- रचना
संगीताने पिढ्यानपिढ्या जगभरातील संस्कृती आणि समाज यांना आकार दिला आहे. संगीताची भाषा नसूनही ते सर्वांनाच समजते. यात एखाद्याचा भाव बदलणे, विचारांना बदलणे तसेच बदलांना प्रेरीत करण्याची शक्ती असते. सर्वांचा संगीताशी व्यक्तीगत संबंध असतो.
गाण्यांमधून आम्ही रोजच्या जगण्यातील अनुभव सांगण्यासाठी, शांती मिळण्यासाठी, स्वतःला व्यक्त करण्यासाठी, आपल्या भावना समजण्यासाठी तसेच इतरांना समजावण्यासाठी, आपला आवाज किंवा विचार इतरांपर्यंत पोहोचवत असतो. गाणं असे माध्यम आहे ज्यातून आपण सहजपणे एखादी गोष्ट किंवा विचार सांगू शकतो. आज जगात प्रेम, क्रांति, धर्म, शिक्षण, युद्ध, लोकभावना यांची गाणी मिळतात.
पण सध्या जी गाणी आम्ही ऐकतोय त्यातून समाजात समानता किंवा समाज सुधारण्याचा काही विचार व्यक्त होतोय की नाही हे बघावे लागेल. पूर्वी चित्रपटातील गाणी प्रगतीचा उद्घोष करायची. सामाजिक भेदभाव, विषमता, स्त्रियांच्या समस्या, निसर्ग इत्यादी विषयांवर गाणी असायची. सध्या अशी गाणी ऐकायला मिळतच नाही. क्वचित गाणी अशी आहेत ज्यातून काही सामाजिक संदेश दिला गेला आहे. आता तर या गाण्यांमधून लिंग, जाती, स्त्रीच्या शरीरावर सरळ हल्ला करण्यात येत आहे.
आपल्या समाजात जात आणि लिंग हे दोन मुद्दे एकमेकांशी संबंधित आहेत. आजवर यावर गाणी झाली आहेत. काही नकारात्मक तर काही सकारात्मक. एरव्ही गाण्यांमधून स्त्रीच्या शरीराचं वस्तूकरण झाल्याचं दिसून येतं. ट्रान्स समुदायाला कमी लेखलं जातंय. या गाण्यांमधून पुरुषांच्या शरीराचं वस्तूकरण दिसत नाही. त्यांना जास्त करून शक्तीशाली, अल्फा किंवा सिग्मा पद्धतीनं रंगवण्यात येतं. पुरुषांचं उदात्तीकरण करणं हाच या गाण्यांचा उद्देश असतो.

हल्लीच्या गाण्यांमधून लैगिक हिंसेला अधिक प्राधान्य
काही गाण्यांमधून लैंगिक हिंसा आणि रितीवाद यांना प्रोत्साहन दिलं जातं. काही गाणी नावांवर आधारीत असतात, उदा. मुन्नी बदनाम हुई, शिला की जवानी, पिंकी है पैसोंवालों की..या नावाच्या मुलींना नंतर लैंगिक हिंसाचाराला सामोरं जावं लागतं. त्यांची छेडखानी केली जाते. ही गाणी लैंगिक भेदभावाने भरलेली असतात. नसीब चित्रपटातील एक गाणं आहे- भला है बुरा है, जैसा भी है मेरा पती मेरा देवता है। इथं नवऱ्याला पती परमेश्वर समजा असं सांगण्यात येतंय. मग तो कसाही का असेना! अशा गाण्यांमधून पितृसत्तेला छुपं समर्थन दिलं जातं.
राजी चित्रपटात एक गाणं आहे- फसले जो काटी जाएँ उगती नहीं, बेटीयाँ जो ब्याही जाएँ मुड़ती नहीं है। अशी गाणी स्त्रियांसाठी अडचणीची ठरतात जेव्हा त्यांच्यावर अत्याचार होतात. लग्नातील बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार इत्यादीत त्यांना ही आशा नसते की त्या आपल्या माहेरी गेल्या तर त्यांचा स्वीकार होईल म्हणून. पण या गाण्यातून असाच संदेश दिला जातो. काही गाणे कर्मकांडाला वाढवतात. एक भोजपूरी गाणे आहे, लहंगा उठा दे रिमोट से। अशी गाणी लैंगिक हिंसेला उत्तेजन देतात. स्त्रियांवर हा अप्रत्यक्ष बलात्कारच असतो.
‘फटा पोस्टर निकला हिरो’ या चित्रपटातील गंदी बात गाण्याचा सारांश हा की यातला नायक हा नायिकेच्या येण्याची वाट बघत होता. त्याने चांगलं होण्याचा प्रयत्न केला पण तिनं त्याला भाव दिला नाही. (राजा बेटा बनके मैंने जब शराफ़त दिखाई, तुने बोला, हट्ट मवाली, भाव नहीं दिया रे) त्यामुळे आता तो चांगलं वागणं बंद करून तिच्यासोबत गंदी बात करणार आहे. या गाण्यात एक धमकी दिसून येते. चिट्टीया कलाईयाँ गाणे हे ऐकायला बरे वाटते पण त्यातही मुझे शॉपिंग पर ले चलो, मुझे मुवी देखने के बाहर ले चलो अशा ओळी आहेत. तसेच मुलीला स्वतःच्या गोऱ्या रंगावर खूप गर्व आहे. एका स्त्रीची किंमत तिच्या गोऱ्या रंगावरच अवलंबून असते का?
बॉलिवूडची गाणी आणि ट्रान्सजेंडर समाजाची चेष्टा
ट्रान्सजेंडर समुदायाला गाण्यांतून अनेकदा अपमानित केलं जातं. तय्यब अली प्यार का दुश्मन हाय हाय या गाण्यात ट्रान्सजेंडर लोकांना रस्त्यावर टाळ्या वाजवत हाय हाय म्हणताना दाखवण्यात आलं आहे. त्यांची ही प्रतिमा त्यांना उत्सवात, रस्त्यांवर, ट्रेन किंवा बस मध्ये नाच किंवा टाळ्या वाजवत पैसे मागण्यापूरतं मर्यादित करते. काही गाणी जातीवर आधारीत असतात. उदा. दाबे से जो दबे ना, ऐसी ठाकूर की जात है किंवा बहु बन जा राजपुताने की किंवा भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा किंवा राम नाम के नारों से बाबर की बाबरी टूँट गई अशा गाण्यांमधून धार्मिक तणाव वाढतो आणि समाजातील सौहार्द संपतं.
या गाण्यांमुळे जातिय व धार्मिक भेदभाव वाढतो आणि हिंसाचाराला प्रोत्साहनही मिळतं. ही गाणी द्वेष पसरवतात आणि अनेकदा दंगलीचं कारणही बनतात. समाजात शांती आणि समानता आणि सामंजस्य टिकवून ठेवण्यासाठी अशा गाण्यांवर बंदी आणायला पाहिजे.

पितृसत्ता आणि रुढींना आव्हान देणारी गाणी
सध्या बेकारी, गरीबी, शिक्षण, शेतीच्या समस्या, स्त्रियांच्या समस्या वाढल्या आहेत पण त्यावर गाणी दिसून येत नाही. काही प्रगतीशिल लेखक, गीतकार यावर गाणी करतात. पण त्यांचाही मोठा विरोध केला जातो. हायवे चित्रपटातील पटाका गुड्डी हे गाणं स्त्री स्वातंत्र्याला समर्पित आहे. दंगल चित्रपटातील धाकड है गाणं जगासमोर आपली शक्ती दाखवणाऱ्या मुलींसाठी एखाद्या एंथमपेक्षा कमी नाही. पिंक चित्रपटातील पिंक एंथम गाणं असंच स्त्रियांना आपल्या पद्धतीने जगण्याचा आनंद घेताना दाखवते. अशी गाणी पितृसत्ता आणि रुढींना आव्हान देतात. जात आणि लिंग या मुद्द्यांवरील गाण्यांनी समाजाला प्रभावित केलं आहे. यातल्या भेदभावांना गाण्यांमधून आव्हान देण्यात आलं आहे.
गाणी, चित्रपट, रेडियो ही फक्त मनोरंजनाची साधनं नाही आहेत तर समाजात चांगल्या विचारांचा प्रसार करण्याचं माध्यमही आहे. त्याचा लोकांच्या मानसिकतेवर प्रभाव पडतो. त्यामुळे गीतकार, गायक, संगीतकार, चित्रपट निर्माते यांनी अशा गाण्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे ज्यातून समाजात जागरूकता येईल, चांगले विचार वाढतील. हिंसा आणि द्वेष यांना नकार देण्याची हिम्मत वाढेल.






