नुकतेच संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय बाल आपात्कालीन कोषाने (युनिसेफ) मुलांच्या विरोधात होणाऱ्या लैंगिक हिंसाचारावर जागतिक आणि विभागीय अनुमान जाहीर केले. यात सांगितलंय की, जगात आजवर ३७० दशलक्षाहून जास्त स्त्रिया आणि मुली लैंगिक हिंसाचाराला बळी पडल्या आहेत. आठपैकी एक मुलगी वयाची अठरा वर्षे पूर्ण होण्याआधीच लैंगिक हिंसाचाराची शिकार होते.
आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या आधी हा अहवाल जाहिर करण्यात आला. यातील मुलांविरोधातील लैंगिक शोषणाचे आकडे भयावह परिस्थिती दर्शवतात. यातून त्यांच्यावर होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांचीही वाच्यता करण्यात आली आहे. युनिसेफच्या बाल संरक्षण विशेषज्ञ, अफ्रुज कावियानी जॉन्सन यांनी युएस न्यूजला सांगितलं की, 2010 ते 2022 दरम्यान 120 देशांमधील गोळा केलेली ही आकडेवारी आहे, जे अत्यंत गंभीर आहेत. यात लैंगिक हिंसाचाराच्या अप्रत्यक्ष पद्धती जोडल्या उदा. ऑनलाईन शोषण, वाचिक हिंसाचार, इत्यादी, तर ही संख्या ६५० दशलक्षाच्या पुढे जाऊ शकते.
या आकड्यावरून हे समजतं की लैंगिक हिंसेचे सर्व प्रकार थोपवण्यासाठी किती तातडीची प्रभावी व कार्यक्षम उपाययोजना करण्याची निकड आहे. अप्रत्यक्ष प्रकारांमध्ये शारिरीक संपर्क येत नाही. पण लैंगिक शोषण, दुर्व्यवहार, मुलांना पॉर्न दाखवणं, किंवा त्यांना लैंगिक संबंधांसाठी तयार करणं यांचा समावेश होतो. डिजीटल युगाचा विस्तार होत असतानाच या लैंगिक शोषणाचाही विस्तार वेगानं वाढत आहे. युनिसेफ म्हणतं की मुलांविरोधातील लैंगिक हिंसा ही आमच्या नैतिकतेवरील मोठा डाग आहे.

बहुसंख्य प्रकरणांमध्ये या मुलांना त्यांच्याकडूनच धोका होता जे त्यांच्या ओळखीचे आहेत आणि ज्यांच्यावर त्यांचा विश्वास आहे. जिथे मुलांना सुरक्षित वाटायला पाहिजे त्याच ठिकाणी अशा घटना घडतात ही त्याहून दुःखाची गोष्ट आहे. संघर्षग्रस्त देश, अस्थिर सरकार असलेले देश किंवा सामुहिक प्रवासाच्या काळात या लैंगिक हिंसाचाराची सरासरी जागतिक सरासरीच्या दुप्पट असते.
दर आठपैकी एक मुलगी अठरा वर्षांची होण्याआधीच लैंगिक हिंसेची बळी
जास्त लोकसंख्येच्या देशांमध्ये, भागांमध्ये लैंगिक हिंसाचाराच्या संख्याही जास्त आढळतात. भौगोलिक, सांस्कृतिक, आर्थिक सीमारेखा ओलांडून या हिंसाचाराने सगळीच क्षेत्रे व्यापली आहेत. एकूण लैंगिक हिंसाचाराच्या घटनेच्या 34 टक्के घटना ओशियाना भागात घडल्या आहेत. त्यानंतर आफ्रिका – 22 टक्के, दक्षिण अमेरिका व कैरेबियन – 18 टक्के, उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशिया – 15 टक्के, युरोप आणि उत्तर अमेरिका – 14 टक्के, मध्य आणि दक्षिण आशिया – 9 टक्के आणि पूर्व आणि दक्षिण-पूर्व आशिया – 8 टक्के घटना घडल्या आहेत. पण टक्केवारी फसवी असते व यातून फक्त एक बाजू समोर येते.
आकडेवारी पाहिली तर एकट्या उप-सहारा आफ्रिका भागात 79 दशलक्ष मुलींना लैंगिक हिंसेचा सामना करावा लागला आहे जी पाच पैकी एक आहे. पूर्व आणि दक्षिण-पूर्व आशियात 75 दशलक्ष, मध्य आणि दक्षिण आशियात 73 दशलक्ष, युरोप आणि उत्तर अमेरिकेत 68 दशलक्ष, दक्षिण अमेरिका व कैरीबियनमध्ये 45 दशलक्ष, उत्तर आफ्रिका व पश्चिम आशियात 29 दशलक्ष आणि ओशियानात ही संख्या 6 दशलक्ष आहे. शरणार्थी म्हणून जगणाऱ्या लोकांमध्येही मुलींना या हिंसाचाराला सामोरं जावं लागतं. इथं लहानपणीच 4 पैकी एक मुलगी या हिंसाचाराला बळी पडते. 14 ते 17 या वयादरम्यान लैंगिक हिंसाचाराच्या सर्वाधिक घटना घडतात.
लैंगिक हिंसाचारी जर पकडले गेले नाहीत तर ते पिडीत मुलांवर वारंवार अत्याचार करत राहतात. त्यामुळे हिंसाचाराची माहिती मिळताच त्यावर उपाययोजना करणं गरजेचं असतं ज्यामुळे हे चक्र तोडता येऊ शकतं. याचे नंतरचे परिणाम कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. लैंगिक हिंसाचाराचे बळी पडलेले वयस्क, पुढे लैंगिक गुप्तरोग, अंमली पदार्थांचं व्यसन, सामाजिक एकटेपणा, मानसिक रोग यांनाही बळी पडू शकतात. त्यांच्यासाठी पुन्हा लैंगिक संबंध करणं अवघड होऊन बसतं.
मुलं जेव्हा त्यांच्याविषयीचे अनुभव दीर्घकाळ लपवून बसतात किंवा उशीरा त्याविषयी बोलतात तेव्हा त्याचा आघात जास्त तीव्र असतो. तसं पाहता स्त्रिया आणि मुलींना लैंगिक हिंसाचाराचा जास्त सामना करावा लागतो आणि त्यांची माहिती अधिक विस्तृतपणे संकलितही होते. पण, पुरुष आणि मुलांनाही याचा सामना करावा लागतो असं दिसून आलं आहे. 240 ते 310 दशलक्ष पुरुष व मुले, किंवा 11 पैका 1 जण या हिंसाचाराला बळी पडलेले असतात. आणि ऑनलाईन माध्यमामुळे ही संख्या 410 ते 530 दशलक्षापर्यंत पोहोचते.

काय करावं लागेल?
या अहवालावरून एक गोष्ट स्पष्ट होते की लैंगिक हिंसाचार थोपवण्यासाठी आणि मुलांना सुरक्षित जगणं देण्यासाठी जागतिक स्तरावर तातडीची उपाययोजना करणं गरजेचं आहे. यात लैंगिक हिंसाचार वाढवणाऱ्या सामाजिक व सांस्कृतिक प्रथांना आव्हान देणं, मुलांना वयात येताच योग्य ते लैंगिक शिक्षण व माहिती देणं, ज्यामुळे ते लैंगिक हिंसाचार ओळखू शकतील आणि त्याविषयी सांगू शकतील, असे उपाय येतील.
त्याचबरोबर, हे देखील सुनिश्चित करणं गरजेचं आहे की हिंसाग्रस्त मुलांना योग्य उपचार, समुपदेशन मिळेल, त्यांना न्याय मिळेल ज्यामुळे भविष्यात त्यांना अशा गोष्टींना सामोरं जावं लागणार नाही. अहवालात हेही म्हटलंय की, लैंगिक हिंसाचाराला थोपवण्यासाठी कठोर कायदे आणि धोरणं राबवावित आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात यावी. अशा घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी, त्यांची नोंद करण्यासाठी देखरेखीच्या यंत्रणा प्रभावी करणे आणि त्याची जबाबदारी संबंधितांवर टाकणे.
युनिसेफच्या या अहवालातून लैंगिक हिंसाचाराचा दीर्घकालीन काळा चेहरा बाहेर आला आहे. यातून हे स्पष्ट होतं की हा हिंसाचार रोखण्यासाठी जागतिक पातळीवर एकत्र येऊन उपाय करण्याची गरज आहे. शिवाय सामाजिक, सांस्कृतिक, कायदे व्यवस्था सुधारण्याचीही गरज आहे. यासाठी गांभीर्याने प्रयत्न केले गेले तरच मुलांचं भविष्य आपल्याला सुरक्षित ठेवता येऊ शकेल.






