बिहारमध्ये जन्मलेल्या सिद्दीकी यांनी मुंबईला आपले कार्यस्थान बनवले. ते तीन वेळा आमदार होते. सिद्दीकी यांनी काँग्रेससोबतचा 48 वर्षांचा संबंध तोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. बॉलीवूड स्टार्सशी त्यांचे जवळचे संबंध होते. सिद्दीकी हे बॉलीवूड स्टार राहत असलेल्या भागातून सलग तीन वेळा आमदार झाले होते. यामुळेच ते चित्रपट जगतातील लोकांना चांगलाच परिचित होते.
सलमान खान आणि शाहरुख खान यांसारखे अनेक बॉलीवूड दिग्गज त्यांच्या इफ्तार आणि रमजान पार्ट्यांना हजेरी लावत असत. पाच वर्षांपूर्वी बाबा सिद्दीकी यांनीच शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातील वाद संपवला होता. सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बॉलिवूड आणि गुन्हेगारी जगताचा संबंध पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.






