दिनांक 28 डिसेंबर 1998… या तारखेला दिल्लीच्या प्रगती मैदानात एक विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. प्रदर्शन होतं मोटारींचं. अनेक मोटारी तिथे भारतातील लोकांचं लक्ष वेधून घेण्यास सज्ज असतानाच, त्या ठिकाणी आणखी एक मोटार खास होती. ती खास असण्याचं कारणही खासच होतं. ते कारण म्हणजे संपूर्ण भारतीय बनावटीची ती पहिली मोटार होती.
तिची निर्मिती पुण्याजवळील पिंपरी चिंचवडमध्ये तेव्हाच्या टेल्को कारखान्यात झाली होती. या मोटारीचं नाव, इंडिका आणि भारतातील स्वदेशी बनावटीची पहिली मोटार बनवण्याचे स्वप्न पाहून ते सत्यात उतरवणारी व्यक्ती म्हणजे रतन टाटा…
नऊ ऑक्टोबरच्या रात्री रतन टाटांचे निधन झाले. टाटा नावाचा वारसा समर्थपणे चालवत देशाच्या हिताची जपणूक करत, व्यवसायवृध्दी करणाऱ्या रतन टाटांच्या जाण्याने एका लोभस पर्वाचा अंत झाल्याचे वाटते. हे पर्व लोभस का असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्यासाठी एक उदाहरण म्हणजे, गुडफेलो'स नावाची एक संस्था अलीकडच्या काळात,रतन टाटांच्या पुढाकारातून स्थापन झाली.

शंतनु नायडू या तरूणाने अशी कल्पना मांडली की,वयोवृद्ध आजी-आजोबा ज्यांना कोणी आधार नाही अशांसाठी आधार म्हणून एखादी संस्था असावी. त्यातूनच या संस्थेची निर्मिती झाली. वयोवृद्धांचा एकटेपणा दूर करणे, त्यांना तंत्रज्ञानविषयक माहिती देणे जेणेकरून रोजच्या कामात मदत होईल अशी कामं ही संस्था करते.
अशा कित्येक संस्थांच्या निर्मितीमागे असलेले नाव म्हणजे रतन टाटा. टाटा समूहाची जबाबदारी त्यांनी जेआरडी टाटा यांच्याकडून मार्च 1991 मध्ये रतन टाटांकडे आली. मार्च 1991 ते डिसेंबर 2012 पर्यंत त्यांनी ही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे, भारतीयांची सोय हेच मुख्य सूत्र जाणवते. ही सोय करत असताना त्यात गुणवत्तेशी, दर्जाही तडजोड न करणारी टाटांची परंपरा, रतन टाटा यांच्या कारकिर्दीत अबाधित राहिली किंबहुना टाटा नावावरील भारतीयांच्या विश्वासात आणखीनच भर पडली.
ग्राहक हित डोळ्यांसमोर ठेवून निर्माण केलेली अशी कित्येक उत्पादने सांगता येतील. त्यापैकीच एक म्हणजे लाखात येणारी नॅनो कार. रतन टाटांना स्कूटरवरून कसरत करत जाणारं चार जणांचं कुटुंब दिसलं आणि त्यातून त्यांना सुचलेली कल्पना म्हणजे नॅनो. यासाठी टाटांना बंगालमधील त्यांचा प्लांट गुजरातमध्ये हलवावा लागला.
बंगालमधील राजकीय कुरघोडींचा फटका त्यांना बसला पण तरीही या सगळ्या दिव्यातून मार्ग काढत 23 मार्च 2009 ला नॅनो लॉन्च केली. भारतातील देशी बनावटीची पहिली कार इंडिका हे देखील त्यांचेच स्वप्न. त्यासाठी तर त्यांनी 1700 कोटींची मोठी आर्थिक जोखीम पत्करली होती. त्यावेळी टेल्को दिवाळखोरीत निघेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती मात्र रतन टाटांनी तडजोड न करता निर्णय तडीस नेला.
यातून त्यांची उद्यमशिलता लक्षात येते. अशी उद्यमशीलता अंगी असल्यानेच मागच्या काही काळात कोरस ही स्टील कंपनी व जग्वार लँड रोव्हर सारख्या बलाढ्य कंपन्या टाटा समूहात सामावून घेतल्या. रतन टाटांच्या काळातील टाटा समूहाची व्यावसायिक प्रगती यावर कितीही भाष्य केलं तरी कमीच. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अन्य पैलू शोधताना प्राण्यांवरील असणारे त्यांचे अपार प्रेम दिसून येते.

ऐसी कळवळ्याची जाती
रतन टाटा यांचे श्वान प्रेम काय नवीन नव्हते. टिटो हा त्यांचा कुत्रा. त्याच्यासोबत ते रमून जायचे. बॉम्बे हाऊस या टाटा समूहाच्या मुख्यालयाच्या आसपास असणारे श्वान यांचा सांभाळ देखील टाटा समूहाकडून केला जातो. नुकताच पंचतारांकित ताज हॉटेलमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात एक भटका कुत्रा थेट हॉटेलच्या इमारतीत आतमध्ये निवांत झोपला होता. ताज हॉटेल परिसरातील श्वानांना थेट प्रवेश देण्याच्या सूचना रतन टाटांच्याच. हे सगळे आपणास सर्वश्रुत आहेच पण आणखी एक घटना महत्वाची आहे.
आफ्रिकेतील टांझानिया हा देश. दुर्मिळ खनिजांनी समृद्ध अशा देशातील एक मोठा नॅट्रोन नावाचा तलाव. या तलावाच्या परिसरात 46,000 कोटी घनफूट इतका सोड्याचा साठा आहे. टांझानिया सरकारने या परिसरात सोडा ॲशचा कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी टाटा केमिकल्सला कारखाना स्थापन करण्याची जबाबदारी दिली.
मात्र त्या तळ्याच्या काठी असणारा फ्लेमिंगो पक्षाचा अधिवास त्यामुळे धोक्यात येणार होता. बर्ड लाइफ इंटरनॅशनल या संस्थेने विरोध सुरू केला. टाटा समूहाने देखील फ्लेमिंगो पक्षांच्या अधिवासाचा विचार केला व तो कारखाना स्थापन करण्याचा निर्णय रद्द केला. ही घटना रतन टाटा यांच्याच कारकिर्दीतील. अशा अनेक घटना आहेत ज्यात सामाजिक भानाचा टाटा समूहाने प्राधान्याने विचार केला आहे.






