ज्या शाळेत मी लहानपणी शिकले त्या शाळेला अलीकडेच जेव्हा भेट दिली तेव्हा लक्षात आलं की अनेक गोष्टी बदलल्या होत्या. ते म्हणतात ना 'Change Is The Only Constant Thing'! पण मला वाटलं काळानुसार Change हा सकारात्मक असेल तर चांगलं होतं. आमच्या वेळी आठवीपर्यंतचा शाळेचा गणवेश पांढरा शर्ट आणि हिरवा स्कर्ट असा होता.
आम्ही त्याखाली ‘लेगिन’ ही घालत असू. नववीत गेल्यानंतर पंजाबी ड्रेस सारखा ओढणी असणारा गणवेश झाला. आता शाळेत गेले तेव्हा पाहिलं की अगदी पाचवीच्या लहान मुलींना देखील ओढणीचा पंजाबी ड्रेस हाच गणवेश केलाय.
एवढ्या लहान वयात ओढणी सावरत मुली कशा खेळात भाग घेत असतील…? कसा प्रवास करत असतील…? सायकल कशा चालवत असतील…? या प्रश्नांनी मलाच अपराधी वाटायला लागलं. त्या मुलींना त्यांची आई आतापासूनच ओढणी पडू नये म्हणून पिना लावायला शिकवत असणार किंवा शाळेतील शिक्षक ओढणीची घडी कशी मोठी असायला हवी यासाठी सूचना देत असतील…
‘समाजबंध’ संस्थेच्या माध्यमातून विविध शाळेत मुलींसोबत 'आरोग्य संवाद सत्र' घेताना वयात येताना शरीरात कोणकोणते बदल होतात याची माहिती दिली जाते. हे सगळं सांगत असताना स्तनांची वाढ होते, स्नायूंना गोलाई येते, काखेत आणि जननेंद्रियांजवळ केस येतात, मासिक पाळी यायला सुरुवात होते असं मी जेव्हा शिकवताना म्हणते तेव्हा मुली लाजतात आणि शरमेने मान खाली घालतात.
सुरक्षित-असुरक्षित स्पर्श समजावून सांगताना मी स्वतःच्या छातीला स्पर्श करून प्रात्यक्षिक देते आणि 'जर कुणी असं छातीला स्पर्श करत असेल तर तो Bad/Unsafe touch म्हणजेच असुरक्षित स्पर्श असतो' असं सांगते. तेव्हा देखील 'ताई असं कसं स्वतःच्या छातीला स्पर्श करून दाखवू शकते?' असे हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर असतात.
या गोड मुलींचे निरागस चेहरे इतके बोलके असतात की लगेच समजून येतं… मुली हे शब्द ऐकल्यावर किंवा उच्चारल्यावर इतक्या का लाजतात? याच्या मुळाशी आपण गेलो तर समजतं की मुलींना स्वतःचे स्तन आणि योनी हे शरीरातील इतर अवयवांप्रमाणेच अवयव असल्याचं शिकवलं जात नाही. ते Private Parts आहेत हे त्यांच्या मनावर इतकं बिंबवलं जातं की त्या स्वतः देखील ते पहायला लाजतात. केवळ ते झाकून ठेवणं हेच प्राधान्यावर असल्यानं त्यांची काळजी कशी घ्यावी याला महत्त्व दिलं जात नाही.

अंजली जोशी या 'विरंगी मी, विमुक्त मी' या पुस्तकात म्हणतात, "आपण कधी आरशासमोर स्वतःला नग्न होऊन पाहिलं आहे का? आपले स्तन आणि योनी कशी आहे हे आपल्याला माहित आहे का? कारण हे अवयव कायम चारित्र्याचे प्रतिक समजले जात असल्याने, कुणाला दिसू नये किंवा कुणी बघू नये याचीच खबरदारी घेतली जाते. महिलांनो, तुम्ही स्वतःच्या स्तनांना शेवटचं कधी निरखून पाहिलं आहे, हे तुम्हाला आठवतं का? त्यांची काळजी घ्यावी किंवा प्रेम करावं असं कधी वाटलं का? V for Vagina हे समजण्याआधी V stands for Virginity only हे बिंबवलं जातं.
याची सुरुवात काहीशी अशी होते. शाळेच्या वयात ओढणी घेऊन जणू लाज झाकली जाते. कॉलेजच्या वयात स्तनांचे वस्तूकरण - Objectification केलं जातं. आकार केवढा आहे? उठावदार आहेत की नाहीत? यामुळेच मुलींमध्ये स्वतःच्या स्तनांवरून गोंधळ आणि पर्यायाने न्यूनगंड निर्माण होतो.
लग्न ठरलं की नवीन ‘ब्रा’ पासून बिकिनी लाईन वॅक्सपर्यंत सगळी तयारी असते. म्हणजे नवऱ्याला खुश करण्यासाठी स्त्रिया सज्ज असतात. महिला डी मार्ट, मेट्रो स्टेशन अशा ठिकाणी गेल्यावर चेकिंगसाठी पडदा असतो. पुरुषांप्रमाणेच महिलांच्याही अंगावरून मशीनच फिरवली जाते पण ती कुणाला दिसणार नाही अशा पद्धतीने. अशी वेगळी वागणूक देऊन उगाच कुतूहल चाळवायचं. थोडं मोठं झाल्यावर ‘ब्रा’चा बेल्ट दिसतोय का अशा चर्चा कानावर येत असत.
‘ब्रा’चा बेल्ट दिसल्यावर सोबतच्या मुली किंवा स्त्रिया सांगतात, ते आत टाक. अनेकदा शर्टमधून पुरुषांचं बनियनही दिसतंच की, तेव्हा मात्र कुणालाच त्याबद्दल Objection नसतं. आता ‘ब्रा’ घालते म्हणजे बेल्ट कधीतरी दिसणारच.
मुलं गर्लफ्रेंडच्या बाबतीत, नवरेमंडळी बायकांच्या बाबतीत फार दुटप्पी असतात. बाहेर जाताना नीट कपडे घाल, अंगभरून घाल, स्लीवलेस नको, नेटचा नको अशा सुचनांचं प्रमाण जास्त असतं. पण घरी असलं की त्यांच्या मागण्या बदलतात.
स्तनांचा आकार जरा असा हवा, तू टाईट कपडे घालत जा, स्लीवलेस घाल वगैरे लडीवार मागण्या... हे घालू नको म्हटलं तरी तिला वाटतं त्याचं माझ्यावर खुप प्रेम आहे म्हणून तो तसं वागतो, चिडतो. हे घाल म्हटलं तरी परत खुप प्रेम आहे म्हणून तसं म्हणतो.
लहानपणापासून म्हातारपणापर्यंत महिलेला तिच्या कपड्यांचं स्वातंत्र्यच नसतं आणि त्याहून वाईट बाब म्हणजे ते तिला कधी समजतच नाही. वेगवेगळ्या नात्यातील वेगवेगळ्या भावनांची ती मागणी आहे असं समजून ती पुरवठा करत राहते. पण ही त्या नात्याची किंवा व्यक्तीची नाही तर त्याआडून पुरुषप्रधान संस्कृतीची केवळ एका मादीकडून असणारी ही मागणी आहे, हे तिच्या व्यक्तीस्वातंत्र्यावरील बंधन आहे हे स्त्रियांनी लक्षात घ्यायला हवं. कुठे काय घालावं, याची समज महिलांना पुरुषांपेक्षा जास्त असते. आणि तसंही बाईने काय घालावं यावर बोललं जातं, पण पुरुषांनी बाईकडे कसं बघावं याविषयी कुणी बोलत नाही.
वयातही न आलेल्या मुलीपासून ते साठीपार झालेल्या आजीपर्यंत, ‘ब्रा’ घालणाऱ्या आणि न घालणाऱ्या, ‘निपल्स’ दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या सगळ्या महिलांवर अतिप्रसंग होतात. त्यामुळे ‘ब्रा’चा बेल्ट दिसतोय तो आत घाल, ओढणी किंवा पदर घे हे सतत मुलींना शिकवण्यापेक्षा पॅन्टची चेन उघडण्याआधी संमती - Consent नावाचा प्रकार असतो आणि तो गरजेचं असतो हे पुरुषांना शिकवण्याची आता गरज आहे.
आपल्याकडे पुरुषाला माणूस म्हटलं जातं आणि बाईला मात्र बाई. म्हणजे बाई ही माणूस नाही का? बाई ही देखील माणूस आहे हे समजून बाईमाणसाशी कसं वागावं हे पुरुषांनी शिकणं गरजेचं आहे. त्याचबरोबर महिलांनी ही काही शिकणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे 'माझं शरीर - माझा अधिकार!' हा मूलमंत्र.
संकलन : सचिन आशा सुभाष






