वस्तुस्थिती हेच ओरडून ओरडून सांगत आहे की, मानवी समुदायाने उत्पादन शक्तींचा कितीही विकास केलेला असो, वैज्ञानिक शोध लावलेले असो, तंत्रज्ञानात प्रगती साधलेली असो आणि विकसित यंत्र तयार केलेली असो, हे सर्व करूनही तो माणूसकीचा पायाभूत धडा अजून वाचू शकलेला नाही आहे.
माणूसकीचा हा धडा या तथाकथित सभ्य जगाला केवळ आदिवासीच शिकवू शकतात. बिगर-आदिवासी असलेल्या ‘तथाकथित’ सभ्य आणि आधुनिक जगाला आदिवासींकडून पहिला धडा हा शिकावा लागेल की, त्याने हा विचार नेहमीसाठी सोडून द्यावा की, माणसाने निसर्गावर विजय मिळवलेला आहे किंवा माणूस निसर्गावर विजय मिळवू शकतो किंवा माणसाने निसर्गावर विजय मिळवायला पाहिजे.
ज्याला आम्ही आधुनिक युग किंवा विज्ञान युग म्हणतो त्याची पायाभूत धारणा हीच राहिलेली आहे की, माणूस निसर्गाचे नियम समजून घेऊन निसर्गावर विजय मिळवू शकतो. या विचाराने मनुष्य जातीला त्या अवस्थेत आणून ठेवलंय जिथं तो या पृथ्वीसाठी आणि स्वतःसोबतच अन्य प्राण्यांसाठीही धोका बनला आहे. हा धोका फार दूर नाही, किंबहुना वाढतं तापमान आणि हवामान बदलाचं संकट आता संपूर्ण जगावर कोसळत आहे.
पावसाचं रौद्र रुप आणि दुष्काळाचा सामना सर्व जगाला करावा लागतो आहे. तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी वाढत आहे त्यामुळे किनाऱ्यावरील अनेक मानवी वस्त्या पाण्यात गेल्या आहेत किंवा जात आहेत. समुद्र किनारे असलेले देश संकटात सापडले आहेत. उत्पादन आणि उपभोग या आधुनिक जीवनशैलीमुळे झरे, तलाव, नद्या, आणि समुद्रही कचऱ्याने भरून वाहत आहेत.
हवा तर इतकी दूषित झाली आहे की श्वास घेणं म्हणजे मृत्युला आमंत्रण देण्यासारखं आहे. खाण्यापिण्याच्या वस्तूही प्रदूषित झाल्या आहेत. यातून वाचण्याचा धडा जगाला आदिवासींकडून शिकावा लागेल. निसर्गाविषयीची त्यांची दृष्टी आणि त्यासोबत जगण्याची त्यांची जीवनशैली शिकावी लागेल.

आदिवासींकडून शिकण्यासारखा दुसरा धडा
बिगर-आदिवासी तथाकथित आधुनिक आणि सुसंस्कृत लोकांना निसर्गाविषयी आदिवासींकडून दुसरा धडा हा शिकावा लागेल की तुम्ही निसर्गाचा अविभाज्य भाग आहात, त्याचे मालक नाही. तुम्हाला निसर्गावर विजय मिळवण्याचा विचार पूर्णपणे सोडून द्यावा लागेल.
निसर्गावर वर्चस्व मिळवण्याचा अहंकार सोडावा लागेल. जो आधुनिक सभ्य जगाची चालकशक्ती राहिलेली आहे आणि अजूनही तशीच आहे. आदिवासी समाज स्वतःला निसर्गाचा अभिन्न भाग समजतात. ते निसर्गावर विजय मिळवण्याचा विचारही करत नाहीत. निसर्गाच्या सर्जक आणि विध्वंसक शक्तींविषयी त्याला समान आदर असतो. त्यावर श्रद्धा असते. निसर्गाची तो पूजा करतो कारण त्याच्यापासूनच त्याला अन्न, वस्त्र, निवारा मिळतो.
आदिवासींकडून शिकण्यासारखा तिसरा धडा
बिगर-आदिवासी समुदाय आदिवासींकडून तिसरा धडा हा शिकू शकतात की, निसर्गाकडून तितकंच घ्या जेवढ्याची त्याला गरज आहे. कधीही निसर्गाची गरजेपेक्षा जास्त पिळवणूक करू नका. आदिवासी निसर्गाकडून तितकंच आणि त्याच गोष्टी घेतात ज्याची त्यांना जगण्यासाठी गरज आहे. ते या वस्तूंचा संग्रह देखील करत नाहीत. निसर्गाच्या या गोष्टी ते एक भेट म्हणून स्वीकारतात. त्या घेण्यापूर्वी ते निसर्गाप्रती आपला सन्मान व्यक्त करतात. याच आधारावर आदिवासींचे सण आणि उत्सव आधारलेले असतात.
आपल्याला हे माहितीच आहे की आधुनिक समाजात जे उत्पादन तयार होतं त्यातला मोठा भाग हा विकला न गेल्यामुळे खराब होतो आणि नंतर फेकण्यात येतो. कारण इथं उत्पादन लोकांच्या गरजेनुसार किंवा मागणीनुसार नाही तर लाभ कमावण्यासाठी केलं जातं.
जगाला कोणत्या गोष्टींची व किती प्रमाणात गरज आहे याचा कोणताही विचार न करता उत्पादन केलं जातं. यामुळे निसर्गाची अमूल्य साधनसंपत्ती कायमची नष्ट होत आहे. आधुनिक जग आदिवासींकडून शिकू शकतं की तेवढंच उत्पादन करा जेवढ्याची गरज आहे.
भविष्याच्या कठीण प्रसंगासाठी देखील थोड्याच संग्रहाची गरज भासते. संग्रह करून लाभ कमावण्याची हाव आदिवासींमध्ये नसते. अमर्यादित लाभाची हाव आणि अफाट संग्रहीवृत्ती आज माणसाची सर्वांत मोठी शत्रू झाली आहे. संग्रह आणि संरक्षणाचा खरा अर्थ जगाला आदिवासींकडून शिकायला हवा.
बुद्धाच्या अपरिग्रह तत्त्वावरच आदिवासींची जीवनपद्धती आधारलेली आहे. आदिवासी निसर्गपूजक आहे. त्याचा अर्थ आहे की, तो निसर्गाकडे नेहमीच पवित्र नजरेनं बघतो. तो तलाव, झरा, नदीत प्रवेश करण्याआधी, डोंगरावर चढण्याआधी, इतकंच काय झाडावर चढण्याआधीही त्याला वंदन करतो. त्याची परवानगी घेतो.
एखादं फळ तोडण्याआधी तो झाडाची परवानगी घेतो. निसर्गाकडून तो जे काही घेतो त्याविषयी तो कृतज्ञता व्यक्त करतो. आदिवासी निसर्गाकडून काही घेण्याला आपला विशेषाधिकार किंवा सहजाधिकार समजत नाही. पण आधुनिक जगाला मात्र तसं वाटतं. त्यालाच ते विकास समजतात. पण हा विकास आता निसर्गाचा विनाश झाला आहे. आधुनिक समाजाने लोकांकडून त्यांची सामूहिकता आणि वाटून घेण्याची प्रवृत्ती हिसकावून घेतली आहे.
इथं प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याशी शर्यत करत असतो. वैयक्तिक स्वार्थ पूर्ण करणं हेच सगळ्यांचं ध्येय झालेलं आहे. एकटेपणा आणि विलगता आजच्या आधुनिक जगाची प्रमुख लक्षणं आहेत. प्रत्येक माणूस आपल्या वैयक्तिक जगात रमलेला आहे. त्याच्याकडे इतरांविषयी विचार करण्याची किंवा कोणासाठी जगण्यास वेळ नाही. इच्छाही नाही. या परिस्थितीने लोकांना मानसिकदृष्ट्या बिमार पाडलं आहे. 
जन्मजात उच्च-नीच जाति भावना आणि विचारापासून मुक्तीचा धडा
आधुनिक जगाच्या या व्यक्तीवादाच्या आजारापासून वाचण्याचा धडा आदिवासी त्यांना शिकवू शकतात आणि त्यांनी तो शिकायलाही हवा. आदिवासी सामूहिकता आणि वाटणीत विश्वास ठेवतात. आदिवासी समाजात या गोष्टीची कल्पना करणं कठीण आहे की एखाद्याचं धान्याचं कोठार भरलेलं आहे आणि त्याचा शेजारी उपाशीपोटी झोपलाय.
जे आदिवासी शिकार करतात, त्यांच्यात हा सामान्य नियम असतो की ते शिकारीवरून परतल्यावर त्यातला काही हिस्सा त्या लोकांनाही देतील जे काही कारणानं शिकारीत सहभागी होऊ शकत नाहीत. मग ते आजारी असतील, म्हातारे असतील, अपंग असतील. घरातील पुरुष सदस्य मेल्यावर, घरातील बायका ज्या शिकारीवर जाऊ शकत नाहीत, त्यांनाही शिकारीची भाग दिला जातो.
मिळून मिसळून जेवण करणं आणि जगणं ही आदिवासी संस्कृतीची विशेषता आहे. आधुनिक जगानं त्यांच्याकडून हे शिकून घेतलं तरी त्याच्या बहुतांश समस्या आणि संघर्षांचा विराम होईल.
सध्या जगात इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे की सर्वांच्या गरजा आरामात पूर्ण होतील. भूक, कुपोषण, गरीबी आणि अभाव पूर्णपणे संपुष्टात येऊ शकतो. पण त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन गोष्टी वाटून घेण्याची कला शिकायला पाहिजे. तरच जग सुंदर आणि जगण्यालायक होईल.
आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाने आपली संपत्ती वाढवली आहे पण वाटून घेण्याची संस्कृती शिकवली नाही. आदिवासींकडून ते या गोष्टी शिकू शकतात. आदिवासी समाजाकडून जग विशेषतः भारतीय समाज एक सर्वांत मोठी गोष्ट जी शिकू शकतो ती म्हणजे, जन्मजात उच्च-नीच जाति भावना आणि विचारापासून मुक्तीचा धडा.
भारतात फक्त आदिवासी समाजच आहे ज्यांच्यात वर्णव्यवस्था तसेच जातिव्यवस्था नसते. ते बाकी भारतीयांना शिकवू शकतात की कोणाला उच्च किंवा नीच न मानता बंधुभावानं कसं जगता येऊ शकतं. बुद्ध-आंबेडकर यांची समता-बंधुता ही सर्वांत मूल्यवान देणगी होती जी या आदिवासींमध्ये आधीच अस्तित्वात होती. समता-बंधुतेचा धडा भारतीय समाज आदिवासींकडून शिकू शकतो.
आदिवासी समाजातील लैंगिक समता
आधुनिक सभ्य समाज आजही लैंगिक समतेला आपल्या संस्कृतीचा भाग बनवू शकला नाही आहे. आदिवासी समाजात स्त्री ही कमीअधिक प्रमाणात पुरुषाच्या बरोबरचीच समजली जाते. काही समुहांत तिला पुरुषांपेक्षाही जास्त अधिकार आहेत.
स्त्रीला दुय्यम दर्जाची समजणं किंवा तिला आपली संपत्ती समजणं ही भावना आणि समज आदिवासींमध्ये नसते. आदिवासी स्त्रिया साधारणपणे स्वगौरवाने जगतात. त्यांच्यावर बहुधा बिगरआदिवासीच अन्याय करतात. बलात्कार, लैंगिक शोषण, व्यभिचार या आधुनिक जगातील नित्याच्या गोष्टी झाल्या आहेत.
आदिवासी समाजात त्याचं प्रमाण फार कमी असतं. बलात्कार, लैंगिक शोषण आणि व्यभिचारमुक्त समाज होण्याची शिकवण बिगरआदिवासी समाज आदिवासींकडून घेऊ शकतात आणि त्यांनी ती घ्यायलाच पाहिजे.

आदिवासींमध्ये अन्यायविरोधी भावना प्रखर आणि तेजस्वी असते. ते कोणत्याही अन्यायाच्या विरोधात निर्भयपणे उभे ठाकतात. आपल्या स्वातंत्र्याची आणि स्वाभिमानाची रक्षा ते जीव तोडून करतात. जगात सर्वांत जास्त अन्यायविरोधी वीर आदिवासींमध्येच जन्माला आले आहेत. ते आपली हिम्मत, शक्ती आणि लवचिकतेच्या बळावर अन्यायाच्या विरोधात संघर्ष करतात.
भारतीय आदिवासी समाजातही बिरसा मुंडा, तिलका मांझी, सिदो-कान्हू सारखे वीर होऊन गेले आहेत. आज देखील देशातील बलाढ्य कॉर्पोरेट कंपन्यांना जंगल, नदी, डोंगर यांच्यावर ताबा मिळवण्यापासून आदिवासी समुहांनीच रोखून धरलं आहे. त्यासाठी हा समाज त्यागाची पराकाष्टा करत आहे. बलिदान देत आहे.
आधुनिक समाजाने विज्ञान, तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक यंत्रांचा विकास करून मानवी क्षमता अपार वाढवली आहे. पण त्याचा उपयोग निसर्ग, मानवी समुदाय आणि प्राणीमात्रांच्या हितासाठी केला जात नाही तर त्यांच्या विनाशासाठी केला जातोय. यालाच सारे विकास म्हणत आहेत.
विकासाच्या या विनाशकारी मार्गापासून मुक्त होण्याचा धडा आदिवासी समुदाय या तथाकथित आधुनिक सभ्य सुसंस्कत जगाला शिकवू शकतात.
अनुवाद - प्रतिक पुरी






