भारतात एकेकाळी गिधाडं सगळीकडे दिसायची. त्यांची संख्या 5 कोटींहून जास्त होती. पण 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात जंगलातील गिधाडांच्या संख्येत एकदम 95 टक्के इतकी प्रचंड घट झाली. आज गिधाडांच्या तीन जाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत आणि जंगलात केवळ काही हजार गिधाडच शिल्लक आहेत.
भारतात गिधाडांच्या संख्येत झालेली ही घसरण इतिहासातील कोणत्याही पक्षाच्या संख्येत आलेल्या घसरणीपेक्षा जास्त वेगवान आहे. अमेरिकेत जंगली कबुतरांच्या संख्येत आलेल्या घसरणीनंतरची ही सर्वांत मोठी घसरण आहे. गिधाडांची संख्या का रोडावली आणि त्यामुळे माणसांचं किती मोठं नुकसान होत आहे.
याविषयीचा एक अहवाल, ‘अमेरिकन इकॉनॉमिक रिव्यू’मध्ये प्रकाशित झाला आहे. यात भारतातील 340 जिल्ह्यांमधील आरोग्याची आकडेवारी तपासण्यात आली आहे. या अभ्यासात ऐतिहासिकदृष्ट्या गिधाडांची संख्या कमी असलेले जिल्हे आणि जास्त संख्या असलेल्या जिल्ह्यांत घसरण होण्याआधी आणि नंतर मानवी मृत्यू दर किती होता याची तुलना करण्यात आली. यातील निष्कर्ष हे आश्चर्यचकित करणारे आहेत.
गिधाडं नसल्यामुळे पाच वर्षांत पाच लाख माणसांचा बळी
अभ्यासानुसार 2000 ते 2005 या कालावधीत गिधाडे नसल्यामुळे या जिल्ह्यांमध्ये दरवर्षी जवळपास १ लाख माणसांची अतिरिक्त बळी गेला आहे. या अकाली मेलेल्या लोकांमुळे देशाला दरवर्षी जवळपास 69.4 अब्ज डॉलर्स इतकं नुकसान झालं आहे. ही माणसं अशा आजारांमुळे आणि जीवाणूंमुळे मेली आहेत ज्यांना गिधाडं पर्यावरणातून नष्ट करत होते.

पण त्यांच्या अभावी कुत्र्यांची संख्या वाढली आणि माणसांना रेबिजसारख्या घातक रोगांशी सामना करावा लागला. या काळात रेबिज लशी आल्या पण त्यांची संख्या पुरेशी नव्हती. कुत्रे गिधाडांप्रमाणे सडक्या अवशेषांना पूर्णपणे नष्ट करू शकत नाहीत. त्यामुळे त्यातील जीवाणू आणि विषाणू पिण्याच्या पाण्यात मिसळले. पाण्यात शौचातून येणाऱ्या जीवाणूंची संख्या दुपटीने वाढली.
हॅरिस स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीचे सहाय्यक प्राध्यापक आणि ईपीआयसी स्कॉलर, इयाल फ्रँक आणि वॉरविक विश्वविद्यालयाचे असोसिएट प्रोफेसर आणि इपिक नन-रेसिडेंट स्कॉलर, अनंत सुदर्शन यांनी हा अभ्यास केला आहे.
जिल्ह्यातील आकडेवारीची तुलना अनंत सुदर्शन यांनी केली आणि त्यांना असं आढळून आलं की गुराढोरांच्या उपचारासाठी वेदनाशामक औषधांच्या (ड्रायक्लोफेनाक) विक्रीत वाढ झाल्यानंतर आणि गिधाडांच्या संख्येत घसरण आल्यानंतर, लगेच ज्या जिल्ह्यांत आधी गिधाडांची संख्या जास्त होती तिथं मानवी मृत्यू दरांत ४ टक्के वाढ झाली. याचा थेट प्रभाव त्या शहरांमध्ये जास्त दिसून आला जिथं गुरांची संख्या जास्त होती आणि त्यांचे मृतदेह शहराबाहेर फेकले जायचे.
गिधाडांच्या संख्येत एकदम 95 टक्के घट
गिधाडांच्या मरण्याचं कारण सुरूवातीला एक रहस्यच होतं. 2004 मध्ये खरं कारण उघडकीस आलं. गिधाडांच्या अनेक प्रजाती किडनी खराब झाल्यामुळे मृत्युपंथाला लागल्या. झालं असं की गुरांवरील उपचारासाठी ड्रायक्लोफेनाक या वेदनाशामक औषधांचा वापर करण्यात येत होता. ही जनावरं मेल्यानंतर गिधाडं त्यांचं मांस खायचे आणि ड्रायक्लोफेनाक त्यांच्या शरीरात जायचं.
पण त्याची ही लहानशी मात्राही त्यांच्यासाठी जीवघेणी ठरू लागली. 1990 च्या दशकात भारतीय कंपन्यांनी ड्रायक्लोफेनाक औषधीच्या स्वस्त व जेनेरिक ब्रँड्स बाजारात आणले, ज्यामुळे गुरांच्या उपचारासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ लागला. भारतीय शेतकऱ्यांनी 1994 मध्ये पहिल्यांदाच जनावरांसाठी ड्रायक्लोफेनाक वापरायला सुरूवात केली ज्याचा उपयोग आधी फक्त माणसांसाठीच केला जायचा.
हा वापर वाढत गेला तसतशी गिधाडांच्या संख्येत वेगानं घसरण होऊ लागली. 1996 च्या एका अभ्यासात असं दिसलं की राजस्थानच्या केवलादेव राष्ट्रीय अभयारण्यात गिधाडांची घरटी 1984 च्या 353 घरट्यांच्या तुलनेत अर्ध्यावर आली होती. बाकी ठिकाणीही हीच परिस्थिती होती. भारत सरकारने शेवटी 2006 मध्ये जनावरांच्या उपचारात ड्रायक्लोफेनाक वापरायला बंदी घातली.

पण 2018 च्या अभ्यासातून आढळलं की याचा अवैध वापर त्यानंतरही सुरूच राहिला होता आणि माणसांसाठी वापरण्यात येणारे ड्रायक्लोफेनाकही जनावरांच्या इलाजासाठी वापरण्यात येत होते. त्यामुळे गिधाडांची संख्या सातत्यानं कमी होत राहिली.
गिधाडे नसल्यामुळे जनावरांच्या मृतदेहांवर कुत्री आणि उंदीर गर्दी करतात
गिधाडं एक कुशल स्वच्छता कर्मचारी म्हणून पर्यावरण स्वच्छ राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. जनावरांचे सडणारे मृतदेह साफ करण्यासाठी शेतकरी त्यांच्यावर अवलंबून राहतात. इतर कोणत्याही प्राणी किंवा पक्ष्यांपेक्षा गिधाडं मृतदेह खाण्यात वाकबगार असतात. याचं कारण त्यांच्या पोटात उच्च स्तरीय आम्लता असते जी माणसाच्या तुलनेत शंभर पट जास्त असते.
त्यामुळे ते कोणतंही सडलेलं मांस खाऊ आणि पचवू शकतात. बहुतांश जीवाणू त्यांच्यात जीवंत राहू शकत नाहीत. गिधाडांचा थवा एखाद्या मोठ्या जनावराचा मृतदेहही तासाभरात साफसूफ करून टाकतात. याच्या उलट कुत्रे किंवा उंदीर संपूर्ण मांस खाऊ शकत नाहीत. शिवाय त्यांच्यामुळे रेबिजसारखे घातक जीवाणू पसरतात ते वेगळेच. त्यामुळे गिधाडांची जागा भरू शकेल असा दुसरा सफाई कामगार निसर्गात नाही.
गिधाडांच्या अनुपस्थित शेतकऱ्यांना त्यांची मृत जनावरं पुरण्यासाठी खोल खड्डे खणावे लागतात किंवा नगर पालिकेनं खास डिझाईन केलेल्या भट्टीत त्यांना जाळावं लागतं. यात दोन्ही प्रकारात अर्थातच पैसे खर्च होतात. त्यामुळे प्रत्यक्षात शेतकरी खड्डेही खोदत नाहीत आणि नगर पालिकाही भट्टीची सोय उपलब्ध करून देत नाही.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 2020 च्या अहवालानुसार, भारतात गिधाडांना पर्याय म्हणून वीज भट्टीचा उपयोग केला जात नाही. फारच कमी शहरात अशा भट्टी आढळून येतात. दिल्लीत एक भट्टी आहे आणि चंदिगडमध्ये भट्टी स्थापण्याची प्रक्रिया सुरू होती.
या सर्व कारणांमुळे भारतात जनावरांचे मृतदेह सर्रास कुठेही टाकून दिले जातात किंवा नदीत फेकले जातात. इथे मग गिधाडे नसल्यामुळे कुत्री आणि उंदीर गर्दी करतात. पण ते गिधाडांसारखे कुशल सफाई कामगार नसल्यामुळे संसर्गजन्य रोग पसरतात ज्याची मोठी किंमत माणसांना चुकवावी लागत आहे.

या अभ्यासाचे सहलेखक इयाल फ्रँक म्हणतात, “मानवी आरोग्याच्या संदर्भात गिधाडांची भूमिका लक्षात घेता हे समजून येईल की केवळ सुंदर आणि आकर्षक प्राण्यांचीच नाही तर सर्वच प्राण्यांची संरक्षण व संवर्धनाची गरज का आहे. पर्यावरणीय चक्रात हे सर्व प्राणी मानवी जीवन प्रभावित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात.”
या गंभीर प्रश्नावर उपाय करण्यासाठी गिधाडांसारख्या पर्यावरणीय यंत्रणेला सुरक्षित ठेवणाऱ्या सर्व महत्त्वाच्या प्राणी-पक्ष्यांना संरक्षण देण्याची नितांत गरज आहे. अनंत सुदर्शन म्हणतात, “भारतात गिधाडांची संख्या कमी होणं याचं उदाहरण आहे की एखादी प्रजाती नष्ट झाली तर त्याची माणसांना किती मोठी किंमत चुकवावी लागते. यात रसायनांना दोषी ठरवण्यात आलं.
मात्र माणसाच्या करणीमुळे प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत, वन्यजीव व्यापार वाढत आहे, हवामान बदलाचे परिणाम निसर्गावर जाणवत आहेत, या सर्वांमुळे मानवी जगणेही प्रभावित होत आहे. या सर्वांची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागत आहे.
त्यामुळे नैसर्गिक साखळीतील प्रमुख प्रजातींचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल, त्यासाठी नियम बनवावे लागतील आणि साधनसंपत्ती उपलब्ध करून द्यावी लागेल.”
सौजन्य - द वायर
अनुवाद - प्रतिक पुरी






