आज आमच्या घरात एकही दाणा नाही
आज आमच्या घरात एकही शहाणा नाही भूक,
अंत करणातल्या शेवटच्या दिव्यापर्यंत गायले तर,
भुकेचा दिवा मालवेल काय?
नामदेव ढसाळांनी विचारलेला हा आर्त प्रश्न भूक वेदनांची तीव्रता लक्षात आणून देतो.भुकेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक भूक निर्देशांकात भारताचे स्थान 127 देशांत 105 इतके आहे मागील वर्षीच्या निर्देशांकात 111व्या स्थानावर आपण होतो. यावेळच्या निर्देशांकात वातावरण बदल व महिलांवर होणारा परिणाम तसेच त्यामुळे वाढत जाणारे अन्नसंकट ह्यावर भर दिलेला आहे.
आयरिश संस्था Concern worldwide आणि जर्मन संस्था Welt hunger hilfe यांच्याकडून हा निर्देशांक जाहीर करण्यात येतो. या निर्देशांकात भारताच्या शेजारी देशांची कामगिरी आपल्यापेक्षा अधिक चांगली आहे. बांगलादेश 84, नेपाळ 68 तर श्रीलंका 56 व्या स्थानावर आहे.

कसा काढला जातो जागतिक भूक निर्देशांक?
निर्देशांक काढताना चार घटक विचारात घेतले जातात. त्यात,
1) कुपोषण(Undernourishment)
एकूण लोकसंख्येतील कुपोषण
2) बालकांमधील शुष्क कुपोषण (Child wasting)
यात पाच वर्षांच्या आतील बालकांमधील उंचीप्रमाणे कमी वजन असलेली बालके मोजली जातात.
3) खुरटे कुपोषण (Child stunting)
पाच वर्षांच्या आतील बालकांमधील वयानुसार अपुरी उंची असलेली संख्या मोजली जाते.
4) बालमृत्यू
पाच वर्षांखालील बालकांचा मृत्युदर.
या चार बाबी विचारात घेऊन निर्देशांक काढला जातो.हा निर्देशांक 0-100 दरम्यान असतो. 0 म्हणजे चांगला निर्देशांक. 0 ते 9.9 म्हणजे कमी (low), 10 ते 19.9 म्हणजे मध्यम (moderate), 20 ते 34.9 म्हणजे गंभीर (serious) आणि 35 ते 49.9 म्हणजे alarming आणि 50 व त्यापेक्षा जास्त म्हणजे extremely alarming अशी विभागणी केली जाते. भारताचे स्थान यावर्षीच्या निर्देशांकात 27.3% गुणांकसह गंभीर या वर्गवारीत आहे.
सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हा निर्देशांक काढण्यासाठी कोणत्या माहितीचा वापर केला जातो? तर यातील कुपोषण या घटकासाठी FAO (Food and Agriculture Organisation) या संस्थेकडे असणारी माहिती विचारात घेतली जाते. बालकांमधील दोन्ही प्रकारच्या कुपोषणासाठी WHO, UNICEF, जागतिक बँक यांच्याकडून प्राप्त माहिती विचारात घेतात. तर बालमृत्यूची आकडेवारी UN IGME (Inter-agency Group for Child Mortality Estimation) या संस्थेकडून घेतली जाते.
भारताचा आक्षेप काय होता व सद्यस्थिती काय आहे?
मागील वर्षी जेव्हा हा निर्देशांक प्रकाशित करण्यात आला तेव्हा भारताने यावर आक्षेप नोंदवले होते. त्याआधी देखील सलग दोन वर्षी भारताने हा निर्देशांक नाकारला आहे. भुकेचा निर्देशांक काढताना चार घटकांपैकी तीन घटक हे केवळ बालकांच्या आरोग्याशी संबंधित आहेत. आणि चौथा घटक म्हणजे एकूण लोकसंख्येतील कुपोषण. हा निर्देशांक काढताना 'पोषण ट्रॅकर' या नावीन्यपूर्ण ऑनलाईन प्रणालीचा वापर करून भुकेसंबंधी आवश्यक ती माहिती सरकारकडे आहे.
त्या माहितीत आणि निर्देशांकात असलेल्या माहितीत तफावत असल्याचे महिला व बालविकास मंत्रालयाकडून मागील वर्षी सांगण्यात आले होते. पोषण ट्रॅकर या अभिनव कल्पनेची प्रशंसा WHO व G 20 राष्ट्रांनी देखील केली असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. यावर मागच्या वेळच्या निर्देशांक प्रकाशित झाल्यानंतर बराच गदारोळ झाला होता. याला उत्तर देताना निर्देशांकात असे नमूद केले आहे की, सर्व देशांचा गुणांक काढताना जागतिक आरोग्य संघटनेच्या, बालकांवरील कुपोषणाची आकडेवारी काढली आहे त्यामुळे पोषण ट्रॅकर मधील आकडेवारीचा उपयोग केलेला नाही.
तसेच भारताने या निर्देशांकात सुधारणा करण्यासाठी उपाययोजना देखील सुचवण्यात आल्या आहेत. सामाजिक योजनांची प्राधान्याने अंमलबजावणी, माता व बालकांच्या आरोग्यावर खर्च करणे, कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग करणे, भरडधान्य पिकांचा पेरा वाढण्यासाठी प्रयत्न करणे असे उपाय सुचवले आहेत.
जगातील भुकेची परिस्थिती काय आहे?
How gender justice can advance climate resilience and zero hunger या शीर्षकाने प्रसिद्ध केलेल्या यंदाच्या अहवालात, हवामान बदलामुळे जग गंभीर भुकेच्या संकटात असल्याचे सांगितले आहे. या सगळ्या परिस्थितीचा फटका महिलांना सोसावा लागत आहे. भुकेची समस्या ही दिवसेंदिवस वाढतच असून ती कमी करण्यासाठीचे प्रयत्न खूप कमी गतीने होत आहेत असे निर्देशांक सांगतो.
याशिवाय, युद्धग्रस्त भागातील अथवा सतत तणाव असणाऱ्या देशांतील परिस्थिती अधिकच चिंताजनक आहे. फिजी, जॉर्डन, सीरिया, लिबिया ,व्हेनेझुएला या देशांत भूकेची खोली व व्याप्ती वाढतेच आहे. काही देशांनी विपरीत परिस्थितीत देखील या निर्देशांकात सातत्याने यावर्षी देखील चांगली कामगिरी केली आहे. या देशांचा विशेष उल्लेख या निर्देशांकात करण्यात आला आहे. ते पाच देश म्हणजे, आपल्या शेजारील बांगलादेश, नेपाळ तसेच टोगो, मोझांबिक, सोमालिया या देशांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
आपल्याच शेजारी असलेला चीन हा पहिल्या पाच देशांत येतो. जगभरात हवामान बदल व त्यामुळे वाढणारे अन्न संकट यांचा सहसंबंध व त्यातून महिलांच्या वाट्याला येणाऱ्या वेदना यांवर हा निर्देशांक अधिक लक्ष केंद्रित करतो. या सगळ्या कोलाहलात भारतातील, "भुकेचा दिवा मालवेल काय?" या नामदेव ढसाळांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर कधी मिळणार हा देखील प्रश्नच आहे.






