भारतात तरुणांची लोकसंख्या ही जगात सर्वाधिक आहे. यात अर्थातच स्त्रियांचाही समावेश होतो. देशात आज स्त्रिया प्रत्येकच क्षेत्रात काम करीत आहेत. प्रत्येक क्षेत्रातील काम करण्याच्या त्यांच्या इच्छेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेतही त्यांचं योगदान वाढत आहे.
पण आपल्या देशात मुलींना-स्त्रियांना बहुधा कार्यालयीन कामच दिलं जातं. पितृसत्ताक समाजाची ही विचारसरणी आहे की स्त्रियांनी काम करावं पण ते ऑफिसमध्येच. ज्या कामात वेळ जास्त जातो, प्रवास करावा लागतो, अशी कामं स्त्रियांना मिळत नाहीत किंवा दिली जात नाहीत. अशी कामं त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरतात. यातीलच एक क्षेत्र आहे पत्रकारीता.
शेवटी मी पत्रकारीता सोडली…
देशात रोजच लोकांना बातम्या वाचणं, ऐकणं, बघणं आवडतं. पण यातील स्त्रियांच्या योगदानाकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. न्यूज चॅनेल्सवर स्त्री एंकर्स मिळतात पण पत्रकार कमीच असतात. प्रिंटमध्येही हीच स्थिती आहे. आजही आपल्या समाजात स्त्रियांनी ऑफिसात 9 ते 5 काम करावं अशीच लोकांची इच्छा असते.
एका वेब पोर्टलसाठी ऑनलाईन कंटेंट रायटर म्हणून काम करणारी सोनम आधी पत्रकार होती. पण या काळात तिला फिल्डवर अनेक आव्हानांना सामना द्यावा लागायचा. सोनम सांगते, “मला आव्हानांची भिती नव्हती. पण घरच्या लोकांसमोर मला हरावं लागलं. त्यांनी फिल्डवर्क सोडण्यासाठी माझ्यावर दबाव आणणं सुरू केलं.

मी जर संध्याकाळी सहानंतर फिल्डवर असेल तर घरून मला काम सोडण्यासाठी सांगितलं जायचं. फिल्डवर्क करताना अनेकदा मी अस्वस्थ असायची. मी अनेकदा पुरुष फोटोग्राफरसोबत जायची तर त्याच्या आणि माझ्या नात्यावरून शेरेबाजी केली जायची. फिल्डवरही मला जास्त करून पुरुष पत्रकारच मिळायचे ज्यांच्यामुळे मी माझ्या अडचणी त्यांच्यासोबत शेअर करू शकत नसे.
बाहेर स्त्री पत्रकारांच्या सुरक्षेची काही वेगळी व्यवस्था नसते. एकदा पब्लिक ओपिनियन कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी माझ्यावर पेन आणि बॉटल्सचा मारा केला. माझ्या फोनवर अनेकदा राँग नंबर्स यायचे. शेवटी या सर्वांना त्रासून मी पत्रकारीता सोडली आणि कंटेंट रायटींगचं काम सुरू केलं. आता माझ्या घरचे लोकही खुश आहेत.”
कोविड-19 मुळे जागतिक स्तरावर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. साथ आटोक्यात आल्यानंतर कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयात बोलावणं सुरू केलं. पण यातही स्त्रियांना पुन्हा कामावर घेण्याची संख्या कमीच होती. जागतिक बँकेच्या एका सर्वेनुसार 2010-20 या काळात भारतात कामकरी स्त्रियांची संख्या कोविड काळात 26 वरून 19 टक्क्यांवर घसरली होती.
मागील वर्षीच्या जून मध्ये ‘इंडिया टूडे’ मध्ये आलेल्या एका बातमीत टीसीएस कंपनीत कोविडनंतर अनेक स्त्री कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला होता. कंपनीने कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येऊन काम करायला सांगितलं होतं, त्यानंतर हे राजीनामे आले. स्त्रियांना ऑफिसमध्ये काम करणं कठीण का वाटतं हा प्रश्न यामुळे इथे उपस्थित होतो.
केवळ मुलगी आहे म्हणून कमी पगार दिला जायचा
पटना येथील दरभंगा हाऊस मधून पत्रकारीता पूर्ण केलेली नेहा छपरा आपल्या घरूनच विडीयो एडिटींगचं काम करते. नेहा सांगते, “मी 2022 पर्यंत ऑफिसमध्ये विडीयो एडीटर म्हणून काम केलं. पण ऑफिसात काम करताना मी केवळ मुलगी आहे म्हणून मला कमी पगार दिला जायचा. त्यामुळे मी ते काम सोडलं.
माझ्या पुरुष सहयोगाला ज्या कामासाठी 15 हजार मिळायचे त्याच कामासाठी मला 10 हजार मिळायचे. मी जेव्हा यावर आक्षेप घेतला तेव्हा पुरुषांच्या जबाबदाऱ्या जास्त असतात असं कारण मला सांगण्यात आलं. या भेदभावामुळे निराश होऊन मी काम सोडून घरी आले. आता मी दुसऱ्या ठिकाणी ऑनलाईन काम करते. घरी मी घरची-बाहेरची कामंही करू शकते आणि माझं काम तर सुरूच असतं.
माझ्या इच्छेनुसार मी माझा वेळ देऊ शकते. कोणताही दबाव माझ्यावर येत नाही.” दरभंगा येथील मौसम झा पटना येथे पत्रकारीता करते. तिला फिल्डवर्क करायला आवडतं. पण फिल्डवर्क करताना अनेकदा काम करणं कठीण होऊन बसतं. ती सांगते, “मी स्त्री असल्यामुळे अनेकदा असं घडतं. एखादी बातमी कव्हर करण्यासाठी अनेकदा मला रात्री बाहेर जावं लागतं. तिथं मला अस्वस्थ वाटतं. असुरक्षित वाटतं.”
एका मीडिया चॅनेलसोबत काम करताना तिने आपलं काम आणि अनुभव यांच्या आधारे पगार मागितला होता पण कंपनीने तो देण्यास नकार दिला. त्यामुळे तिनं ते काम सोडलं.
‘मनीकंट्रोल’ मध्ये आलेल्या एका अहवालानुसार भारतात 53 टक्के कामकरी स्त्रिया आपल्या पगारात वाढ मागण्यात जास्त आत्मविश्वासी असतात, जी जागतिक तुलनेत 30 टक्के जास्त आहे. ‘प्रमोटींग वुमन फॉर बेटर वर्क’च्या अहवालानुसार भारतात 65 टक्के स्त्रियांनी आपल्या कामाच्या आधारे पगारात योग्य वाढ मागितली जी इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे.
पण यातील 56 टक्के स्त्रियांना हवा तेवढा पगार मिळाला नाही. यातून हेच स्पष्ट होतं की कामाच्या ठिकाणी मग ते बॉलिवूड असो, पत्रकारीता असो किंवा कॉर्पोरेट क्षेत्र असो, स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत कमीच पगार दिला जातो. भेदभाव ऑफिसमध्ये होवो अथवा बाहेर, त्यावर बोलण्याची कोणतीच व्यवस्था नसते.

बिहार येथील ‘इंडिया सिटी लाईव्ह’ चॅनेलसाठी काम करणाऱ्या अनन्याला काम करताना शोषण आणि फिल्डवर्क करताना ती मुलगी असल्यामुळे पुरुष वर्चस्वाला सामोरं जावं लागलं. ती म्हणते, “अनेकदा आम्हाला एखाद्या नेत्याची किंवा मंत्र्याची प्रतिक्रिया घ्यायची असते.
अशावेळी पुरुष पत्रकार त्यांना घेराव घालतात त्यात महिला पत्रकारांना आत शिरणं कठीण होतं आणि असहजही. स्त्री पत्रकार फिल्डवर्क करत नाहीत कारण त्यांना लग्नाच्या आधी आणि नंतरही बाहेर काम करण्याची परवानगी दिली जात नाही. अनेकदा घरून एका निश्चित वेळेनंतर घराबाहेर जाण्याची बंदी असते. शहराच्या बाहेर जाण्यावरही आमच्यावर प्रतिबंध असतात.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी मला अनेक अडचणी आल्या. महिला पत्रकारांना बातमी सादर करण्यासाठी ऑफिसमध्येच थांबवलं जातं. या क्षेत्रात महिलांना कंटेंट रायटींग, वॉईस ओव्हर आर्टीस्ट, किंवा कॅमेराच्या मागची कामं दिली जातात. बातमी सादर करण्यासाठी चांगला चेहरा असलेल्या स्त्री पत्रकारांचीच निवड करण्यात येते.”
लग्नानंतर स्त्री पत्रकारांना काम करताना अनेक अडचणी येतात आणि त्यांना नोकरी सोडावी लागते. पटना येथे राहणारी अंजली यादव एका न्यूज चॅनेलमध्ये काम करते. ती सांगते, “काही लोक पत्रकारीतेला महत्त्व देत नाहीत. त्यामुळे ते आपल्या घरातील स्त्रियांनाही या क्षेत्रात येऊ देत नाहीत.
अनेकांची इच्छा असते की त्यांनी 9 ते 5 या वेळेतला डेस्क जॉब करावा. ज्यामुळे त्यांना घरातील कामंही करता येतील. आमच्या कुटुंबात अजूनही हीच विचारसरणी आहे की पत्रकारीता पुरुषांचंच क्षेत्र आहे. लग्नानंतर मलाही वाटलं की मी एकदा माझ्या सासरच्यांना विचारू माझ्या कामाविषयी. त्यांची माझ्या कामाला आडकाठी नसली तरीही, अनेक स्त्री पत्रकारांना अशी सवलत मिळत नाही हे खरंय.”
अजून महिला पत्रकारांची संख्या वाढणं आणि बाहेर काम करताना त्यांना सुरक्षित वातावरण मिळणं बाकी आहे. जो समाज पितृसत्तेच्या नियमावरच अजूनही चालतो आहे तिथे, देशातील स्त्री पत्रकारांना ऑफिसात तसेच बाहेरही काम करताना अनेकदा किंवा ऑनलाईनही धमक्या मिळतात, त्यांचं ट्रोलिंग होतं.
स्त्रियांसाठी एक सुरक्षित आणि सुविधापूर्ण कामाचं वातावरण तयार करण्यासाठी त्यांचं कुटुंब, समाज यांनी एक होऊन काम करण्याची गरज आहे.
अनुवाद - प्रतिक पुरी






