भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या मान्सूनच्या अभ्यासासाठी ब्रिटिशांच्या काळापासून हवामान खाते (आयएमडी) कार्यरत आहे. देशभर पसरलेले वेधशाळांचे जाळे, ठिकठिकाणी बसवण्यात येणारी रडार, पृथ्वीभोवती फिरणारे कृत्रिम उपग्रह अशी सुसज्ज यंत्रणा दिमतीला आहे. मात्र, निसर्गातील सर्वात क्लिष्ट घटनांपैकी एक असणाऱ्या मान्सूनचे परिपूर्ण आकलन करणे कोणाला जमलेले नाही. भारताच्या मुख्य भूमीत मान्सूनचा प्रवेश होण्याआधी महासागर आणि वातावरणात असंख्य घटनांचा क्रम सुरू असतो, तसाच क्रम मान्सून देशभरात विविध ठिकाणी बरसल्यावरही सुरूच असतो तो अगदी पुढील वषीर्च्या मान्सूनच्या आगमनापर्यंत. महागाई, पाणी आणि अन्नाची टंचाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा स्वरुपात मान्सूनचे परिणाम अगदी वर्षभर पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत उपाय असतो तो पुन्हा मान्सूनच.
दरवर्षी नेमाने येणारा मान्सून अतिपरिचयामुळे आपल्याला तितकासा रोमॅन्टिक वाटत नसेल, पण निसर्गाचे हे विलक्षण चक्र न अनुभवणाऱ्या युरोपीय व पश्चिमात्यांना तो लुभावणारा विषय आहे. हा मान्सून अनुभवण्याचा व चेरापुंजीला भेट देण्याचा ध्यास घेतलेल्या अलेक्झांडर फ्रेटरचे स्वप्न पूर्ण झाले आणि वाचकांच्या हाती एक ‘चेसिंग द मान्सून’ सदर ऐवज पडला.

अलेक्झांडर फ्रेटर हा ब्रिटिश लेखक. त्याचे वडील स्कॉटिश मिशनरी होते. दक्षिण पॅसिफिकमधल्या छोट्या बेटांवर अलेक्झांडरचे बालपण गेले. मिशनरी वैद्यकीय सेवेतील त्याचे वडील लहानपणापासून चेरापुंजीबद्दल बोलत. त्याच्या घरातल्या चित्राच्या खाली लिहिले होते, चेरापुंजी आसाम ‘द वेटेस्ट प्लेस ऑन अर्थ’- जगातील सर्वात भिजरे गाव. एका दिवसात 35 इंच पाऊस पडणाऱ्या या गावाचे वर्णन वेबशॉट नावाच्या मित्राने केले होते. तेव्हापासून मान्सून आणि चेरापुंजी अशा दोन गोष्टी पाहायच्या आणि अनुभवायच्या असा ध्यास लेखकाला लागला. 1986 मध्ये चीनमध्ये प्रवास करताना त्याला विचित्र आजाराची लक्षणे जाणवू लागली. हा मज्जातंतूचा आजार होता ज्यावर उपाय नव्हता. निराश झालेल्या फ्रेटरला तसाच आजार असलेल्या माणसाची बायको भेटली. तिचा नवरा लेखक होता. त्याचं नाव मिस्टर बाप्टिस्टा. ते गोव्याचं कुटुंब होतं. दोघं मान्सूनबद्दल बोलायला लागले आणि बाप्टिस्टाने त्याला कालिदासांच्या मेघदूतातील वर्णन ऐकवले. बाप्टिस्टाचे मूळ गाव केरळात होते. यानंतर लेखकाने भारतात जायचे ठरवले. त्यातून आकाराला आले ‘चेसिंग द मान्सून’ हे पुस्तक.
खरं तर पावसावर माणूस किती पानं लिहू शकेल. 2732 पानं तर शक्य नाही, पण लेखक पाऊस पाहता-पाहता भेटलेली माणसं, ठिकाणं, भारतीयांचे वागणे आणि जगणे विलक्षण रंजक पद्धतीने सांगतात. शिवाय हे करता-करता तो अलेक्झांडरच्या काळापासून ते इब्न बतुतापर्यंत प्राचीन प्रवासी आणि 17व्या, 18व्या शतकातील ब्रिटिश लेखक असा इतिहासही आपल्यासमोर ठेवत आहे. मुंबईत पोहोचल्यावर तो लिहितो. सात राज्यांना पाण्याचा तुटवडा जाणवत होता. अनेक ठिकाणी चार वर्षांत पाऊस पडला नव्हता. ज्या केरळमध्ये मी दुसऱ्या दिवशी घुसणार होतो. तिथे टँकर्स साडेबारा हजार ठिकाणी पाणी पोहोचवत होते. इंजिनीअर्सनी 11 हजार 216 ठिकाणी हायड्रन्टस बसवले होते. 500 पेक्षा टय़ूबवेल्स आणि 400 बोअरवेल्स राज्यभरात खोदल्या होत्या. आंध्रमध्ये लोकांना एकदिवसाआड पाणी मिळत होते, तर मद्रासमध्ये एक लाख 80 हजार लोकांना बादल्या दिल्या गेल्या, पण पाणीच नव्हते. पालघाटमध्ये दूषित पाण्याने गॅस्ट्रोने 22 जण मरण पावले. मुंबईमध्ये लेखक आफ्टरनून वर्तमानपत्रातला बी टू बी कॉलम वाचतो. त्रिवेंद्रमच्या दिशेने निघतो. तिकडे 39 अंश सेल्सिअस तापमान असते. लोक पावसाची वाट पाहात असतात.
इथेच मला मान्सूनचा थोडा इतिहास अभ्यासायला मिळतो. मान्सून हा शब्द अरबी भाषेतील मौसमवरून आला. हॅलेचा धूमकेतू शोधणाऱ्या ब्रिटिश शास्त्रज्ञाने सर्वप्रथम मान्सूनचा अभ्यास केला. पहिल्यांदा मान्सूनचा तक्ता बनवला. ही माहिती मिळते ती त्रिवेंद्रमच्या वेधशाळेत.

मान्सून हे एक निसर्गाचं वेगळंच संयंत्र आहे. समृद्ध आणि जमिनीवरच्या तापमानातील फरकाने मान्सून विस्तारतो, वर चढतो. समुद्राच्या थंड हवेत विषुववृत्ताच्या दक्षिणेला भारतीय समुद्रावर त्याचा प्रचंड वेग असलेला प्रवाह वाहू लागतो. समुद्राची वाफ गोळा करत मान्सूनचे ढग भारताच्या दिशेने कूच करतात. ही वाफ थंड होत असताना ऊर्जा तयार होते, त्यामुळे हवा व्यापून ढगाला ढकलते. समुद्राहून अधिक आद्र्र हवा सामावली जाते. हा मान्सून अरबी समुद्र मग पश्चिम घाटावरून येतो. तसाच बंगालच्या उपसागरावरूनही येतो. तोच चेरापुंजीच्या दिशेने जातो. हिमालय पर्वतामुळे गंगेच्या पठारावर जातो. पाऊसरूपाने पडतो. कोलकत्याचा मान्सून मुंबईपेक्षा तीन दिवस आधी येतो.
मान्सून हे एक निसर्गाचं वेगळंच संयंत्र आहे. समृद्ध आणि जमिनीवरच्या तापमानातील फरकाने मान्सून विस्तारतो, वर चढतो. समुद्राच्या थंड हवेत विषुववृत्ताच्या दक्षिणेला भारतीय समुद्रावर त्याचा प्रचंड वेग असलेला प्रवाह वाहू लागतो. त्याचा अभ्यास करण्यासाठी हवेत हायड्रोजन भरलेले फुगे सोडले जातात. त्यात ट्रान्समीटर, तापमानमापक, थर्मिस्टर व हायड्रोमीटर ही उपकरणं ठेवली जातात. यामुळे 75 हजार फुटावरील हवेचा दाब, तापमान, आद्र्रता व वाऱ्याचा वेग मोजला जातो. ज्या काळात असे फुगे नव्हते, त्या काळात पतंगांच्या साहाय्याने हा अभ्यास केला जाई. 31 मे ते 15 जून अशा 16 दिवसांचा डायरीवजा वृत्तांत लेखक सादर करतो. अर्थातच इंग्रजी भाषेत लेखक जेव्हा लिहीत असतो, तेव्हा त्याने प्रामुख्याने इंग्लंड, अमेरिकेचा वाचक आणि ढोबळमानाने जगभरातील वाचक समोर ठेवलेला असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तपशिलाने समजावण्याची जबाबदारी लेखकावर पडते. उदाहरणार्थ, रिक्षा, यज्ञ म्हणजे काय? मुंबई, त्रिवेंद्रम, गोवा असं करत लेखक चेरापुंजीला पोहोचतो. त्यात तो भारतातील विविध धर्माची माणसं, त्यांच वागणं-बोलणं, ब्रिटिशांचे राज्य, इथले रस्ते, भ्रष्टाचार, आयुर्वेदीय दवाखान्यासारख्या विविध संस्था, परकियांकडे संशयाने व आपुलकीने बघण्याची वृत्ती, विविध लेखक, कलावंत अशा विविध गोष्टींचे दर्शन घडते.
डॉम मोराईस हा कवी सांगतो की, पावसाला गरीब विद्यार्थी घाबरतात. कारण घरात गर्दी असल्याने त्यांना रस्त्यावर अभ्यास करावा लागतो. पावसाळ्यात घरी बसावे लागल्याने त्याचा अभ्यासावर परिणाम होतो. प्रीतिश नंदी हे साप्ताहिकाचे संपादक त्याला सांगतात, पत्रकारिता करायला लागल्यापासून मी कविता करणे सोडले आहे. या देशात भ्रष्टाचार आहे. वाईट मार्गानेच इथे पुढे जाता येते. दरवर्षी लाखो लोक इथे दारिद्रय़ाखाली ढकलले जातात, अशा देशात कवी काय करणार? संपादक म्हणून मी अनेक विषय चावडीवर मांडतो. राज्यकर्त्यांशी भांडतो. थोडातरी बदल घडवू शकतो. लेखक पुन्हा परत येतो त्या वेळच्या या भेटी आहेत. मुंबईच्या चौपाटीवरच्या पावसाळी संध्याकाळचे सुंदर वर्णन त्याने केले आहे.

चेरापुंजीला जाण्याची परवानगी मिळणे किती कठीण आहे हे तो अनुभवतो. पण दिल्लीत त्याला परवानगी मिळते. पण तो कोलकात्याला थांबून मेघालयच्या दिशेने निघतो. कोलकात्यात पडलेल्या दुष्काळानंतर हर्मान क्रीश या 23 वर्षीय ब्रिटिश अधिकाऱ्याने 15 हजार गावकऱ्यांना घेऊन छोटासा रोजगार देऊन केवळ काही आठवडय़ांत पाच धरणे, 40 तलाव बांधले. त्या वर्षीच्या पावसानंतर हजारो बलगाडय़ा, घोडे आणि लाखो माणसांची तहान भागली.
या सर्व दगदगीनंतर लेखक चेरापुंजीला पोहोचतो. तेव्हा गावकरी संशयाने पाहतात. अगदी छत्री विकणारादेखील इतक्या पावसात त्याला छत्री देत नाही, पण चटकन दोस्ती करायच्या स्वभावामुळे तो छोटासा मुक्काम लेखक मजेत घालवतो. जगातील चौथ्या क्रमांकाचा धबधबा, 500 फुलपाखरांचं म्युझियम, छोटीशी पिकनिक हे सारं पाहात तो मौज करतो. 1850 सालच्या जोसेब होकर या ब्रिटिश निसर्गशास्त्रज्ञाने नोंदवले होते की, ऑगस्ट 1841 मध्ये इथे 64 इंच पाऊस झाला आणि त्यात सात महिन्यांत 500 इंच पाऊस झाला. याच होकरने इथे दहा मल परिसरांत दोन हजार झाडे दिसल्याचे लिहिले होते. त्याच्या याच मुक्कामात त्याला भारताच्या परराष्ट्र खात्याने चेरापुंजी भेट नाकारल्याचे पत्र मिळते, असा हा सारा प्रवास आहे. तो आपल्याला आपला देश त्याच्या नजरेतून छान दाखवतो.






