काही वर्षांपूर्वीची गोष्ट… स्थळ : सोलापूरच्या भागवत थिएटर्समधील ’चित्रमंदीर’ हे चित्रपटगृह! आणि अवघे 40 रुपये बाल्कनीचे तिकीट असताना पिटातले तिकीट काढून बसलेला मी.
टायटल्स संपतात, चित्रपटाला सुरुवात होते. पिटातल्या त्या प्रेक्षकांमध्ये (माझ्यासकट) प्रचंड चलबिचल.

कधी येणार बे त्येनं? च्यायला मुंग्या आल्या बुडाला? (चित्रपट सुरू होऊन पाच मिनीटेही झालेली नसतात). तेवढ्या एक पिवळ्या रंगाची मेटॅडोरवजा स्कुल बस पडद्यावर दिसते. एका जुनाट घराच्या अंगणात ही स्कुलबस थांबते आणि त्यातून ड्रायव्हरच्या वेशातला, थकल्यासारखा वाटणारा, चेहर्यावर प्रचंड सुरकुत्या बाळगणारा एक म्हातारा खाली उतरतो आणि पब्लिक जल्लोश करतं…
“आला बघ..चित्ता !”
दुसर्याच क्षणी पडद्यावर चिल्लर उधळली जाते, कुणीतरी त्यातल्या त्यात पैसेवाला माणुस दोनच्या, पाचच्या नोटासुद्धा उधळुन देतो. कदाचित त्याने गेल्या आठवडाभराच्या बुट पॉलीशच्या पैश्यातून त्या बाजुला काढून ठेवलेल्या असतात. सगळीकडे शिट्ट्यांचा गजर चालु असतो. सगळा संकोच बाजूला ठेवून मीही एक शिट्टी त्या गजरात मोकळेपणाने वाजवून टाकतो.
चित्रपट होता ‘गोलमाल-3’ ! चित्रपटात इतरही तगडे हिरो असताना एका म्हातार्याचे असे स्वागत आमच्या सोलापूरातच होवू शकते.आणि तो चित्ता म्हणजे…, आता सांगायलाच हवं का? तरीही सांगतो… “अय स्साला..कोई शक?”
मला मिथुन चक्रवर्ती नामक या महामानवाचं व्यसन कधी लागलं ते आता नक्की आठवत नाही. पण ज्या वयात चित्रपटात घडतं ते सगळं खरंच असतं असं वाटायचं तेव्हापासून ते आजच्या वयात अगदी ‘नाना’सुद्धा फारच भडक अभिनय करतो ना असं वाटायच्या दिवसातदेखील माझं हे व्यसन कमी झालेलं नाहीये. मुळात ज्या वयात ते लागलं त्यावेळी इतर कुठली व्यसनं नव्हती अगदी कवितेचंही नव्हतं. कदाचित त्यामुळे त्या वेळी त्या एकाच व्यसनावर लक्ष जास्त केंद्रीत झालं असावं आणि मग हळु हळु ते रक्तात भिनत गेलं. पुढे या व्यसनाचं रुपांतर भक्तीत होत गेलं आणि ते अधिकच पक्कं झालं.
(मृगया चित्रपटातून पदार्पण)
“बाबु मोशाय, जिंदगी बडी होनी चाहीये, लंबी नही” म्हणत वेड लावणार्या राजेश खन्नाच्या प्रेमात पडण्याचे ते दिवस होते. हळु हळु अमिताभ बच्चन नावाच्या सुपरस्टारभोवतीही आमच्या सार्या इच्छा-आकांक्षा, सारी स्वप्ने घोळका करुन उभी राहायची. तशातच एक दिवस टिव्ही वर “हम पांच” पाहण्यात आला. महाभारताचं कथानक घेवून सद्यस्थितीवर भाष्य करणारा ‘बापु’चा हा चित्रपट ! गेलो होतो संजीव कुमारला बघण्यासाठी म्हणून. जेव्हा परत आलो तेव्हा डोक्यात पक्की जागा करुन बसले होते ते अमरिश पुरी आणि अर्थातच ’भीमा’ उर्फ़ मिथुन चक्रवर्ती.
'गरीबांचा अमिताभ' हा शिक्का कायम बसला
अमिताभ ओळखला जातो तो त्याच्या डोळ्यातल्या अंगारासाठी ! ज्या कुणी ’हम पांच’ बघीतला असेल त्याला जाणवले असेल की ’हम पांच’ने अमिताभच्या डोळ्यातल्या प्रखर अंगाराला एक सशक्त पर्याय सुचवला होता. कदाचित मिथुन चक्रवर्ती या माणसाच्या प्रेमात पडायला तेव्हाच सुरूवात झाली असावी. मी तर म्हणेन भारतात जसे हिंदु, मुस्लीम किंवा इतरही इजम (Ism) आहेत, तसेच एक 'मिथुनिज्म' सुद्धा आहे आणि या धर्माचे लोक भारतातल्या प्रत्येक धर्मात आहेत.

('हम पाच', मधील 'भीमा'च्या भूमिकेने लक्ष वेधले)
या आधी मिथुनदांनी बोटावर मोजण्याइतके चित्रपट केलेले होते. पण 1979 साली आलेले ‘सुरक्षा’ आणि थोडा फार चाललेला 'तराना' सोडला, तर मिथुनदांवर फ्लॉप हिरोचाच शिक्का लागलेला होता. पण 'हम पांच' जोरात चालला आणि 'मिथुन चक्रवर्ती' नामक 'गरीबांच्या अमिताभचा' जन्म झाला. त्यानंतर आलेले टॅक्सी चोर, उन्नीस-बीस, वारदात, साहस , सितारा वगैरे चित्रपट पुन्हा अपयशीच ठरले.
त्या कालावधीतला अपयशी ठरलेला पण तरीही उल्लेखनीय ठरलेला मिथुनदांचा एक चित्रपट म्हणजे ' द नक्षलाईट्स' ! नक्षलवादाच्या वास्तवावर भाष्य करणारा, प्रभुजींच्या सुरुवातीच्या वैयक्तीक आयुष्याशी निगडीत असलेला हा चित्रपट, कै. स्मिता आणि मिथुनदा असुनही अपयशीच ठरला.
आय एम अ डिस्को डान्सर…
त्यानंतर 1982 साली 'डिस्को डान्सर' चित्रपटगृहांमधून झळकला आणि मग मिथुनदांचे युग सुरू झाले. एकीकडे अमिताभसारखा जबरदस्त ताकदीचा कलावंत, तरुणाईला भुरळ घालत असताना, त्यांच्या साम्राज्याला तडा देण्याचे काम डिस्को डान्सरपासून सुरु झालेल्या मिथुनयुगाने केले. त्या काळात मिथुनदांचे अनेक चित्रपट गाजले पण त्यातल्या त्यात भक्त मंडळीच्या मुखात हरिनामासारखे वसणारे चित्रपट म्हणजे... प्यार का मंदिर, प्यार झुकता नहीं, सुरक्षा (आणि प्रभुजींचे सर्व गन मास्टर जी. नाइन सिरीजचे चित्रपट), डिस्को डांसर, , कसम पैदा करने वालेकी... , प्रेम प्रतिज्ञा, अग्निपथ, आणि अर्थातच गुंडा!

(तरुणाईच्या गळ्यातला ताईत - आय एम अ डिस्को डान्सर…)
दुर्दैवाने 'पहिल्यापासूनच' मारधाडपटांचीच मोठी रांग असल्याने हिंदी चित्रसृष्टीने आपोआपच मिथुनदाला 'बी'ग्रेड अॅक्टर च्या कॅटेगरीत उभे केले होते. हा खरे तर मिथुनदासारख्या अष्टपैलू कलावंतावर खुप मोठा अन्याय होता. या शिक्क्यामुळे त्याला चित्रपटही तसेच मिळाले. पण त्यातही मिथुनदांनी अनेक हिट दिले. या कालावधीत मिथुनदांनी जवळजवळ सर्व प्रकारच्या भूमिका केल्या.
डिस्को डान्सरमधला डान्सचे प्रचंड वेड असलेला आणि सुडाने पेटलेला नायक रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. डिस्को डान्सरने मिथुनदांना नाव, ग्लॅमर आणि पैसा या तिन्ही गोष्टी मिळवून दिल्या. त्यानंतर मग रीघच लागली....
तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार
पण नेहमी एक बी ग्रेड आर्टीस्ट म्हणून हिणवल्या गेलेल्या या मनस्वी कलावंताला तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. 1977 साली ’मृगया’, 1993 साली ’तहादेर कथा’ (सर्वोत्कृष्ट अभिनेता-राष्ट्रीय पुरस्कार) आणि 1996 साली ’स्वामी विवेकानंद’मधील "रामकृष्ण परमहंसांच्या’ भूमिकेसाठी सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार. मृगयाचा 'घिनुआ' असो, तहादेर कथाचा 'शिबनाथ' असो वा स्वामी विवेकानंदमधली 'श्री रामकृष्ण परमहंसांची' भूमिका असो. मिथुनदा त्या भूमिका अक्षरश: जगले होते.
आपल्या कारकिर्दीत मिथुनदांनी अनेक पुरस्कार मिळवले. बॉलीवूड, बंगाली सिनेमा तसेच भोजपूरी सिनेमातही त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले. पण बॉलीवूडने मात्र त्यांच्यातल्या अस्सल कलावंताला, त्यांच्या खर्या क्षमतेला खुपच कमी आणि अभावानेच वाव दिला असा माझा आरोप आहे.

(राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना मिथुनदा)
ऐशीचं दशक खर्या अर्थाने गाजवलं ते मिथुनदांनी. 'आय एम ए डिस्को डान्सर' किंवा 'जिमी जिमी ..आजा आजा' किंवा 'याद आ रहा है.... तेरा प्यार' म्हणत सगळी तरुणाई आपल्या तालावर नाचवत मिथुनदांची क्रेझ थेट चीन, रशीयापर्यंत जावून पोहोचली. तो काळ नि:संशयपणे मिथुनचा होता. अगदी अमिताभ सारख्या महानायकाचे चित्रपट बरोबर असताना देखील मिथुनदाचे चित्रपट 100% गर्दी खेचायचेच.
काळा-सावळ्या रंगाचा, उंच, सडपातळ पण पिळदार बांध्याचा, गर्दीत सहजपणे सामान्य म्हणून खपून जाईल असा हा बिनचेहर्याचा कलाकार, दोन वेळच्या भाकरीसाठी दिवस दिवस राबणार्या सामान्य जनांना आपला वाटला नसता तरच नवल. त्या काळातही जेव्हा या देशातील तरुणाईवर ’अमिताभ बच्चन’ या नावाचं प्रचंड गारुड होतं तेव्हादेखील मिथुनदाने स्वतःचं असं एक समांतर साम्राज्य उभं केलं होतं. अगदी 'अग्नीपथ' मध्ये जेव्हा मिथुनदा बच्चनसमोर उभा राहीला तेव्हा देखील प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची, आपल्या ताकदीची दखल घ्यायला भाग पाडून गेला.
'आय्यम कृष्णन अय्यर एम्मे नारियलपानीवाला'
डिस्को डान्सर यायच्या आधी मिथुनदांचा गाजलेला एकमेव चित्रपट म्हणजे गनमॅन (जी-9) सिरीजचा ‘सुरक्षा’. पुढे काही वर्षानंतर आमच्या या देशी गनमॅनचं महत्व कमी व्हायला लागलं, त्यांना कामे मिळेनाशी झाली. कारण तोपयंत इंडस्ट्रीत अनेक कोवळी पोरं येऊन दाखल झाली होती. प्रेमकथांचा दौर सुरु झाला होता. मग मिथुनपटांची संख्या कमी होत गेली. तसे चित्रपट येत होते, पण हे सरसकट मिथुनपटच होते.
रोमान्स, हाणामार्या, डिस्को, मिथुनदांची डान्सची ती सिग्नेचर स्टेप, सुडकथा. पण पब्लिक डोक्यावर घेत होतं. नाही म्हणायला अधून मधून प्रयोगही चालुच होते. "आधी स्वतःला स्थापित करा आणि मग हवे ते प्रयोग करा' हा मिथुनदाचा सिद्धांत त्यांनी स्वतःही व्यवस्थित जपला आणि सिद्ध करुन दाखवला. एकीकडे तद्दन मसालापट करत असताना हा मनस्वी कलावंत मधूनच एखादा गुलामी, प्रेमप्रतीज्ञा, शौकीन सारख्या वेगळ्या भूमिकाही करत होता.

(अग्निपथ मधील 'आय्यम कृष्णन अय्यर एम्मे नारियलपानीवाला')
'गुलामी'मधला 'जावर' असो वा प्रेमप्रतिज्ञाचा 'राजा भैय्या' या भूमिका खास मिथुनदाच्याच होत्या. अशात 1990 चा 'अग्निपथ' आला. 'आय्यम कृष्णन अय्यर एम्मे नारियलपानीवाला' म्हणत लुंगीला गाठ मारत हा कळकट वाटणारा, काळा-सावळा केरळी नारियलपानीवाला आपल्या समग्र शक्तीनिशी महानायकासमोर उभा राहीला आणि हा हा म्हणता उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचे फिल्मफेयर पटकावून गेला.
पण मिथुनदांचे मेनस्ट्रीममधले दिवस संपले होते हेच खरे. मग सुरु झाला 'बी' ग्रेड सिनेमांचा प्रवास. कधी-कधी खरोखर आश्चर्य वाटतं. कारण एकाच वेळी मिथुनदांचा समांतर प्रवास सुरू होता. एकीकडे लोहा, गुंडा, चिता, रावणराज, जल्लाद, यमराज, चांडाल असले तद्दन मारधाडपट करत असतानाच हा माणूस बंगालीत मात्र एकाहून एक सुंदर विषयांवर काम करत होता.
'2008 साली आलेला 'एक नादिर गल्पो' (A tale of a river) पिता-पुत्रीमधल्या तरल आणि कोमल नात्यावर आधारीत सुंदर चित्रपट होता. अर्थात तिथेही (बंगाली फिल्म्समध्ये) अॅक्शनपट केलेच. पण त्याबरोबर नेहमीपेक्षा वेगळ्या विषयावर असलेले त्रोयी, गौतम घोषचा गुडीया, रितुपर्णो घोषचा तितली असे सहज सुंदर चित्रपटही केले. 'तितली'मध्ये त्याने बॉलीवुडच्या सुपरस्टारची भुमिका केलेली होती. 2008 मध्ये आलेल्या 'शुकनो लंका'मध्ये आयुष्याची तीस वर्षे अभिनयक्षेत्रात संघर्ष करणार्या एका कलावंताची भुमिका होती.
तर 'लाल पहारेर कथा' मध्ये 'छाऊ'या ओरिसातील आदिवासी नृत्यप्रकाराला उर्जितावस्था आणण्यासाठी धडपडणार्या एका कलाकाराची व्यथा होती. ’शुकनो लंका’ या चित्रपटाला अगदी परदेशातील वेगवेगळ्या फिल्म फेस्टिव्हल्समध्ये परदेशी रसिकांनी अतिशय नावाजले, पण दुर्दैवाने भारतात हा चित्रपट अजुनही रिलीजच झालेला नाहीये.
2012 मध्ये रिलीज झालेला 'नोबेल चोर' हाही असाच एक अप्रतिम चित्रपट. 2004 मध्ये रविंद्रनाथ टागोर यांच्या चोरीला गेलेल्या 'नोबल पुरस्कारा'भोवती या चित्रपटाची कथा फिरते. 'आमि सुभाष बोलची' प्रमाणे ही देखील एक फँटसीच आहे. यातही मिथुनदांची सुंदर भूमिका आहे. टागोरांच्या तत्वज्ञानाचा, त्यांच्या विचारसरणीच्या वर्तमानकाळात असलेल्या महत्त्वावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.
या चित्रपटाची सोळाव्या 'लंडन फिल्म फेस्टीवल'साठी निवड झालेली आहे.अशा कित्येक सुंदर चित्रपटातून मिथुनदा आपली अभिनयाची भूक भागवत राहीले.
सुदैवाने बॉलीवुडला परत मिथुनदांची आठवण आलीय. चंदेरी पडद्यावर मिथुनदा परत झळकायला लागले आहेत. यापैकी एक टाळता न येणारा उल्लेख म्हणजे 'मणी रत्नम'चा 'गुरू'. यातली मिथुनदांची एका प्रामाणिक वृत्तपत्र संपादकाची भूमिका त्यांच्या सामर्थ्याला पुरेपुर न्याय देणारीच आहे.

(रामकृष्ण परमहंसाची भूमिका)
नक्षलवादापासून बॉलीवूडपर्यंत
पण मिथुन चक्रवर्ती या ’ सहृदय माणसाची’ ओळख इथेच संपत नाही. सतत अन्यायाविरुद्ध दंड थोपटण्याच्या ज्या वृत्तीने त्यांना नक्षलवादाच्या कुख्यात प्रांगणात नेऊन सोडले होते, त्याच वृत्तीने त्यांना चित्रपट क्षेत्रातील सामान्य कामगार वर्गावर निर्मात्यांतर्फ़े होणार्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी, त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी एक संस्था उभी करायला भाग पाडले.
मिथुनदा त्यांच्या पडद्या मागच्या कलाकारांसाठी, त्यांच्या कुटुंबियांच्या उत्कर्षासाठी केलेल्या अथक धडपडीसाठीसुद्धा ओळखले जातात. चित्रपटातल्या कामकरी किंवा ’पर डे’ वर काम करणार्या कामगारांच्या युनियन्स उभारणे आणि त्यायोगे त्यांचा मेहेनताना स्टॅण्डर्डाइझ करणे, तसेच निर्मात्यांकडून पूर्वी होत असलेली फसवणूक थांबवायला आळा घालणे याबाबतीतलंही या माणसाचं काम खूप मोठं आहे.
”फ़िल्म स्टुडीयो सेटींग्ज अँड अलाईड मझदूर युनीयन’ या चित्रपट क्षेत्रातीला कामगारांसाठी कार्य करणार्या संस्थेचे मिथुनदा चेअरपर्सन आहेत. या कामगारांना सर्व प्रकारची आर्थिक, वैद्यकीय मदत अतिशय कमी दरात उपलब्ध करून देण्याचे कार्य ही संस्था करते. संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमाला, अगदी लहान-सहान वैद्यकीय शिबिरालासुद्धा मिथुनदा स्वत: उपस्थित असतात. अशी सर्वगुणसंपन्न माणसे पुन्हा-पुन्हा जन्माला येत नाहीत....
अय स्साला... कोई शक्क?






