मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम सुरू आहे. या स्मारकातील डॉ. आंबेडकर यांचा पुतळा यापूर्वी 250 फूट उंचीचा बांधण्याचे नियोजित होते. मात्र नंतर या पुतळ्याची उंची वाढवण्यात आली असून हा पुतळा आता 450 फुटांचा असणार आहे. जगातील सगळ्यात उंच पुतळा उभारण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने प्रख्यात मुर्तीकार राम सुतार यांच्यावर सोपवली आहे.
गेल्या 10 वर्षांपासून या स्मारकाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असतानाच आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दक्षता समितीने या पुतळ्याची नमुना प्रतिकृती सदोष असल्याचा आरोप केला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा ' सदोष पुतळा आणि साडे बारा एकराच्या विस्तीर्ण भूखंडावरील आंतरराष्ट्रीय स्मारकाचा घोर निराशा करणारा आराखडा हे सारे पाप एमएमआरडीएमधील नोकरशहांचे आहे, असा स्पष्ट आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दक्षता समितीने केला आहे.
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर स्मारक दक्षता समितीची स्थापना झाली आहे. स्मारकाच्या कामावर लक्ष ठेवणे आणि काही त्रुटी असल्यास त्या शासनाच्या निदर्शनास आणून देणे, असे या दक्षता समितीचे काम आहे.
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकामध्ये उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 450 फूट उंचीच्या पुतळ्यासाठी गाझियाबाद येथील मुर्तीकार राम सुतार यांच्या शिल्पशाळेत 25 फुटांच्या प्रतिकृती उभारली आहे. याच प्रतिकृतीच्या धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 450 फूट उंचीचा भव्य पुतळा साकारला जाणार आहे. अलीकडेच राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने बाबासाहेबांच्या या 25 फुटी प्रतिकृतीला मंजुरी दिली होती. 
बाबासाहेबांच्या अचूक पुतळ्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमा !
मात्र आता याच प्रतिकृतीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दक्षता समितीने आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात मुंबईत आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत इंदू मिलच्या आंतरराष्ट्रीय स्मारकातील बाबासाहेबांच्या हुबेहूब पुतळ्याच्या निर्मितीसाठी कला क्षेत्रातील तज्ज्ञांची एक समिती मुख्यमंत्र्यांनी स्थापन करावी, अशी मागणी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दक्षता समितीसोबत नामवंत चित्रकार, शिल्पकार, छायाचित्रकार आदी कलावंत उभे ठाकले असल्यामुळे इंदू मिलचा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चेहऱ्याची रचना आंबेडकरांच्या चेहऱ्याशी साधर्म्य दाखवत नाही
‘इंदू मिल स्मारक’ हे आंतरराष्ट्रीय आकर्षण ठरणार आहे, कारण ते ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाचे भौगिलिक, सामाजिक राजकीय व सांस्कृतिक महत्व होय, हे आपण सर्व जाणतोच. त्यामुळे या स्मारकाचे काम सर्व बाजूंनी अचूक पद्धतीने व आदर्शवत असणे आवश्यक आहे. जेष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी तयार केलेली बाबासाहेबांच्या पुतळ्याची २५ फुटांची प्रतिकृती दोषपूर्ण आहे यात शंकाच नाही. कोणत्याही कलेची पार्श्वभूमी नसलेला व्यक्ती देखील या शिल्पातील दोष निदर्शनास आणू शकतो, इतके ते सदोष आहे.
चेहऱ्याची रचना आंबेडकरांच्या चेहऱ्याशी साधर्म्य दाखवत नाही. शरीराची ठेवण, कपड्यांची रचना, बुटांचे आकार इत्यादी गोष्टी सदोष आहेत. शिवाय त्या विशेष अभ्यास न करता केलेल्या आहेत हे स्पष्टपणे दिसून येते. बाबासाहेबांचे इतके रेफरंस उपलब्ध असताना देखील राम सुतार यांनी अशा प्रकारचे काम निर्माण करावे हे चुकीचे आहे. शिवाय त्यांनी यापूर्वी अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे शिल्प साकारले आहे, तरीही त्यांच्याकडून असे कार्य अपेक्षित नाही, असे मत पत्रकार परिषदेत दक्षता समितीने व्यक्त केले आहे.
डॉ. आंबेडकर स्मारक दक्षता समितीचा गौप्यस्फोट
बाबासाहेब आंबेडकर यांचा ' सदोष पुतळा आणि साडे बारा एकराच्या विस्तीर्ण भूखंडावरील आंतरराष्ट्रीय स्मारकाचा घोर निराशा करणारा आराखडा हे सारे पाप एमएमआरडीए' मधील नोकरशहांचे आहे, असा स्पष्ट आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दक्षता समितीने आज केला. त्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीत शिल्पकार आणि आर्किटेक्ट यांची निवड ही मनमर्जीने आणि स्पर्धात्मक निवड प्रक्रिया पद्धती बाजूला सारून करण्यात आली, असा गौप्यस्फोट त्या समितीने एका पत्रकार परिषदेत केला.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पत्रकार परिषद घेवून डॉ. आंबेडकर स्मारकाबाबत त्या समितीने अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले, त्या स्मारकासाठी निधी पुरवणाऱ्या सामाजिक न्याय खात्याच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे केलेले दुर्लक्ष, उदासीनता ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे, असेही दक्षता समितीने म्हटले आहे.
या पत्रकार परिषदेला स्मारक दक्षता समितीच्या कोअर कमिटीच्या मान्यवर सदस्यांनी संबोधित केले. त्यात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष ऍड. डॉ. सुरेश माने, दलित पँथरचे नेते सुरेश केदारे, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, माजी शिवसेना आमदार बाबुराव माने, प्रजासत्ताक जनता परिषदेचे अध्यक्ष प्रबुद्ध साठे, ओबीसी नेते राजाराम पाटील, काँग्रेस नेते गणेश कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे नेते उत्तमराव गायकवाड, समाजवादी पार्टीचे राज्य महासचिव राहुल गायकवाड, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष मिलिंद सुर्वे, बुद्धिस्ट कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष रवी गरुड, आंबेडकरवादी भारत मिशनचे सतीश डोंगरे, ऍड. जयमंगल धनराज यांचा समावेश होता. 
शिल्पकाराच्या निवडीत डोळेझाक
450 फूट उंचीच्या उत्तुंग पुतळ्याच्या निर्मितीसाठी शिल्पकार राम सुतार (वय 100 वर्ष) यांची निवड ही त्यांचे वय आणि क्रियाशिलता याकडे डोळेझाक करून करण्यात आली. केवळ त्यांची ख्याती, लौकिक पाहून त्यांच्या कंपनीला पुतळ्याचे काम देण्यात आले. परिणामीः प्रत्यक्षात पुतळ्याची निर्मिती त्यांचे पुत्र अनिल सुतार हे करत आहेत, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिल्पात साकार करण्यात त्यांच्या मर्यादा आणि अपयश सदोष पुतळ्याने उघडे पाडले आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाला न्याय देण्यासाठी नव्या समर्थ शिल्पकाराचा शोध घेण्यात यावा, अशी आमची आग्रही मागणी आहे.
डझनभर आराखडे कोनाड्यात का फेकले ?
इंदू मिल येथील स्मारकाच्या उभारणीचे कंत्राट शापुरजी पालनजी या कंपनीला देण्यात आले असून सल्लागार मेसर्स शशी प्रभू अँड असोसिएट हे आहेत. त्या स्मारकासाठी आर्किटेक्ट निवडताना एमएमआरडीएने प्रचलित पद्धतीनुसार सुरुवातीला जाहिराती देवून स्पर्धात्मक पसंतीसाठी देशी विदेशी आर्किटेक्टस् कडून आराखडे मागवले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळून डझनभर आराखडे प्राप्तही झाले होते. त्यातून सर्वोत्तम आराखड्याला पसंती देवून आर्किटेक्टची निवड करणे क्रमप्राप्त होते. पण एमएमआरडीएमधील नोकरशहांनी ते सारे आराखडे गुंडाळून कोनाड्यात फेकून देत मनमर्जीने शशी प्रभू यांची निवड करून टाकली.
पंतप्रधानांच्या भेटीसाठी जाणार
गुजरातमधील केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा उत्तुंग पुतळा उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो पुतळा जसा प्रतिष्ठेचा मानला, तितक्याच आत्मीयतेने त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही पुतळा आणि समारकाकडे पाहावे, अशी आमची रास्त अपेक्षा आणि नम्र विनंती आहे. त्यासाठी दक्षता समितीचे एक शिष्टमंडळ लवकरच मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार आहे.
शिल्पकार राम सुतार यांनी तयार केलेल्या कलाकृतीवर आक्षेप
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या शिष्टमंडळाने गाझियाबाद येथे असलेल्या चित्रकार राम सुतार यांच्या कार्यशाळेला भेट दिली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 25 फुटाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या 25 फुटांच्या प्रतिकृतीप्रमाणे दादर येथील इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचा 450 फुटाचा पुतळा उभारला जाणार आहे.
राम सुतार यांच्या कार्यशाळेला भेट देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबातील सदस्य, बाबासाहेबांच्या चळवळीतील अनुयायी आणि इतर मान्यवरांचा समावेश होता. शिष्टमंडळाच्या भेटीनंतर 450 फूट उंचीचा पुतळा उभारण्याबाबतचा निर्णय सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतला आहे.
- इंदू मिल येथील स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत 16 नोव्हेंबर 2022 रोजी बैठक झाली होती.
- या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवारातील सदस्य, लोकप्रतिनिधी तसेच आंबेडकरी चळवळीतील मान्यवर व्यक्तींना सोबत घेऊन गाझियाबाद येथील राम सुतार यांच्या शिल्पशाळेतील 25 फुटांच्या प्रतिकृतीची पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
- त्यानुसार 6 एप्रिल 2023 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत राम सुतार यांच्या शिल्पशाळेला भेट देऊन तेथील 25 फुटांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृती पुतळ्याची पाहणी करण्यात आली.
- या पाहणीदरम्यान मान्यवरांकडून 25 फुटी पुतळ्याच्या प्रतिकृतीला सहमती देण्यात आली होती. या प्रतिकृतीच्या धर्तीवर इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 450 फूट उंचीचा पुतळा उभारण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने अंतिम मंजुरी दिली.
अलीकडेच 6 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवरील इंदू मिलवर स्मारक तयार करत आहोत. त्याला थोडा उशिर होत आहे, पण अत्यंत वेगाने ते आपल्याला पूर्ण करायचं असल्याचे मत व्यक्त केले होते. मला अतिशय आनंद आहे की, बाबासाहेबांच्या प्रत्येक आठवणीसोबत मला जुडण्याची संधी मिळाली.
बाबासाहेब यांच्या जीवनाकडे पाहतो तेव्हा थक्क होतो. कारण एक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये इतक्या गोष्टी कसे करू शकतात. मी तर असं म्हणेल ही व्यक्ती नाही तर संस्था आहे. पण अशा हजारो संख्या एकत्र केल्या तरी देखील बाबसाहेबांचं ज्ञान आणि व्यासंग पूर्ण होऊ शकत नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
प्रस्तावित स्मारकाची वैशिष्ट्ये
1.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हे या स्मारकाचं मुख्य आकर्षण असेल. या पुतळ्याची मिनीपासूनची उंची 106 मीटर एवढी असेल. त्यात १०० फुटांचे पादपीठ (चौथरा) आणि 350 फुटांचा पुतळा असेल.
2.या स्मारकात बौद्ध वास्तुरचना शैलीतले घुमट आणि स्तूप, संग्रहालय, तसंच प्रदर्शनं भरवण्यासाठी दालन असेल.
3.पुतळ्याभोवती सहा मीटर लांबीचा चक्राकार मार्ग असेल. तसंच चौथऱ्यावर पोहोचण्यासाठी लिफ्टची सोय असेल.
4.सांस्कृतिक कार्यक्रम तसंच सार्वजनिक सभा घेण्यासाठी एक हजार लोकांची आसनक्षमता असलेलं अत्याधुनिक प्रेक्षागृह असेल.
5.विपश्यनेसाठी येणाऱ्या लोकांसाठी ध्यानधारणा केंद्र.
6.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात एक ग्रंथालय असेल. त्यात बाबासाहेबांबद्दलची माहिती पुस्तके, त्यांचं साहित्य, जीवनचरित्र, माहितीपट, लेख, तसंच त्यांनी केलेल्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक योगदानावर संशोधन करण्याची सोय असेल.
7.या केंद्रात व्याख्यान वर्ग आणि कार्यशाळा घेण्यासाठी 400 लोकांची क्षमता असलेलं सभागृह असेल.






