सबंध भारतभरातील प्रतिष्ठित अशा देवस्थानांमध्ये ड्रेसकोड लागू करण्याचा मंदिर व्यवस्थापनांचा मुद्दा अलीकडे चांगलाच गाजत आहे. मग ते सिद्धी विनायक असो, जग्गनाथ पुरी असो वा शबरीमला… भक्तांचा पेहराव हा पावित्र्य राखणारा असावा यासंबंधी अनेक मंदिर व्यवस्थापनांनी ड्रेसकोड लागू केले आहेत आणि तेही विशेषत: महिलांसाठी. मात्र केरळमध्ये सध्या मंदिरात येणाऱ्या पुरुषांच्या पेहरावावरून वादंग सुरू आहे.
केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून एका विषयावर जोरदार चर्चा सुरू आहे. केरळमधील अनेक जुन्या देवस्थानांमध्ये पुरुष भाविकांनी शर्ट न घालता उघड्या अंगाने मंदिरात जाण्याची सक्ती आहे. शर्ट घातला असेल तर त्या व्यक्तीला मंदिरात प्रवेश करता येत नाही. वाद नेमका याच गोष्टीवरून सुरू आहे.
ही प्रथा आता सोडावी आणि पुरुषांवर शर्ट काढण्याची सक्ती करू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे.. केरळमधील प्रसिद्ध शिवगिरी मठाच्या प्रमुखांनी उघड्या अंगाने मंदिरात प्रवेश करण्याची ही प्रथा अत्यंत घृणास्पद असल्याचे सांगून ही वाईट प्रथा बंद करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या आवाहनाचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीदेखील समर्थन केले आहे.
मंदिरात प्रवेश करताना पुरुषांवर शर्ट काढण्याची सक्ती करू नये
शिवगिरी तीर्थयात्रेच्या उद्घाटनप्रसंगी समाजसुधारक श्रीनारायण गुरु यांनी स्थापन केलेल्या मठाचे अध्यक्ष स्वामी सच्चिदानंद यांनी सांगितले की, ” पुनूल (जानवं) दिसावं म्हणून ही प्रथा सुरू करण्यात आली होती आणि आजही ती मंदिरांमध्ये सुरु आहे. स्वामी म्हणाले की, श्री नारायण सोसायटीला ही प्रथा बंद करायची आहे. “ही एक वाईट प्रथा आहे यात शंका नाही. श्रीनारायण मंदिरांमध्ये ही प्रथा अस्तित्त्वात नाही. योग्य वेळी बदल करणे आवश्यक आहे.”
मुख्यमंत्री विजयन यांनी या मागणीचे समर्थन करताना, हा एक मोठा सामाजिक बदल असू शकतो आणि अनेक मंदिरे त्याचे आशेने पालन करतील. काळानुसार अनेक प्रथा बदलल्या आहेत. श्रीनारायण चळवळीशी संबंधित मंदिरांनी तो बदल स्वीकारला आहे. मला आशा आहे की, इतर प्रार्थनास्थळे देखील या बदलाचे अनुसरण करतील,” अशी भूमिका घेतली आहे. केरळ भाजप आणि नायर सेवा सोसायटीने मात्र मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा निषेध केला असून हिंदूंना एकजूट राहण्याचे आवाहन केले आहे.
जानवं दिसावं म्हणून सुरू असलेली ही प्रथा बंद करावी
एक धार्मिक प्रमुख आणि एक राजकीय प्रमुख अशा दोघांनी शर्टसक्ती विरोधात भूमिका घेतल्यामुळे हा विषय एकदम चर्चेत आला. बदलत्या काळाप्रमाणे जुन्या प्रथा सोडून द्यायला हव्यात असं मत मांडत असतानाच काही मंदिरांमध्ये पुरुषांना पँटवर धोतर गुंडाळायला लावण्याची आणि स्त्रियांना सलवार कमीजवर साडी नेसायला लावण्याची सक्ती केली जाते तीही नाकारायला हवी, असं मत सच्चिदानंदांनी व्यक्त केलं.
पूर्वीच्या काळी तथाकथित निम्न जातींना मंदिरात येण्यापासून मज्जाव करण्यासाठी पुरुषांनी उघड्या अंगाने आणण्याची सक्ती करण्यात आली होती. ब्राह्मण पुरुष जानवं घालत असल्याने आणि इतरांना तसा अधिकार नसल्याने त्यांच्यात भेद करण्यासाठी ही युक्ती शोधून काढली होती, असा सच्चिदानंद यांचा दावा आहे. आता जातीच्या आधारे कुणालाही मंदिर प्रवेश नाकारता येत नसल्याने या प्रथेचा पुराणमतवाद्यांना काही उपयोग नाही, असं त्यांचं म्हणणं.
मात्र केरळमधील नायर या दुसऱ्या मोठ्या समाजाच्या नायर सर्विस सोसायटीने त्याला विरोध केला आहे. त्यांच्या पाठीशी इतरही काही घटक गोळा होत आहेत. उघड्या अंगाने दर्शन घेण्याचा जानव्याशी आणि जातिभेदाशी काही संबंध नाही. वरिष्ठ, वयोवृद्ध, ज्येष्ठ आणि देवासमोर समोर उघड्या अंगाने लीन होण्याची पूर्वापार पद्धत आहे.
या पद्धतीचा भाग म्हणून पूर्वीचे राजे रजवाडेही देवालयात मूर्तीसमोर उघड्या अंगाने जात. देव सर्वोच्च आहे ही त्यामागची भावना होती, असं या मंडळींचं म्हणणं आहे. शिवाय आपल्या प्रथांचं पालन करण्या-न करण्याचा अधिकार भाविकांकडे असावा; राजकारण्यांनी किंवा इतरांनी त्यात हस्तक्षेप करू नये, अशी या गटाची भूमिका आहे.
गर्भगृहात प्रवेश करण्यापूर्वी केरळ राज्यातील सर्व मंदिरे पुरुषांना शर्ट काढण्यास सांगत नाहीत. परंतु, तिरुवनंतपुरममधील श्री पद्मनाभस्वामी मंदिर, त्रिशूरमधील गुरुवायूर श्री कृष्ण मंदिर आणि कोट्टायममधील एट्टुमनूर महादेव मंदिर यासारख्या काही प्रमुख मंदिरांमध्ये या प्रथेचे कठोर पालन केले जाते. पद्मनाभस्वामी मंदिरात महिलांनी साडी किंवा स्कर्ट (परकर) घालणे आवश्यक असते किंवा त्यांच्या शरीराचा खालचा अर्धा भाग धोतराने गुंडाळावा लागतो.
केरळ राज्यात प्रबोधन आणि सुधारणांचा मोठा वारसा आहे आणि कम्युनिस्टांमुळे निधर्मी विचारांचाही प्रभाव आहे; पण तरीही मुळात तो समाज कमालीचा धार्मिक आणि देवभोळा आहे, हेही खरं आहे. चर्च आणि मशिदींप्रमाणे इकडे मंदिरांचं आणि प्राचीन देवस्थानांचं प्रस्थ मोठं आहे. यातील बहुतेक मंदिरांमध्ये जुन्या-पुराण्या प्रथा अजूनही चालू आहेत. पुरुष भाविकांना शर्ट काढून दर्शन घ्यावं लागण्याची सक्ती त्यातील एक.
कोणी सुरू केली ही चळवळ?
केरळमध्ये नारायण गुरू नावाचे मोठे बंडखोर समाज सुधारक होऊन गेले. ते ज्या इळावा समाजाचे होते तो समाज शूद्र समजल्या जाणाऱ्या वर्णातला होता. पण त्यांना अन्य समाज अतिशूद्रांसारखी अस्पृश्यतेची वागणूक देत होता. पूर्वीच्या काळी दलितांवर जी कामं करण्याची सक्ती केली जात असे, तशी सक्ती या समाजावर कधी केली गेली नाही, तरीही हा समाज अस्पृश्य मानला गेला. त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला गेला. या आणि अन्य अन्यायांविरोधात नारायण गुरू यांनी बंड केलं आणि सर्व जातिधर्मांना मुक्त प्रवेश देणारी पर्यायी मंदिर चळवळ उभारली. शाळा काढल्या. नाकारलेल्यांना ज्ञानाचे दरवाजे खुले केले.
नारायण गुरुंनी स्थापन केलेल्या मंदिरं आणि संस्थांमध्ये नंतरही समाज सुधारणेची कास धरून ठेवली गेली. हल्लीच श्री नारायण गुरू धर्म संघम ट्रस्टचे धार्मिक प्रमुख स्वामी सच्चिदानंद यांनी एका जाहीर कार्यक्रमात शर्ट-सक्ती प्रकरणाबद्दल आपलं मत व्यक्त केलं. ही प्रथा सोडून दिली पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन हेही उपस्थित होते. त्यांनीही या भूमिकेला पाठिंबा दिला आणि सच्चिदानंद यांचं म्हणणं नारायण गुरू यांच्या शिकवणुकीला धरून आहे, असं म्हटलं.






