नाव आहे समरवीर, डॉ. समरवीर. करोल बाग येथील हा अवघ्या 11 वर्षांचा मुलगा स्वतःची ओळख अशीच करून देतो. तो डॉक्टरच होईल, एका डॉक्टर मुलीशीच लग्न करेल आणि सभरवाल कुटुंबाची शंभर वर्ष जुनी परंपरा जीवंत ठेवेल. पाच पिढ्यांपासून या कुटुंबात सारे डॉक्टरच आहेत, जवळपास दीडशे डॉक्टर्स.
काका-काकू, पती-पत्नी, आजी-आजोबा, मुलगा-मुलगी, भाऊ-बहिण, सर्व प्रसूति-स्त्री रोग तज्ञ, रेडियोलॉजिस्ट, सर्जन, ऑर्थोपेडिस्ट, युरोलॉजिस्ट, बाल रोग तज्ञ आणि जनरल फिजिशियन्स आहेत.
दिल्लीच्या सभरवाल कुटुंबाकडे आज करोल बाग, आश्रम, वसंत विहार या भागांत पाच रुग्णालयं आहेत. जिथं या कुटुंबातील वेगवेगळे सदस्य काम करतात आणि त्याचा त्यांना अभिमान आहे. लहानपणापासून ते मेडिकलच्या वातावरणातच वाढतात. एकानं तर इतिहास शिकण्यास नकार दिला कारण त्याचा मेडिकलशी संबंध नव्हता.

पण डॉक्टरांची ही साखळी आता सहाव्या पिढीपासून काहीशी विस्कळीत होऊ लागली आहे. काही जणांना आता लेखक, क्रिकेटर, इंजिनियर होण्याची इच्छा आहे. कुटुंबप्रमुख 84 वर्षीय डॉ. सुदर्शन सभरवाल म्हणतात, “आम्ही आमच्या मुलांना वाढदिवशी या शुभेच्छा देतो की त्यांनी मोठं होऊन डॉक्टर व्हावं आणि कुटुंबाची ही परंपरा पुढे न्यावी.”
1920 मध्ये सभरवाल कुटुंबाला त्यांचा पहिला डॉक्टर मिळाला
डॉक्टरी वंशाची सुरूवात लाहौरचे स्टेशन मास्टर असलेल्या लाला जीवनमल यांच्या स्वप्नातून झाली होती. १९०० च्या दशकात त्यांना आपल्या चारही मुलांना डॉक्टर करायचं होतं. 1920 मध्ये कुटुंबाला त्यांचा पहिला डॉक्टर मिळाला. ‘रुग्णांची सेवा हीच ईश्वरसेवा’ यावर विश्वास असलेल्या या कुटुंबानं पुढे तेच केल. हेच जीवनमल यांचंही स्वप्न होतं.
सुदर्शन यांचा भाचा, 43 वर्षीय डॉ. अंकुश सभरवाल म्हणतो, “आमच्या कुटुंबाची ही परंपरा पुढे नेणं आम्हाला कधी ओझं वाटलं नाही. हा व्यवसाय आणि समाजाची सेवा हीच आमचीही पहिली पसंत होती.” जीवनमल यांना आपल्या मुलांनाच डॉक्टर करायचं नव्हतं तर त्यांचं लग्न ज्यांच्याशी होईल त्या मुलीही त्यांना डॉक्टरच हव्या होत्या. सुदर्शन म्हणतात की, “आमची मुलं मेडिकलमध्ये शिकायला गेली की आम्ही सांगायचो की ते केवळ एका डॉक्टर मुलीशीच प्रेम आणि लग्न करू शकतात.”
सभरवाल कुटुंबात बोलणंही रुग्ण आणि आजार यावरच होत असते. सध्या त्यांच्या चर्चेचा विषय आहे नीट परीक्षा आणि त्यातील घोटाळा. अमृतसरच्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस पदवी मिळवणारा अंकुश म्हणतो, “नीट आधीच खूप कठीण परीक्षा आहे. त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. अशात या घटनांमुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. त्यामुळे याची चौकशी व्हायलाच हवी. सरकारला विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकायला पाहिजे.”
बाकी सदस्य यावर दुजोरा भरतात. एकच व्यवसाय असल्यामुळे बोलणं सोपं होतं. इमरजेन्सी कॉल आला तर कोणाला कधीही जावं लागतं पण त्यामुळे घरातील कामांवर क्वचितच परिणाम होतो.
अंकुशची बायको, आणि सभरवाल कुटुंबातील पहिली रेडियोलॉजिस्ट डॉ. ग्लॉसी सांगते, “काही वेळेस आम्ही स्वयंपाक करत असतानाच कॉल येतात आणि आम्ही तसेच पळत सुटतो. हॉस्पिटल जवळ असल्यामुळे प्रवास फारसा नसतो. त्यामुळे अशा दबावाचं ओझं वाटत नाही. कुटुंबातील इतर सदस्यांना अशा गोष्टी सांगण्याची गरज भासत नाही कारण या व्यवसायात अशा गोष्टी त्यांनी गृहीत धरलेल्या असतात.”
हॉस्पिटलपेक्षा घरी रुळायला ग्लॉसीला थोडा वेळ लागला. ती म्हणते, “घरी ते आई-वडील असतात, पण कामाच्या ठिकाणी मी त्यांना डॉक्टरच म्हणते.” जेव्हा तुम्ही घरच्या लोकांना अनौपचारीक परिस्थितीत बघता तेव्हा हॉस्पिटलमध्ये त्यांना वेगळ्या अवतारात पाहणं थोडं अडचणीचं जाऊ शकतं. स्त्री-रोग तज्ञ डॉ. शिवानी या गोष्टीशी सहमत आहे.

ती लेबर रुममध्ये आपली सासू डॉ. मालविका यांच्यासोबत काम करते. ती म्हणते, “हॉस्पिटल आणि घर या दोन्ही ठिकाणी सासूबाई वेगवेगळी आहे. त्या खूप शिस्तप्रिय डॉक्टर आहेत आणि रुग्णांच्या बाबतीत त्या कोणतीही चूक माफ करत नाहीत. पण घरी त्या समंजस आणि मदतीला तत्पर असतात.”
सहाव्या पिढीला मात्र डॉक्टरी पेशेत रस नाही
डॉक्टरशीच लग्न करण्याचा नियम तेव्हा मोडला जेव्हा 60 वर्षीय सुनल सभरवाल यांनी जीवशास्त्राच्या पदवीधर शक्ती यांच्याशी लग्न केलं. सभरवाल कुटुंबात त्या लवकरच या प्रश्नामुळे त्रस्त झाल्या की त्या डॉक्टर का नाहीत. पण त्या आता अमेरिकेत आहेत आणि डॉक्टरही आहेत.
पण शक्ती यांच्याप्रमाणे सारेच या नियमासमोर माना तुकवायला राजी नाहीत. निदान सभरवालच्या सहाव्या पिढीतील मुलं तरी. डॉक्टरी व्यवसायासाठी असलेल्या त्यांच्या या अतिआसक्तीवर ते आता प्रश्न विचारत आहेत.
21 वर्षीय दीया सभरवालला कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड विश्वविद्यालयातून इंग्रजी आणि संगणक विज्ञानात दुहेरी पदवी मिळवल्यानंतर तिचं इमोशनल ब्लॅकमेलिंग सुरू झालं. ती म्हणते, “मेडिकल हा एक चांगला व्यवसाय आहे पण मी त्याच्यात रमू शकणार नाही हे मला माहिती होतं. मला इंजिनियर तसेच लेखक म्हणून करियर घडवायचं आहे. प्रॉडक्ट डिझाईनमध्ये मला जास्त रस आहे.” दीयाचं 2018 मध्ये ती नववीत असतानाच ‘ए नॉट सो सायलेंट नाईट’ नावाचं लहान मुलांचं पुस्तक प्रकाशित झालं आहे.
आता तिच्या घरच्यांनी तिचा हा निर्णय मान्य केला आहे. पण यासाठी तिला अनेक वर्ष त्यांचा विरोध सोसावा लागला होता. इतक्या मोठ्या विरोधाचा दबाव सहन करण्यासाठी हिम्मत तर लागतेच. कारण घरीच नाही तर बाहेर, हॉस्पिटलचे कर्मचारी, शाळेतले शिक्षक, इतर डॉक्टर्सही या युवा सभरवालांकडून डॉक्टर होण्याचीत अपेक्षा ठेवत असतात.

जनरल आणि लेप्रोस्कोपिक सर्जन आणि चौथ्या पिढीचे डॉक्टर, 72 वर्षीय विनय सभरवाल सांगतात, “शाळेत आमचं नाव ऐकताच शिक्षक म्हणायचे की हा तर डॉक्टरच होणार.” दीयानं आपल्या घरच्यांना समजवण्यासाठी शेवटी अनेक दिवस रडत राहण्याचा हमखास उपाय योजला. ती म्हणते, “डॉक्टर होण्याची घरात परंपरा होती. आई-बाबांनाही मी डॉक्टर व्हावं हेच वाटत होतं. हॉस्पिटलचे कर्मचारी मला डॉ. दीया म्हणून हाक मारायचे.” दीया दहावीत असताना तिनं नीटची तयारी सुरू केलीही होती.
ती म्हणते, “मी शेवटी मनाची तयारी केली होती. पण माझ्या लक्षात आलं की यामुळे माझा वेळ आणि मुख्य म्हणजे ज्या गोष्टींची मला आवड आहे त्यासाठीची उर्जा यात खर्च होत आहे. मला नव्या गोष्टी घडवायच्या होत्या. सृजनात्मक कामात मला रस होता. मला तेच करायचं होतं ज्यात मी चांगली आहे.”
दीयाचा चुलत भाऊ, आर्यन यानं मात्र पुढच्या वर्षी 12वी होताच मेडिकलला जाण्याचा निर्णय घेतला आहे. तो सध्या घरीच नीटची तयारी करतोय. तो म्हणतो, “माझी आजी माझ्या मागेच लागली आहे. ती नेहमी मला कुटुंबाच्या या परंपरेची आठवण करून देते आणि सांगते की लोकांसोबत काम करणं, त्यांची मदत करणं किती महान गोष्ट असते.” पण त्याला अजून विश्वास नाही की तो आजीचं स्वप्न पूर्ण करू शकेल की नाही ते.
त्याची मोठी बहिण, सेरेना मात्र युकेत सेंट्रल लँकेशायर विश्वविद्यालयातून मेडिकल स्कूलमध्ये शिकत आहे. सुदैवानं दोघांच्या आई-वडीलांनी हे मान्य केलंय की त्यांची सर्वच मुलं डॉक्टर होणार नाहीत. आर्यनची आई, स्त्री-रोग तज्ञ डॉ. शीतल सभरवाल म्हणतात, “नवीन पिढी त्यांना हवं ते करायला स्वतंत्र आहे. हे चांगलंच आहे की त्यांना मागच्या पिढीतील लोकांप्रमाणे कुटुंबाच्या दबावाचा सामना करावा लागत नाही. त्यामुळे काही मेडिकलला जात आहेत तर काही इतर फिल्डमध्ये.”

महात्मा गांधींपासून मिळाली होती प्रेरणा
सभरवाल डॉक्टर वंशाची सुरूवात ज्या लाला जीवनमल यांच्यापासून झाली होती त्यांना महात्मा गांधी यांच्या एका भाषणातून प्रेरणा मिळाली होती. ज्यात त्यांनी म्हटलं होतं की भारताचं भविष्य त्याच्या शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील गुणवत्तेवर अवलंबून राहिल. त्याच वेळी जीवनमल यांनी निर्णय घेतला की ते एक हॉस्पिटल बांधतील. आपलं स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षा त्यांनी बोधराज, त्रिलोकनाथ, राजेंद्रनाथ आणि महेंद्रनाथ या चार मुलांमध्ये वाटून दिली.
1920 मध्ये डॉ. बोधराजच्या रुपानं कुटुंबाला पहिला डॉक्टर मिळाला. जीवनमल यांनी आत्ताच्या पाकिस्तानातील जलालपूर शहरात हॉस्पिटल उभारलं. फाळणीनंतर ते दिल्लीला आले आणि पुन्हा एक हॉस्पिटल उभारलं. तोवर त्यांची बाकीची तिन्ही मुलंही डॉक्टर झाली होती. सभरवाल परिवारातील प्रत्येक सदस्य ही गोष्ट जाणतो. ज्यांना डॉक्टर व्हायचं नाही त्यांनाही याविषयी आदर आहे.
डॉ. अंकुश म्हणतो, “माझे पणजोबा, डॉ. बोधराज, आपल्या रुग्णांना घरच्या लोकांप्रमाणे वागवायचे. बाहेरून आलेल्या रुग्णांना ते आधी जेवू घालायचे. नंतर त्यांच्या उपचार करायचे. पणजोबा केवळ एक चांगले व्यक्ती आणि डॉक्टरच नव्हते तर एक वीर आणि बंडखोरही होते. त्यांनी ब्रिटीश सरकारचा, केवळ इंग्रजांचाच उपचार करण्याचा आदेश धुडकावला होता. त्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला.”

आजही जलालपूर हॉस्पिटल सोबतच पाचही हॉस्पिटल्समध्ये डॉ. बोधराज आणि त्यांच्या भावांचे फोटो भिंतीवर लावलेले दिसतात. तिथून जातांना अनेक रुग्ण या फोटोंसमोर आदरानं माना झुकवतात. हे सभरवाल यांचे पिढीजाद रुग्ण आहेत. यांच्या आई-वडिलांनी आणि आजी-आजोबांनीही सभरवाल डॉक्टर्सकडूनच उपचार केले होते. हे रुग्णही या परंपरेचा हिस्सा आहेत.
भावना मिनोचा यांची पणजी, त्यांच्या कुटुंबातील पहिली व्यक्ती होती जी सभरवाल यांच्याकडे करोल बागच्या जीवन माला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आली होती. 58 वर्षीय मिनोचा म्हणतात, “आम्ही कधी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो नाही. माझी जन्म इथेच झाला. माझ्या दोन्ही मुलांना मी इथेच जन्म दिला. हा माझ्या आयुष्याचा अभिन्न हिस्सा आहे.”
(सौजन्य - द प्रिंट)
अनुवाद - प्रतिक पुरी






