निसर्गाचे वरदान लाभलेल्या भंडारदरा जलाशयाचे नाव बदलण्यात आले आहे. भंडारदरा जलाशय आता “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” या नावाने ओळखले जाणार आहे. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 1926 साली भंडारदरा धरणाचे काम पूर्ण झाले. धरणाचे बांधकाम करणारा तत्कालिन ब्रिटिश अभियंता विल्सनच्या नावाने धरणाला 'विल्सन डॅम' म्हणून ओळखले जाते.
विल्सन डॅमऐवजी धरणाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नाव द्यावे या मागणीसाठी गेल्या काही वर्षांपासून येथील स्थानिक आदिवासींनी लढा दिला होता. राज्य सरकारने या धरणाचे नामकरण करण्याचा निर्णय घेतला असून नामांतराबाबतचा शासन आदेश जलसंपदा विभागाने जारी केला आहे. यामुळे आता अकोले तालुक्यातील जनतेची अनेक दिवसांची मागणी मान्य झाली आहे.
भंडारदरा धरणाला जरी आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे यांचे नाव देण्यात आले असले तरी इतिहासाने बेदखल केलेला या क्रांतिकारकाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. इंग्रजांच्या परकीय सत्तेशी प्राणपणाने लढणाऱ्या आदिवासी महादेव कोळी, भिल्ल, ठाकर या जमातीच्या बंडखोरांनी आणि त्यांच्या नायकांनी स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले आहे. राघोजी भांगरा (भांगरे) हा या परंपरेतील एक भक्कम, ताकदवान, धाडसी, रुबाबदार बंडखोर नेता होता. त्यांची तेजस्वी कारकिर्द म्हणजे रोमांचकारी घटनांची एक मोठी मालिकाच होती.
महाराष्ट्राला ललामभूत ठरलेल्या राकट, कणखर सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगेच्या कुशीतल्या देवगाव या लहानशा आदिवासीबहूल खेड्यात 8 नोव्हेंबर 1805 रोजी रामजी व रमाबाई यांच्यापोटी राघोजीचा जन्म झाला. त्या काळातील जव्हारच्या मुकणे संस्थानच्या राजूर प्रांताचे रामजी भांगरे सुभेदार होते. त्या काळात गावात शिक्षणाची सोय नसतानाही राघोजीसाठी खास घरी शिकण्याची सोय करण्यात आली होती.
लहानपणापासून राघोजीला व्यायामाची आवड होती. त्याचे शरीर सुदृढ होते. बालपणातच राघोजी धाडसी खेळ तो खेळत असे. अन्यायाची त्याला चीड होती. इतिहासाची पाने चाळताना लक्षात येते की काळाचे संदर्भ गतीने बदलत गेले. इंग्रजी सत्तेकडून जुलूम वाढले. त्याविरुद्ध राघोजी पेटून उठला. त्याने इंग्रजी सत्तेविरुद्ध दंड थोपटून बंड केले.

इंग्रजांनी घुसखोरी केल्यामुळे महादेव कोळ्यांमध्ये मोठा असंतोष
पेशवाई बुडाल्यानंतर (1818) इंग्रजांनी महादेव कोळ्यांचे सह्याद्रीतील किल्ले, घाटमाथे राखण्याचे अधिकार काढून घेतले. किल्ल्याच्या किल्लेदारांच्या जबाबदाऱ्या काढल्या. बुरुज नष्ट केले. वतनदाऱ्या काढल्या. पगार कमी केले. परंपरागत अधिकार काढून घेतल्याने स्वाभिमानी असलेल्या महादेव कोळ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. 1828 मध्ये शेतसारा वाढविण्यात आला.
सारा वसुलीमुळे गोरगरीब आदिवासींना रोख पैशाची गरज भासू लागली. ते सावकार, वाण्यांकडून भरमसाठ दराने कर्जे घेऊ लागले. कर्जाच्या मोबदल्यात सावकार जमिनी बळकावू लागले. लोक भयंकर चिडले सावकार आणि इंग्रजांविरुद्ध बंडाला त्यांनी सुरुवात केली. अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या महादेव कोळी समाजातील बंडखोर नेत्यांनी या बंडाचे नेतृत्त्व केले.
अकोले तालुक्यातील रामा किरवा याला पकडून नगर येथील तुरुंगात फाशी (1830) देण्यात आली. यातून महादेव कोळी बंडखोरांमध्ये दहशत पसरेल असे इंग्रजांना वाटत होते. रामाचा जोडीदार राघोजी भांगरे याने सरकारविरोधी बंडात सामील होऊ नये यासाठी त्याला मोठ्या नोकरीवर घेतले. परंतु नोकरीत पदोपदी होणारा अपमान आणि काटछाट यांमुळे राघोजी भयंकर चिडला. नोकरीला लाथ मारून त्याने बंडात उडी घेतली.
उत्तर पुणे व नगर जिल्ह्यात राघोजी आणि बापू भांगरे यांच्या नेतृत्वाखाली मोठा उठाव सुरु झाला. 1838 मध्ये रतनगड आणि सनगर किल्ल्याच्या परिसरात त्याने बंड उभारले. कॅप्टन मॅकिंटोशने हे बंड मोडण्यासाठी सर्व अवघड खिंडी, दऱ्या, घात, रस्ते, जंगले यांची बारीकसारीक माहिती मिळविली. बंडखोरांची गुपिते बाहेर काढली. नाकेबंदी केली. मात्र भूगोलाची नीट माहिती असल्याने गनिमी काव्याने चाली रचत बंडखोर लढत राहिले. ते नमले नाहीत. बंडाने व्यापक रूप धारण केले.
नोकरीला लाथ मारून राघोजीने बंडात उडी घेतली...
इंग्रजांनी कुमक वाढविली. गावे लुटली. मार्ग रोखून धरले. अनेक लोकांना कैद केले. दहशतीमुळे काही लोक उलटले. फंदफितुरीमुळे राघोजीचा उजवा हात समजाला जाणारा धाडसी लढवय्या बापुजी मारला गेला. राघोजीला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने त्या काळी पाच हजारांचे बक्षीस जाहीर केले. ठाणे ग्याझेटियर्सच्या जुन्या आवृत्तीत ऑक्टोबर 1843 मध्ये राघोजी मोठी टोळी घेऊन घाटावरून खाली उतरला आणि त्याने अनेक ‘दरोडे‘ घातले असा उल्लेख आहे.
वास्तविक राघोजीने गोरगरीब जनतेला छळणाऱ्या जुलमी मारवाड्यांवर छापे घातले होते. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. सामान्य लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम राघोजी करू लागल्याने त्याच्याविषयी कोणीही सरकारला माहिती देत नव्हते. ठावठिकाणा विचारायला आलेल्या पोलिसांना माहिती न दिल्याने चिडलेल्या पोलिसांनी त्यांच्या आईचे निर्दयपणे हाल केले. त्यामुळे चिडलेल्या राघोजीने कारवाया करत नगर व नाशिकमध्ये इंग्रजांना सळो को पळो करून सोडले.
त्या काळात सावकारांना सत्तेचा आसरा होता. सावकारांना ब्रिटिशांचे हस्तक समजले जाई. हाती लागलेल्या प्रत्येक सावकाराचे नाक कापले गेले. राघोजीच्या भयाने सावकार गावची गावं सोडून पळून गेले, असा उल्लेख अहमदनगर ग्याझेटियर्समध्ये सापडतो. साताऱ्याच्या पदच्युत छत्रपतींना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इंग्रजांविरुद्ध उठावाचे जे व्यापक प्रयत्न चालले होते. त्याच्याशी राघोजीचा संबंध असल्याचे सांगितले जाते.

छत्रपतींनी राघोजीला एक पत्र लिहिले होते. बंडासाठी पैसा उभारणे, समाजावर पकड ठेवणे व छळ करणाऱ्या सावकारांना धडा शिकविणे या हेतूने राघोजी खंडणी वसूल करीत असे. नोव्हेंबर 1844 ते मार्च 1845 या काळात राघोजीचे बंड शिगेला पोचले होते. बंड उभारल्यानंतर राघोजीने आपण गोरगरीब जनतेचे कैवारी असून सावकार व जुलमी इंग्रज सरकारचे वैरी आहोत, अशी भूमिकाच जाहीर केली होती. (मात्र इथल्या थोर इतिहासकारांना राघोजी भांगरे यांच्या भूमिकेत देशप्रेम दिसत नाही!)
महिलांबद्दल राघोजीला अत्यंत आदर होता. टोळीतील कुणाचेही गैरवर्तन तो खपवून घेत नसे. शौर्य व प्रामाणिक नितीमत्ता याला त्याने अध्यात्मिकतेची जोड दिली. महादेवावर त्याची अपार श्रद्धा व भक्ती होती. भीमाशंकर, वज्रेश्वरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, पंढरपूर येथे बंडाच्या काळात तो दर्शनाला गेला होता. त्याच्या गळ्यात वाघाची कातडी असलेल्या पिशवीत दोन चांदीचे ताईत असत.
त्याच्या बंडाला ईश्वरी संरक्षण आणि आशीर्वाद असल्याची त्याची स्वतःची खात्री होती. धारेराव आपल्याला लढायला बळ देतो असेही त्याचे मानणे होते. देवजी हा त्याचा प्रमुख सल्लागार आणि अध्यात्मिक गुरु होता. मे 1845 मध्ये गोळी लागून तो ठार झाला. त्यानंतर राघोजी खचला असावा. नंतरच्या काळात साधूच्या वेशात तो तीर्थयात्रा करू लागला. विठ्ठलाच्या दर्शनाला त्याने दिंडीतून जायचे ठरविले.
ईश्वरी शक्तीची तलवार, चांदीचे ताईत आणि लांब केस याची साथ त्याने सोडली. 2 जानेवारी 1848 या दिवशी इंग्रज अधिकारी लेफ्टनंट गेल याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी राघोजीला ओळखले. चंद्रभागेच्या काठी गेलच्या तुकडीने राघोजीला अटक केली. कसलाही विरोध न करता तो पोलिसांच्या स्वाधीन झाला.
"फाशी देण्यापेक्षा मला तलवारीने किंवा बंदुकीने मारा,"
साखळदंडात करकचून बांधून त्याला ठाण्यात आणले गेले. विशेष न्यायाधीशांसमोर राजद्रोहाच्या खटल्याची सुनावणी झाली. वकील न मिळाल्याने राघोजीची बाजू न मंडळी जाता एकतर्फी सुनावणी झाली. राघोजीला दोषी ठरविले गेले. त्याला फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आली. राघोजी खरा वीर पुरुष होता. बंडाच्या तीन पिढ्यांचा क्रांतिकारी इतिहास त्याला लाभला होता.
"फाशी देण्यापेक्षा मला तलवारीने किंवा बंदुकीने मारा. वीर पुरुषासारखे मरण द्या.," असे त्याने न्यायाधीशांना निक्षून सांगितले होते अशा नोंदी आहेत. स्वाभिमानी आणि लढवय्या राघोजीने व्यक्त केलेली अपेक्षा पूर्ण झाली नाही. सह्याद्रीच्या या वाघाला 2 मे 1848 रोजी ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात फासावर चढविले.
‘अनसंग हिरो‘ होता राघोजी!
लिखित इतिहासाने घनघोर उपेक्षा केलेला ‘अनसंग हिरो‘ होता राघोजी! पुणे, ठाणे, नगर, नाशिक या जिल्ह्यातील सीमावर्ती भागातल्या सह्यकड्याच्या कपारीत, बाडगीच्या माचीतल्या गुफेत राहणाऱ्या गोरगरीब आदिवासींना नाडणाऱ्या जुलमी, अत्याचारी सावकारांची नाकं छाटणाऱ्या राघोजीचा पराक्रम, त्यांचं योगदान पहिल्यांदा मराठी मुलखासमोर ठेवले ते जुन्या पिढीतील व्यासंगी आणि ख्यातकीर्त पत्रकार वरुणराज भिडे यांनी.
त्यांनी कुमार सप्तर्षी संपादक असलेल्या 'सत्याग्रही विचारधारा' या मासिकात दीर्घ लेख लिहून फार मोठे काम करून ठेवले आहे. त्यांनतरच आदिवासी संशोधक, नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, लेखक यांचे लक्ष राघोजी नामक महान क्रांतिकारकाकडे गेले.
इतिहासकारांनी राघोजीचा शौर्याची, धाडसी कारवायांची नोंद घेतली नसली तरी कळीकाळाचे भान असलेल्या आदिवासी समाजातील समकालीन आयबायांनी ओव्या, पोवाडे आणि इतर लोकगीतांमध्ये राघोजीचा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे. पांडुरंग धोंगडे यांनी या लोकगीतांचे संकलन करून फारच मोठे काम करून ठेवले आहे.

लोकसाहित्यातले संदर्भ तसेच काही लेख वाचून लेखक शांताराम गजे यांनी 'बाडगीची माची' ही कादंबरी लिहिली आहे. भाऊसाहेब नेहेरे यांनी राघोजीवर चरित्रवजा पुस्तक लिहिले आहे. ‘सह्याद्रीतील महादेव कोळी‘ या पुस्तकात संशोधक डॉ. गोविंद गारे यांनी राघोजीविषयी एक टिपण लिहिले आहे.
यातून आता कुठं आदिवासी समाजातील थोर स्वातंत्र्यसेनानी असलेल्या राघोजी भांगरे यांच्यासारख्या जननायकाचा पराक्रमी वारसा, प्रेरणादायी, क्रांतिकारी इतिहास नवीन पिढीला माहिती होऊ लागला आहे. अन्यथा 2 मे 1848 रोजी राघोजीला ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली तेव्हाच इतिहासातील एक क्रांतिकारी अध्याय संपून गेला असता.
आदिवासी क्रांतिकारकांनी दिलेल्या योगदानाची नोंद इतिहासाने घेतली नाही
राघोजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा बंडखोर वारसदार! रामा किरवा, रामजी भांगरा, उमाजी नाईक, तंट्या भिल्ल... अशा अनेक आदिवासी क्रांतिकारकांनी दिलेल्या योगदानाची नोंद इतिहासाने घेतल्याचे दिसत नाही. वासुदेव बळवंत फडके यांचा आद्य क्रांतिकारक असा उल्लेख होतो. मात्र राघोजीने इंग्रजांविरुद्ध लढा उभारला तेव्हा वासुदेव बळवंत फडके किती वर्षांचे होते? असा प्रश्न उपस्थित होतो.
राघोजीच्या इंग्रजी सत्तेविरुद्धच्या बंडानंतर सुमारे पंचवीस वर्षांनी वासुदेव बळवंत फडके यांचे बंड सुरु झाले, ही नोंद घेणे इथे विशेष महत्त्वाचे आहे. जगाचा इतिहास जेत्यांनी लिहिलेला असल्याने पराभूत झालेल्यांच्या पराक्रमाच्या गाथा शब्दबद्ध झालेल्या दिसत नाहीत. तसेच काहीसे अभिजन इतिहासकारांनी बहुजनांच्या इतिहासाबाबत, नायकांबाबत केलेले दिसते.
राघोजीच्या राजकीय बंडखोरीच्या अनेक नोंदी, पोलिस दप्तरांत, गॅझेटमध्ये आहेत. नाही असे नाही. पण त्याकडे दुर्लक्ष झाले असावे. पाठ्यपुस्तकांमध्ये राघोजी भांगरे, उमाजी नाईक, तंट्या भिल्ल अशा महान नायकांचे योगदान कधी वाचायला मिळाले नाही. खरे तर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने आदिवासी जननायकांची चरित्रमाला प्रकाशित करायला हवी.
आदिवासी समाजातील क्रांतिकारक किंवा पूर्वासुरींनी दिलेले लढे ग्रथित झालेले दिसत नाहीत. आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाचनालयातील पुस्तकांतही कोणती पुस्तकं असतात? त्यात आदिवासी लोकजीवन आणि संस्कृती किती असते? त्यामुळे मुलं आपल्या सांस्कृतिक परंपरेबाबत अनभिज्ञ राहतात.
आदिवासींना डोंगरावर गुरे चारायला इंग्रजांनी बंदी केली आणि राघोजीने त्याविरुद्ध बंड पुकारले. जंगल आमचं आहे, आम्ही आदिवासी जंगलचे राजे आहोत, तुम्ही आम्हाला रोखणारे कोण? असा खडा सवाल उपस्थित करणारा राघोजी पहिलाच असावा! राघोजीचा विलक्षण तेजस्वी जीवनपट त्याग, मातृभूमी आणि आपल्या लोकांसाठी केलेले समर्पण, अतुलनीय पराक्रम हे सारे सारे बघता त्यांच्याविषयी झालेले लेखन संशोध अपूर्ण आहे असेच वाटत राहते.
म्हणूनच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने राघोजीचा चरित्र ग्रंथ प्रकाशित करायला हवा. त्याचा आणि आदिवासी क्रांतिकारकांचा प्रेरणादायी लढा नव्या पिढीसमोर यायलाच हवा. त्यासाठी अजून संशोधन होण्याची आवश्यकता आहे. आदिवासी क्रांतिकारकांचं स्वातंत्र्य समरातील योगदान अनुल्लेखित राहता कामा नये.
(लेखक शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते आहेत)






