राजस्थानातल्या एका खेडेगावात 1946 च्या 24 एप्रिलला ‘कमला भसीन’ यांचा जन्म झाला. त्या केवळ स्त्रीवादी विचारवंत नव्हत्या तर लिंगभाव, शिक्षण, मानवी विकास, चिरस्थायी विकास, मानवी हक्क यासारख्या प्रश्नांची सूक्ष्म जाणीव ठेवणाऱ्या समाजशास्त्रज्ञ होत्या. स्त्री-पुरुष समानतेचा जागर घालणाऱ्या कमलादी गेल्या 35 वर्षांपेक्षाही अधिक काळापासून विकास, शिक्षण, लिंगभाव, माध्यमे यांचे विविध पैलू आणि इतर निगडीत क्षेत्रात अभ्यासक, तत्वचिंतक नि कार्यकर्त्या म्हणून सक्रीय योगदान देत होत्या.
लोकप्रिय अभिनेता आमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या टीव्हीवरल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कमला भसीन हे नाव भारतातल्या कोट्यावधी घरात पोहचलं. स्त्री चळवळ,स्त्रीवाद,स्त्री सबलीकरण, लिंगभाव संवेदनशीलता, पुरुष प्रधानता, पितृसत्ताक समाज रचना यावर काम करणाऱ्या कार्यकर्ते- अभ्यासक- अध्यापक- माध्यमकर्मी- संशोधक यांच्यापर्यंत मर्यादित असलेलं कमलादी याचं कार्य, विचारधारा नि योगदान ‘सत्यमेव जयते’ने सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवलं. तीन वर्षांपूर्वी 25 सप्टेंबर 2021 मध्ये त्यांचे निधन झाले.
कोण होत्या कमला भसीन?
कमलादी याचं बालपण राजस्थानातल्या खेड्यांमध्ये गेलं. त्यामुळे त्यांना खेड्यातल्या बायकांच्या अडचणी, त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न याचे अचूक भान आलं होतं. परिणामी भारतातल्या ग्रामीण महिलांचे प्रश्न आंतरराष्ट्रीय पटलावर त्यांनी जोरकसपणे उपस्थित केले. राजस्थान विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यावर त्यांनी ‘विकासाचे समाजशास्त्र’ या विषयात जर्मनी इथल्या ख्यातनाम मनस्टर विद्यापीठातून निष्णात शिक्षणक्रम उत्तीर्ण केला. त्यानंतर ‘bad होन्नेफ’ इथल्या ‘German foundation for developing countries orientation centre’ इथं वर्षभर शिकवलं.

त्या असं म्हणायच्या की, ‘’मला अशा अनेक स्त्रिया ठाऊक आहेत की ज्या संपूर्णपणे पितृसत्ताकवादी आहेत आणि असे पुरुषही ज्ञात आहेत की ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन हे महिलांच्या हक्क नि अधिकारांसाठी संघर्ष करण्यात व्यतीत केलं आहे. स्त्रीवाद हा जैविक नाही, तर स्त्रीवाद ही एक विचारप्रणाली आहे.’’
कमलादी यांनी 70 च्या दशकामध्ये संयुक्त राष्ट्र संघात काम केलं. स्त्रिया आणि निरनिराळ्या उपेक्षित-दुर्लक्षित समूहांसाठी असलेल्या विविध प्रकल्पांमध्ये त्यांनी नोकरी केली. तोवर आपल्या देशात महिला चळवळीचा फारसा विस्तार झालेला नव्हता. माणूस म्हणून स्त्रियांना सर्व प्रकारचे अधिकार नि हक्क मिळायला हवेत, हा विचार जोर धरु लागला होता. 1979 मध्ये त्या भारतात परतल्या आणि त्यांनी दिल्लीत काम करायला सुरुवात केली.
दिल्ली हे चळवळीचे शहर समजले जातं. विशेषतः स्त्रीवादी चळवळीचं... दिल्लीच्या हवेतच चळवळ आहे,असं त्या मानायच्या. त्या दिल्लीला आल्या तेव्हा दिल्लीत हुंडा विरोधी चळवळ सुरु होती. अर्थातच त्या यात सहभागी झाल्या. त्यामुळे त्यांना दुर्लक्षित,वंचित,उपेक्षित, पिडीत समूहाच्या स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराची कल्पना आली.
आपल्या देशात महिलांना देवी म्हणून पूजले जाते मात्र त्यांचे माणूस म्हणून अधिकार डावलले जातात, याची जाणीव करून देणारी चळवळ सुरु झाली होती. स्त्रियांच्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीचं संशोधनात्मक अध्ययन आपल्याकडे 1975 नंतर प्रामुख्याने सुरु झालं. सरकारने महिलांसाठी विशेष योजना, उपक्रमांवर काम करायला प्रारंभ केला. या सर्व प्रक्रियेत कार्यरत असणाऱ्या गटात कमला भसीन अग्रणी होत्या.
कमलादी याचं अवघं आयुष्य संघर्षमय नि खडतर असं होतं. त्यांची स्त्रीवादावरची निष्ठा अविचल होती. वंचित समूहातल्या स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या अविश्रांत झटल्या. केवळ देशातल्या नव्हे तर विदेशातल्याही महिलांच्या हक्क नि अधिकारासाठी त्यांनी आंदोलने उभारली.
दक्षिण आशियातल्या अफगाणीस्तान, बांगलादेश, भूतान, मलादीव, नेपाळ आणि श्रीलंका या देशातल्या महिलांच्या प्रश्नांना भिडण्यासाठी त्यांनी ‘संगत’ (South Asian Network for Gender Activity and Training, SANGAT) नामक नेटवर्क तीन दशकांपूर्वी सुरु केलं होतं. ‘संगत’च्या वतीने ‘South Asian Feminist Capacity Building Course on Gender, Sustainable Livelihoods, Human Rights and Peace’ हा एक महिन्याचा निवासी अभ्यासक्रम सुरु करण्यात आला होता.
त्या ‘वन बिलियन रायझिंग’ मोहिमेच्या दक्षिण आशियाच्या समन्वयकही होत्या. स्त्रियांवरील बलात्कार आणि लैंगिक हिंसाचार नष्ट करण्यासाठी सुप्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या इव्ह एन्स्लर यांनी आरंभलेली ही जागतिक मोहीम आहे.
‘’क्योंकी मै लडकी हू, मुझे पढना है...’’
आपल्या समाजकार्याचा प्रारंभ कमलादीने 1972 मध्ये राजस्थानमधल्या एका स्वयंसेवी संस्थेतून केला. ‘स्त्री प्रश्न’ हा त्यांच्या कामाचा गाभा असला तरी शिक्षण आणि विकासाच्या प्रश्नांनाही त्यांनी हात घातला. सर्व सामाजिक प्रश्न एकमेकांमध्ये गुंतलेले असून त्यांना सुटे-सुटे बघता येत नसल्याचं त्या म्हणायच्या. क्षेत्र शिक्षणाचे असो वा माध्यमांचे, सर्व ठिकाणी लिंगभाव समानता जोपासली जायला हवी, यासाठी त्या सतत आग्रही राहायच्या.

स्त्रीवाद ही पाश्चिमात्य संकल्पना नसल्याचे त्याचं मत होतं. भारतीय समाजातली विषमता-असमानता-अव्यवस्था-जातीभेद याचं फलित म्हणजे भारतीय स्त्रीवाद अशी मांडणी त्या करायच्या. त्यांनी ‘समाजशास्त्रज्ञ’ म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली असली तरी पुढे त्यांनी कवयत्री म्हणूनही लौकिक मिळवले. त्यांनी स्त्रीवादावर अनेक कविता लिहिल्य. त्यांची ‘’ क्योंकी मै लडकी हू, मुझे पढना है...’’ ही कविता जगभरातल्या स्त्रीवादी कार्यकर्त्यांची प्रेरणा स्त्रोत समजली जाते.
स्त्रीवादी कार्यकर्ती, स्त्री समानतेच्या प्रशिक्षक, स्त्री प्रश्नांवरील संशोधक, विचारवंत आणि तत्वचिंतक या भूमिकेतून त्यांनी केलेलं काम अतिशय मूलगामी, मुलभूत आणि महत्वपूर्ण आहे. व्यक्तिगत जीवनातल्या दु:खद घटनांची मालिका देखील त्याचं मन चळवळीपासून दूर वळवू शकली नाही. आयुष्यातल्या अनेक संकटांचा त्यांनी धीरोदत्तपणे सामना केला. विकासवादी कार्यकर्ती ते स्त्रीवादी विकास कार्यकर्ती ही त्यांची वाटचाल भारतीय स्त्रीवादाला अनुसरूनच झाली असल्याचं त्या समजतात.
स्त्रीवाद म्हणजे नेमका काय?
आपला बहुसंख्य समाज स्त्रीवादाचा स्वीकार करायला खळखळ करतो. प्रथा-परंपरा-चाली-रिती-विचारसरणी-श्रद्धा-अंधश्रद्धा-सामाजिक दबाव-धर्म व पंथाचा पगडा यामुळे महिलांना स्वातंत्र्य द्यायला समाज राजी होत नाही. स्त्रीवादी स्त्रिया स्वातंत्र्य-समानता व बरोबरीच्या सन्मानाची मागणी करतात. स्त्रीवाद म्हणजे महिला आणि पुरुष यांच्यामधलं युद्ध नसून दोन विचारसरणीमधली लढाई होय.
एक जो पुरुषांना वर्चस्व गाजवण्याचं सामर्थ्य देतो आणि दुसरा, जो समानतेचा आग्रह धरतो, अशी मांडमी त्यांनी केली आहे. स्त्रीवादी विचार आणि व्यावहारिक कृती यांच्यामध्ये समन्वय साधला गेला तरच सामाजिक परिवर्तन घडून येतं. वैचारिक अधिष्ठानाची पायाभरणी स्त्रीवादी सिद्धांत करतात. या आधारे व्यवहारामध्ये कृतीशील अंमलबजावणी करण्यासाठी प्रेरणा मिळत असते. यासाठी सिद्धांताला कृतीची जोड देणं गरजेचं असल्याचं त्या ठसवायच्या. त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या लिंगभाव संवेदनशील प्रशिक्षण कार्यक्रमातून याचा प्रत्यय येतो.
कमलादी केवळ स्त्रीवादी गाणी रचून थांबल्या नाहीत तर त्यांनी स्त्रीवादाच्या विविध पैलूंची चर्चा करणारे साहित्यही लिहीलं आहे. What is Patriarchy?, Exploring Masculinity, Boarders and Boundaries: Women in India’s Partition, Understanding Gender, Feminism and its Relevance in South Asia, If Only Someone Had Broken the Silence आणि मार्च 2020 मध्ये प्रकाशित झालेलं From Patriarchy to Equality: Feminism in South Asia यासारख्या अभ्यासपूर्ण ग्रंथांचे लेखन त्यांनी केलं आहे.
आपल्या पुस्तकांमधून त्यांनी पितृसत्ताक वादाचा उगम व त्याचे सामाजिक दुष्परिणाम, पुरुषत्वाची संकल्पना व लिंगभाव समानतेचे महत्व, महिलांच्या नजरेतून फाळणीची दाहकता, आशियाई देशातल्या स्त्रीवादी कार्यकर्त्यांची कामगिरी, बाललैंगिक शोषणाचे दाहक वास्तव, पितृसत्ता कडून समानतेकडे वाटचाल अशा विविध घटकांवर साक्षेपी प्रकाशझोत टाकलेला आहे. फाळणीवरचं पुस्तक त्यांनी रितू मेनन यांच्या साथीनं लिहिलं आहे. त्यांच्या पुस्तकांचा मराठी-हिंदीसह अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.

‘कॉस्मस्टिक आणि पोर्न इंडस्ट्री’ महिलांच्या शोषणाला जबाबदार
महिलांचे मानवी हक्क डावलणाऱ्या भांडवलवादी अर्थव्यवस्थेचा पाया ‘शोषणा’वर आधारलेला आहे. माणूस म्हणून स्त्रीचं अस्तित्व नाकारून फक्त एक शरीर म्हणून स्त्रीकडे बघितलं जातं. सबंध दुनियेत फोफावलेली ‘कॉस्मस्टिक इंडस्ट्री’ आणि ‘पोर्न इंडस्ट्री’ हे याचं चपखल उदाहरण असल्याचं त्या सांगायच्या. हे दोन्ही उद्योग स्त्री देहाशी निगडीत आहेत. दोन्हींची आर्थिक उलाढाल प्रचंड मोठी आहे.
यातूनच महिलांवरील अत्याचार, महिलांविरोधाच्या हिंसाचारात वृद्धी होताना दिसते. भांडवलशाहीत हरेक बाब विक्रीयोग्य समजण्यात येते. हाडामांसाची व्यक्तीसुद्धा माणूस म्हणून ओळख हरवते आणि फक्त एक विक्रीक्षम वस्तू म्हणून शिल्लक राहते. या व्यवस्थेत ‘नफा’ हेच सर्वस्व मानलं जातं. या विचारातून एक व्यवस्था म्हणून त्या भांडवलवादाच्या विरोधात जातात. त्यांच्या मते, भांडवलवाद हा पितृसत्ताकवादाचा अभिकर्ता (एजंट) आहे. ‘मालकी हक्क’ हा भांडवलवादाचा गाभा आहे.
स्त्रीवरील मालकी हक्काच्या बिजांचे रोपण कुटुंबातूनच होत असतं. यासाठीच कुटुंबात ‘लिंगभाव समानता’ प्रयत्नपूर्वक वाढीला लावायला हवी असा आग्रह त्या करायच्या. भारतासह दक्षिण आशियाई देशांमध्ये मोठी सांस्कृतिक क्रांती होण्याची गरज असल्याचे कमलादी म्हणत होत्या. कारण या देशांमध्ये अजूनही महिलांना संस्कार-परंपरा-संस्कृतीच्या आवरणाखाली दुय्यम समजण्यात येतं. पितृसत्तेची बंधने त्यांच्यावर लादली जातात. संविधानाने दिलेले समानतेचे अधिकार नाकारून धार्मिक कर्मकांडानुसार आचरण करण्यास भाग पाडले जातं.
भारतीय स्त्रीवादाचा विस्तार, विकास आणि समृद्धी यासाठी सतत कार्यमग्न राहून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत ‘स्त्रीवाद’ पोहचवण्यासाठी कमला भसीन यांनी दिलेलं योगदान अनन्यसाधारण आहे. भारतीय स्त्रीवादाच्या इतिहासात कमला भसीन याचं कर्तृत्व सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल यात शंका नाहीये!






