किताबें करती हैं बातें
बीते ज़मानों की
दुनिया की, इंसानों की
आज की, कल की
एक-एक पल की
ख़ुशियों की, ग़मों की
जीत की, हार की
प्यार की, मार की
क्या तुम नहीं सुनोगे
इन किताबों की बातें?
किताबें कुछ कहना चाहती हैं
तुम्हारे पास रहना चाहती हैं
सफदर हाशमी यांच्या या ओळी. पुस्तकांच्या दुनियेत हरवून जाणाऱ्या सर्वच वाचकांना या ओळी मनापासून भावतात. याच पुस्तकांच्या वाचनातून प्रतिभेचा आविष्कार घडवत लेखक, कवी आपल्या कलाकृती साकारतात. आज जागतिक पुस्तक दिवस. या दिवसाच्या निमित्ताने आपण आज अनोख्या कवींच्या कलाकृतीची माहिती पाहणार आहोत. काव्याच्या माध्यमातून सृजनाचा, प्रतिभेचा आविष्कार घडवणारे अनेक कवी आपण पाहिलेत. पण पोरसवद्या वयात सातवी – आठवीच्या वर्गातील मुलींनी कविता लिहिल्या आहेत यावर आपला विश्वास बसणार नाही. परंतु हे घडलंय नाशिकच्या एका शाळेत. नाशिक महानगरपालिकेच्या आनंदवली शाळा क्रमांक 18 च्या सातवी व आठवी वर्गातील मुलींनी स्वतःच्या कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे. कविता उमलत्या कळ्यांच्या या नावाचा हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला असून आशयगर्भ कविता यातून आपल्याला वाचायला मिळणार आहेत. नारायण सुर्वे म्हणतात की, अनुभवाची कविता होते. त्याप्रमाणे त्या त्या वयातील भावविश्व त्याच वयोगटातील व्यक्तींकडून लेखनात आले तर त्याचे महत्व अधिक असते कारण समानुभूतीचा प्रत्यय वाचकांना येतो. या मुलींनी लिहिलेल्या कविता त्यांच्याच वयोगटातील मुले मुली वाचतील तेव्हा त्यांना त्या जवळच्या वाटतील. इतके मूलभूत काम करण्यासाठी व या मुलींना काव्य शिकवण्यापासून ते त्यांच्या कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यापर्यंत मोलाची भूमिका बजावली आहे. आनंदवली शाळेच्या शिक्षिका कुंदा शिंदे यांनी त्यांना ही कल्पना कशी सुचली याबाबत बाईमाणूसशी बोलताना कुंदा शिंदे म्हणाल्या की,

“आम्ही आमच्या शाळेत गेले वर्षभर लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम राबवत आहोत. सोबतच आम्ही दररोज कवितांचा तास सुरू केला होता. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहून आम्ही दररोजच्या परिपाठामध्ये काव्यवाचनाचा समावेश केला. त्यातूनच ही कल्पना समोर आली.”
75 हून अधिक कवितांचा समावेश या काव्यसंग्रहात आहे. जेमतेम सातवी आठवीच्या मुलींच्या कविता खूप काही सांगून जातात. त्यापैकीच एक असलेली, रंजना गौड ही तिच्या मैत्री या कवितेत, मैत्रीच्या नात्यावर लिहिते,
आज आहे तसेच
उद्या कायम राहील
लोक रूप पाहतात,
आम्ही हृदय पाहतो
लोक स्वप्न पाहतात
आम्ही स्वप्नात मैत्री पाहतो
आणि मैत्री मध्ये जग पाहतो…

ऐन सातवीत मैत्रीच्या नात्याची समज काव्यातून प्रकट करणाऱ्या या किशोरवयीन कवयित्रीचे व तिला प्रोत्साहन देणाऱ्या कुंदा शिंदे यांचे कार्य कौतुकास्पदच. आनंदवली शाळेने उमलत्या कळ्यांना बहरण्यास खऱ्या अर्थाने पोषक वातावरण उपलब्ध करून दिले. अनेक नवनवीन उपक्रम कुंदा शिंदे यांनी त्यांच्या शाळेत सुरू केले आहेत. हँगिंग लायब्ररी हा देखील एक आगळावेगळा उपक्रम त्यांनी राबविलेला आहे. तीन मजली शाळेच्या इमारतीमध्ये पुस्तके अडकवून ठेवण्यात आली आहेत. जेणेकरून विद्यार्थी येता जाता ती पुस्तके वाचतील. याबद्दल शिंदे म्हणतात,
“यातून विद्यार्थ्यांना पुस्तकांची आवड निर्माण झाली आहे. जेवणाचा डबा खाऊन झाला की मुली लगेच पुस्तके वाचायला घेतात. माझ्या वैयक्तिक संग्रहातील बहुतांश पुस्तकांच्या माध्यमातून आम्ही ही ‘हँगिंग लायब्ररी‘ साकारली आहे. आधी पुस्तके खराब होतील, गहाळ होतील याची भीती होती मात्र आमच्या विद्यार्थ्यांनी जेवढी मी काळजी घेतली त्यापेक्षा जास्त काळजी या पुस्तकांची घेतली आहे.”

वाचनसंस्कृती व वाचकांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्याचे म्हणले जाते. परंतु असे स्तुत्य उपक्रम नाशिक महानगरपालिकेच्या आनंदवली शाळेतून राबवले जात आहेत. जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा…





