सतत येणारा अवकाळी पाऊस आणि पावसाळा यात वीज पडून मृत्यू होण्याच्या घटना घडल्यानंतर लगेचच बातम्या प्रसिद्ध होऊ लागतात त्या दामिनी ॲपच्या… ‘आता वीज कुठे पडणार ते 15 मिनिटांत कळणार’, ‘वीज पडून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी वापरा दामिनी ॲप’, ‘आता वीज कोसळण्यापूर्वीच मिळेल ॲलर्ट’… चार वर्ष झाली दामिनी ॲप सुरू होऊन मात्र तरीही वीज पडून मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो (NCRB) च्या अहवालानुसार 2022 ते 2023 साली नैसर्गिक आपत्तींमुळे देशात 8,060 जणांचा मृत्यू झाला तर वीज पडून 35.8% म्हणजेच 2,887 लोकांचा मृत्यू झाला. वीज पडून संपूर्ण देशात झालेल्या मृत्यू पैकी तब्बल 29 टक्के मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. भारतात वीज पडल्यामुळे दरवर्षी दोन हजारांहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळे मग वीजेपासून बचाव करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने तयार केलेल्या ‘दामिनी ॲप’चा उपयोग काय असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

‘’अशा कुठल्या ॲपची माहिती असती तर ती वाचली तरी असती…’’
गेल्याच महिन्यात शेतात कांदे झाकायला गेले असताना अहमदनगर येथील श्रीगोंदा तालुक्याच्या येवती गावातील मीना आढाव आणि त्यांच्या मुलगा नवनाथ आढाव या मायलेकाचा वीज पडून मृत्यू झाला होता. सरकारच्या या ‘दामिनी ॲप’ संबंधी ‘बाईमाणूस’शी बोलताना मृत मीना आढाव यांचे भाचे सचिन ठोंबरे यांनी असा एखादा ‘ॲप’ असतो यावरच आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले की, मला नाही वाटत की गावकऱ्यांना या ‘दामिनी ॲप’ बद्दल माहित असेल. असा काही ‘दामिनी ॲप’ असतो हे तर तुम्ही बोलताय म्हणून मलाच पहिल्यांदा कळतयं. जर या ‘दामिनी ॲपबद्दल मला माहित असतं किंवा गावामध्ये त्यासंदर्भात जनजागृती झाली असती तर कदाचित माझी मामी आणि माझा मामेभाऊ वाचले तरी असते.”
सचिन ठोंबरे यांचीही ही एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे. खरं म्हणजे ‘दामिनी ॲप’बद्दल महाराष्ट्रातील अनेक भागात फारशी माहिती नाही. त्यापूर्वी हा ‘दामिनी ॲप’ नेमका काय आहे आणि तो कसा कार्यरत होतो हे बघू…
‘दामिनी ॲप’ काय आहे?
पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपीकल मेटरोलॉजी (IITM) ही भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणारी या स्वायत्त संशोधन संस्था आहे. या संस्थेने 2020 मध्ये ‘दामिनी लाईटनिंग’ ॲप विकसित केले आहे. संस्थेने वीज प्रवण क्षेत्र अचूकरित्या शोधण्यासाठी देशभरात 83 ठिकाणी लाईटनिंग लोकेशन नेटवर्क उभारले आहेत. या नेटवर्कचा सेंट्रल प्रोसेसर हा IITM या संस्थेत आहे. हा प्रोसेसर या नेटवर्ककडून आलेले सिग्नल रिसिव्ह करतो, त्यावर प्रक्रिया करतो आणि मग 500 मीटर पेक्षा कमी अचूकतेसह वीज पडणारे ठिकाण ओळखतो. हे ॲप संपूर्ण भारतात घडणाऱ्या विजेच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहे. व्यक्तीच्या जीपीएस लोकेशेनद्वारे तो राहत असलेल्या ठिकाणापासून 20 ते 40 किलोमीटर अंतरावर वीज पडणार की नाही, याची पूर्वसूचना हे ॲप देतं.

आता इतके महत्वाचे संशोधन जर भारताने केले असेल तर मग लोकांपर्यंत ते हा पोहचलं नाही याविषयावर ‘बाईमाणूस’ने महाराष्ट्रातील काही गावकऱ्यांशी, सरपंचांशी आणि अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधला असता, गावकऱ्यांना आणि सरपंचांना या ॲप बद्दल कुठलीच कल्पना देण्यात आलेली नाहीये असे लक्षात आले.
माहितीच्या अभावाबद्दल बोलताना छत्रपती संभाजीनगरमधील कृषी जिल्हा अधीक्षक प्रकाश देशमुख म्हणाले, “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपीकल मेटरोलॉजी या भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणारी स्वायत्त संशोधन संस्था यांच्याद्वारे ‘दामिनी लाईटनिंग ॲप’ तयार करण्यात आले. 2020 पासून ते ॲप सर्व लोकांपर्यंत पोहोचवावे अशा सूचना आम्हाला आल्या होत्या. तालुक्यापासून ते गावपातळीपर्यंत 15 मे ते 15 जून या दरम्यान खरीप हंगाम प्रशिक्षण गावोगावी दिले जाते. याच प्रशिक्षणादरम्यान आम्ही ह्या ॲपबद्दलची माहिती शेतकऱ्यांना सांगतो. तसेच सरपंचांच्या व्हाट्सअप ग्रुप वर देखील वेळोवेळी ही माहिती पोहचवण्यात येते.”
शिवाजी बावणे हे लातूर जिल्ह्यातील तांदुळजा गावाचे सरपंच आहेत. त्यांना या ॲपबद्दल विचारले असता ते म्हणाले, असलं कोणतंही ॲप मला माहित नाही. या ॲपबद्दल गावकऱ्यांना माहिती सांगा अशाप्रकारच्या कोणत्याही सुचना आम्हाला आलेल्या नाहीत.
…तर मग ‘दामिनी ॲप’ची जनजागृती करणे आवश्यक
महिला राजसत्ता आंदोलनाच्या अध्यक्षा मालती सगणे म्हणाल्या, या दामिनी ॲपबद्दल ना मी कोणते पोस्टर बघितले ना कोणाला याविषयी बोलतांना ऐकलं. माझ्या संपर्कामध्ये जितक्या शेतकरी महिला आहेत, त्यांचे वेगवेगळे ग्रुप आहेत त्यात एकदाही ह्या दामिनी ॲपचा उल्लेख झालेला नाहीये. जर झाला असता तर आम्ही स्वतः याबद्दल अनेकांनी माहिती दिली असती. जनजागृती केली असती. पण एवढ्या महत्वाच्या दामिनी ॲप बद्दल आम्हालाच माहिती नाहीये.
रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंटचे संचालक भीम रासकर यांच्याशी संवाद साधल्यावर ते म्हणाले, मुळात मला ह्या दामिनी ॲपबद्दल माहितीच नाहीये. पण विजेपासून बचावासाठी जर हे ॲप महत्वाचं असेल तर नक्कीच शेतकऱ्यांना या ॲपचा फायदा होऊ शकतो. ह्या ॲपबद्दल दैनिकांमधून, मासिकांमधून माहिती देणं आवश्यक होतं. सर्वात महत्वाचं बघायला गेलं तर गावागावांमध्ये आता व्हाट्सअप ग्रुप तयार आहेत त्या ग्रुप वर सरपंचांच्या मार्फत ही माहिती देणं आवश्यक होतं. महाराष्ट्रात 28,349 पंचायती आहेत त्या पंचायती पर्यंत जरी ह्या ॲप बद्दल माहिती पोहोचली असती तर ते गावकऱ्यांकडे पोहोचणं शक्य झालं असतं. मीडिया मार्फत रेडिओ मार्फत या संदर्भात जनजागृती केली तर नक्कीच ह्या ॲपचा उपयोग शेतकऱ्यांना होईल.”

वीज पडणं ही आपल्या देशात नैसर्गिक आपत्ती मानली जात नाही. वीज पडून होणाऱ्या मृत्यूंपैकी 96 टक्के मृत्यू ग्रामीण भागात होतात. अशा स्थितीत ग्रामीण भागात अशाप्रकारच्या दामिनी ॲपची माहिती देणं गरजेचं आहे. देशात दरवर्षी वीज कोसळण्याच्या घटना सरासरी एक कोटीहून अधिक प्रमाणात घडतात, यावरुनच या समस्येची तीव्रता समजू शकते. या घटनांमध्ये साधारणत: दोन ते अडीच हजार लोकांचा मृत्यू होतो. भारताप्रमाणेच जगाचीही तीच स्थिती आहे. जगभरात वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं. चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयातील प्राध्यापक तथा भूगोल, वातावरण, वन्यजीव विषयाचे अभ्यासक डॉ. योगेश दूधपचारे यांनी या अभ्यासाची माहिती दिली आहे. विज पडायची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, याचा हवामान बदला सोबत सरळ संबंध जोडला जातोय. हवामानाच्या एखाद्या गोष्टीवर नियंत्रण साधले जाऊ शकेल परंतु वीज पडण्यावर नियंत्रण अन्य अत्यंत कठीण काम आहे. वीज पडून मृत्यू मात्र गरिबांचाच जास्त होतोय. एका संशोधनातून मिळालेली आकडेवारी सांगते की 66% मृत्यू हे पुरुषांचे आणि 34% स्त्रियांचे आहेत. 62% हे वयस्क लोकांचे आणि 38% हे मुलांचे आहेत.
जर दामिनी ॲप वापरायचा असेल तर…?
दामिनी ॲप गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ते डाऊनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर ‘Damini : Lightning Alert’ असे सर्च करायचे. हे ॲप डाऊनलोड केले की जीपीएस लोकेशन ऑन ठेवण्यासाठी परवानगी द्यायची आहे. त्यानंतर हे ॲप तुमचे लोकेशन शोधेल आणि तुमच्या ठिकाणापासून 40 किलोमीटरच्या अंतरापर्यंत एक वर्तुळ काढेल. आणि मग तुमच्या भागात पुढच्या 15 मिनिटांत वीज पडण्याची शक्यता आहे की नाही ते सांगेल. या प्रक्रियेसोठी थोडा वेळ लागेल. वीज पडणार नसेल, तर No Lightning Warning किंवा बिजली की चेतावनी नही, अशी सूचना तिथे दिलेली असेल. पण जर वीज पडणार असेल आणि त्या वर्तुळात लाल रंग दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या भागात पुढच्या 5 मिनिटांत वीज पडण्याची शक्यता असते. वर्तुळात पिवळा रंग दिसत असेल, तर 5 ते 10 मिनिटांत वीज पडण्याची शक्यता असते आणि निळा रंग असेल, तर 10 ते 15 मिनिटांत वीज पडण्याची शक्यता असते.

दामिनी ॲपवर खबरदारीच्या सूचना
या ॲप वरील Instructions या पर्यायात तुम्ही जर वीज प्रवण क्षेत्रात असाल तर काय खबरदारी घ्यायची, याच्या सूचना दिल्या आहेत. या ॲपवरील Register या पर्यायावर क्लिक करून तुम्ही इथे नोंदणी करू शकता. नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता, पिनकोड, व्यवसाय ही माहिती भरून तुम्ही या ॲप वर नोंदणी करू शकता. त्यानंतर मग तुम्हाला तुमच्या भागात वीज पडण्यासंदर्भात पूर्वसूचना दिली जाते. जून-जुलैचा महिना लक्षात घेत महाराष्ट्रातील जिल्हा प्रशासनांनी दामिनी ॲप वापरण्याचं आवाहन सर्वसामान्य जनतेला केलं आहे.





