सध्याच्या काळात प्रेमाची व्याख्या, नात्यांमधील संबंध बदलत असले तरीही, प्रेमाची जाणीव, लोकांच्या मनीषा आणि गरजा त्याच आहेत. आपल्या समाजात प्रत्येक गोष्टीसाठी एक वय निश्चित केलं गेलंय. लग्न, मुलांना जन्म देणं आणि डेटींगचंही वय आहे. आश्चर्याची गोष्ट ही की एकीकडे भारतीय समाज, प्रेम, नाती, कुटुंब यांची भलामण करतो तर दुसरीकडे प्रौढ लोकांना विशेषतः स्त्रियांना प्रेमाचे, कुटुंबाचे, डेटींगचे दरवाजे मात्र बंदच ठेवतो.
एकीकडे समाज हे सांगत राहतो की तुम्हाला जोडीदाराची गरज लागतेच. दुसरीकडे एकल स्त्रियांचा, ‘चरित्रहिन’ आणि ‘अवघड’ म्हणून अपमान केला जातो. कधी ‘फेमिनिस्ट’ म्हणून टिंगल केली जाते. जेव्हा प्रौढ स्त्रिया एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात जातात तेव्हा त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते की त्या आपल्या नवऱ्यासोबत येतील. एखाद्यानं अचानक येऊन विचारणं की, तुम्ही लग्न कधी करणार, किंवा लग्न का करत नाही, या गोष्टी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या आघात करणाऱ्या असतात.
लग्नसमारंभात तर अशा एकल बायकांना अपमानित किंवा लज्जीत करण्यात लोकांना आनंदच वाटतो. त्या स्त्रिया आपल्या आयुष्यात कितीही यशस्वी असल्या तरीही, त्यांचं लग्न होत नाही तोवर त्या यशाला मान्यता मिळत नाही. बम्बलच्या अभ्यासानुसार, भारतात, 5 पैकी 2 म्हणजे 39 टक्के डेटर्सनी सांगितलंय की त्यांच्या घरातले लोक, लग्नाच्या दिवसांत त्यांच्यावर लग्नासाठी दबाव टाकतात. 39 टक्क्यांना ते कधी लग्न करणार असं विचारलं जातं. एकल लोकांवरही असाच दबाब असतो.

कमी वयापेक्षा जास्त वयाच्या काळात डेटींग करणं अधिक आव्हानात्मक
आपल्या समाजात कमी वयापेक्षा जास्त वयाच्या काळात डेटींग करणं अधिक आव्हानात्मक असतं. याविषयी कोलकाताच्या इन्स्ट्रक्शनल डिझायनर इंद्राणी मुखर्जी सांगतात, “मी चाळीशीची आहे. जेव्हा मी टीनएजर होते तेव्हा प्रेम करणं किंवा लव्ह मॅरेज मोठी गोष्ट वाटायची. मी बायसेक्सुअल असल्याने एखाद्या बाईशी डेटींग करणं कठीणच होतं. सेक्स अजूनही अमान्य असला तरीही प्रेम आणि डेटींग चालून जातं. माझ्याकडे आता डेटींग एप्स आहेत. आधी कोणी आवडलं तरीही सांगणं कठीण व्हायचं. पण टेक्नॉलॉजी, सामाजिक बदल आणि स्वतःची जाण यामुळे या वयात डेटींग करणं पूर्वीपेक्षा सोपं जातं.”
इंद्राणीचा घटस्फोट झालाय. तिला पुन्हा लग्न करण्याऐवजी, डेटींग करून आपलं आयुष्य मनासारखं जगायचं आहे. पितृसत्ताक समाजात हे समजणं आणि मान्य करणं कठीण आहे की, स्त्रियांच्या काही गरजा असू शकतात आणि लग्नाच्या आधी किंवा लग्नाशिवायही त्या कोणासोबत राहू शकतात.
याविषयी मुंबईच्या मनोविश्लेषक तनुश्री (नाव बदललंय) सांगतात, “अजूनही डेटींगमध्ये लैंगिक हिंसाचार आणि खोटेपणा आहेच. पण माझ्या लहान वयात असताना मी जे करायची त्यापेक्षा या वयात मी डेटींग काळजीपूर्वक करते. मी आधी त्या माणसाला समजण्याचा प्रयत्न करते. मला लक्षात आलंय की मी आजवर ‘फ्री इमोशनल लेबर’ करत होते.
पण आता मी कोणाही अशा माणसासोबत डेट करणार नाही जिथे मला काही अडचण जाणवेल. माझ्यासाठी डेटींग सोपं आहे. त्यामुळे मी सल्ला देईन की कोणा एकाची निवड करण्याआधी अनेकांशी डेट करणं गरजेचं आहे.” तनुश्री म्हणते की तिला आज अशी अपेक्षा नाही की तिच्या सर्व गरजा एकच माणूस पूर्ण करेल.
“एकानं मला यासाठी नकार दिला होता की मी बौद्धिकदृष्ट्या खूप हुशार आहे’’
भारतीय समाजात पुरुष अनेकदा आपल्या जोडीदाराला जास्त शिकलेली, कमावणारी, सोशल असलेली सहन करत नाहीत. यावर तनुश्री म्हणते, “एकानं मला यासाठी नकार दिला होता की मी त्याच्यापेक्षा बौद्धिकदृष्ट्या खूप हुशार आहे आणि जास्त कमावते. तो माझ्यासाठी कटू अनुभव होता. मला वाटतं की आजही भारतीय पुरुष डेट करतांना स्त्रियांना कमी दाखवण्याची संधी शोधतच असतात.”
आज केवळ मेट्रो सिटीतच नाही तर शहरांमध्ये, गावांतही बाया एकटं राहणं पसंत करतात. त्याला कुटुंबात, समाजात विरोध होतोच. कारण एकटं राहण्याला अनेकदा जगण्यातलं अपयश, एखादी व्यक्तिगत दोष, याच्याशी जोडलं जातं. यावर इंद्राणी सांगतात, “माझ्यासाठी माझं स्वातंत्र्य आणि स्पेस गरजेची आहे. मी ती कोणासोबतही वाटून घेणार नाही. एकटेपणा माझ्यासाठी शारिरीकपेक्षा भावनिक जास्त आहे. मला नक्कीच वाटतं की कोणीतरी हवं ज्याच्यासोबत मी घरी आल्यावर अनेक गोष्टी बोलू शकेन.

पण मी त्याच्यासोबत 24 तास एकत्र नाही राहू शकणार.” ज्या समाजात सेक्सवर बोलणंही चुकीचं समजलं जातं तिथे स्त्रियांनी त्यांच्या गरजांविषयी बोलणं, नात्यात एक मर्यादा ठेवणं कठीण गोष्ट असते. ती जर टीनएजर असेल तर हे जास्त जाणवतं. यावर तनुश्री सांगतात, “माझ्या लैंगिक गरजांविषयी मी उघडपणे बोलत असते. तरीही माझ्यासोबत लैंगिक हिंसा झाली आहे. अनेकदा लोक ऐकायला तयार नसतात. पण लैंगिक संबंधाबाबत मी निश्चितच अधिक चांगल्या अवस्थेत आहे.”
आपल्या पितृसत्ताक समाजात जिथे स्त्रियांसाठी सर्व गोष्टी पुरुष, समाज ठरवतात तिथे एखाद्या बाईला एकटं राहणं फार कठीण जातं. ते सामाजिक नियमांच्या विरोधात मानलं जातं. आदर्श स्त्रीच्या भूमिकेत एकटी बाई कधीच फिट बसत नाही. जी आपल्या इच्छेनं एकटी आहे, प्रौढ वयात जी लग्नाऐवजी डेटींगचा विचार करते आहे. अनेकदा आपल्या कडवट अनुभवांमुळे प्रौढ बाया दुसरं लग्न किंवा लिव-इन रिलेशनशिपचा विचार करत नाहीत.
भारतीय समाजात लग्न किंवा जोडीदाराची निवड ही कौटुंबिक गोष्ट असते त्यामुळे बाया आपल्या जोडीदाराची निवड स्वतः करतात तेव्हा समाजासमोर दुहेरी आव्हान उभं राहतं. मोठ्या शहरांत लोक आता वेगवेगळ्या लैंगिकतेला समजू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी भिन्नलिंगी नात्यांबाहेर डेटींग करणं सोपं जातंय. तरीही डेटींग निश्चित कारणांसाठी केलं जातं.
जेव्हा मर्यादित वेळेत लग्नापर्यंत गोष्ट नेण्याचा प्रयत्न केला जातो. यावर इंद्राणी सांगतात, “डेटींग माझ्यासाठी कधीही गोल ओरिएन्टेड नव्हतं. पण माझ्याकडे विशेषाधिकार आहे की मी डेटींग फक्त डेटींगपुरतीच मर्यादित ठेवू शकते.” तनुश्री याविषयी सांगतात, “कधी कधी माझ्या आईवडिलांच्या नियंत्रणातून बाहेर पडण्यासाठी मला वाटतं की माझं लग्न झालं असतं तर अशा गोष्टी घडल्या नसत्या. मुलगी एकटी असेल तर तिनं आपल्या कुटुंबाची देखभाल करावी ही मान्यताही अडचणीची ठरतेय.”
एका वयानंतर स्त्रियांमध्ये डेटींगविषयी शंका असल्या तरीही, त्यांना आपल्या डेटींग पार्टनरकडून काय हवंय आणि त्या कोणत्या गोष्टीत तडजोड करणार नाही, याविषयी स्पष्ट असतात. आज बायकांसाठी डेटींगचे अनेक अर्थ आहेत. काहींना डेटींगमधून लग्न किंवा पुनर्विवाह करायचा असतो. काहींनी विनाशर्त सोबत हवी असते. काहींना लैंगिक संबंध हवे असतात, ज्यात स्वतःची आवड जपायची असते.
दुसरीकडे ही भीतिदायक गोष्टही असू शकते. फसलेलं लग्न, बिघडलेलं नातं, दीर्घकाळ डेटींग न केल्यानं आलेला तणाव अशा नकारात्मक गोष्टींमुळे इतरांवर प्रभाव पडू शकतो. डेटींग एकीकडे परिपूर्ण, संतुष्टी देणारी, जीवनात नवा अनुभव देणारीही असू शकते आणि याच्या उलटही. त्यामुळे डेटींगसाठी स्त्रियांवर दबाव आणणं किंवा बंदी घालणं दोन्ही चुकीचंच. एकाद्या बाईला कोणासोबत राहायचंय किंवा नाही राहायचंय हा तिचा वैयक्तिक निर्णय असायला पाहिजे. त्याचवेळी डेटींगमध्ये आलेल्या वाईट अनुभवांसाठी त्या बाईला जबाबदार ठरवणं किंवा लज्जीत करणंही टाळायला पाहिजे.
(सौजन्य - फेमिनिजम इन इंडिया)
अनुवाद - प्रतिक पुरी






