विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशनात बुधवारी ‘कुत्ता गोळी’चा मुद्दा भलताच गाजला. घडलं असं की, मालेगावमधील एमआयएमचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी मालेगावमधील अमली पदार्थांच्या प्रसाराचा मुद्दा उपस्थित केला. “मालेगावात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची खरेदी-विक्री होत आहे.
कुत्ता गोळीमुळे व इतर अमली पदार्थांमुळे नवी पिढी बरबाद होत आहे. मालेगावात नार्कोटिक्सचं ऑफिस नाहीये. त्यामुळे तिथे प्रभावी कारवाई होत नाही. सरकारकडून यावर काय कारवाई होईल?”, असा प्रश्न त्यांनी केला.
त्यापाठोपाठ अनिल देशमुख यांनीही कुत्तागोळीचा विषय काढला. “कुत्तागोळी मार्केटमध्ये आहेच. एक कुत्तीगोळीही आहे. कुत्तागोळी म्हणजे स्ट्राँग आणि कुत्तीगोळी म्हणजे माईल्ड याची माहिती आपल्याला आहे का? ही गोळी कुठून येते? याची माहिती घेतली जाईल का? यात मध्य भारतात एकही एनसीबीचं मुख्यालय नाहीये.
नागपूर अमली पदार्थांचं हस्तांतरण केंद्र आहे. त्यामुळे नागपूरला एनसीबीचं केंद्र उघडलं जाणार का?” असा सवाल अनिल देशमुख यांनी केला.
त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी “कुत्तागोळीला काहीतरी वैज्ञानिक नाव असेल. त्या नावाचा आपण वापर केला पाहिजे” असं म्हटल्यानंतर अत्राम यांनी त्याला अलप्रॅन्झोलम टॅबलेट असं नाव असल्याचं सांगितलं. यावेळी “कुत्तीगोळीबाबत मला काही माहिती नाही त्यावर माहिती घेऊन सभागृहासमोर ठेवेन. त्याशिवाय एनसीबी केंद्राबाबत गृहमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ”, असं अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम म्हणाले.

हे झालं विधिमंडळच्या अधिवेशनात. परंतू या निमित्ताने पुन्हा एकदा ‘कुत्ता गोळी’ हा विषय चर्चेत आला आहे आणि त्यानिमित्ताने या कुत्ता गोळीचे उगमस्थान जे आहे ते मालेगाव शहरही…मॉलिवूड, जातीय दंगली, पॉवरलूम अशा एका ना अनेक कारणांमुळे चर्चेत येणारे मालेगाव गेल्या महिन्यात कुत्ता गोळीमुळे पोलिसांसह अन्न व औषध प्रशासन विभागाच्या रडारवर आले आहे.
औषध म्हणून घेण्यात येणाऱ्या या झोपेच्या गोळीमुळे मालेगावकरांचीच नव्हे, तर जिल्ह्याची झोप उडाली आहे. कारण ही गोळी नशेसाठी घेतली जात असून, त्यामुळे तरुण पिढीचे आयुष्य वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मालेगाव शहरामध्ये तर हजारो मजुर आणि तरूण मुले अशी आहेत की, त्यांना जेवण नसले तरीही चालते पण ही गोळी दररोज पाहिजे. जर त्यांनी ही गोळी नाहीच मिळाली तर ती अक्षरशः वेड्यासारखी वागतात. फक्त मालेगाव मध्येच या कुत्ता गोळीतून लाखो रूपयांची उलाढाल होत आहे. अक्षरशः ट्रकने या गोळ्या मालेगाव मध्ये येत आहेत.
काय आहे कुत्ता गोळी?
औषध म्हणून कुत्ता गोळीचा वापर केला जात असला, तरी काही समाजकंटकांनी तिचा नशेसाठी वापरण्यास सुरुवात केली आहे. या गोळीत उत्तेजक रसायनांचे मिश्रण केले जात असून, त्यामुळे ती आरोग्यास घातक ठरत आहे. या गोळीच्या सेवनाने संपूर्ण शरीर बधिर होते. शरीराला वेदनाही जाणवत नाहीत.
या गोळीच्या सेवनाने बेभान झाल्यागत होते, तसेच कोणतेही कृत्य करण्यास अशी व्यक्ती मागे-पुढे पाहत नाही. त्यामुळेच या गोळीला ‘कुत्ता गोळी’ असे म्हंटले जाते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अल्प्राझोलम असे या गोळीचे शास्त्रीय नाव आहे. कुत्ता गोळीच्या सेवनाने मनुष्य निद्रावस्थेत जातो.
निद्रावस्था टाळल्यास अशी व्यक्ती स्वत:वरचे नियंत्रण गमावते. या नियंत्रणहीन झालेल्या व्यक्तीच्या भावना भडकल्यास ती कोणतेही कृत्य करण्यास उद्युक्त होते.
नशेचा नवा बाजार
कुत्ता गोळीचा प्रवास नेमका कुठून झाला, याची उकल अद्याप झालेली नसली तरी नशेचा हा नवा बाजार असल्याचा हा प्रकार आहे. या टॅब्लेट मध्य प्रदेशसह इतर काही ठिकाणांहून मागविण्यात येत असल्याचे सांगितले जाते. सुरुवातीला स्वस्त वाटणाऱ्या या टॅब्लटे्सची मागणी वाढली की तस्कर त्या चढ्या भावाने खरेदीदारास देतात.

यामागे मोठे रॅकेट असण्याचा कयास व्यक्त होत आहे. अगदी दोन रूपयात एक गोळी मिळत असल्याने स्वस्तात तरुण या नशेच्या आहारी गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. 0.25 आणि 0.50 या दोन स्वरूपात या गोळ्या उपलब्ध असून, शेड्युल वन या कॅटेगरीत येत असल्याने त्यांची विक्री करताना विक्रेत्यांना काळजी घ्यावी लागते. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय अशा गोळ्या देता येत नाही.
मात्र, नशेसाठी वापरण्यात येणारी इतरही बरीच औषधे असून, त्यातून मोठी उलाढाल होते आहे. ही कुत्ता गोळी वेगवेगळ्या पाॅवर कपॅसिटीमध्ये येते. त्यामुळेच त्या गोळीची नावे पण वेगवेगळी प्रमाणे आहेत. डाॅबरमॅन, बुलडाॅग, जर्मन शेपर्ड अशी...
अल्प्राझोलम या गोळीचे सांकेतिक नाव कुत्ता गोळी आहे. ही गोळी मुख्यतः मनोविकारावर डाॅक्टर देतात किंवा ज्यांना अजीबात झोप येत नाही, त्यांना खुपच कमी प्रमाणात दिली जाते. अलीकडे महाराष्ट्रातील तरूण व शाळकरी मुले या गोळीचा उपयोग नशा करण्यासाठी करत आहेत. ही माहिती मिळताच फुड एंड ड्रग्ज डिपार्टमेंटने (अन्न व औषध प्रशासन) महाराष्ट्रातील सर्वच शहरातील पोलीस स्टेशनला याची सुचना दिलेली आहे.
एखादी व्यक्ती जास्त काळ आणी जास्त प्रमाणात या गोळीचे सेवन करत असेल तर त्या व्यक्तीचे मानसिक संतुलन कायमचे बिघडुन ती व्यक्ती वेडी होऊ शकते. किंवा त्या व्यक्तीला ब्रेन ट्युमर व ब्रेन स्ट्रोक चा धोका होऊ शकतो.
आजकाल या कुत्ता गोळीचे सेवन अनेक तरूण आणी शाळकरी मुले करत आहेत. केवळ नाशिक जिल्ह्य़ामध्येच नाही तर खानदेश,धुळे, जळगाव, मुंबई, ठाणे, पालघर, दिल्ली, बंगलोर, अहमदाबाद, कलकत्ता, इंदोर, चंढीगढ इत्यादी शहरातील हजारो तरुण व शाळकरी मुले नशेचा अनुभव घेण्यासाठी करत आहेत.






