दिल्लीहून बदली झाल्यानंतर चंदन कुमार रांचीच्या नामकुम भागात राहतात. शहरापासून दूर, शांत, हिरवागार असा इथला परिसर आहे. पण या वर्षी पडलेल्या भीषण गरमीमुळे त्यांना आपल्या फ्लॅटमध्ये एसी लावावा लागला. त्यांची इच्छा नव्हती पण हीट वेव्ह बघता त्यांनी आपला निर्णय बदलला. मोंगाबे-हिंदीशी बोलताना ते म्हणाले, “दिल्लीच्या तुलनेत रांचीचं वातावरण फारच छान आहे. पण या एप्रिलमध्ये अशी गरमी पडली की मला एसी लावावाच लागला.”
चंदन यांच्याप्रमाणेच गोपाल यांनीही मे महिन्यात एसी लावला. ते रांचीच्या मोहराबादी परिसरात राहतात जो मोकळा आणि झाडांनी भरलेला आहे. गोपाल रांचीचेच आहेत. ते सांगतात, “काही वर्षांपर्यंत रांचीचं तापमान सोसण्यासारखं असायचं. पण आता गरमी सहन होत नाही. हीट वेव्हमुळे रात्री झोप लागत नाही. त्यामुळे मला एसी लावावा लागला.”
या वर्षी मे मध्ये शेवटच्या चार दिवसांत रांचीत 42 डिग्री तापमान होतं, जे नेहमीपेक्षा 5 डिग्री जास्त होतं. राज्यात डाल्टनगंजला सर्वाधिक 47 डिग्री तापमानाची नोंद झाली. हीट वेव्हमुळे झारखंडमध्ये 27 लोक मेले. घनदाट झाडी, मोकळी मैदानं आणि डोंगरांनी वेढलेल्या रांची शहरात यावर्षी गरमीनं लोकांचं जगणं कठीण केलं. चंदन आणि गोपाल यांच्याप्रमाणेच पहिल्यांदाच एसी लावणाऱ्या लोकांची संख्या चकीत करणारी आहे.

एसी कंपनी ब्लू स्टारचे मॅनेजिंग डायरेक्टर बी. त्यागराजन यांच्या म्हणण्यानुसार 95 टक्के लोकांनी पहिल्यांदाच एसी विकत घेतला आहे. यातील 65 टक्के लोक हे भारताच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या वर्गाच्या शहरांतले आहेत. मे महिन्यात एसीची विक्री दुपटीनं वाढली. मागणी इतकी होती की ती पुरवताना एसी कंपन्यांना घाम फुटला होता. यामुळेच यावर्षी त्यांना 30-35 टक्के जास्त नफा होण्याची शक्यता आहे.
हवामान बदलांमुळे भारतातील एसी बाजारही बदलत आहे. दरवर्षी यात 15 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. 2028 पर्यंत ही वाढ कायम राहणार आहे. पॅनासोनिक इंडियाचे बिजनेस हेड अभिषेक वर्मा सांगतात की भारतात केवळ सात टक्के घरांमध्ये एसी आहे. त्यामुळे वाढता पगार, शहरीकरणाचा वाढता वेग आणि खर्च करण्याची मानसिकता यामुळे लोक एसीकडे वळत आहेत. या वर्षी एसी बाजारात 30-40 टक्के वाढ अपेक्षित आहे. 2011 नंतर पहिल्यांदाच इतकी वाढ नोंदवण्यात आली आहे. जगभरात भारतात एसीचा बाजार वेगानं वाढत आहे. गरमीतच नाही तर अन्य काळातही याची मागणी आहे. 2040-50 च्या दरम्यान एसीच्या बाजारात भारत चीनला मागे टाकण्याची शक्यता आहे.
एसीची वाढती मागणी ही सरळपणे वाढत्या तापमानाशी संबंधीत आहे. भारतात एप्रिल-मे दरम्यान अनेक ठिकाणी भयंकर गरमी पडते. दक्षिण भारतात तर मार्चपासूनच उन वाढू लागतं. 9 मे रोजी भारतात सर्वाधिक उष्ण शहरांत राजस्थानचं फलौदी, उत्तर प्रदेशचं झांसी, मध्य प्रदेशचं शिवपूरी, गुजरातचं सुरेंद्रनगर, महाराष्ट्रचं मालेगाव, तेलंगणाचं निजामाबाद या लहान शहरांचा समावेश होता. फलौदीत तर 50 हजाराचीच लोकसंख्या आहे. 9 मेला या सर्वच शहरांत 41.9 ते 46.2 डिग्री तापमान होतं. 27 एप्रिलला पश्चिम बंगालचं कलाईकुंडाचं तापमान 45.8 डिग्री होतं. देशातील 112 शहरांत 40 डिग्रीपेक्षा जास्त तापमान होतं.
रांचीतील भारत रेफ्रिजरेशनचे संचालक शब्बीर सांगतात, “एका वर्षांत आम्ही साधारणपणे 500 एसी विकतो. 10 वर्षांपूर्वी हा आकडा 150 ते 200 च्या घरात होता. पूर्वी हायक्लास सोसायटीचे लोक शौक म्हणून एसी लावायचे. आता मात्र मध्यमवर्गीय लोकही एसी लावतात. त्यांच्यासाठी मार्केटींग करण्याचीही गरज नाही. ते स्वतःच एसी घ्यायला येतात. कारण एसी त्यांची गरज बनली आहे. ज्याला तो विकत घेता येतो तो विकत घेतोय. आता रांचीत एसीची मोठमोठी शोरुम्स उघडली आहेत.”
रांचीचेच जालान इलेक्ट्रॉनिक्सचे मालक अभिषेक जालान सांगतात, “गरमी वाढली आहेच पण ती जास्त काळ टिकतेय त्यामुळेही एसीचं मार्केट वाढलं आहे. कुलरची किंमत सध्या 15-20 हजार आहे. त्यात आणखी 10-12 हजार टाकले तर एसी येतो. त्यामुळे लोक एसीच विकत घेतात.” इंटरनॅशनल एनर्जी एजेंसीच्या अहवालानुसार भारतात 2010 च्या तुलनेत एसीचा वापर तिप्पट झाला आहे. आता 100 घरांमध्ये 24 एसी आहेत. त्यामुले वीजेची मागणीही 21 टक्क्यांनी वाढली. 2050 पर्यंत एसीची मागणी नऊ पट वाढणार आहे त्यामुळे वीजेची खपतही त्याच प्रमाणात वाढेल. मे महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत 15 टक्के वीज जास्त वापरली गेली. एसी आणि अन्य कुलिंग उपकरणांमुळे हे झालं. 30 मे रोजी 250 गीगावॅट इतकी विक्रमी वीज वापरली गेली होती.
इंटरनॅशनल एनर्जी एजेंसीच्या अहवालानुसार मे आणि जूनमध्ये सरासरी तापमानात 1 डिग्रीचीही वाढ झाली तरी विजेची मागणी २ टक्के वाढते. 2019 ते 2023 मध्ये जून महिन्यात तापमान 32 डिग्री पर्यंत झाल्यावर विजेची मागणी 28 टक्क्यांनी वाढली होती. आज भारतात 10 टक्के विजेचा वापर घर किंवा कार्यालयं थंड ठेवण्यासाठी केला जातोय. भारतात अनेक समूह असे आहेत जे वाढत्या उन्हातही घरी राहू शकत नाहीत आणि एसी ही त्यांच्यासाठी ऐश आहे. भारताची अर्धी श्रमशक्ती शेती-वाडी, खनन, बांधकाम क्षेत्रांत काम करते जिथं उन्हापासून वाचणं कठीण असतं.

मग कामासाठी आदर्श तापमान काय असायला हवं? रांचीच्या पल्स हॉस्पिटलचे पल्मोनोलॉजिस्ट डॉ. अत्री गंगोपाध्याय सांगतात, “तुम्ही कुठं राहता यावर ते आधारीत असतं. तुम्ही खोलीत असाल तर 27 डिग्री तापमान पुरेसं आहे. माणसाच्या शरीराचं सरासरी तापमान हे 35 ते 37 डिग्री असतं. 42 डिग्रीपेक्षा जास्त तापमान प्राणघातक ठरू शकतं. त्याहून जास्त तापमानानं शरीराची हानी सुरू होते. आपल्या शरीरातील प्रोटीन कमी तापमानात सुरक्षित राहतं. पण जास्त तापमानात ते खराब होतं. त्यांतील रसायनांमध्ये एक ताळमेळ असणं गरजेचं असतं. सामान्य तसेच थंड तापमानात हा ताळमेळ नीट असतो.
वाढत्या गरमीत हा ताळमेळ बिघडतो. त्याचं काम थांबतं. आपण थंडी सहन करू शकतो. पण गरमी सहन करता येऊ शकत नाही. कारण वाढत्या उष्णतेत शरीरातील प्रोटीनचं तंत्र बिघडतं आणि शरीरातील पाणी कमी होऊ लागतं.” पटनाचे कंसल्टंट फिजिशिअन आणि इंडियन डॉक्टर्स फॉर पीस अँड डेव्हलपमेंटचे अखिल भारतीय महासचीव, डॉ. शकील सांगतात, “40 डिग्रीहून जास्त तापमान मानवी शरीरासाठी धोकादायक असतं. वय कमी अथवा जास्त असल्यास गरमीत हीट स्ट्रोक, डीहायड्रेशन होऊ शकतं. शरीरातील पाणी आणि मीठाचं प्रमाण कमी होतं. वयोवृद्धांमध्ये डोक्यातल्या रक्तवाहिन्यांचा आकार वाढू लागतो आणि ब्रेम हॅमरेजची शक्यता वाढते.”
एसीच्या वाढत्या मागणीसाठी बदलतं हवामान कारणीभूत आहे. जागतिक हवामान विज्ञान संघटनेनं 2023 ला आजवरचं सर्वाधिक उष्ण वर्ष घोषित केलंय. एलनीनोमुळे हा विक्रम याचवर्षी मोडण्याची शक्यता आहे. भारतातही मे महिन्यात अधिकांश शहरांत सरासरीपेक्षा जास्त तापमान नोंदवण्यात आलं. मार्च महिन्यात तापमान सरासरीइतकं होतं. पण किमान तापमान अर्धा डिग्री जास्त होतं. यावर्षी एप्रिलमध्ये सर्वाधिक गरमी होती. दीर्घ कालावधीत हवामान उष्ण करणारे घटक वाढत आहेत. जगाच्या तुलनेत आशिया खंड वेगानं गरम होत आहे. 1961 ते 90 च्या तुलनेत हा वेग दुपट्ट झाला आहे.
1961 ते 2020 दरम्यान भारतात अनेक ठिकाणी मार्च ते जून दरम्यान हीट वेव्हची शक्यता वाढली होती. तसेच ती राहण्याचे दिवस 3 दिवसांनी वाढले आहेत. 2060 पर्यंत उष्णतेची लाट 12-18 दिवस राहण्याची शक्यता आहे. जी सध्या 2 ते 8 दिवस असते. हिमालय आणि उत्तर-पूर्व डोंगराळ प्रदेश वगळता भारताच्या अन्य भागांमध्ये या शतकाच्या शेवटास उष्णतेची लाट दोनदा येऊ शकते. 8 ते 12 दिवसांनी त्यांच्यात वाढही होऊ शकते. भारत हवामान विज्ञान विभागाचे माजी महासंचालक लक्ष्मण राठौड सांगतात, “1999 पासूनच जगभर तापमान वाढत आहे. हवा तसेच समुद्र यांचं तापमान वाढत आहे. उष्णतेच्या लाटेसोबतच हवामानातही अनिश्चितता येत आहे. बंगालची खाडी आणि अरबी समुद्र उष्णतेच्या लाटेत येत आहेत. हिमालयात हिमनद्या वितळत आहेत. वाढत्या तापमानामुळे हे घडत आहे.”
(सौजन्य - मोंगाबे-हिंदी)
अनुवाद - प्रतिक पुरी






