‘’मी मुसलमान आहे म्हणून मला काम करण्याचा कोणताही अधिकार नाही. ‘न्यू गणपती टुरिस्ट ढाबा’ या नावाने माझा एक ढाबा होता, जिथे फक्त आणि फक्त शुद्ध शाकाहारी जेवण मिळायचं आणि तेही बगैर कांदा-लसुणचे. माझ्या ढाब्याचे पार्टनर आणि सगळा स्टाफ हिंदू होते, मात्र तरीही गेल्या आठ महिन्यापासून माझा ढाबा बंद पडला आहे’’
उत्तरप्रदेशच्या बहूचर्चित मुजफ्फरनगर येथे राहणारा 44 वर्षाचा वसीम अहमद त्याची हतबलता अशाप्रकारे व्यक्त करतो. गेल्या आठ वर्षांपासून वसीम या परिसरात त्याचा ढाबा चालवायचा, परंतू गेल्यावर्षीपासून याच परिसरातून कावड यात्रा निघायला सुरूवात झाली आणि वसीमचे पूर्ण आयुष्यचं बदलून गेलं. ढाबा बंद करायला लावल्यामुळे वीसम आता एका मंडईत 11 हजार रुपयांची नोकरी करतो.
कावड यात्रेला सुरूवात होण्यापूर्वी मुजफ्फरनगर जिल्हा पुन्हा तापायला लागला आहे. योगी सरकार सत्तत आल्यानंतर कावड यात्रेदरम्यान प्रत्येक वेळी मांस विक्रीची दुकाने आणि मांसाहारी हॉटेल्स बंद ठेवण्याचे आदेश येतात. मात्र यावेळी मुझफ्फरनगर जिल्ह्यात मुस्लिमांची शाकाहारी हॉटेल्सही बंद करण्यात आली आहेत. सहारनपूर आणि बिजनौर या शेजारील जिल्ह्यांमध्ये मात्र हॉटेल्स सुरू आहेत.
कावड यात्रेच्या मार्गावरील मांस, अंडी आणि दारूची सगळी दुकाने बंद राहतील असा आदेश प्रशासनाने जारी केला आहे. तसेच सर्व दुकाने, हॉटेल, ढाबे इत्यादींवर नावे स्पष्ट आणि मोठ्या शब्दात लिहिलेले असेल असेही आदेशात म्हटले आहे. दुसरीकडे, येथे अशी अनेक हॉटेल्स किंवा ढाबे बंद करण्यात आले आहेत.
ज्यांचे मालक तरी मुस्लिम आहेत किंवा त्यांचे धंद्यातले भागीदार तरी…या मुस्लिम हॉटेल मालकांचे म्हणणे आहे की आता आम्हाला हॉटेल व्यवसाय कायमचा बंद तरी करावा लागेल किंवा एखाद्या हिंदूला तो विकावा तरी लागेल. गेल्या वर्षी मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या घटनेमुळे आणि प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे आमच्यावर ही वेळ येऊन पोहचली असल्याचे हॉटेल चालकांचे म्हणणे आहे.
प्रशासनाने हॉटेल मालकांना काय आदेश दिले आहेत?
गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये मुझफ्फरनगर जिल्ह्यातील कावड यात्रेदरम्यान, यात्रेच्या मार्गावर येणारी मुस्लिम मालकांची सर्व हॉटेल्स बंद करण्यात आली होती. यामध्ये अशा शाकाहारी हॉटेल्सचाही समावेश होता जिथे जेवणात कांदा आणि लसूणही टाकले जात नव्हते.
या ढाब्यांच्या मालकांचा आरोप आहे की, गेल्या वर्षी त्यांची हॉटेल्स आणि ढाबे सुमारे 15 दिवस बंद ठेवण्यात आले होते. वास्तविक यशवीर नावाचे एक स्वामी या सगळ्या मुस्लिम हॉटेल मालकांविरुद्ध गेल्या काही वर्षांपासून मोहीम चालवत आहेत.
स्वत:ला संत म्हणवणारे स्वामी यशवीर म्हणतात, “अनेक मुस्लिमांच्या हॉटेल्सची नावे हिंदू आणि हिंदू देवतांची नावे आहेत. त्यामुळे कावड यात्रा जेव्हा या परिसरातून जाते तेव्हा अनेक भाविक हॉटेल्सच्या हिंदू नावांमुळे जेवायला जातात.

येत्या 22 जुलैपासून कावड यात्रेला सुरूवात होणार आहे आणि म्हणूनच प्रशासनाने आतापासूनच आदेश जारी केले आहेत.
- कावड मार्गावरील मटणाची आणि अंड्याची सगळी दुकाने बंद राहतील.
- कावड मार्गावरील सगळ्या दुकानांची, हॉटेल्सची आणि ढाब्यांची नावे ठळक आणि मोठ्या अक्षरात लिहिलेली असली पाहिजेत.
- हॉटेल आणि ढाब्यांच्या फलकांवर त्यांच्या मालकांची, मॅनेजरांची नावे ठळक अक्षरात लिहिली असली पाहिजेत.
मुस्लिमांनी हॉटेलची नावे हिंदू देव-देवतांच्या नावांवरून ठेवू नये
कावड यात्रेच्या पूर्वतयारीसाठी जी बैठक झाली त्यात उत्तरप्रदेशचे मंत्री कपिलदेव अग्रवाल यांनी पोलिसांना असे निर्देश दिले आहेत की कोणत्याही मुस्लिम हॉटेल चालकाने त्याच्या हॉटेलचे नाव हिंदू देव-देवतांच्या नावांवरून ठेवता कामा नये.
इतर धर्माची लोकं त्यांच्या दुकानांची, हॉटेलची नावे हिंदू देवी-देवतांच्या नावावरून ठेवू शकत नाहीत का, कायद्याने तसा गुन्हा आहे का? असा प्रश्न जेव्हा मुझफ्फरनगर शहर दंडाधिकारी विकास कश्यप यांना विचारला तेव्हा ते म्हणाले की, असा कोणताही कायदा नाही परंतू तशी नावं न ठेवणे हे अधिक चांगले!
आदिल राठौर हा कावड यात्रेचा मुख्य मार्ग असलेल्या NH-58 वर 'वेलकम टू पिकनिक पॉइंट टुरिस्ट ढाबा' चालवायचा. मात्र आता त्याने ढाबा बंद केला आहे. याचं कारण सांगताना आदिल सांगतो, "मुसलमान असल्याकारणाने माझं हॉटेल बंद करण्यात आलं. मी अगोदर हॉटेल भाड्याने घेतलं होतं. अगोदरच्या मालकाने हॉटेलचे नाव ‘ओम शिव वैष्णो’ असं ठेवलं होतं.
मी ते नाव बदलून 'वेलकम टू पिकनिक पॉइंट टुरिस्ट ढाबा' असं केलं. गेल्या वर्षी मला तब्बल दीड लाखांचे नुसकान झाले. मी तर शाकाहारी जेवणातही कांदा-लसूण टाकत नव्हतो. मात्र तरीही मला हा व्यवसाय बंद करावा लागला. आता मी गावी शेती करतो. आमच्याकडे 50 कामगार आहेत. ते सर्व हिंदू आहेत.
हवे तर CCTV तपासा, आम्ही जेवणात कांदा-लसूणही टाकत नाही, कुणाचा धर्म कसा भ्रष्ट करणार. पूर्वी माझा बिजनौर रोडवर बाबा नावाचा ढाबा होता. कोणतीही अडचण नव्हती. आमचा ढाबा बंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
गेल्या वर्षीपर्यंत NH-58 वर बाग वाली चौकात ‘पंजाबी न्यू स्टार’ शुद्ध ढाबा होता. हा ढाबा सोनू पाल आणि सादिक त्यागी भागीदारीत चालवत होते. सोनू पाल सांगतो की, पोलिस आले आणि त्यांनी सांगितले की ढाब्याच्या नावासोबत त्याच्या मालकांची नावेही लिहावी लागतील. सादिक माझा जुना मित्र आहे. परंतू प्रशासनाने गेल्या वर्षी आमचा ढाबा बंद केला आणि मला तीन लाखांचा फटका बसला.
प्रशासन मात्र या गोष्टीचा इन्कार करते. ते सांगतात की, आम्ही फक्त मांसाहारी हॉटेल आणि धाबा बंद केले होते.
स्वामी यशवीर म्हणतात, जेवणात थुंकी आणि मूत्र मिसळले जाते
मुस्लिम दुकानदारांविरुद्ध मोहीम सुरू काढणारे स्वामी यशवीर यांनी आरोप केला आहे की, हिंदू धर्म आणि देवतांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात मुस्लिम व्हेज हॉटेल्स चालवत आहेत. त्या हॉटेल्सचे कर्मचारीही मुस्लिम आहेत. त्यांना फूड जिहाद करायचा आहे. जिहादचे अनेक प्रकार आहेत. हा देखील जिहादचाच एक भाग आहे. लोक हिंदू हॉटेल समजतात, पण त्यांच्या जेवणात थुंकी आणि मूत्र मिसळले जाते.
भाज्या आणि डाळींमध्ये तडका देण्यासाठी चरबी वापरतात. भाज्यांमध्ये गोमांस टाकले जाते. हिंदूंचा धर्म भ्रष्ट करणे हा त्यांचा उद्देश आहे. तुम्ही हॉटेल चालवा पण हिंदूंच्या नावाने, देवदेवतांच्या नावाने चालवू नका, असे आमचे म्हणणे आहे. तुमचा धर्म आणि नावाने चालवा. हे मुस्लिमांचे षड्यंत्र आहे. हिंदू नावाचे हॉटेल असेल तर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही ग्राहक येतील. म्हणजे हिंदूंचा धर्म भ्रष्ट करण्याची सोयही होईल.

पण, मुस्लिम नावाचे हॉटेल असेल तर तिथे हिंदू जाणार नाहीत. त्यांना जिहाद करायचा आहे, म्हणूनच हे लोक हिंदूंच्या नावाने हॉटेल चालवत आहेत.
मात्र यशवीर यांच्या आरोपांचा इथले मुस्लिम हॉटेल व्यावसायिक तीव्र शब्दांत इन्कार करतात. वासिम सांगतो की, आपण कोणाशी वाद घालायचा आणि आपले दुःख कोणाकडे मांडायचे? शेवटी, कोणी अन्नात थुंकेल किंवा लघवी का करेल? आम्हीही हे अन्नखातो. आमच्या हॉटेलचा सगळा स्टाफ हिंदू आहे, हे असं कोणीही करणार नाही.
(सौजन्य - द क्विंट)






