जगभरातील असा एकही भूप्रदेश उरला नाही जिथे वातावरण बदलाचा फटका बसला नाही.तीव्र हवामानबदल व अनिश्चित स्वरूपाचे ऋतू आता नेहमीचीच समस्या होऊन बसली आहे.या समस्यांपासून बचावासाठी सर्वच स्तरांतून प्रयत्न केले जात आहेत.जागतिक स्तरावर जे प्रयत्न सुरू आहेत त्यात भारत नेहमीच अग्रेसर राहिला आहे.त्यातच आता पडलेली नवी भर म्हणजे पर्यावरण पूरक उत्पादनांसाठी इकोमार्क देण्याचा घेण्यात आलेला निर्णय.
2021 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिशन लाईफ (LiFE) या अभियानाची घोषणा केली होती.पर्यावरणपूरक जीवनशैली अंगिकारण्यासाठी व त्यास प्रोत्साहन देण्यासाठी हे अभियान सुरू केले होते.आता इकोमार्कच्या निर्णयाने याचाच पुढचा टप्पा मानण्यात येत आहे.केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने नुकतीच एक अधिसूचना काढून हा निर्णय घेतला आहे. उत्पादनांना इकोमार्क देण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला मान्यता देण्यात आली आहे.

तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि 'ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड ' (BIS) या दोन संस्थांच्या माध्यमातून उत्पादनांना इकोमार्क देण्यात येणार आहेत.यासाठी इको मार्क योजना 1991 च्या जागी नव्याने अधिसूचना काढण्यात आली आहे.
इकोमार्कच्या माध्यमातून होणारे फायदे
ग्राहकांमध्ये पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर वाढावा यासाठी प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे. इकोमार्क असलेल्या उत्पादनांच्या माध्यमातून पर्यावरणास कमीतकमी हानी पोहोचण्याची शक्यता आहे. यातून होणारा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे, उत्पादकांना पर्यावरणपूरक उत्पादने बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल व जास्तीत जास्त उत्पादने बाजारात पर्यावरणपूरक येण्यास मदत होईल.
यातून जास्तीत जास्त पर्यावरणपूरक उत्पादनांना मागणी वाढेल व त्या पद्धतीची जीवनशैली तयार होण्यास मदत होईल. इकोमार्क संबंधी असलेला आणखी एक महत्वाचा निर्णय म्हणजे ज्या उत्पादनांना आधी BIS प्रमाणपत्र मिळाले आहे त्याच उत्पादनांचा विचार इकोमार्क देण्यासाठी करण्यात येईल. तसेच ज्या उत्पादनाला इकोमार्क नाही अशांना लावण्यास परवानगी देखील नाही.

या निर्णयाच्या अंमलबजावणीविषयी
पर्यावरण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार इकोमार्क निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी इकोमार्क पोर्टल स्थापन करण्यात येणार आहे. तसेच सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने याविषयी जनजागृती सोशल मीडियाच्या व अन्य जाहिरातींच्या माध्यमातून करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.
कोटिंगसाठी वापरण्यात येणारी पावडर, बांधकामाचे रंग, सौंदर्य प्रसाधने, पॅकेजिंग साधने, खाद्यपदार्थ, साबण व डिटर्जंट, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कागद, प्लास्टिक उत्पादने, वस्त्र, ज्यूट व त्यापासून बनवली जाणारी उत्पादने इत्यादी यांचा समावेश या इकोमार्क निर्णयात करण्यात आला आहे. या सगळ्या उत्पादनानुसार व ती उत्पादने कोणत्या प्रकारच्या प्रदूषणास कारणीभूत ठरत आहे यानुसार त्यांना इकोमार्क देण्यात येणार आहेत.






