जगभरात अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये ‘रेशमा बानो कुरेशी’ या तरुणीनं रॅम्पवॉक केला. फॅशनच्या जगात हा शो प्रचंड लोकप्रिय आहे. अर्थात असे शो सध्या सर्वत्र होत असतातच. चित्रपट, टी.व्ही. आणि सोशल मीडियामुळे तर अशा शोला मोठा प्रतिसाद मिळत असतो. स्त्रीसौंदर्य, तिची वेशभूषा, केशभूषा, आभूषणे इत्यादीपासून ते तिचे सर्वांगसुंदर व्यक्तिमत्व यानिमित्ताने पुढे येते. अर्थात जाहिरात हाही यातला एक भाग असतोच.
त्यामुळे अमेरिकेपासून तर मुंबईपर्यंत अशा शोचे आयोजन होत असते. आत्मविश्वासपूर्वक पावलं टाकत आणि तितक्याच आत्मविश्वासानं उपस्थितांच्या नजरेला नजर भिडवत जेंव्हा एकेक मॉडेल रॅम्पवर येतात, तेव्हा उपस्थितांमध्ये चैतन्याची लाटच उसळते जणू. अद्वितीय सौंदर्य असलेल्या ललना आणि आणि त्यांचे लयबद्ध चालणे मोठे रम्य असते. त्यामुळेच फॅशनचे विश्व कमालीचे विस्तारले आहे.
अर्थात चेहऱ्याची सुंदरता ही इथली प्राथमिक अट असते. मात्र रेशमा बानो कुरेशी ही तरुणी याला अपवाद ठरली. सुंदरतेच्या जवळपासही जावू न शकणारे तिचे व्यक्तिमत्व असूनही ती या शो मध्ये सहभागी झाली. केवळ सहभागीच झाली असे नाही; तर उपस्थितांनी तिचे प्रचंड जल्लोषात स्वागतही केले.
माध्यम प्रतिनिधींनी तिला वेढा दिला. तिचा एक बाईट मिळावा म्हणून त्यांना मोठी धडपड करावी लागली. सौंदर्याचे कोणतेच निकष पूर्ण न करणाऱ्या रेशमाकडे असे काय होते की ज्याने साऱ्या जगाचे लक्ष वेधले? तर रेशमाकडे होता दुर्दम्य आशावाद आणि जगण्याची तीव्र इच्छा. तिचा रॅम्पवॉक कमालीचा ठरला.

(रेशमा बानो कुरेशी)
सौंदर्याची परिभाषा बदलून टाकणारी रेशमा परंपरागत मॉडेलसारखी सुंदर नाही. तिचा चेहरा कुरूप आणि भीतीदायक वाटावा इतका विद्रूप आहे. एक डोळाही तिने गमावलाय. असे असूनही तिने लोकांची मने जिंकली ती केवळ तिच्या जबरदस्त आत्मविश्वासाच्या बळावर. काही वर्षापूर्वी एका माथेफिरू तरुणाने तिच्यावर ॲसिड हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात तिचा चेहरा जळाला. विद्रूप झाला. मात्र ती सुदैवाने यातून वाचली. आजघडीला ती ॲसिड हल्ल्यातून वाचलेल्या आणि आत्मविश्वास गमावलेल्या तिच्यासारख्याच तरुणींसाठी कार्य करते आहे.
न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये तिला अत्यंत सन्मानाने आणि हेतुपूर्वक म्हणूनच निमंत्रित करण्यात आले होते. कारण आपल्या आयुष्यातील एका मोठ्या अपघाताला ती अत्यंत धीराने सामोरी गेली आहे. तिने एका मोठ्या आशावादाची पेरणी आपल्या सकारात्मक जगण्यातून केली आहे. तथाकथित आणि रूढ सौंदर्याला धक्का देत बाह्यसौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य महत्वाचे असल्याचे तिने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. नराधम पुरुषी प्रवृत्तीच्या विरोधात तिने टाकलेले हे पाऊल तिच्यासारख्या अनेक रेशामांना बळ देणारे आहे.
कारण ॲसिड हल्ला झालेल्या तरुणीचे आयुष्य आरपार बदलून जाते. स्वप्नांची क्षणात राखरांगोळी होते. तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. चेहऱ्यावरच्या व्यंगामुळे सातत्याने तिची अवहेलना होते. कधीकाळी सुंदर असणारा तिचा चेहराही तिला आता नकोसा होतो. एकतर्फी प्रेमाच्या सूडभावनेने तिच्या जगण्याचा चक्काचूर होतो. जीवघेण्या शारीरिक वेदना आणि त्याचबरोबर संकुचित सामाजिक भावना अशा पेचात या तरुणी सापडतात. कोणताच दोष नसताना त्यांना शिक्षा भोगावी लागते.
त्यांचे अवघे अस्तित्व संपून जाते. रेशमाच्या आयुष्यातही असेच घडले; पण सुदैवाने तिच्या जगण्याच्या प्रबळ उर्मीने तिच्या वेदनेवर मात केली. ती खचली नाही. आयुष्याला सामोरे जायचे तिने ठरवले. ‘मेक लव नॉट स्कार्स’ या संस्थेच्या माध्यमातून ती ॲसिड हल्ल्यातून वाचलेल्या पीडितांच्यासाठी असलेल्या अभियानात सक्रीय झाली आणि या ऑनलाईन मोहिमेचा ती मुख्य चेहराही झाली. दु:ख आणि आनंद अशा संमिश्र भावनेची ही तिची आगळीवेगळी कहाणी.

रेशमा ज्यादिवशी न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉकवर चालली त्याच दिवशी प्रीती राठी खटल्याचा मुंबईत निकाल लागला आणि आरोपी तरुणाला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा केवळ योगायोग होता का? प्रीतीवर तीन वर्षापूर्वी मुंबईत ॲसिड हल्लाच झाला होता हे विशेष. आपल्याकडे एकतर्फी प्रेमाच्या घटना सातत्याने घडत असतात. विशिष्ट वय, भिन्नलिंगी शारीरिक आकर्षण हे स्वाभाविक असले तरी याचा शेवट इतका भीषण का होतो? ही मानसिकता पुरुषात येते कुठून? दुसऱ्याची भावना समजून न घेताच कल्पनेच्या आकाशात एकांगी भराऱ्या मारणाऱ्या प्रेमवीरांना नकार मिळाला की त्याच्यातला सैतान जागा होतो.
‘तू माझी नाही तर कुणाचीच नाही’ अशी सूडभावना निर्माण होते आणि मग निष्पाप मुलींवर, स्त्रियांवर जीवघेणे हल्ले होतात. एकतर्फी प्रेम ही गंभीर मनोविकृतीच म्हणायला हवी. सौंदर्याचाच शाप ठरावा अशा या घटना आहेत. ‘प्रेम’ या शब्दाचा अर्थही न कळलेले हे विकृत महाभाग प्रेमाच्या नावाखाली जो काही उच्छाद मांडतात तो भयंकरच आहे. प्रीती राठी ही तरुणी खूप सारे स्वप्न घेवून मुंबईत आली होती. नौदलाच्या अश्विनी रुग्णालयात तिला परिचारिकेची नोकरी मिळाली होती.
नोकरीवर रुजू होण्यासाठी ती दिल्लीहून कुटुंबीयांसमवेत मुंबईत आली होती. मात्र तिच्या नकळत पाठलाग करत आलेल्या एका माथेफिरू तरुणाने भर रस्त्यावर तिच्या तोंडावर ॲसिड फेकले. गंभीर जखमी झालेल्या प्रीतीने महिनाभरानंतर प्राण सोडले. होत्याचे नव्हते व्हावे इतक्या वेगाने हे सगळे घडले. या घटनेने पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आला.
प्रेम ही शाश्वत आणि व्यापक गोष्ट आहे. प्रेमाला जातीपातीची-धर्माची बंधने रोखू शकत नाहीत. किंवा प्रेम निर्व्याज असते वगैरे म्हणणे खूप सोपे असले तरी प्रत्यक्षातले वास्तव अत्यंत भीषण असते. वास्तव आणि आभासातल्या सीमारेषा धूसर झाल्या की माणसाचा विवेक हरवून जायला वेळ लागत नाही. कुटुंबापासून वाढलेली दूरता आणि आवडत्या व्यक्तीने दिलेला नकार पचवण्याची क्षमता हरवून बसलेली मुले मग नैराश्यात खोल बुडतात.
यातूनच सुडाचे चक्र सुरु होते आणि त्याची परिणीती अशा घटनांमध्ये होते. ‘प्रेम करणे आणि प्रेमाशी प्रामाणिक राहणे’ या दोन भावना असतात. दुर्दैवाने या भावनांचा अभाव असेल तर सगळे अवघड बनत जाते. राधा-कृष्ण, बाजीराव-मस्तानी, अमृता प्रीतम-साहीर किंवा एखाद्या चित्रपटातील नायक-नायिकांसारखे आपले भावविश्व असावे या आभासात असणारी तरुणाई प्रेमाकडे खूप संकुचित दृष्टीने बघते. त्यामुळे नवी पिढी बिघडली, संस्कारहीन झाली अशी वाक्यं आपल्या कानावर आदळत असतातच. प्रत्येक काळात नवी पिढी असते.

मला आठवतंय 1990 साली रिंकू पाटील या दहावीतल्या तरुणीला एकतर्फी प्रेमातून भरवर्गात पेटवून दिले होते. उल्हासनगरची ही घटना त्याकाळी देशभर गाजली. कारण त्यापूर्वी इतक्या टोकाची क्रूरता कुणी पहिली नव्हती. मी त्यावेळी नववीत होतो. आमच्याही शाळेत या घटनेचे दु:खद सावट होते. पालक आणि मुली भेदरलेल्या होत्या.
त्याकाळात आजच्यासारखी इलेक्ट्रोनिक माध्यमे किंवा मोबाईल नव्हता तरी ही घटना प्रत्येकाला माहित होती. या घटनेला आता इतकी वर्ष झाली असली तरी या आठवणी पुसून टाकता येत नाहीत. महानगरातच काय अगदी खेड्यापाड्यातसुद्धा अशा घटना घडत असतात. पालक हतबल असतात. कधी जात तर कधी कौटुंबिक प्रतिष्ठा आड येते. यातूनच काही टोकाचे निर्णय घेतले जातात. शिवाय एकतर्फी प्रेम करणाऱ्याला तर विकृतीने पछाडलेले असल्यामुळे कुठे ना कुठे रिंकू पाटील, अमृता देशपांडे किंवा प्रीती राठीचा बळी जातोच.
प्रत्येक घटनेची वाच्यता होतेच असेही नाही. आई-वडिलांची अब्रू जावू नये म्हणून आत्महत्या करणाऱ्या हळव्या मुलींची संख्याही मोठी आहे. एवढे होवूनही वाचलेल्या आणि जगण्याला सामोऱ्या जाणाऱ्या तरुणींचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. रेशमा बानो कुरेशी ही अशीच एक धाडसी तरुणी आहे, जिणे आपल्या जीवघेण्या वेदनेवर आणि दु:खावर मात करून पुरुषी मुखवटा फाडला आहे. भलेही तिच्याकडे चेहऱ्याचे सौंदर्य नसेल; पण आहे तो दुर्दम्य आशावाद. तिच्या या आशावादालाच न्यूयॉर्क फॅशन वीकने सलाम केलाय. आपणही करूया..!






