महिलांचे जीवन म्हणजे ‘चूल आणि मुल’ ही म्हण अनेक वर्षापासून प्रचलित आहे. पण सध्याच्या परिस्थिती ती म्हण नाहिशी होताना दिसते. महिलांची उंची तिच्या कुटुंबात किंवा तिच्या समाजापर्यंत मर्यादीत नसून, ती देशात अन् जगात दिसत आहे. आताच्या महिला अनेक क्षेत्रात आपले कर्तुत्त्व आजमावत आहेत. सरपंचापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत आपण महिलांना पाहत आहोत. हे पाहता चूल आणि मुलं या म्हणीत महिला अडकल्या आहेत, असे सध्या तरी दिसत नाही. महिला क्रीडा क्षेत्रातही भरारी घेताना दिसत आहेत. त्यात मैदानी खेळ खेळणं हे विशेष. नुकतंच मुंबईतील मानखुर्द येथे महिला कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या कबड्डी टुर्नामेंटमध्ये मुंबईतील रिहाना शेख यांनी भाग घेतला होता. घरं सांभाळत, महिलांना एकत्र करून स्वत:ची टीम तयार करून त्यांनी मैदानात खेळून दाखवलं. त्यांच्याविषयी थोडक्यात…

मुंबईतील गोवंडी भागातील राहणाऱ्या रिहाना शेख. त्याचं सात लोकांचं कुटूंब आहे. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने नवरा-बायको मजुरी करुन घरचा संसार चालवतात. रिहाना या पेशन्टची देखभाल करण्याचं काम करतात. कोरोनाच्या काळात ‘कोरो इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेच्याच्या टीमचं काम बघून आपणही आपल्या भागातील लोकांसाठी काम करायला पाहिजे, या उद्देशाने रिहाना या ‘कोरो’शी जोडल्या गेल्या. गेली तीन वर्षे झाली त्या कोरो इंडियासोबत गोवंडी परिसरात काम करत आहेत. स्वतःचं काम सांभाळत रिहाना आपल्या परिसरातील प्रश्न सोडविण्यासाठी मदत करीत आहेत. या परिसरातील अनेक छोटे-मोठे प्रश्न सोडविण्यासाठी महिलांच्या बैठका घेऊन, त्यांच्याशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याचं काम करतात.
रिहाना स्वतः नवीन गोष्टी शिकून महिलांनीही शिकावं यासाठी प्रयत्नशील असतात. रिहाना सांगतात, ”एकदा उस्मानाबादला कबड्डीची टूर्नामेंट होती. कोरो इंडियाकडून माझं नाव दिलं होतं. काय कबड्डी खेळायचं..? असा आश्चर्यजनक प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. सुरुवातीला संस्थेत काम करायला घरचा विरोध होता. त्यात कबड्डी खेळायला जाणं, हे माझ्यासाठी आव्हानात्मक होतं. मला तर कबड्डी खेळायचं होतं. मी घरी काहीच नाही सांगितलं. कबड्डी खेळायचं असेल तर सराव पाहिजे, त्यासाठी मी शक्कल लढवली. आणि घरातून एक तास अगोदर कामाला जायला सुरुवात केली. तो एक तास मैदानावर जाऊन सराव करीत होते. उस्मानाबादला ज्यावेळी खेळायला जायची वेळ आली. त्यावेळी अवघड झालं. घरातल्याना शंका होती की, मी खेळायला निघाली. मी त्यांना समजावून सांगितलं. मी खेळायला जाणार नाही. बहिणीसोबत फिरायला जाणार आहे. हा खेळ केवळ बाहेरून बघणार आहे. खेळून आल्यावर सांगितलं, मी कबड्डी खेळायला गेले होते. त्यावेळी मात्र घरातले सर्व लोक माझ्यावर रागावले.” रिहाना यांनी घरच्यांना पटवून सांगितलं. माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या महिला कबड्डी खेळत होत्या. त्यामुळं मलाही वाटलं की, मीही कबड्डी खेळू शकते. आपण पुढे गेलो तर आपली मूलंही पुढे जातील. हाच विचार मनात पक्का केला. आणि मी मैदानात उतरले.

कबड्डी स्पर्धा झाल्यानंतर माझे फोटो, व्हिडिओ गोवंडी भागातील महिलांना दाखवले. स्पर्धेत मला मेडल देखील मिळाले होते. तेही मी जितक्या महिलांना दाखवता येईल. तेवढ्या महिलांना दाखवले. फोटो, व्हिडिओ, मेडल पाहून महिलांनाही काहीतरी करण्याचा उत्साह मनात आला. त्यावेळी काही महिलांनी सकारात्मक प्रतिसाद देत आम्हीही खेळू शकतो, असा शब्द उच्चारला. घरात बसून काही होणार नाही. घरचं तर आयुष्य कायम जगतच आहोत. पण बाहेरचं आयुष्य कसं जगणार? असा प्रश्न महिलांनीच उपस्थित केला.
रिहाना सांगतात, मुंबई येथे मार्च महिन्यात कोरो इंडिया आणि गर्व स्पोर्ट्स क्लब यांनी कबड्डी टुर्नामेंटचं आयोजन केलं होतं. त्यावेळी मलाही वाटलं की, माझीही एक स्वत:ची टीम असावी. म्हणून मी परिसरातील महिलांशी बोलले. त्यांना समजावून सांगितले. ज्या महिलांची इच्छा होती. त्या अनेक महिलांनी माझ्याकडे नावे दिली. काही महिलांना तर घरातून विरोध होता. त्या घरातील सदस्यांना समजावून सांगणं जरा कठीण होतं. एवढी मोठी स्पर्धा, आपल्या महिला टी-शर्ट घालणार आणि तेथे जाऊन कबड्डी खेळणार, असे अनेक प्रश्न काही महिलांच्या घरातील सदस्यांनी उपस्थित केले होते. कसंतरी नऊ महिलांची टीम तयार केली. आता एक मोठा प्रश्न पडला की, सराव कसा करायचा? एकीकडे माझी नोकरी होती. दुसरीकडे डोळ्यासमोर स्पर्धा. या दोन्हीचे नियोजन कसे करावे, हे सुचत नव्हते. मग नोकरीला जाण्याच्या आधी आम्ही सराव लागलो. सुट्टीच्या दिवशीही घरात न सांगता सराव घेण्यासाठी बाहेर जायची. असं करत पंधरा ते वीस दिवस आम्ही सराव केला. आणि आम्ही स्पर्धेत उतरण्यास तयार झालो.”

”स्पर्धेच्या दिवशी आम्ही लवकर आवरून दुपारपर्यंत तेथे पोहचलो. कबड्डी टूर्नामेंटमध्ये 17 टीम आणि 180 महिला खेळाडू सहभागी झाल्या होत्या. त्यात आमचीही एक टीम होती. जिंकू अगर हारु हे आम्हाला महत्त्वाचे नव्हते. पण आम्ही मैदानात खेळणं हे आमची इच्छा होती. आम्ही ते करून दाखवलं. आम्ही त्या स्पर्धेत हारलो असलो तरी आम्हाला जिंकल्यासारखं वाटतं. घरातून बाहेर निघून मैदानात खेळलो इथेच आम्ही जिंकलो होतो, अशा महिलांही म्हणू लागल्या,” असे रिहाना सांगतात. गोंवडीसारख्या भागातील एक महिला धाडस दाखवत, स्वत:ची टीम तयार करुन मैदानात उतरते. महिलाही चौकटीच्या बाहेर येऊन स्वत:ला सिद्ध करु शकतात. हे यावरून दिसते.






