कर्नाटकात नुकतीच एक अजब घटना घडली. एका व्यक्तीने चक्क मृतदेहासोबत शारीरिक संबंध ठेवले. ही बाब उघडीकस आल्यानंतर कर्नाटक सरकारने त्या आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यासाठी सरकारने भारतीय दंड विधानाच्या कलम 376 चा आसरा घेतला. ‘मृतदेहासोबत बलात्कार’ केल्याने संबंध राज्यात खळबळ उडाली होती आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खटल्याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते.
मात्र न्यायालयाच्या निर्णयाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. न्यायालयाने त्या आरोपीची चक्क निर्दोष मुक्तता केली आणि त्यामगचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, या देशातील दंड विधानामध्ये मृतदेहाबरोबर शारीरिक संबंध ठेवल्याने बलात्काराचा आरोप ठेवता येतो, यासंबंधीची तरतूदच नाही…
मृतदेहाशी शारीरिक संबंध ठेवणे हा गुन्हा नाही?
उच्च न्यायालयाचा हा निकाल कर्नाटक राज्य सरकारला फारसा रुचला नाही आणि त्यांनी हेच प्रकरण सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करून कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयास आव्हान दिले. मात्र सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवताना मृत व्यक्ती विषयी असलेले वेड किंवा त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवणे हा भारतीय दंड विधानाच्या कोणत्याही कलमाखाली गुन्हा होत नसल्याचा निर्वाळा दिला.
न्यायालयाच्या या निकालाने आता या घटनेची संबंध देशभरात चर्चा सुरू झाली आहे. मृत व्यक्ती विषयी असलेले वेड किंवा त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवणे या प्रकाराला ‘नेक्रोफिलिया’ असे म्हटले जाते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठासमोर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. कर्नाटक सरकारकडून बाजू मांडणारे अतिरिक्त महाधिवक्ता अमन पनवार यांनी असा युक्तिवाद केला की, आयपीसीच्या कलम 375 (क) मधील 'बॉडी' या शब्दाचा अर्थ मृतदेहांचाही समावेश असावा.
त्यांनी असेही म्हटले की बलात्काराच्या व्याख्येनुसार, जर एखादी महिला संमती देऊ शकत नसेल तर तो बलात्कार मानला जाईल, असे तरतुदीत म्हटले आहे. त्याच तर्कानुसार, मृतदेह देखील संमती देऊ शकत नाही, म्हणून हा गुन्हा बलात्कार म्हणून वर्गीकृत केला पाहिजे. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने हा युक्तिवाद स्वीकारण्यास नकार दिला. आणि म्हटले की नेक्रोफिलिया हा भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा नाही. आणि म्हणूनच, उच्च न्यायालयाच्या आदेशात त्यांनी हस्तक्षेप केला नाही.
मृत शरीराला 'व्यक्ती' किंवा 'मानव' मानले जाऊ शकत नाही. म्हणून…
मृतदेहासोबत लैंगिक संबंध ठेवणे बलात्कार मानता येणार नसल्याचे,कर्नाटक उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. कारण आयपीसीचे कलम 375 आणि 377 फक्त जिवंत व्यक्तिंना लागू होतात. कलम 375 आणि 377 चा सखोल अभ्यास केल्यास हे स्पष्ट होते की, मृत शरीराला 'व्यक्ती' किंवा 'मानव' मानले जाऊ शकत नाही.
म्हणून, या कलमांखाली मृतदेहावरील बलात्काराचा कोणताही गुन्हा दाखल होत नाही आणि आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम 376 अंतर्गत शिक्षा होऊ शकत नाही. उच्च न्यायालयाने हे देखील मान्य केले की, नेक्रोफिलिया ही एक गंभीर समस्या आहे आणि संसदेने ती गुन्हा घोषित करण्यासाठी कायदा करावा.
रुग्णालये आणि शवागारांमध्ये मृत महिलांशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले जातात अशा अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. असे कृत्य करणारे लोक मानसिक लैंगिक विकाराने ग्रस्त असतात, असे या प्रकरणात मानले जाते. पण मृतदेहाची विशेषतः महिलेची प्रतिष्ठा राखण्यासाठी अशा कृत्यांना गुन्हा म्हणून वर्गीकृत केले पाहिजे, अशीही एक बाजू मांडली जात आहे. हे घृणास्पद कृत्य युनायटेड किंग्डम, कॅनडा, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेत गुन्हा मानले जाते. या अनुषंगाने आयपीसीच्या कलम 377 मध्ये सुधारणा करावी, अशी मागणी केली जात आहे.
‘नेक्रोफिलिया’ नावाचा हा विकार नेमका काय आहे?
बेल्जियन मानसोपचारतज्ज्ञ जोसेफ गुइस्लेन यांनी 1850 मध्ये नेक्रोफिलियाचा प्रथम उल्लेख केला होता. रिचर्ड फॉन क्राफ्ट-एबिंग यांनी 1894 मध्ये नेक्रोफिलियाला 'दुःखाचे भयानक प्रकटीकरण', असे म्हटले होते, तोपर्यंत नेक्रोफिलिया हा शब्द व्यापकपणे वापरला जात नव्हता. या वर्तनाचे वर्गीकरण करण्याच्या अनेक
प्रयत्नांप्रमाणे, नेक्रोफिलिया स्वतःच गोंधळात टाकणारी संकल्पना राहिली आहे. संपूर्ण इतिहासात, विविध संस्कृती आणि धर्मामध्ये नेक्रोफिलियाचे उल्लेख धार्मिक प्रथा, पौराणिक कथा वा मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दलच्या श्रद्धांशी निगडित आहे. इजिप्शियन आणि ग्रीक यांसारख्या प्राचीन समाजांनी धार्मिक विधी किंवा देव आणि नश्वरांशी संबंधित कथांमध्ये नेक्रोफिलियाच्या कृत्यांच्या घटना नोंदवल्या होत्या.
मध्ययुगीन युरोपात, नेक्रोफिलियाचा निषेध मृतांच्या पावित्र्याविरुद्ध गंभीर गुन्हा म्हणून केला जात असे, ज्यासाठी सार्वजनिक फाशी किंवा विच्छेदन यांसारख्या कठोर शिक्षेची शिक्षा दिली जात होती. कालांतराने, धार्मिक सिद्धांत, नैतिक मूल्ये आणि कायदेशीर चौकटींमध्ये बदलांसह नेक्रोफिलियाबद्दल सामाजिक दृष्टिकोन विकसित झाला आहे, जो मृत्यू, लैंगिकता आणि मानवी प्रतिष्ठेबद्दलच्या दृष्टिकोनात व्यापक बदल दर्शवितो.
प्रेतांबद्दल लैंगिक आकर्षण
प्रेतांबद्दल लैंगिक आकर्षण असलेला नेक्रोफिलिया, मानसशास्त्र, कायदा आणि सांस्कृतिक नियमांना छेदणारी एक निषिद्ध आणि गुंतागुंतीची लैंगिक घटना आहे. काही संशोधकांचा अंदाज आहे की मृत्यू, भयानक आघात किंवा लहानपणी आलेल्या अत्यंत विकृत अनुभवांमुळे एखाद्या व्यक्तीला मृतदेहांना लैंगिक उत्तेजनाशी जोडण्याची प्रवृत्ती होऊ शकते.
वारंवार कल्पना केल्याने किंवा संपर्कातून या अनुभवास अधिक समर्थन मिळाल्यास, हे आकर्षण पॅराफिलिक या दीर्घ विकारात बदलू शकते. पॅराफिलिया ही एक जटिल आणि बऱ्याचदा लैंगिक गैरसमज असलेली मनोवैज्ञानिक स्थिती आहे जी मुख्यत्वेकरून विविध, बहुधा विकृत अशा लैंगिक आवडींद्वारे दर्शविली जाते.
नेक्रोफिलियाला जोडीदाराबद्दल येणाऱ्या अत्यंत टोकाच्या असुरक्षिततेच्या भावनेशी जोडले गेले आहे, ज्यामुळे व्यक्ती पूर्णपणे आपल्या काबूत असलेला किंवा अधीन असलेला किंवा कायमचा जोडीदार शोधत असते. हा जोडीदार कधी विरोध करण्याच्या किंवा सोडून जाण्याच्या भूमिकेत जाणारच नाही. काही प्रकरणांमध्ये अशा व्यक्तीं असतात ज्यांना अतीव एकटेपणाचा अनुभव येतो आणि त्यांना या मृत 'अचल' भागीदारांमध्ये सांत्वन मिळते व सुरक्षित वाटते.
अलीकडच्या अभ्यासातून असे आढळून आले आहे की नेक्रोफिलिया असणाऱ्या व्यक्तींना समाजविघातक व्यक्तिमत्व विकार, स्किझोफ्रेनिया आणि गंभीर मनोविकृती असू शकतात. तर नेक्रोफिलिक प्रवृत्ती असलेले काही सिरीयल गुन्हेगारही असू शकतात, त्यांच्यात सहानुभूतीचा अभाव आणि प्रतिकार न करणाऱ्या पीडितेवर वर्चस्व गाजवण्याची विकृत इच्छा असते.
मानसशास्त्रीयदृष्ट्या, नेक्रोफिलिया हा मृत्यूबद्दल विचित्र आकर्षण, मृत व्यक्तीवर नियंत्रण ठेवण्याची अनैसर्गिक इच्छा किंवा जवळीकतेची विकृत धारणा यासारख्या विविध घटकांमुळे लैंगिक विकृत रूपात प्रकट होतो. नेक्रोफिलियाची दुर्मीळता व्यापक आणि सखोल संशोधनासाठी नैतिक मर्यादा आणि सामाजिक नियमांमुळे अनेक आव्हाने निर्माण करते.
नेक्रोफिलियाचा इतिहास दीर्घ आहे
नेक्रोफिलियाचा दीर्घ इतिहास आहे आणि अनेक संस्कृतींमध्ये त्याचा अहवाल देण्यात आला आहे. धार्मिक सिद्धांत, पौराणिक कथा आणि मृत्यू आणि नैतिकतेबद्दल असलेल्या सामाजिक दृष्टिकोनांमुळे त्याची विविध सामाजिक रूपे आपण पाहत असतो.
नेक्रोफिलियाशी नेमकी काय सामाजिक भूमिका असायला पाहिजे याबद्दल जगभरातील कायदेशीर व्यवस्थांमध्ये वेगवेगळे दृष्टिकोन आहेत; अनेक देशांनी मृतदेहांचे हाल किंवा सार्वजनिक सभ्यतेशी संबंधित अशा या कृती बेकायदेशीर ठरवल्या आहेत.
मृत व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन ही एक प्रमुख नैतिक चिंतेची बाब आहे, जी मानवी प्रतिष्ठा आणि मानवी अवशेषांच्या धार्मिक पावित्र्याबद्दलच्या बाबीत दिसून येते. नेक्रोफिलियावरील सामाजिक प्रतिक्रिया सांस्कृतिक व धात्मिक वृत्तींनी प्रभावित होतात; रुढीवादी समाजांमधील लोकांना याबद्दल अत्यंत घृणा वाटते. ते कृत्य मानवतावादी दृष्टीकोनातून निंदनीय मानले जात.
मनोविकार शास्त्रात नेक्रोफिलिया हा 'मृतदेहांमध्ये वारंवार आणि तीव्र लैंगिक आवड असलेला एक विशिष्ट पॅराफिलिक (विकृत) विकार' म्हणून परिभाषित केला आहे. हा अजूनही एक अतिशय संवेदनशील आणि क्लिष्ट विषय आहे जो नीतिमत्ता, सामाजिक नियम आणि जागतिक कायदेशीर प्रणालींच्या सीमांच्या पलीकडे जातो.
त्याच्या तपासासाठी मानवी प्रतिष्ठा आणि हक्क जपण्यासाठी शास्त्रीय दृष्टीकोन, तसेच मानसशास्त्र, समाज आणि कायद्याचे सखोल आकलन आवश्यक आहे. पारदर्शक संवादाला प्रोत्साहन देऊन, वैज्ञानिक संशोधन वाढवून आणि कायदेशीर सुरक्षा बळकट करून समाज नेक्रोफिलियाच्या गुंतागुंतीच्या समस्यांवर प्रभावीपणे उपाय काढू शकतो.
भारतात मृत व्यक्तींसाठी कोणकोणते अधिकार आहेत?
भारतात मृत व्यक्तीच्या अधिकारांमध्ये प्रतिष्ठेचा हक्क, योग्य अंत्यसंस्कार आणि अवमानापासून संरक्षण यांचा समावेश होतो. हे अधिकार भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 वर आधारित आहेत, जे सन्मानाने जगण्याच्या अधिकाराची हमी देते.
भारतात मृतांचा हक्क व सन्मान राखणे. योग्य दफन किंवा अंत्यसंस्कार करण्याच्या अधिकारासह, सन्मानाने वर्तणूक मिळण्याचा अधिकार मृतास आहे.
अवमानापासून संरक्षणसुद्धा आहे. बदनामी आणि धमकावण्यापासून संरक्षित करण्याचा अधिकार मृत व्यक्तीस आहे. मृत व्यक्तीवर धार्मिक रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार होणे हा त्या व्यक्तीचा अधिकार आहे. खालील कायदेशीर प्रकरणांमध्ये दिलेल्या न्याय निर्णयामुळे हे वरील अधिकार प्रस्थापित करण्यात आले आहेत.
परमानंद कटारा विरुद्ध भारतीय संघराज्य
सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की, मृत शरीराला सन्मानाचा आणि न्याय्य वागणुकीचा अधिकार आहे.
आश्रय अधिकार अभियान विरुद्ध भारतीय संघराज्य
सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की, बेवारस मृतदेहांचे योग्यरित्या अंत्यसंस्कार करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत.
मृतांच्या हक्कांचे संरक्षण करणाऱ्या भारतीय दंड विधानातील तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत
भारतीय दंड संहितेचे कलम 297 प्रमाणे दफनभूमीवर अतिक्रमण अंत्यसंस्कार विर्धीमध्ये अडथळा निर्माण करणे, मृतदेहाला अवमानित करणे हा गुन्हा ठरतो. भारतीय दंड संहितेचे कलम 404 प्रमाणे मृत व्यक्तीच्या मालमत्तेचा गैरवापर करणे गुन्हा आहे. भारतीय दंड संहितेचे कलम 499 प्रमाणे मृत व्यक्तीची बदनामी करणे हा गुन्हा ठरवते. भारतीय दंड संहितेचे कलम 503 प्रमाणे मृत व्यक्तीच्या प्रतिष्ठेला इजा पोहोचवण्याची धमकी देण्यास गुन्हेगार ठरवते.
अशा पद्धतीने सद्यःस्थितीत अस्तित्वात असलेल्या कायद्याप्रमाणे काही अधिकार मृत व्यक्तीस आहेत. मृतदेहाबरोबर शारीरिक संबंध या कृत्यास मानसिक विकृतीची बाजू असली, तरी कायदेशीर चौकटीमध्ये हा गुन्हा ठरत नाही व त्याबाबतीत कायदा हा अपुरा ठरतो. सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला जर तसे आवश्यक वाटले, तर संसदेकडे जाण्याचे निर्देश दिले आहेत आणि कायदे तयार करणे हे कायदेमंडळाचे कार्य आहे, हे नमूद केले आहे.






