अमेरिकेने दिलेला युद्धबंदीचा प्रस्ताव इस्त्रायलने धुडकावून लावला आहे. इस्त्रायलमधील सामान्य लोकांचा युद्धाला विरोध असला, तरी पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. अमेरिकेच्या मदतीवर पोसलेला हा देश आता अमेरिकेचेही ऐकायला तयार नाही. एकाच वेळी इस्त्रायल तीन देशांशी लढतो आहे. गाझापट्टी, लेबनॉन आणि इराणसोबत या देशाने अघोषत युद्ध सुरू केले आहे.
हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ल्याकडून आता जमिनीवरच्या युद्धाकडे इस्त्रायल वळतो आहे. रशिया आणि युक्रेन युद्ध गेल्या पावणेतीन वर्षांपासून सुरू असताना मध्य पूर्वेतला संघर्षही थांबायला तयार नाही. पुन्हा पुन्हा जग तिसऱ्या महायुद्धाकडे ढकलले जात आहे का, अशी शंका येत आहे.
दुसऱ्या महायुद्धांनतर स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्राची अवस्था दात आणि पंजे नसलेल्या सिंहासारखी झाली आहे. त्याला कारवाईचे काहीच अधिकार नाही. संयुक्त राष्ट्रांनी सांगूनही इस्त्रायल त्याला जुमानायला तयार नाही. ‘व्हेटो’चा ठराविक देशांना असलेला अधिकार आणि संयुक्त राष्ट्रांचे जगातील सभासद देशांवरचे परावलंबित्व त्याला काहीच करू देत नाही. लेबनॉनमध्ये इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात सध्या भीषण युद्ध सुरू आहे.
आता ते संपूर्ण परिसरात पसरण्याची भीती आहे. आता इराणही या युद्धात अडकू शकतो. दुसरीकडे रशियानेही युरोपला क्षेपणास्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. आशिया खंडातला वाढता युद्धज्वर जगाला विनाशाकडे नेण्याची भीती आहे. नेतन्याहू यांनी हिज्बुल्लाहला संपवण्याची भाषा केली आहे. त्याच वेळी जोपर्यंत इराणचा पराभव करत नाही, तोपर्यंत ही समस्या थांबणार नाही, असे त्यांचे सांगणे म्हणजे इराणला डिवचण्यासारखे आहे.

सापाचे डोके इराणमध्ये आहे आणि जोपर्यंत तो चिरडला जात नाही, तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही, ही त्यांची भाषा युद्धज्वर आणखी वाढवणारी आहे. ज्या पद्धतीने इस्त्रायलमध्ये तयारी केली जात आहे, त्यावरून इराणवरही हल्ला होणार असल्याचे दिसते. इराणवर हल्ला झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
वास्तव हे आहे, की अमेरिका आणि इस्रायलच्या सामर्थ्याने सर्व देश पराभूत झाले आहेत. कोणताही देश त्यांच्याशी, विशेषतः अमेरिकेशी स्पर्धा करू शकत नाही. इराणने आपल्या सैन्याचा जो काही विकास केला, तो इस्रायलशी स्पर्धा करण्यासाठी केला. इराण अशा स्थितीत आहे, की तो इस्रायलला हानी पोहोचवू शकतो. मध्य पूर्वेतील तणाव थांबणार नाही; पण अमेरिकेशी सामना करणे त्यांच्यासाठी खूप कठीण जाईल.
अमेरिका एकीकडे युद्धविरामाचा सल्ला देत असताना नेत्यनाहू यांची भाषा युद्धखोरीची आहे. इराणला मुद्दाम डिवचण्यामागे इराण एकदा का युद्धात उतरला, की अमेरिकेला अपरिहार्यपणे इस्त्रायलच्या बाजूने युद्धात उतरावे लागेल.
इराणवर हल्ला झाल्यास ते तेलाचा पुरवठा बंद करतील. दुसरे म्हणजे, अमेरिकेचा तळ कुठेही असेल, मग तो इराक, सीरिया, सौदी अरेबिया, कतार-बहारिन असो; त्याला लक्ष्य करून तेल बंद करण्याचा इशारा इराण देत आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे हवाई मुख्यालय कतारमध्ये आहे, तर भूदलांचे मुख्यालय बहरीनमध्ये आहे. त्या ठिकाणी तेलाचा पुरवठा थांबला, तर सर्व देशांसमोर मोठी समस्या निर्माण होईल.
दुसरी गोष्ट अशी, की लेबनॉनमध्ये सध्या ज्या प्रकारे युद्ध सुरू आहे, ते दिवसेंदिवस भयंकर होत आहे. गाझामध्ये जशी परिस्थिती होती, तशीच परिस्थिती निर्माण होत आहे. इस्रायलची योजना अशी आहे, की त्यांना हिजबुल्लाहच्या लोकांना इस्त्रायलची सीमा लेबनॉनला जिथे मिळते, तिथे बाहेर काढायचे आहे. तिथे बफर झोन बनवायचा आहे.
इस्त्रायल किंवा अमेरिकेला नेहमीच्या सैन्यासह लढणे खूप सोपे आहे; पण दहशतवादी गटाला पराभूत करणे फार कठीण आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे तालिबान. अमेरिका जवळपास 22 वर्षे दहशतवाद्यांशी लढत राहिली, नंतर त्यांच्याकडे सत्ता सोपवून परत आली. इस्रायलचे हमाससोबतचे युद्ध जवळपास वर्षभर चालले; पण त्याला अद्याप विजय मिळवता आलेला नाही. इस्रायलला हमासला नष्ट करता आलेले नाही. ते त्याचे खरे उद्दिष्ट आहे.

लेबनॉन हा एक छोटा आणि सुंदर देश आहे. त्याची लोकसंख्या सुमारे 50 लाख आहे. तिथे दहा लाख सीरियन निर्वासित आहेत. येथील लोक खूप मेहनती आणि संगीत, संस्कृती आणि कलेची आवड असणारे आहेत. हे अरब जगाचे सांस्कृतिक केंद्र आहे. वास्तविक, लेबनॉनमध्ये 1975 पासून असा संघर्ष सुरू आहे. इस्रायली सैन्याने 2006 मध्ये दक्षिण लेबनॉनवर हल्ला केला; परंतु त्याचे उद्दिष्ट साध्य होऊ शकले नाही. युद्धातून ध्येय साध्य होऊ शकत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला वारंवार सांगितले असले, तरी कुणीही माघार घ्यायला तयार नाही. युद्धाने उद्दिष्टे साध्य होणार नाहीत.
व्हिएतनाम-अमेरिका युद्धात चार हजार लोक मरण पावले, त्यानंतर अमेरिकेला तेथून पळ काढावा लागला. त्यानंतर अमेरिकेने लॉस कंबोडिया, इराक येथे लढा दिला. सद्दाम हुसेनचे सरकार पाडले; परंतु तेथे अमेरिकन समर्थक सरकार स्थापन करू शकले नाहीत. लीबियात फ्रान्स आणि अमेरिकेने बॉम्बफेक करून गद्दाफी मारला; परंतु तिथली गृहयुद्धाची परिस्थिती कायम आहे. ते दोन भागात विभागले गेले आहेत आणि आपसात भांडत आहेत.
या पार्श्वभूमीवर इस्त्रायल जर युद्धाच्या माध्यमातून हिजबुल्लाला संपवण्याचा विचार करत असेल तर ते शक्य नाही. या चळवळी आहेत आणि कोणतीही चळवळ संपवणे फार कठीण आहे. इस्रायलने हमासच्या उच्च अतिरेक्यांना मारले, तरीही तेथे नवीन लोक अधिक अतिरेकी बनतात. हमासने २००६ मध्ये इस्रायलवर भीषण हल्ला केला होता, तेव्हापासून अनेक नवीन लोक आले. हमास तेथे खूप मजबूत आहे, तर इस्रायलने गाझाला 17 वर्षांपासून वेढा घातला आहे. इस्रायल हा एक अतिशय शक्तीशाली देश आहे आणि त्याच्याकडे अण्वस्त्रे आहेत हे खरे आहे.
पारंपारिक शस्त्रास्त्रांमध्येही, त्याच्याकडे खूप श्रेष्ठ शस्त्रे आहेत; परंतु चळवळीला सामोरे जाणे कठीण आहे, कारण ज्या प्रकारचे अहवाल येत आहेत, त्यावरून असे दिसून येते, की अनेक लढाऊ हमासमध्ये सामील झाले आहेत. ते तिथे मरायला तयार असतील, तर त्यांना प्रशिक्षणाची गरज नाही. इस्रायलची अर्थव्यवस्थाही चांगली नाही. पर्यटनही उद्योग अत्यंत खालावला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे पर्यटक येत नाहीत.

इस्रायलमध्ये दुहेरी नागरिकत्व असलेल्यांनी आपला देश सोडला आहे. असे असले, तरी या वेळी इस्रायलला गाझामधून सर्व पॅलेस्टिनींना हाकलून इजिप्तच्या दिशेने ढकलायचे आहे असे दिसते. वास्तविक, गाझामध्ये इस्रायलची योजना त्यांना आणखी 10 किलोमीटर आत ढकलण्याची आहे. हे शक्य नाही कारण बरेच लोक मरतील आणि नंतर ते इस्रायलींनाही मारत राहतील. अशा परिस्थितीत एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे दोन राज्य उपाय. इस्रायलला कधीतरी हे क्षेत्र रिकामे करावे लागेल.
संयुक्त राष्ट्र महासभेने आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून मत मागितले असता, हे व्यापलेले क्षेत्र आहे, जे इस्रायलला रिकामे करावे लागेल, असे सांगण्यात आले. निर्वासितांना परत यावे लागेल. लेबनॉनमध्ये इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात संघर्ष सुरू आहे. इस्रायलच्या भीषण हल्ल्यात हिजबुल्लाहच्या अनेक सदस्यांना प्राण गमवावे लागले. आता इस्रायलने अमेरिकेसह इतर देशांनी दिलेला 21 दिवसांचा युद्धविराम प्रस्ताव नाकारला आहे.
लेबनॉनमधून हिजबुल्लाला संपवणे हे अंतिम ध्येय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लेबनॉनमधील हिजबुल्लाहला चिरडणे हा त्याच्या उत्तरेकडील नवीन हल्ल्याचा अंतिम परिणाम असावा. इस्त्रायली मंत्र्याने दावा केला, की अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी प्रस्तावित केलेल्या युद्धबंदीमुळे हिजबुल्लाला पुनर्गठन करण्यासाठी वेळ मिळेल. यापूर्वी लेबनॉनचे पंतप्रधान नजीब मिकाती यांनी इस्रायल आणि इराण समर्थित हिजबुल्ला यांच्यातील लढाई संपवण्यासाठी लवकरच युद्धविराम होऊ शकेल, अशी आशा व्यक्त केली होती.
इस्रायलने जमिनीवर आक्रमण करण्याचा विचार केल्याने दोन्ही देशांमध्ये युद्धाचा धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इशारा दिला आहे, की इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील संघर्ष सर्वांगीण युद्धात वाढण्याचा धोका आहे. इस्रायलच्या मंत्र्याचे वक्तव्य फ्रान्स आणि अमेरिकेच्या २१ दिवसांच्या युद्धबंदी योजनेलाही धक्का मानला जात आहे.






