- शुभम सोळसकर
भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मढी येथील वार्षिक यात्रेला प्रारंभ, काही दिवसांत नुकताच होईल. या पार्श्वभूमीवर मात्र कधी नव्हे असा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. मढी येथील सरपंच व कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष असलेल्या संजय मरकड यांनी आयोजित केलेल्या ग्रामसभेत एक ठराव पारित करण्यात आला आहे.
या ठरावानुसार, मढी येथे सुरू होणाऱ्या यात्रेत 'विशिष्ट समाजाच्या (मुस्लिम समाज)' लोकांना व्यवसाय करण्यास बंदी घातलेली आहे. या निर्णयाचा सर्वच स्तरातून विरोध होत असून याविरोधात व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.
हा निर्णय कशासाठी घेण्यात आला आहे?
संजय मरकड यांनी आयोजित केलेल्या ग्रामसभेने, ठरावाच्या प्रतीमध्ये असे नमूद केले आहे की, येथील प्रथांचे मुस्लिम व्यापारी पालन करत नाहीत म्हणून असा निर्णय घेण्यात आला आहे. ठरावात नमूद केल्यानुसार,
"मढी यात्रेत 700 वर्षांपासून चालत आलेल्या यात्रा काळामध्ये श्री कानिफनाथ महाराज यांच्या समाधीला तेल लावले जाते. या काळात खाट, बाज, पलंग यावर न बसणे, तेलकट पदार्थ न तळणे, कुठलाही आनंदोत्सव न करणे अशा प्रकारचा धार्मिक रितीरिवाज आहे. त्यानुसार रूढीपरंपरा सर्व ग्रामस्थांकडून पाळल्या जातात. परंतु काही समाजाकडून (मुस्लिम) रूढी परंपरा खंडित केल्या जातात."
ठरावात हे नमूद केले आहे.परंतु माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत मरकड यांचा हेतू स्पष्ट होतो. माध्यमांशी बोलताना मरकड म्हणतात की, प्रयागराजमध्ये जसे मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी आहे तसेच इथे बंदी घालण्यात आली आहे. यापुढे बोलताना ते म्हणतात की, "जो माणूस कुंकू लावत नाही त्यानं आम्हाला कुंकू विकावं एवढी दुर्भाग्याची गोष्ट हिंदू धर्मासाठी कुठली नाही." म्हणजे एकीकडे ठरावात कारण देताना परंपरा पाळत नाहीत असे म्हणायचे तर दुसरीकडे त्यांचा मुस्लिम द्वेष स्पष्ट दिसून येतो.
ठराव कायदेशीर की बेकायदेशीर?
यासंदर्भात मढी येथे दिनांक 22-2-2025 रोजी सरपंच आणि ग्रामसभा अधिकारी यांच्या सहीने एक ठराव प्रसिद्ध करण्यात आला. यात्रांमध्ये सार्वजनिक ठिकाणी ग्रामपंचायतीला नियमित शुल्क भरून व्यवसाय करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. त्याबाबत धर्म अथवा जातीच्या आधारे भेदभाव करणे बेकायदेशीर आहे.तसेच भटक्या विमुक्त समाजातील भाविक कानिफनाथाला तिखटाचा नैवेद्य दाखवतात.यासाठी पशुबळी दिले जातात.
या प्रथेला देखील विरोध करण्यात आला होता मात्र भटक्या विमुक्त समाजाच्या संघटनांनी त्याविरुद्ध आवाज उठवला व यावरील बंदी उठवण्यात आली. कानिफनाथ हे संपूर्ण भारतातील भटक्या विमुक्त समाजांचे श्रद्धास्थान आहे. त्याचप्रमाणे कानिफनाथ यांनी आपल्या जीवनकाळात काही वर्षे सुफी संप्रदायाशी जोडून घेतले होते, त्यामुळे परंपरेने कानिफनाथ देवस्थान हे सुफी मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान आहे. तसेच नाथपरंपरेतील कानिफनाथ हे हिंदू धर्मियांचेही महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. 
या ठिकाणी रंगपंचमी नंतर पंधरा दिवस वार्षिक यात्रा भरते. यावेळेस तिन्ही समाजाचे भक्त मोठ्या संख्येने या देवस्थानाला येतात आणि आपली श्रद्धा भक्ती करत असतात. मुख्य म्हणजे याविषयी ऐतिहासिक ठोस कागदपत्रे आणि भटके विमुक्त समाज, मुस्लिम आणि हिंदू यांना ब्रिटिशपूर्वकाळापासून देवस्थानाचे हक्क परंपरागत हक्क म्हणून देण्यात आलेले आहेत. हे हक्क ब्रिटिश काळात सुद्धा सुरू राहिले.
त्याविषयीची अधिकृत सनद उपलब्ध आहे. या देवस्थानाशी संबंधित परंपरागत अधिकारात या तिन्ही समाजांना आपले हक्क बजावण्यासाठी प्रत्येकी 60 एकर इतकी जमीन इनाम देण्यात आली आहे. तसेच कानिफनाथ देवस्थानाची स्वतंत्र साठ एकर जमीन आहे. याविषयीच्या सविस्तर कागदपत्रे नोंदी आहेत. त्याचबरोबर या तिन्ही समाजांनी बजावयाची देवस्थान सेवा संबंधी परंपरा प्रस्थापित आहेत.
मढीची बहुढंगी परंपरा
मढी येथील यात्रा गेली कित्येक वर्षे भरत आहे. इथे भटक्या विमुक्त समाजाच्या भाविकांसोबत, सर्व जाती धर्माचे भाविक येत असतात. इथे आज कानिफनाथांच्या समाधीवर जे मंदिर दिसत आहे ते महाराणी येसूबाईंनी बांधलंय. शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेत असताना सुटकेसाठी त्यांनी कानिफनाथांना नवस बोलला होता. या मंदिराच्या बांधकामामध्ये भटक्या समाजांचा मोठा सहभाग होता.
गोपाळ समाजाने मंदिरासाठी मोठमोठे दगड वाहून आणले, घिसाडी समाजाने लोखंडी काम केलं, बेलदार समाजाने नक्षीकाम केलं, कोल्हाटी समाजाने उंच बुरूज बांधण्यास मदत केली, कैकाडी समाजाने बांबूच्या टोपल्या तयार केल्या. अशाच प्रकारे वैदू, गारुडी, लमाण, भिल्ल, जोशी, वडारी अशा अठरापगड जमातींनी आपापला सहभाग देऊन या मंदिराचं बांधकाम केलं. मंदिराच्या बांधकामानंतर इथे यात्रा भरण्यास सुरुवात झाली. या यात्रेत भटक्या समाजांना त्यांनी मंदिर बांधण्यास केलेल्या मदतीनुसार मानपान लाभले.
यात गोपाळ समाजाला होळी पेटवण्याचा मान मिळाला, तर कैकाडी समाजाला मानाच्या काठ्या मिरवण्याचा व सर्वांत आधी समाधी मंदिराच्या कळसाला काठी टेकवण्याचा मान मिळाला. म्हणूनच बहुधा या स्थानाची ‘भटक्यांची पंढरी’ म्हणून ओळख झाली असावी. इथे हिंदूंसाठी असलेले ‘कानिफनाथ’ मुस्लिमांसाठी ‘जानपीर’ आहेत. दोन्ही समुदायांचे लोक इथे मानाच्या काठ्या घेऊन येतात. आणि याहूनही विशेष म्हणजे कानिफनाथांचा जयजयकार करत इथे एकवटणा-या जाती-जमाती.
मढी म्हणजे व्यावसायिकांसाठी पोट भरण्याची संधी
या ठिकाणी लागणाऱ्या दुकानांमध्ये लोकांची गर्दी होते. खेळणी, जोडे-चपला, बॅग्ज, कपडे, बांगड्या, भांडीकुंडी, पुस्तकं, कॅसेट वगैरेंची ही दुकानं असतात. याशिवाय शाकाहारी-मांसाहारी खानावळी, पान टप-या, कोल्ड्रिंक्सचे ठिय्ये असतात. सर्वसाधारणपणे कोणत्याही ग्रामीण यात्रेत आढळतात अशी दुकानं-पालं इथेही असतात. मढीच्या यात्रेत भटक्या समाजांचे लोक पालं ठोकून आपापले पारंपरिक व्यवसाय करतात. वैदूंच्या काही पथा-या दिसतात.
त्यावर काही जडी-बूटी मांडलेल्या असतात, घिसाडी समाजाच्या एक-दोन पथा-या असतात. त्यात शेतकामाची लोखंडी औजारं, कानिफनाथांचे चिमटे, त्रिशूळ वगैरे विक्रीस ठेवलेल्या असतात. तिथेही लोकांची गर्दी असते. अधूनमधून शहरात दिसणारे वासुदेव व पोतराजही इथे दिसत असतात.
अशा या बहुढंगी, बहुरंगी व जातीय धार्मिक सौहार्दाच्या परंपरेला गालबोट लावण्याचा निर्णय काही समाजकंटकांच्या ठरावामुळे होत असेल तर ही चिंतेची बाब आहे असे समजून काही संस्था, संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. लवकरच यावर तोडगा निघेल व मढीची यात्रा यावर्षी देखील उत्साहात संपन्न होईल ही अपेक्षा.






