भारतीय अध्यात्मात शिवपुराणात भस्मासुराची गोष्ट सांगितली आहे. ती जगविख्यात आहे, मात्र तिचा संबंध माणसाशी इतका जवळून येईल असे वाटले नव्हते. जग जाळून खाक करण्याचं बळ मागितलेल्या भस्मासुराने एक दिवस स्वतःचे दोन्ही हात स्वतःच्या डोक्यावर ठेवले आणि जळून भस्म झाला. प्लास्टिकचे ही तसंच झालं.
जगभरात 60-70 च्या दशकात आणि भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये विशेषतः आशिया खंडात 80 च्या दशकात एखाद्या व्हायरस सारखा पसरलेला प्लास्टिक आज हाहाकार माजवून उभा आहे. त्यावेळेस पारंपारिक उपकरणं, अवजारं आणि वापरातल्या वस्तूंना सहज, सोपा आणि स्वस्त पर्याय ठरलेला प्लास्टिक आज माणसाच्या मेंदूतही भिनायला लागला आहे. काल-परवापर्यंत भारतासारख्या देशात अंडी, तांदूळ आणि लसूण सारख्या पदार्थांमध्ये प्लास्टिक मिसळल्याचे शेकडो उदाहरणे आली.
सुरुवातीला ती खोटी देखील वाटली. मात्र प्रयोग झाले आणि कळालं की आता प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत सहजपणे प्लास्टिक मिसळला जातोय. मात्र हाच प्लास्टिक थेट माणसाच्या मेंदूत मुरतोय, याची कणभरही चाहूल नव्हती. ऑस्ट्रेलियातील कार्टिन विद्यापीठ तसेच नोट्रे डेम विद्यापीठात हे संशोधन करण्यात आले. अभ्यासात यकृत मूत्रपिंड आणि मेंदूचे नमुने घेण्यात आले होते.
2016 ते 2024 या आठ वर्षाच्या काळात या विद्यापीठांनी प्लास्टिक कुठे कुठे मूरते आहे त्याचं प्रमाण, पद्धत आणि स्थळे यांचा कसून अभ्यास केला. त्यात तपासलेल्या मेंदूंच्या नमुन्यातील प्लास्टिकचे प्रमाण 50% वाढल्याचे समोर आले आहे. यावरून प्लास्टिक प्रदूषण माणसाशी किती जवळ आलंय आणि ते माणसाला किती गिळून मोकळं झालंय, भविष्यात प्लास्टिक केवळ जैवसाखळीवरतीच नव्हे तर अखंड ब्रम्हांडावर विनाशकालीन हमला करणार आहे, याची ती चाहूल ठरावी.

प्लास्टिक शरीरामध्ये अगदी सोप्या आणि मुबलक पद्धतीने शिरते आहे…
तशी ही चर्चा आजची नाही. भारतासारख्या देशातही त्याची खूप खोल चर्चा गेल्या 25 वर्षापासून सुरू आहे. त्यात प्रामुख्याने मायक्रोपोलिथिनचा शेकडो वेळा उल्लेख झाला आहे. अगदी सोप्या भाषेत पॉलिथिनपासून प्लास्टिक बनत असेल तर हे पॉलिथिनचे मायक्रो कण प्लास्टिकच्या अति वापरामुळे अपर्यायतेमुळे थेट मानवी शरीरामध्ये अगदी सोप्या आणि मुबलक पद्धतीने शिरते आहे, हे तज्ञांनी वेगवेगळ्या सोप्या भाषेत समजावले आहे.
बाटलीबंद पाणी हे त्यातलं अतिशय सोपं उदाहरण होतं. या बाटलीमधला द्रव हे पॉलिथिनचे कण विरघळवतो आणि ते थेट माणसाच्या पोटात, रक्तात, यकृत, मूत्रपिंड आणि मेंदूपर्यंत पोचतात. हे आता ऐकताना मागील इशाऱ्यांची आणि पॉलिथिन अर्थात प्लास्टिक शक्यतो कुठे वापरू नये याची चर्चा किती महत्त्वाची होती हे सिद्ध करत आहे. मायक्रो प्लास्टिक सहसा दूषित अन्न आणि पाण्याद्वारे शरीरात प्रवेश करते.
आपण हवेतील मायक्रो प्लास्टिकचा श्वास घेत आहोत, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. विशेषतः मानवी विष्ठा, सांधे, यकृत, प्रजनन संस्था, विविध अवयव आणि रक्तवाहिन्या यांच्या तपासामध्ये पॉलीथीनचे मायक्रो कण सापडलेले आहेत. यावरून भविष्यातल्या तपासण्यांचा मार्ग पॉलिथिन मायक्रो तपासण्यांपासून सुरू होईल हेही अधोरेखित होत आहे.
थोडक्यात काल-परवापर्यंत हवा हवासा वाटणारा प्लास्टिक आता पृथ्वीवरती मोठं संकट म्हणून उभा आहे. नद्या नाल्यांचे प्रवाह, समुद्राचा विटाळ, अनेक पद्धतीची भेसळ, पूर, महापूर यांचं कारण ठरलेला प्लास्टिक आता त्याच्या निर्मात्याला म्हणजे माणसालाच भास्मासूरासारखा भस्म करणार आहे हे विशेष. पृथ्वीने तिच्या नजीकच्या लाखों वर्षाच्या आयुष्यात अनेकदा जगबुडी पाहिली आहे, असं म्हटलं जातं.
नोहाच्या नौकेची देखील एक जगभरात आख्यायिका आहे. ती वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या देशांमध्ये बोलली जाते. की जग बुडालं तेव्हा काही पशुपक्षी, प्राणी, माणसांना घेऊन नोहाने आपल्या होडीतून नवीन जग पाहिले. आताच्या सहस्रकात किंवा दशसहस्रकात जेव्हा ' जगबुडी ' होईल तेव्हा चित्र काय असेल याची चर्चाही गेल्या काही वर्षात झाली.
त्यात समोर आलेलं उत्तर होतं की पृथ्वीच्या पृष्ठावरती विविध रंगाचा प्लास्टिक तरंगताना दिसेल, कचरा तरंगताना दिसेल. आणि नव्या पृथ्वीच्या आणि जीवसृष्टीच्या स्थापनेतला तो सगळ्यात मोठा अडथळा असेल. नवी पृथ्वी जन्म घेईल तीच मुळात विविध ' विटाळ ' घेऊनच, असं म्हटलं गेलं. त्याचा प्रत्यय आता सहज सोप्या भाषेत घेता येतोय.

हिमालयाचा जीव आता गुदमरू लागलाय...
आता हे प्लास्टिक बाटली, पिशवी, भांडी एवढ्या पुरतं राहिलं नाही. ते तंत्र, यंत्र, सर्वत्र संचारलय. खऱ्या अर्थाने ' ब्रम्हांडनायक ' शोधायचा झाला तर तो प्लास्टिक शिवाय आणखीन दुसरा कोण असू शकेल, की ज्याची नखं जळी, स्थळी, काष्टी आणि पाषाणी एवढेच नव्हे तर ब्रम्हांडातील इतर ग्रहांनाही लागली आहेत. गेल्या पन्नास वर्षात या प्लास्टिकचे एक नख थेट चंद्रालाही लागलंय.
स्पेस स्टेशनच्या भोवताळच्या प्रदेशात पृथ्वीवरून गेलेली अनेक यानं आणि त्यांचा कचरा साठला आहे, असं अनेकदा नासाने सांगितलय, दाखवलय. हा कचरा अर्थात जैविक नाही तो रासायनिक, प्लास्टिक, फायबर याच पद्धतीचा आहे, धातूंचा आहे. तो परत आणण्यासंदर्भात अद्यापि जगाने विचार केलेलाही दिसत नाही. हीच परिस्थिती हिमालयाच्या अनेक शिखरांवरती दिसते आहे.
शतकापूर्वी ' अनटच ' असलेला हिमालय आता मानवी कचऱ्याने चिंतातुर झाला आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येत देश-विदेशातून गिर्यारोहक हिमालय पादांक्रांत करत आहेत. त्यांच्यासाठी या साहसी मोहिमा असतीलही मात्र हिमालयाचा जीव आता गुदमरू लागला आहे. गेल्या पन्नास वर्षात शेकडो टन कचरा हिमालयाच्या शिखरांवरती जमा झाला आहे. बेस कॅम्पच्या बाजूची कचऱ्याची चित्रं जगाने पाहिली आहेत.
गिर्यारोहकांनी सोबत नेलेला कण आणि कण कचरा परत आला पाहिजे यासंदर्भात जगाने विचार केला पाहिजे किंवा या मोहिमांचे नियोजन करणाऱ्या आणि गिर्यारोहणाच्या पोटी हजारो रुपयांची फी आकारणाऱ्या यंत्रणेने, आस्थापनेने हा कचरा हिमालया बाहेर आणला पाहिजे.
जे हिमालयाचं त्याहीपेक्षा भयंकर दुखणं नद्या, नाले, खाड्या, विहिरी आणि समुद्राचे आहे. उभ्या पृथ्वीवरून तयार होणारा कण आणि कण कचरा या नद्यां, खाड्यांमार्गे थेट समुद्रात जाणार असेल तर समुद्र शक्यतो कुठलीच गोष्ट आपल्या पोटात ठेवत नाही. याथा अवकाश माणसाने दिलेलं हे विषारी दान तो परत किनाऱ्यावर फेकतो. हीच शोकांतिका जगाच्या दुसऱ्या टोकाला म्हणजे लाखो वर्ष बर्फाखाली एक वेगळी सृष्टी बनवून उरलेल्या अंटार्टिकाला झोंबत आहे.
अंटार्टिका म्हटलं की बर्फाची तिसरी दुनिया आहे. मात्र या दुनियेत आता आजूबाजूच्या देशांचा समुद्रात वाहून आलेल्या कचऱ्याने प्लास्टिकवर स्वार होऊन वेगवेगळ्या जीवांची घुसकोरी अंटार्टिकाच्या बर्फाळ प्रदेशात करायला सुरुवात केली आहे. दक्षिणी महासागराच्या तिन्ही बाजूंनी असलेला अंटार्टिका आता वेगवेगळ्या कचऱ्याच्या स्पर्शाने घुसखोरीने, दुर्गंधीने आणि या कचऱ्यावरती पोसणाऱ्या परजीवांच्या खुसखोरीने बाधित होऊ लागला आहे.
भविष्यात दुर्दैवाने ही साखळी वाढत गेली, तिच्यावरती वेळेत उपचार झाले नाहीत तर जगाचं हे दुसरं टोक बघता बघता अवघ्या सृष्टी समोर नवीन आव्हान निर्माण करेल, संकट निर्माण करेल यात संशय नाही.

ज्यानं या प्लास्टिकला भस्मासुरासारखा जन्म दिला त्याच्या मेंदूत तो आज मुरलाय
ग्लोबल वॉर्मिंगमुळे अगोदरच ग्लेशियर म्हणजे बर्फाचे डोंगर वितळत आहेत. त्या पाण्याचे प्रवाह वाढत आहेत. सातत्याने समुद्रामध्ये मोठमोठ्या महासागरांमध्ये जन्म घेणारी वादळं प्रवाहाची दिशा आणि गती वाढवत आहेत आणि यावर स्वार झालं आहे ते प्लास्टिक आणि प्लास्टिक. या सगळ्या विषारी पदार्थांना अंटार्टिकाच्या बर्फाळ किनाऱ्यावरती सोडत आहे. याचा सगळ्यात मोठा नैसर्गिक फटका हा लाखों वर्ष बर्फाची आणि बर्फाळ प्रदेशांची जीवसृष्टी ठरलेल्या तिथल्या जीवांना घातक आहे.
वरवर पाहता हे खूप दूर वाटत असेल तरी ज्यांनी चंद्र प्लास्टिकच्या कचऱ्याने भरलेला पाहिलाय तेच सांगू शकतील की मनुष्य समजतो तेवढा जगाच्या दुसऱ्या टोकाचे म्हणजे अंटार्टिकाचं संकट जास्त दूर नाही. ते अगदी हाकेच्या अंतरावर आलेला आहे. ज्यानं या प्लास्टिकला भस्मासुरासारखा जन्म दिला त्याच्या मेंदूत तो आज मुरलाय. उद्या हाच प्लास्टिक पृथ्वीच्या सर्वनाशाचे कारण ठरेल यात शंका नाही.
अंटार्टिका संदर्भात प्रसिद्ध झालेली ही संशोधनं जागतिक देशांच्या संघटनेनं प्राथमिकतेने स्वीकारायला हवीत. ग्लोबल वॉर्मिग प्रमाणे जगाने इथेही चालढकल केली तर मात्र नजीकच्या काळात माणसाच्या दूनियेसमोर बिघडलेल्या निसर्गाचं फार मोठं आव्हान उभं असेल.






