‘कैदी नंबर 626710 हाजिर है…’ (Prisoner No.626710 Is Present) ही काही घोषणा नव्हे तर हे एका डॉक्युमेंट्रीचे नाव आहे. या डॉक्युमेंट्रीची सुरुवातच उमर खालिदच्या एका वाक्यापासून होते.. "जर तुम्ही मला याक्षणी पाहात असाल तर मी आता तुरुंगात आहे.’’ ललित वाछानी यांनी बनवलेला हा माहितीपट. राजकीय आंदोलनामुळे गेल्या चार वर्षांपासून तुरूंगात कैद असलेल्या उमर खालिद या विद्यार्थी नेत्याची कहाणी यात दाखवली आहे.
यातून वाछानी यांनी नेमका कोणता उलगडा केला आहे? तर यातून त्यांनी, 13 स्पटेंबर 2020 रोजी उमर खालिद याला पोलिसांनी दिल्लीत झालेल्या दंगलींचा मास्टरमाईंड ठरवून केलेल्या अटकेपासून ते त्याला वारंवार नाकारलेला जामीन व आजपर्यंतचा त्याचा प्रवास याचा उलगडा करण्याचा प्रयत्न या माहितीपटातून केला आहे.
उमर खालिद संदर्भात नागरी हक्कांची पायमल्ली कशी झालेली आहे याचा अंदाज आपल्याला यातून येतो. यात महत्वाचे योगदान असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या संशोधक बानोज्योत्स्ना लाहिरी या उमर खालिद बद्दल सांगतात की, "मी पहिल्यांदा त्याला JNU मध्ये भेटले तेव्हा असं जाणवलं की,हा मुलगा कायम प्रश्न विचारत राहतो."

59 मिनिटांच्या या माहितीपटात उमर खालिदचे काही व्हिडिओज आहेत ज्यात तो नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करताना दिसतो. या माहितीपटातून हेच स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे की, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची हीच अवस्था होईल.
वाछानी यांनी तयार केलेला हा माहितीपट, आपल्याला त्याच दिशेने घेऊन जातो. जसं त्यांनी याआधी बनवलेल्या डॉक्युमेंट्री आहेत. याआधी वाछानी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आधारित, The Boy in the branch (1993) आणि The men in the tree (2002) या डॉक्युमेंट्रीची निर्मिती केली आहे. यापैकी पहिल्या डॉक्युमेंट्रीमध्ये संघाचे हिंदुत्ववादी विचार लहान मुलांवर, खेळ व शारीरिक कसरतींच्या माध्यमातून कसे बिंबवले जातात याचा आढावा घेण्यात आला आहे.
तसेच वर उल्लेख करण्यात आलेल्या दुसऱ्या डॉक्युमेंट्रीमध्ये हीच मुले बाबरी मशिद पाडण्यात कशी सहभागी आहेत हे दाखवले आहे. या सिरीज मधील तिसरी डॉक्युमेंट्री बनवण्याचा वाछानी यांचा विचार होता. 2016 मध्ये त्यांनी त्यादृष्टीने फुटेजेस एकत्र केले परंतु हा प्रकल्प बारगळला.मुख्य म्हणजे भाजपचे नरेंद्र मोदींच्या वर्चस्वाखाली सरकार स्थापन झाले होते.

दिग्दर्शक ललित वाछानी याबद्दल म्हणतात की, " मला हे चांगलं माहिती आहे की आरएसएस सत्तेत आली आहे पण मला वाटत नाही की त्यांचा द्वेष पूर्णतेत लगेचच फारसा बदल होईल." वाछानी यांचा रोख सीबीआय, ईडी यांसारख्या संस्थांचा करण्यात येणारा वापर यावर देखील आहे. Prisoner No.626710 Is Present या डॉक्युमेंट्री निर्मितीसाठी वाछानी यांनी दिल्ली दंगल प्रकरणी अटक केलेल्या विद्यार्थी नेत्यांचा आढावा घेतला तर त्यात बहुतांश नेते हे मुस्लिम समाजाचे होते. खालिद,शर्जील इमाम,मरीन हैदर इत्यादी…
ललित वाछानी हे उमर खालिद विषयी म्हणतात की, 'खालिदची भाषणे ही अत्यंत धाडसी होती.' उमर खालिद त्याच्या एका भाषणात म्हणतोय की, RSS च्या नागपूर मधील मुख्यालयात 2000 सालापर्यंत तिरंगा फडकला नाही. या माहितीपटातून उमर खालिदच्या अटकेची दाहकता लक्षात यावी यासाठी उमरच्या सहकारी बानोज्योत्स्ना लाहिरी यांना काय अनुभव आला आहे याची माहिती घेतात. लाहिरी नेमक्या कोणत्या परिस्थितीतून जात आहेत याचे वर्णन त्याच करतात. या डॉक्युमेंट्रीमध्ये एका ठिकाणी लाहिरी म्हणतात,
"जेव्हा मी उमरला तुरूंगात भेटते तेव्हा मी, आम्ही त्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो,त्याला हसवण्याचा प्रयत्न करतो. त्याने आत्तापर्यंत तुरूंगात जवळपास दोनशे पुस्तके वाचली आहेत."

लाहिरी या उमर खालिद यास पुस्तके उपलब्ध करून देतात. डॉक्युमेंट्री निर्मितीवेळी लाहिरी यांनी काही फोटो देखील वाछानी यांच्यासोबत 'शेअर' केलेत. उमर खालिदचे हे तेव्हाचे फोटो आहेत जेव्हा त्याला तिहार तुरुंगातून सात दिवसांकरिता कुटुंबातील एका लग्नासाठी सोडण्यात आले होते.जानेवारी 2023 मधील हे फोटोग्राफ. अंतिमतः जेव्हा वाछानी हे लाहिरी यांना प्रश्न करतात की, उमर खालिदची सुटका कधी होणार? त्यावर लाहिरी उत्तर देतात की,
"आम्ही एका राजकीय कटाचा भाग झालो आहोत ज्याला कोणताच कायदेशीर आधार नाही. कोणतेच न्यायालय अशी हिंमत दाखवेना की ही केस बंद करून खालिद बाहेर येईल.मला माहिती नाही अजून किती दिवस लागतील."
दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय म्हणजेच जेएनयूचे माजी विद्यार्थी उमर खालिद यांची जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. उमर खालिद यांच्या याचिकेवर एकही दिवस सुनावणी झालेली नाही. विद्यार्थी नेता आणि सामाजिक कार्यकर्ता उमर खालिद सप्टेंबर 2020 पासून तुरुंगात आहे. त्यांच्यावर फेब्रुवारी 2020 मध्ये ईशान्य दिल्लीत हिंसाचार भडकवल्याचा आरोप आहे.

(उमर खालिद आणि बनोज्योत्सना लाहिड़ी)
त्यांच्याविरुद्ध दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. उमर यांना एप्रिल 2021 मध्ये एका प्रकरणात जामीन मिळाला होता. दुसऱ्या प्रकरणात त्यांच्यावर बेकायदेशीर कृती प्रतिबंध कायदा म्हणजेच यूएपीए अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत दोन न्यायालयांनी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. एप्रिल 2023 पासून सर्वोच्च न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज प्रलंबित आहे.






