हवामान बदलामुळे कमी काळात जास्त पाऊस, पावसांत खंड, दुष्काळ ही कारणे आता पुढे केली जात असली, तरी भारतातील शहरांत विशेषतः मुंबई, दिल्ली, चेन्नई आदी शहरांत थोडा जरी जास्त पाऊस झाला, तरी त्यांना तळ्यांचे स्वरुप येते. गाड्या वाहून जातात. रस्ते, विमानसेवा ठप्प होते.
मुंबईत दोन-तीनशे मिलीमीटर पाऊस काही नवीन नाही. पावसाळ्याअगोदर शहरांत जी कामे व्हायला हवीत, ती होत नाहीत. गटार, नाला सफाईच्या कामावर हजारो कोटी रुपये खर्च केले जातात;परंतु कामे कागदोपत्रीच होतात. नाल्यांत हात धुऊन घेणाऱ्यांची संख्या कमी नाही.
आता मुंबई, दिल्लीसारखीच अन्य शहरांचीही अवस्था झाली आहे. गेल्या महिन्यात पुणे, चिंचवडमध्ये शंभर मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला, तर किती हाहाकार झाला होता, हे पाहिले आहे. बंगळूरमध्ये दोन वर्षांपूर्वी ट्रॅक्टरमधून लोकांना बाहेर काढावे लागले.
सर्व इमारतींच्या पार्किंग दोन दिवस पाण्यात होत्या. शहरांतर्गत वाहतुकीसाठी बोटींची व्यवस्था करावी लागते, की काय अशी अवस्था आता शहरांची झाली आहे.
केवळ हवामान बदलावर त्याचा ठपका ठेवून उपयोग नाही. विकासाच्या नावाखाली ‘इको-सिस्टीम’ धोक्यात आणली, तर दुसरे काय होणार? मुंबईत पाऊस पडला, तर मुंबईची जीवनरेखाच बंद पडते.
देशाची आर्थिक राजधानी म्हटली जाणारी मुंबई प्रत्येक वेळी पावसाच्या काही तासांतच पाण्यात बुडते, याचे कारण काय? त्यामागचे कारण अतिक्रमण किंवा शहरातील वस्ती कमी; पण नैसर्गिक रचना जास्त आहे.
दोन दशकांपूर्वीच्या 26 जुलैला 24 तासांत 900 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला. त्या वेळी मुंबईत मिठी नावाची नदी असल्याचा शोध लागला. अतिक्रमणातून नद्या, नाले सुटले नाहीत. पुण्यात दोनशे ओढे, नाले नकाशावरून गायब झाले आहेत.
गल्लोगल्ली काँक्रिटचे रस्ते केल्याने पाणी जिरण्यास वावच राहिला नाही. पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब वाहायला लागणार असेल आणि पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नीट नसेल, तर शहरे तुंबण्यास वेळ लागत नाही. त्यातही प्लॅस्टिक बंदीचा कितीही गाजावाजा केला जात असला, तरी त्याचे उत्पादन थांबवण्याचे धाडस सरकार दाखवत नाही.
कचऱ्यातील प्लॅस्टिक शहरांची तुंबापुरी करण्यात मोठी भूमिका बजावत असतात. एरव्ही शहरे तुंबली, की ओरड करणारे लोकच प्लॅस्टिकच्या वापरात आघाडीवर असतात. 26 जुलैच्या घटनेत पाण्यात अडकून किंवा बुडून 1094 जीव गेले, तर सुमारे 500 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. या घटनेतून किंवा दरवर्षीच्या तुंबणाऱ्या घटनांतून सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था काय बोध घेतात, असे वाटावे तर तशीही स्थिती नाही.
स्त्यावर अडकलेली वाहने, गाड्या रद्द... मुंबईत पावसामुळे जनजीवन विस्कळीत…काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती, काही ठिकाणी भूस्खलन. शहराची वीज एकाच वेळी गायब अशा घटना घडल्यानंतर सातत्याने नियोजन सुरू असल्याचे सांगितले जाते.
हिंदमाता, दादर तसेच हार्बर लाईनवर पंप लावून पाणी उपसा करून पातळी कमी करण्याचा प्रयत्न होतो. हे वरवरचे उपाय आहेत.‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन’ने जपानी कंपनी ‘द जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी’च्या सहकार्याने भूमिगत नदी प्रकल्पावर काम करण्याची चर्चा झाली.
नद्यांना जोडून अशी यंत्रणा तयार करण्यात येणार आहे,की ओव्हरफ्लो झाल्यास पाणी दुसऱ्या ठिकाणी साचून नंतर त्याचा वापर करता येईल; परंतु त्यावर अजून प्रत्यक्षात काहीच काम झाले नाही.
मुंबई हे शहर केवळ अरबी समुद्राने वेढलेले नाही, तर मिठी, दहिसर, ओशिवरा आणि पोयसर या चार नद्यांनीही आहेत. नद्यांव्यतिरिक्त येथे चार खाड्या आहेत. मुंबई आणि परसिराची लोकसंख्या दोन कोटी दहा लाखांहून अधिक आहे. पावसाळ्यात हा सर्व परिसर जीव मुठीत धरून जगतो.
मुंबईकरांच्या लढाऊ वृत्तीचा गौरव करून त्यांना जगण्याच्या लढाईत ढकलून दिले, की यंत्रणांची जबाबदारी संपते. संपूर्ण मुंबईला वेढलेल्या मिठी नदीची रुंदी बहुतेक ठिकाणी फक्त 10 मीटर आहे. रस्ते त्यापेक्षा अधिक रूंद असतात. अशा स्थितीत थोडा पाऊस झाला तरी शहरात पाणी भरायला वेळ लागत नाही.
मुंबईची टोपोग्राफीही वेगळी आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर अनेक ठिकाणी खूप खोल तर अनेक ठिकाणी खूप उंचीवर आहे. सात बेटे परस्परांना जोडून तयार झालेल्या या शहराचा आकार देशातील बहुतेक शहरांपेक्षा अगदी वेगळा आहे. काहीसा सपाट थाळीसारखा आहे. पाऊस सुरू होताच त्यात पाणी आपोआप खाली साचू लागते.
सायन, अंधेरी सबवे, मिलन सबवे आणि खार अशा भागात थोड्या पावसातही ती तरंगतात. पाण्याचा निचरा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. शहराची ड्रेनेज व्यवस्थेचे पाणी समुद्रात जाते; परंतु मुसळधार पावसात किंवा भरतीच्या वेळी समुद्राची पातळी वाढते, तेव्हा पाणी शहरात जाऊ नये म्हणून नाल्यांचे दरवाजे बंद केले जातात.
मुसळधार पावसात, उंच लाटा ड्रेनेज सिस्टीमला अडवतात. पाणी ओसरल्यानंतर या यंत्रणेला पूर्वपदावर येण्यासाठी सुमारे सहा तास लागतात. या काळात ते पाण्याने भरलेले राहते.
भारतासह जगातील बहुतांश शहरांमध्ये पाऊस पडला, की अर्ध्याहून अधिक पाणी जमिनीत मुरते, तर मुंबईत 90 टक्के पाणी नाल्यांमधून बाहेर पडते. त्यामुळे ड्रेनेजवरही मोठा भार पडतो. अतिक्रमण हेदेखील एक कारण आहे.
आर्थिक राजधानी असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येथे येत असतात. इतक्या लोकांना सामावून घेण्याचे नियोजन नाही. मोठी लोकसंख्या सखल भागात राहते. तिला धोकादायक परिस्थितीत राहावे लागते. पाणी बाहेर पडेल किंवा जमिनीत जाईल अशी व्यवस्था नाही. त्यामुळे हलक्या पावसातही अनेक भागात पाणी साचते.

गेल्या काही काळापासून जपानच्या मदतीने मुंबईत भूमिगत विसर्जन वाहिनी होणार असल्याची चर्चा होती. जपाननेही आपल्या टोकियो शहरात हा प्रकल्प तयार केला. जपानच्या हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, टोकियोमधील 3.5 कोटींहून अधिक लोकसंख्या नेहमीच पुराच्या धोक्यात राहते.
आपले लोक आणि पायाभूत सुविधा वाचवण्यासाठी जपानने भूमिगत वाहिनी बांधली. पुराचे पाणी किंवा जास्तीचे पाणी या जलवाहिनीत येते, तेथून ते पंपाद्वारे इडो नदीत सोडले जाते. मुंबईचा ‘स्पंज सिटी’प्रमाणे विकास करण्याचीही चर्चा आहे. ‘स्पंज सिटी’ ही एक संकल्पना आहे.
ज्यात हे शहर स्पंजसारखे काम करील, अशी अपेक्षा आहे. याअंतर्गत शहराची रचना अशा पद्धतीने करण्यात येणार आहे, की पाणी लगेच जमिनीत जाईल आणि नाल्यांवर कोणताही भार पडणार नाही. यामध्ये ‘ग्रीन स्पेस’ वाढविण्यात येणार आहे.
पुण्यातील पुराचे प्रमुख कारण म्हणजे शहराभोवती वाहणाऱ्या सहा नद्या. शहर या नद्यांच्या जवळ पोहोचले आहे. 2019 मध्येही असाच प्रकार पुण्यात घडला होता. शहरात भीषण पूर आला होता. पुरात किमान 20 जणांना जीव गमवावा लागला. यावेळच्या पुराने 2019 सारखे भयंकर स्वरूप धारण केले नसले तरी पुरासाठी जबाबदार असलेल्या समस्या अजूनही कायम आहेत.
बंगळूरमध्ये मुसळधार पावसाने जेरी लावली आणि शहरातील अनेक भागात पाणी तुंबले. अशी पूरसदृश परिस्थिती शहरांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असून, शहर स्मार्ट करण्यासाठी पैसा खर्च केला जात आहे. 26 सप्टेंबर 2014 रोजी बंगळूर शहरात 132.3 मिलीमीटर पाऊस झाला होता.
पाच-सहा तारखेला पडलेल्या पावसाने ‘सिलिकॉन सिटी’ म्हणविल्या जाणाऱ्या बंगळूर शहराच्या नियोजनाबाबत प्रश्न निर्माण झाले. थोडा पाऊस झाला तरी बंगळूरचे नाले तुंबतात आणि पावसाचे पाणी घरात येते. बंगळूरसारखी निर्माण झालेल्या परिस्थितीसारखीच परिस्थिती पाटणा, कोलकाता किंवा गुवाहाटीसारख्या शहरांमध्ये दिसली होती.
काही वर्षांपूर्वी चेन्नई आणि मुंबईसारख्या महानगरांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे लोकांना जीव गमवावा लागला होता. जेव्हा शहरांमध्ये इमारती आणि रस्ते बांधले जातात, तेव्हा नियोजनात नाल्यांचा विचार केला जात नाही.






