- इब्न खलदून भारती
सध्या ‘हलाल’ इस्लामचे नवे वेड बनले आहे. हलाल राहणी, हलाल डेटींग, इतकेच नाहीतर ‘हलाल सेक्स’ पर्यंत इंटरनेटवर चर्चा सुरू असते. नव-इस्लाममध्ये हलाल आता एक जागतिक उद्योग होत चालला आहे. जो धर्म आजवर राजकीय मुद्दा होता तो आता व्यावसायिक मुद्दा बनला आहे. इस्लाम एक संपूर्ण जीवनशैली आहे असा प्रचार वाढत आहे आणि त्यातून राजकारणापासून ते अर्थव्यवस्था ते जगण्याच्या प्रत्येक गोष्टीवर सल्ले दिले जात आहेत.
सर्वोच्च न्यायालयातील एका खटल्यात सॉलिसीटर जनरल तुषार मेहताने मागणी केली की, मांसासाठी हलाल प्रमाणपत्र देण्यात यावे. पण आता सिमेंट, लोखंडी सळ्या, ते पाण्यापर्यंत हलाल प्रमाणपत्र दिलं जात आहे. ते देणाऱ्या खासगी कंपन्या यासाठी मोठे शूल्क आकारत आहे. ज्यांना या प्रमाणपत्रात रस नाही त्यांनाही अशा गोष्टींसाठी जास्तीचे पैसे द्यावे लागत आहे.
नवश्रीमंत मुस्लिमांना लक्ष्य करून हा धंदा सुरू झाला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत त्यांचेही योगदान आहे. यासोबतच आत्मसन्मान आणि सामाजिक सन्मान याचीही खातरजमा व्हावी तसेच धार्मिक पवित्रता आणि प्रदर्शनही दिसावे म्हणून हा नवा हलाल उद्योग जन्माला आला आहे. यातून मुस्लिमांमध्ये संकुचित आणि कट्टर धार्मिकता वाढीस लागू शकते. 
हलाल म्हणजे काय?
हलाल हा मूळचा अरेबिक शब्द आहे. याचे मराठीत भाषांतर करायचे झाल्यास ‘परवानगी असलेला’ असे म्हणता येते. कुराणमध्ये हराम या शब्दाच्या विरुद्ध हलाल या शब्दाचा वापर करण्यात आलेला आहे. हराम म्हणजे निषिद्ध असलेला. कुराणमध्ये काय निषिद्ध आहे आणि कशाला अनुमती आहे, हे सांगण्यासाठी हराम आणि हलाल असे शब्द वापरण्यात आले आहेत.
हलाल हा शब्द विशेषत: इस्लाममध्ये आहारविषयक कायद्यांशी संबंधित आहे. सामान्यतः हराम मानल्या जाणाऱ्या अन्नाच्या दोन वस्तू म्हणजे डुकराचे मांस आणि मादक पदार्थ (अल्कोहोल). डुकराचे मांस नसलेल्या मांसालादेखील हलाल म्हटले जाऊ शकते, परंतु हे प्राणी मारण्याच्या आणि त्यावर होणाऱ्या प्रक्रियेवर ते अवलंबून असते.
भारताच्या संदर्भाने बोलायचे झाल्यास मुस्लिमांनी मांसासाठी एखाद्या प्राण्याला कशा प्रकारे मारले जाते, प्राण्याला मारण्याची पद्धत कशी आहे? हे सांगण्यासाठी हलाल या शब्दाचा वापर केला जातो. मांसासाठी एखाद्या प्राण्याची धारदार चाकूच्या मदतीने जुगुलार व्हेन (डोके आणि चेहऱ्याला रक्तपुरवठा करणारी, तसेच रक्त वाहून नेणारी रक्तवाहिनी) तसेच कॅरोटिड आर्टरी (हदयापासून मेंदूकडे किंवा मेंदूकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणारी रक्तवाहिनी) एका झटक्यात कापलेली असणे आवश्यक असते. कत्तलीच्या वेळी प्राणी जिवंत आणि निरोगी असले पाहिजेत आणि प्राण्याच्या शरीरातून सर्व रक्त काढून टाकले पाहिजे. प्राण्याला मारताना प्रार्थनेचे पठण करणे आवश्यक असते, ज्याला शहादा म्हणूनही ओळखले जाते.
हलाल डेटिंग हा काय प्रकार आहे?
परंतू आता हा हलालाचा मुद्दा फक्त मांसापुरता राहिलेला नाही. हलाल राहणी, हलाल डेटींग, इतकेच नाहीतर ‘हलाल सेक्स’ पर्यंत सध्या चर्चा सुरू झाली आहे. हलाल डेटिंगला इंडोनेशिया आणि मलेशिया सारख्या मुस्लीम देशांमध्ये मान्यता मिळू लागली आहे. खरं तर, हलाल डेटिंग इस्लामिक तत्त्वांचे आणि नियमांचे पालन करून साथीदार शोधण्याच्या हेतूने घेतलेल्या भेटी-गाठी संदर्भातील आहे. काहींचा असाही युक्तिवाद आहे की, जर डेटिंग इस्लामिक तत्त्वांनी ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेल तर ते हलाल असू शकते. काही लोकांचा असाही विश्वास आहे की, लग्नाच्या बाहेर कोणत्याही प्रकारचे डेटिंग करणे हराम आहे.
स्पीड हलाल डेटिंगहा प्रकार देखील सध्या लोकप्रिय होत आहे. हा मलेशियातील एक मॅचमेकिंग कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मलेशियातील मुस्लिमांना मोठ्या प्रमाणात साथीदार शोधण्यास मदत होत आहे. लोक इथं भेटतात. बोलून आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. मलेशियामध्ये प्रेमसंबंध देखील फारसे रुचत नाही. स्पीड डेटिंगमध्ये महिला डेटर्सना एक पालक असतो जो त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम करतो.
हलाल हॉलिडेज हा ट्रेंड का वाढतोय?
हलाल हॉलिडेज म्हणजे अशी ठिकाणं जिथे मुस्लिमांना त्यांच्या धार्मिक श्रद्धा आणि प्रथांशी तडजोड न करता भेट देता येईल. हलाल हॉलिडेज ही एक वाढती बाजारपेठ आहे. ग्लोबल मुस्लीम ट्रॅव्हल इंडेक्सनुसार, 2022 मध्ये हलाल हॉलिडे व्यवसायाची बाजारपेठ 220 अब्ज डॉलर इतकी होती. काही कंपन्या हलाल पर्यटनात पुढे आहेत, तर इतर कंपन्या याकडे पर्याय म्हणून बघत आहेत. पाश्चिमात्य देशांमध्ये मालदीवची ओळख तिथल्या खास हॉटेल्ससाठी आहे. पण आता जगभरातील हलाल पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे.
हलाल पर्यटनामध्ये हॉटेलमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे असतात. उत्तरेकडील एक दरवाजा वैयक्तिक वापरासाठी असतो. मध्य पूर्वेतील बहुतेक कुटुंबांना, विशेषत: स्त्रियांना सर्वांसमोर येणं आवडत नाही. अशावेळी त्या उत्तरेकडील दरवाजातून आत प्रवेश करतात. एक विशेष लिफ्ट देखील आहे जी त्यांना थेट खोलीत घेऊन जाते जेणेकरून कोणीही त्यांना पाहू शकत नाही.
हलाल सर्टिफिकेट्स हा नेमका काय प्रकार आहे?
भारतीय अर्थव्यवस्थेत विकास होत असल्याने मुस्लिम समुदायाची खरेदीची क्षमताही वाढत आहे. हलाल प्रमाणपत्रातून याच वाढत्या मुस्लिम ग्राहकांना लक्ष्य करण्यात येत आहे. पण त्याचे काही घातक आणि अनैच्छिक परिणामही घडू शकतात. यातून आर्थिक वेगळेपणा येऊ शकतो तसेच फक्त मुस्लिमांसाठी एक वेगळी अर्थव्यवस्था निर्माण होऊ शकते ज्यामुळे अन्य धर्मियांवरील आर्थिक बहिष्काराची परिस्थिती उद्भवू शकते.
हलाल बाजारामुळे राजकीय अर्थव्यवस्थेला जे नुकसान पोहोचत आहे त्याच्या तुलनेत सोशल मीडियावर मुस्लिम फेरीवाल्यांवर बहिष्कार टाकण्याचे सल्ले मुख्य मुद्दा भरकटवण्याचे कामच करत आहे. जर या गोष्टी सामान्य झाल्या आणि मुख्य प्रवाहात आल्या तर याचा धार्मिक नात्यांवर दूरगामी परिणाम पडू शकतो- मुस्लिम पर्सनल लॉ किंवा वोट बँकेच्या राजकारणाने टाकला नसेल त्याहून जास्त.
एखादा गैर-मुस्लिम जर हलाल बाजारात खरेदी-विक्री करू इच्छित असेल तर त्याला शरीयाच्या नियमांचे पालन करावे लागेल. यात ते दुसऱ्या दर्जाचे खेळाडू बनतील. आम्हाला इस्लामी स्टेटचं आर्थिक रुप बघावं लागेल. द्विराष्ट्र सिद्धांताचे परिणाम भोगल्यावर आता काय आंधळेपणाने आपण दुहेरी अर्थव्यवस्थेकडे वळत आहोत का? कारण इस्लामी बँकींग, हलाल शेयर, हलाल म्युच्यूअल फंड, हलाल ट्रॅव्हेल्स यांच्या अवतीभवती समानानंतर अर्थव्यवस्था वाढत आहे.
यातून पुढे भारतात राहण्यासाठीच हलाल प्रमाणपत्र, घटनेसाठी हलाल प्रमाणपत्र मागितले जाऊ शकते. सध्या राजकीय पक्षांना ते मिळत आहेच की कोणत्या पक्षाला मत देणं मुस्लिमांसाठी योग्य आहे. लोखंडी सळ्या ते सिमेंटपर्यंत सगळ्यांना धर्माच्या चष्म्यातून बघण्याची गरज काय आहे? जे लोक अशा नजरेने बघतात ते इतर धर्माच्या लोकांना कोणत्या नजरेने बघतील? ही नजर इस्लामच्या दृष्टीने योग्य असली तरीही आधुनिक जगात त्याला स्थान नाही. 
याला धर्मशास्त्राचा आधार आहे का?
पण मूळात हे सारे इस्लामीच नाही. इतिहास अथवा धर्मशास्त्रात असा कोणताही आधार नाही की ज्यामुळे हे योग्य ठरवले जाऊ शकेल. हे सारे पॉप-इस्लामचा भाग आहे जे खोटे पवित्रता देतात, ज्यांना फसव्या इस्लामी धार्मिक शक्ती नियंत्रीत करत आहेत. त्यांना सारं जग हिरव्या रंगात रंगवायचं आहे. जगाला इस्लाम व गैर-इस्लाम मध्ये वाटायचं आहे. मुस्लिम व गैर-मुस्लिम यांच्यात त्यांना शत्रूत्त्व करायचं आहे. दार-उल-इस्लाम व दार-उल-हर्ब यांच्यातील जग आता नव्या नावाने समोर येत आहे.
प्रत्येक गोष्टीला हलाल आणि हराममध्ये विभागण्यात काय अर्थ आहे?
धार्मिक-अधार्मिक, इस्लामी-गैरइस्लामी यांच्या पलिकडेही जग आहे. एखादी गोष्ट चांगली की वाईट आहे हे ठरवण्यासाठी अधिक चांगले व वैज्ञानिक, धर्मनिरपेक्ष व तार्किक मार्ग उपलब्ध आहेत. इस्लाममध्ये अशा प्रमाणीकरणाची व्यवस्था होती का असा प्रश्न कोणाला पडला असेल तर त्याचं उत्तर नकारार्थी आहे. पैगंबरांचा काळ असो वा खलिफांचे राज्य असो किंवा मुघलांचे शासन असो अशी व्यवस्था कधीच नव्हती. पण हे आजच्या काळातील नव-इस्लामवादी आहेत ज्यांना आता बाजारातून धर्मांधता माजवायची आहे.
कुराणात नेमकं काय म्हटलं आहे?
इस्लाममध्ये हलालची गरज असली तरीही आधुनिक भावना आणि घटना याहून ती महत्त्वाची असू शकत नाही. अन्य धार्मिक निर्बंधांप्रमाणेच याचेही वैज्ञानिक मुल्यमापण करणे गरजेचे आहे की याचा स्वीकार व्हावा की न व्हावा यासाठी. हलालची आर्थिक धार्मिकतेला कुराणात काही आधार आहे का? कुराणाच्या अनेक आयतींमध्ये मुस्लिमांना कोणत्या गोष्टी हराम म्हणजेच निषिद्ध आहेत याची माहिती येते. यात खाण्यापिण्याच्या गोष्टींवरच भर आहे. त्यातही मांसाहाराविषयी. कुराणातील सूरा अल-बक़रा (2:173), अल-माइदा (5:3, 90,91), अनम (6: 145), आणि अल-नहल (16: 115) मध्ये सांगितलंय की कोणत्या प्राण्याचे मांस हराम आहे.
यात म्हटले आहे की डुकराचे मांस हराम आहे तसेच अल्लाशिवाय इतर कोणाच्या नावाने चढवण्यात आलेले जनावर किंवा जे जखमी झाले आहे, उंचीवरून पडले आहे, शिंगाच्या माराने घायाळ आहे ते हराम आहे. तसेच हिंस्त्र प्राण्याने खाल्लेले जनावर आणि शिकारीत मेलेले जनावरही हराम आहे. सूरा अल-आराफ़ (7:33) मध्ये खाण्यापिण्याच्या गोष्टींशिवाय इतर काही हराम सांगितली गेली आहेत. त्यानुसार अश्लील गोष्टींना हराम ठरवण्यात आलं आहे. एखाद्याचा हक्क मारणे, जबरदस्ती करणे, ज्याची माहिती नाही अशा गोष्टी करणे इत्यादी गोष्टीही हराम समजल्या जातात.
यात आणखीही काही गोष्टी येऊ शकतात. पण एक नियम असा आहे की ज्या गोष्टी हराम नाहीत त्या हलाल आहेत. पण यातील कोणताही नियम इस्लामनुसार नाहीतर धर्मनिरपेक्ष, वैज्ञानिक अथवा तर्काच्या आधारेच पाळला जायला पाहिजे. कोणत्या गोष्टीचा कसा अर्थ लावायचा हे निश्चित नसल्यामुळे मोठा गोंधळ उडतो आणि ज्याचा फायदा कट्टरपंथी घेत असतात. कुराणात काय करावे व काय करू नये याची यादी आहे. प्रत्येक धर्मात निषिद्ध गोष्टी असतात आणि इस्लाममध्ये अशा गोष्टींना हराम म्हटले जाते. यातून पवित्रतेची एक सीमारेषा आखली जाते. पण ती वाढवली जाऊ शकत नाही की आखडलीही जाऊ शकत नाही.
त्यामुळे अल्लाच्या नावावर हरामला हलाल आणि हलालला हराम आहे असं सांगणाऱ्या लोकांची कुराणात निंदा केली गेली आहे. सूरा अल-माइदा (5:87), अल-यूनुस (10:59), और अल-नहल (16:116) मध्ये म्हटलंय की कोणत्याही गोष्टीला चुकीच्या पद्धतीने हराम किंवा हलाल म्हणू नये. आयत 16:116 म्हणते की आपल्या तोंडाने खोटं बोलून एखादी गोष्ट हराम किंवा हलाल आहे असं म्हणू नका आणि त्याचा आरोप अल्लावर टाकू नका. अल्लाच्या नावाने खोटं बोलणारे लोक कधी यशस्वी होत नाहीत.
आपण बघू शकतो की कुराणात हलाल आणि हराम यांच्या भवती निश्चित रेखा आखलेली आहे. त्यांच्यासोबत छेडछाड करणे म्हणजे अल्लाचा संताप ओढवून घेणे होय. सूरा अल-तौबा (9:31) मध्ये म्हटलं आहे की लोक चुकीच्या व्याख्या आणि अतिविस्तार यामुळे आपले मौलाना आणि धार्मिक विद्वान यांना अल्लाहचा दर्जा देतात, कारण त्यांना हराम व हलालची व्याख्या करण्याचे अधिकार मिळाले आहेत. त्यामुळे जे लोक माझ्या खोलीतील एसी आणि स्टॅबिलायझर हे हलाल आहे की हराम आहे हे ठरवतात ते नव-इस्लामचे खुदा नाहीत तर काय आहेत? आजवरच्या इतिहासात मुस्लिमांना याची माहिती होती की हराम काय आहे आणि हलाल काय आहे.
त्यासाठी त्यांना एखाद्या बाजारू एजेंसीची किंवा प्रमाणपत्राची गरज नव्हती. इस्लामच्या नावावर ही फसवणूक आत्ता सुरू झाली आहे आणि त्यात मुस्लिमांचीच फसवणूक जास्त होत आहे. हलाल प्रमाणपत्राच्या या धंद्यावर सरकारने वेळीच प्रतिबंध घालायला पाहिजे.
(सौजन्य - द प्रिंट)
अनुवाद - प्रतिक पुरी






