माडवी हिडमा उर्फ हिदमाल्लू इदमूल पोडीयम भीमा उर्फ संतोष… माओवादी चळवळीत त्याला अनेक नावांनी ओळखलं जातं. माओवाद्यांच्या पीपल्स गुरिल्ला आर्मीच्या कंपनी क्रमांक एकचा सगळ्यात जहाल कमांडर असलेल्या माडवी हिडमावर आज पाच राज्यांत तीन कोटी रुपयांहून अधिकचे इनाम आहे. दंडकारण्यात आतापर्यंत 200 हून अधिक जवानांच्या हत्येप्रकरणी 40 वर्षांचा हिडमा माडवी जबाबदार असल्याचे म्हटले जाते. त्याने घडवून आणलेले अगदी अलिकडचे हत्याकांड म्हणजे छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेली चकमक… सुरक्षा दलाचे जवान पीपल्स लिबरेशन गोरिला आर्मीचा नक्षली कमांडर माडवी हिडमाला पकडायला निघाले होते. पोलिसांना माहिती मिळाली होती की हिडमा आणि त्याचे साथीदार या भागात आलेले आहेत. पण ऐनवेळी नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत 22 जवानांचा मृत्यू झाला होता. तेलंगणा-छत्तीसगड सीमेवरील विजापूर जिल्ह्यात झालेल्या एका चकमकीत माडवी हिडमा ठार झाल्याचे मध्यंतरी वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र ‘हिडमा अभी जिंदा है’ असे माओवाद्यांनी प्रसिद्धीपत्रक काढून पोलिसांचा आरोप खोडून काढला होता. 22 जवानांच्या मृत्यूनंतर तर प्रशासनालाही खात्री पटली की हे कृत्य माडवी हिडमाचेच असून तो अद्याप जिवंत आहे.

हिडमा माडवीच्या बालेकिल्ल्यातच सुरक्षा दलाने रोवला तिरंगा
माडवी हिडमा अद्याप सुरक्षा दलाच्या ताब्यात आला नसला तरी सुरक्षा दलाच्या एका ऑपेरशनमुळे माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. गेल्याच आठवड्यात हिडमा याच्या छत्तीसगडमधील पूर्वती गावावर सुरक्षा दलांनी ताबा मिळविला आहे. घनदाट जंगलाने वेढलेल्या सुकमा जिल्ह्यातील जगरगुंडा भागातील या गावातून माओवादी कारवायांचे नियोजन होत होते. माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात जवान धडकल्याने हा चळवळीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
सुकमा आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमेवर पूर्वती हे गाव आहे. या गावाचा परिसर कोअर एरिया म्हणून ओळखला जातो. या गावातून शंभराहून अधिक युवक माओवादी चळवळीत सहभागी आहेत. घनदाट जंगलानी वेढलेल्या या गावाला जाण्यासाठी साधा रस्ताही नाही. माओवाद्यांच्या अनेक हिंसक कारवायांचे केंद्रबिंदू हे गाव आहे. या गावात हिडमाचे घर असल्यामुळे मूळचे कोल्हापूरकर असलेले सुकमाचे पोलिस अधीक्षक किरण चव्हाण यांनी थेट हिडमाच्या गावातच पोलिस ठाणे उभारण्याचा निर्णय घेतला. छत्तीसगड पोलिस दल, सीआरपीएफ, कोब्रा बटालियनच्या हजारावर जवानांना घेऊन गावात प्रवेश केला. हजारावर जवान पाहून गावकरी जंगलात पसार झाले. यात अनेक जनमिलिशिया सदस्य होते. चव्हाण यांनी हिडमाच्या आई आणि बहिणीची भेट घेऊन लोकशाहीवर विश्वास ठेवा, असे आवाहन केले.

माडवी हिडमाची इतकी दहशत का?
माडवी हिडमा उर्फ इदमूल पोडीयम भीमा हे त्याचे पूर्ण नाव. आठवीपर्यंत शिक्षण घेतलेला हिडमा गुरिल्ला पद्धतीने सुरक्षा दलाशी मुकाबला करण्यात तरबेज आहे. त्याला माओवाद्यांच्या पीपल्स गुरिल्ला आर्मीच्या कंपनी क्रमांक एकचा कमांडर बनविण्यात आले. या बटालियन अंतर्गत माओवाद्यांचे तीन युनिट काम करतात. सुकमा आणि बिजापूर हे या युनिटचे कार्यक्षेत्र असून अत्याधुनिक शस्रांचा वापर करतात. दंडकारण्यातील माओवाद्यांची मुख्य संघटना मानल्या जाणाऱ्या दंडकारण्य स्पेशल झोनल समितीचाही हा सदस्य आहे. हिडमाच्या नावाची भीती संपूर्ण दंडकारण्यात आहे. 2010 मध्ये चिंतलनारमधील ताडमेटलाच्या जंगलात सीआरपीएफच्या 76 जवानांना घेरून ठार मारण्यात आले होते. या घटनेचा मास्टरमाइंड हिडमा होता. 2013 मध्ये जिरम घाटीत काँग्रेस नेत्याच्या रॅलीवर हल्ला, बुरकापाल, टेकलगुडम अशा प्रत्येक हल्ल्यावेळी हिडमाचे नाव चर्चेत आले. आज पाच राज्यांत तीन कोटी रुपयांहून अधिकचे बक्षीस जाहीर आहे. हिडमाचे निश्चित स्थळ शोधण्याचा प्रयत्न अनेकदा सुरक्षा यंत्रणांनी केला. पण, यश आले नाही.
हिडमा मितभाषी आहे, त्याला नवीन नवीन गोष्टी शिकण्यात रस आहे. त्याने माओवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या एका प्राध्यापकाकडून इंग्लिश भाषाही शिकली आहे. हिडमाची मातृभाषा हिंदी नसली तरी त्याला हिंदी भाषाही येते. त्याचं शिक्षण सातवीपर्यंत झालेलं आहे. माओवादी संघटनेच्या एका माजी सदस्याने बीबीसीला सांगितलं, “हिडमाला 2000 च्या आसपास माओवादी संघटनेच्या हत्यारं बनवणाऱ्या शाखेत पाठवलं गेलं. लोक म्हणतात की हिडमाने तिथे हत्यारं बनवायच्या नवनवीन पद्धती शोधून आपल्या कौशल्याचा परिचय दिला. तो स्वतः हत्यारं बनवायचा, त्यांची देखभाल-दुरुस्ती करायचा आणि स्थानिक पातळीवर ग्रेनेड आणि लॉन्चर्सची व्यवस्था करायचा.”

काय आहे माडवी हिडमाची मोडस ऑपरेंडी ?
माडवी हिडमाच्या बाबतीत एक गोष्ट म्हटली जाते ती म्हणजे तो चकमकीदरम्यान माओवाद्यांचं नेतृत्व करतो, पण स्वतः फार कमी वेळा बंदूक उचलतो. 2011 नंतर माओवादी संघटना सोडलेल्या एका माओवाद्याने सांगितलं की संघटनेतही हिडमाविषयी चर्चा व्हायची, “हिडमाच्या लढाईची पद्धत आक्रमक होती, त्याने अनेक लढायांमध्ये भागही घेतला पण तो स्वतः फार कमी वेळा बंदूक चालवतो. जो पर्यंत नाईलाज होत नाही तो पर्यंत हिडमा स्वतः बंदूक उचलत नाही. त्याची टीम खूप सक्रिय आहे. तो लढाईपासून दूर राहात नाहीत, आपल्या साथीदारांचं नेतृत्व करतो.”
माओवाद्यांच्या कारवायांचा अभ्यास करणारे लोक म्हणतात की 2001 ते 2007 या काळात हिडमा एक सामान्य सदस्य होता. पण बस्तर भागातल्या सलवा जुडूम मोहिमेने त्याला सक्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. आणखी एक माजी माओवादी म्हणतो, “मला तर याच आश्चर्य वाटतं की इतक्या लढायांमध्ये भाग घेतल्यानंतरही त्यांना जरासं खरचटलंही नाही. मला माहिती नाही ती ते 2012 नंतर कधी जखमी झाले की नाही.”
“याआधीही अनेक मोठ्या नक्षलवादी नेत्यांची नावं समोर आली आहेत. पण त्या सगळ्यांनी अनेकदा घाईघाईने पोलिसांवर हल्ला केला. त्यांच्या तुलनेत हिडमा प्रदीर्घ काळापासून सक्रिय आहे. माओवादी नेते घिसाडघाईने चुका करतात, त्यामुळे एकतर ते पोलिसांकडून मारले जातात किंवा आत्मसमर्पण करतात असं म्हटलं जातं. हिडमा वेगळा आहे,” असं माजी माओवाद्याने बीबीसीला सांगितलं.

हिडमाला बस्तरचा हिरो मानलं जातं. तो एका स्थानिक आदिवासी समुदायाचा आहे. स्थानिक लोकांशी त्याचे चांगले संबध आहेत. तिथला युवावर्ग हिडमासाठी वेडा आहे.
दंडकारण्यात रिपोर्टिंग करणाऱ्या एका स्थानिक पत्रकाराने सांगितलं, “इथले लोक त्यांना देव समजतात. ते सगळ्यांचं बोलणं शांतपणे ऐकतात आणि त्यावरून नोट्सही काढतात. ही त्यांची सवय आहे.”
हिडमाला परदेशात प्रशिक्षण मिळालं आहे ही गोष्ट ते नाकारतात. ते म्हणतात, “जितकं मला माहिती आहे त्यावरून त्यांनी कोणतं मोठं शहरही पाहिलं नसेल. ते दंडकारण्य किंवा बस्तरहून पुढेही गेले नसतील. हिडमा यांनी मुख्य रस्त्यावर प्रवास केला असल्याचेही काही पुरावे नाहीत.”






